Three Indians Killed in US Attack: पश्चिम आशियात अमेरिका व इराण यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला आहे. या संघर्षा दरम्यान मागील तीन दिवसांत भारतीय खलाशी असलेल्या दोन जहाजांना अमेरिकेने लक्ष्य केले आहे. ओमानच्या समुद्रात जहाजांवर हल्ले करण्यात आले. बुधवारी (१० जून) अमेरिकेने २४ भारतीय खलाशी असलेल्या ‘टँकर सेटेबेल्लो’ या जहाजावर हल्ला केला होता. या हल्ल्यात तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर २१ जणांना ओमानच्या हवाई दलाने वाचवले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती दिली. या हल्ल्याच्या दोन दिवसांपूर्वी ‘मॅरिव्हेक्स’ या जहाजावर हल्ला करण्यात आला होता. ‘मॅरिव्हेक्स’ जहाजावर असलेल्या २४ भारतीय खलाशांना सुखरूप वाचवण्यात आले होते.
व्यावसायिक जहाजांवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत भारताने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी पी. हरीश म्हणाले, या हल्ल्यांमध्ये अनेक भारतीय नागरिकांनी प्राण गमावले आहेत. तर काही जण बेपत्ता आहेत. भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि हित आमच्यासाठी सर्वतोपरी आहे, असे हरीश म्हणाले. ओमानच्या किनारपट्टी जवळ असलेल्या ‘सेटेबेल्लो’ या व्यावसायिक जहाजावर केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ अमेरिकेने पोस्ट केला आहे. व्यावसायिक जहाजांवर झालेल्या हल्ल्याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अभिमान व्यक्त केला आहे. दरम्यान, भारताने अमेरिकेच्या दिल्लीतील वरिष्ठ दूतांना हल्ल्याचा निषेध करत समन्स बजावले होते. त्यानंतर ट्रम्प यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मागील तीन दिवसांत नेमके काय घडले? याविषयी जाणून घेऊ.
३ दिवसांत २ हल्ले; सेटेबेल्लो टँकरवर हल्ला कसा झाला?
अमेरिकेने सेटेबेल्लो ऑइल टँकर जहाजाच्या थेट इंजिन रूमवर हल्ला केला. त्यावेळी जहाज होर्मुझ सामुद्रधुनीच्या जवळ व ओमानच्या आखातात होते. या हल्ल्यानंतर जहाजात आग लागली. अमेरिकेच्या यूएस सेंट्रल कमांडने ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर करून हल्ला केल्याची माहिती दिली. अमेरिकन नौदलाची नाकाबंदी भेदल्यामुळे ओमानच्या आखातात एका ऑइल टँकरवर हल्ला केल्याची माहिती अमेरिकन लष्कराने दिली.
A U.S. aircraft struck the engine room of the Palau-flagged tanker M/T Settebello in the Gulf of Oman late Monday after its crew repeatedly refused to comply with American orders. It is the second tanker CENTCOM has disabled in two days for attempting to transport Iranian oil in… pic.twitter.com/3kTk0S6Cwh
— Open Source Intel (@Osint613) June 10, 2026
“यूएस सेंट्रल कंमांड (सेंटकॉम)ने पलाउ या देशाचा ध्वज असलेल्या M/T सेटेबेल्लो या जहाजाला ओमानच्या आखातात निष्क्रिय केले. यूएसच्या एअरक्राफ्टमधून जहाजाच्या इंजिन रूमवर हल्ला करण्यात आला. अमेरिकन सैन्याने दिलेले इशारे जहाजाने जुमानले नाही”, अशी माहिती पोस्टमधून देण्यात आली.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याची तीव्र निंदा केली आहे. ओमानमधील भारतीय दूतावास ओमानी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे. मदत व बचाव कार्यात ओमान सहकार्य करत आहे, अशी माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली. ब्रिटिश मरिटाइम सेक्युरिटी फर्म ‘अँम्ब्रे’ने दिलेल्या माहितीनुसार, हा अमेरिकन नौदलाने केलेल्या नाकाबंदीमुळे झालेला हल्ला आहे. तर दुसऱ्या एका सूत्राने सांगितले, जहाजावर अमेरिका क्षेपणास्त्राने हल्ला करणार असल्याची शक्यता होती.
भारताकडून तीव्र निषेध
या घटनेनंतर भारताने बुधवारी (१० जून) अमेरिकेचे प्रभारी राजदूत जेसन मीक्स यांना समन्स बजावले. ओमानच्या किनारपट्टीवर ‘सेटेबेल्लो’ या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव नागराज नायडू यांनी मीक्स यांना समन्स बजावले आणि आखाती प्रदेशात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या हल्ल्याबाबत चिंता व्यक्त केली.
Our statement on the attack on a commercial vessel off the coast of Oman ⬇️https://t.co/w405oJsHmZ pic.twitter.com/m0U3U81hQn
— Randhir Jaiswal (@MEAIndia) June 10, 2026
मॅरिव्हेक्स तेलवाहू जहाजावर हल्ला कसा झाला?
ओमानच्या आखातात सोमवारी (८ जून) २४ भारतीय खलाशी असलेल्या व पलाऊ या देशाचा ध्वज लावलेल्या ‘एमटी मॅरिव्हेक्स’ या तेलवाहू जहाजाला भीषण आग लागली. काही तासांनंतर ओमान हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे जहाजावरील सर्व कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. मस्कत मधील भारतीय दूतावासाने सोशल मीडिया पोस्टद्वारे सर्व २४ भारतीय कर्मचाऱ्यांची सुटका केल्याबद्दल ओमानच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले. मॅरिव्हेक्सच्या कर्मचाऱ्यांनी पाठवलेल्या आपत्कालीन संदेशाच्या ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये जहाजावरील एक कर्मचारी असे म्हणताना ऐकू येत आहे की, इंजिन रूमवर अमेरिकन नौदलाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर जहाजाला आग लागली.
हिंदूस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, “मॅरिव्हेक्स हे जहाज भारताच्या मालकीचे नाही. गेल्या काही दिवसांत या जहाजाने इराणी बंदरांवरील अमेरिकेची नाकेबंदी चुकवण्याचे चार प्रयत्न केले. तीन प्रसंगी, अमेरिकन नौदलाने वारंवार दिलेल्या इशाऱ्यांनंतर हे जहाज मागे फिरले होते.” सूत्रांनी सांगितले की, मॅरिव्हेक्सने सोमवारी (८ जून) ओमानच्या जलसीमेतून प्रवास करून अमेरिकेची नाकेबंदी चुकवण्याचा चौथा प्रयत्न केला. पकडले जाणे टाळण्यासाठी जहाजाने आपली ट्रॅकिंग उपकरणे बंद केली होती.
अमेरिकेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली?
मॅरिव्हेक्सवरील हल्ल्यात अमेरिकेने या कारवाईची जबाबदारी स्वीकारली आहे. ८ जून रोजी सेंटकॉमने दावा केला की, ‘यूएसएस अब्राहम लिंकन’ या युद्धनौकेवरून उड्डाण केलेल्या एफ/ए-१८ सुपर हॉर्नेट लढाऊ विमानाने जहाजाच्या इंजिनिअरिंग आणि स्टीअरिंग कंपार्टमेंटला (नियंत्रण कक्ष) लक्ष्य करून अचूक हल्ला केला. जहाजाने अमेरिकेच्या सूचनांचे पालन केले नाही आणि सध्या सुरू असलेली नाकेबंदी झुगारून इराणी बंदराच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सेंटकॉमने केला आहे. या हल्ल्यामुळे जहाज निकामी झाले, पण ते बुडाले नाही, असे सेंटकॉमने म्हटले आहे. मे महिन्याच्या उत्तरार्धात, मस्कतच्या पूर्वेला सुमारे ६० सागरी मैल (नॉटिकल मैल) अंतरावर आणखी एका तेलवाहू जहाजावर हल्ला झाला होता, तर या वर्षाच्या सुरुवातीला इराणने ओमानच्या खसाब बंदराजवळ एका जहाजावर हल्ला केला होता.
