Airplane Takeoff and Landing Safety Rules : विमानाने नियमित प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाने एक सूचना अनेकदा ऐकलेली असते. ती म्हणजे, “कृपया टेकऑफ आणि लँडिंगदरम्यान आपली सीट पूर्णपणे सरळ स्थितीत ठेवा…” अनेक प्रवाशांना ही सूचना सीटबेल्ट लावणे किंवा मोबाईल फोन फ्लाइट मोडवर ठेवण्याइतकीच साधी वाटते; पण प्रत्यक्षात हा केवळ एक नियम नसून त्यामागे प्रवाशांच्या सुरक्षेचे मोठे गणित दडलेले आहे. अनेक वर्षांच्या विमान अपघातांच्या चाचण्या, मृतदेहांचे संशोधन आणि प्रत्यक्ष आपत्कालीन परिस्थितीच्या सखोल अभ्यासावर हा नियम आधारित आहे, त्याविषयी…
सीट सरळ ठेवण्याचा नियम का आहे?
प्रत्येक प्रवासी विमानात आसन व्यवस्था बसवण्यापूर्वी अत्यंत कठोर सुरक्षा चाचणी केली जाते. अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने यासाठी ’14 CFR 25.562′ हा सुरक्षा नियम तयार केलेला आहे. त्यानुसार, विमानात सीट बसवण्यापूर्वी अभियंते त्यावर एक कृत्रिम मानवी पुतळा बसवतात आणि त्याला वेगाने जमिनीवर आदळतात. हा प्रयोग आपत्कालीन लँडिंग आणि विमान क्रॅश होण्याच्या घटनेसारखाच केला जातो. या संपूर्ण चाचणीतील सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, ती नेहमी सीट पूर्णपणे सरळ स्थितीत लॉक करूनच केली जाते. अशा स्थितीत सीट, तिची फ्रेम आणि विमानाच्या मजल्याशी जोडणारे ट्रॅक हे एक मजबूत आणि एकसंध संरचनेप्रमाणे काम करतात, त्यामुळे अपघाताच्या वेळी किंवा जास्त दणका बसल्यास प्रवाशाला सुरक्षित ठेवणे शक्य होते.
सीट मागे झुकवली तर धोका का वाढतो?
विमानात प्रवास करताना सीट थोडीशी जरी मागे झुकलेली असेल, तर सुरक्षेची सर्व गणिते पूर्णपणे बिघडतात. कारण सीट मागे झुकलेल्या स्थितीत प्रवाशाचे योग्य प्रकारे रक्षण करण्यासाठी तिची रचना केलेली नसते आणि तशी कोणतीही चाचणी घेतलेली नसते, त्यामुळे पूर्णपणे सरळ असलेली सीट तिचे सुरक्षेचे काम योग्य प्रकारे करू शकते. मात्र, टेकऑफ आणि लँडिंगसारख्या सर्वाधिक धोकादायक टप्प्यांमध्ये सीट मागे झुकवली असेल तर ती अपघाताच्या वेळी अपेक्षित संरक्षण देईल याची खात्री देता येत नाही. विमानातील सीटबेल्ट हा दिसायला साधा असला, तरी तो प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारमध्ये वापरल्या जाणाऱ्या तीन-बिंदू सीटबेल्टऐवजी विमानात दोन-बिंदूंचा लॅप बेल्ट वापरलेला असतो. आपल्या शरीराचा सर्वांत मजबूत भाग असलेल्या कंबरेच्या हाडांवर घट्ट बसण्यासाठी त्याची रचना केलेली असते.
शरीरावर नेमका काय परिणाम होतो?
प्रवासी सरळ बसलेला असेल तर त्याच्या कंबरेचा आणि पाठीचा भाग सीटवर व्यवस्थित टेकलेला असतो. अशावेळी अचानक धक्का बसल्यास किंवा आपत्कालीन लँडिंग झाल्यास निर्माण होणारा जोर थेट कमरेखालच्या हाडांवरच पडतो, त्यामुळे शरीरातील इतर अंतर्गत अवयवांना तुलनेने कमी इजा होते. मात्र, सीट मागे झुकवल्यास शरीराची स्थिती बदलते. कंबरेचा भाग किंचित पुढे सरकतो आणि शरीराचा कोन बदलतो. अशा वेळी अचानक जोराचा धक्का बसल्यास प्रवाशाचे शरीर सीटबेल्टच्या खाली घसरू शकते. या धोकादायक परिस्थितीला विमान सुरक्षा तज्ज्ञ “सबमरीनिंग” असे म्हणतात. या घटनेचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या क्रॅश टेस्ट डमीमध्ये कमरेखालच्या भागात विशेष सेन्सर्स बसवलेले असतात, जे अशा हालचालींची नोंद करतात.
सीट सरळ ठेवण्यामागे वैज्ञानिक कारण काय?
जर सीटबेल्ट मजबूत हाडांवर न राहता पोटाच्या मऊ भागावर सरकला, तर अपघाताच्या वेळी निर्माण होणारा संपूर्ण जोर पोटातील अंतर्गत अवयव आणि मणक्याच्या खालच्या भागावर पडतो, त्यामुळे गंभीर दुखापत होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो; म्हणूनच टेकऑफ आणि लँडिंगदरम्यान सीट पूर्णपणे सरळ ठेवण्याच्या नियमाला विमान सुरक्षेमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले जाते. सीट मागे झुकवल्यामुळे निर्माण होणारी पहिली आणि महत्त्वाची समस्या म्हणजे भौतिकशास्त्राचा नियम. एखादी सीट मागे झुकवल्यास आणि त्याचवेळी अचानक मोठा धक्का बसल्यास त्याच्या शरीराला वेगाने पुढे जाण्यासाठी जास्त जागा मिळते, त्यामुळे समोरील एखाद्या कठीण वस्तूवर त्याचे डोके किंवा शरीर आदळून गंभीर दुखापत होऊ शकते. अपघाताच्या धक्क्यातून वाचणे ही सुरक्षेची केवळ अर्धीच बाजू आहे. उरलेली सर्वांत महत्त्वाची बाजू म्हणजे विमानातून लवकरात लवकर बाहेर पडणे.
अपघातानंतर सीटची स्थिती का महत्त्वाची असते?
एखाद्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग किंवा अपघात झाल्यास सीट सरळ असलेल्या प्रवाशांना तुलनेने कमी इजा होते. त्यानंतर शक्य तितक्या कमी वेळेत त्यांना विमानातून सुरक्षितपणे बाहेर काढणेही सोपे जाते. चाचणीदरम्यान विमान कंपन्यांना पूर्ण क्षमतेने भरलेले विमान केवळ निम्मे आपत्कालीन दरवाजे उघडे असतानाही ९० सेकंदांच्या आत रिकामे करून दाखवावे लागते. या प्रक्रियेत प्रत्येक इंच जागा महत्त्वाची ठरते. जर एखाद्या प्रवाशाने सीट मागे झुकवली असेल, तर त्यामागील रांगेतील प्रवाशांच्या पायाजवळील जागाही कमी होते, त्यामुळे त्यांना बाहेर पडताना अतिरिक्त अडथळ्यांचा सामना करावा लागतो. शिवाय, अपघाताच्या धक्क्यामुळे सीट अचानक मागे झुकल्यास ती थेट मागील प्रवाशाला धडकू शकते, त्यामुळे एका रांगेतही असा अडथळा आल्यास अनेक प्रवाशांना विमानातून वेळेवर बाहेर पडण्यास अडथळा येऊ शकतो. याच कारणामुळे आपत्कालीन दरवाज्यांजवळील सीट्स मागे झुकणार नाहीत, अशा प्रकारे लॉक केलेले असतात. तसेच प्रत्येक टेकऑफ आणि लँडिंगपूर्वी विमानातील केबिन कर्मचारी सर्व सीट्स सरळ स्थितीत आहेत की नाहीत याची खात्री करतात. हा केवळ शिष्टाचाराचा भाग नसून, अत्यावश्यक सुरक्षा प्रक्रिया आहे.
हा नियम संपूर्ण प्रवासभर लागू का नसतो?
सीट सरळ ठेवण्याचा नियम संपूर्ण प्रवासभर लागू नसण्यामागेही ठोस कारण आहे. विमान अपघातांची सर्वाधिक शक्यता टेकऑफ आणि लँडिंगदरम्यानच असते. या टप्प्यात विमान जमिनीच्या खूपच जवळ असते आणि काही गडबड झाल्यास ती सावरण्यासाठी वैमानिकाला अत्यंत कमी वेळ मिळतो. याउलट विमान उंच आकाशात असतानाचा प्रवास हा सांख्यिकीयदृष्ट्या प्रवाशांसाठी अत्यंत सुरक्षित मानला जातो. म्हणूनच विमान एका विशिष्ट उंचीवर पोहोचल्यानंतर प्रवाशांना सीट मागे झुकवण्याची परवानगी दिली जाते. बहुतेक विमानप्रवास कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण होतात आणि अनेकदा सीट सरळ ठेवण्यामुळे मिळणाऱ्या त्या काही अतिरिक्त क्षणांची गरजही भासत नाही. मात्र विमानातील सीट, सीटबेल्ट, ‘ब्रेस पोझिशन’ आणि ९० सेकंदांत विमान रिकामे करण्याची संपूर्ण सुरक्षा व्यवस्था एका महत्त्वाच्या गृहितकावर आधारित असते. केबिन कर्मचारी टेकऑफ आणि लँडिंगपूर्वी सीट सरळ करण्यास सांगतात, तेव्हा प्रत्येक प्रवाशाला त्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे लागते, म्हणूनच हा नियम केवळ औपचारिकता नसून, प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक मानला जातो.
