जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेत मध्यावधी निवडणुकीसाठी आज (३ नोव्हेंबर) मतदान होत आहे. या निवडणुकीच्या निकालातून अमेरिकेतील सत्तासंतुलन, विविध राज्यांतील राज्यपाल आणि स्थानिक पातळीवरील हजारो पदांचे भवितव्य ठरणार आहे. बहुतांश जनमत चाचण्यांमध्ये सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाला या निवडणुकीत मोठा फटका बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसे झाल्यास डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या उर्वरित दोन वर्षांतील कारभाराची दिशा बदलू शकते. अमेरिकेच्या सत्तेची सूत्रे हाती घेतल्यापासून ट्रम्प यांनी अनेक वादग्रस्त आणि परिणामकारक निर्णय घेतले. त्यांच्या बहुतांश निर्णयांचा जागतिक अर्थव्यवस्थेसह जगभरातील सर्वसामान्य कुटुंबांच्या घरखर्चावरही मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले. त्यामुळे या निकालांचे परिणाम केवळ अमेरिकेपुरते मर्यादित न राहता जगभरात उमटण्याची शक्यता आहे.

२०२४ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे दमदार पुनरागमन

अमेरिकेत २०२४ मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार आणि तत्कालीन उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचा पराभव केला होता. या विजयासह त्यांनी अमेरिकेच्या राजकारणात जोरदार पुनरागमन केले. ट्रम्प यांचा यापूर्वीचा राजकीय प्रवास अनेक वादांनी भरलेला होता. अमेरिकेच्या इतिहासात दोन वेळा महाभियोगाला सामोरे जाणारे ते पहिले अध्यक्ष ठरले होते. तसेच गुन्हेगारी प्रकरणात दोषी ठरलेले ते पहिले माजी अध्यक्ष आणि पदावर असताना दोषी ठरलेले पहिले विद्यमान अध्यक्षही होते. असे असतानाही दोन प्रमुख मुद्द्यांवर दिलेल्या आश्वासनांमुळे ट्रम्प यांना २०२४ च्या निवडणुकीत मोठा विजय मिळाला. अमेरिकेच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी बेकायदा स्थलांतरावर नियंत्रण आणणे आणि स्थलांतरविषयक धोरण अधिक कठोर करणे हे त्यांचे पहिले आश्वासन होते, तर वाढती महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांवर पडणारा आर्थिक भार कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते.

स्थलांतरावर नियंत्रण, पण महागाईचा प्रश्न कायम

स्थलांतराच्या मुद्द्यावर ट्रम्प प्रशासनाने घेतलेल्या निर्णयांचे परिणाम दिसून आले. या धोरणांवरून वाद निर्माण झाले असले, तरी मध्यावधी निवडणुकीत स्थलांतर हा सर्वात मोठा मुद्दा राहण्याची शक्यता कमी आहे. अमेरिकेत प्रवेश करणाऱ्या स्थलांतरित आणि निर्वासितांची संख्या तसेच जारी करण्यात येणाऱ्या व्हिसांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. दुसरीकडे, स्थलांतरितांना ताब्यात घेण्याच्या आणि त्यांची देशातून हकालपट्टी करण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मात्र, अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर ट्रम्प प्रशासनाच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहेत. बहुतांश जनमत चाचण्यांनुसार, मध्यावधी निवडणुकीत मतदार कोणत्या मुद्द्याच्या आधारे मतदान करतील, हे ठरवण्यात अर्थव्यवस्था सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. विशेष म्हणजे, अर्थव्यवस्थेच्या हाताळणीबाबत ट्रम्प यांना मिळणारा जनतेचा पाठिंबा ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचला असून त्यात आणखी घट होत असल्याचे विविध जनमत चाचण्यांमधून दिसून येत आहे.

अमेरिकेची अर्थव्यवस्था तेजीत, मग अडचण नेमकी कुठे?

अमेरिकेची अर्थव्यवस्था खरोखरच वेगाने वाढत आहे का? तर याचे उत्तर होय असेच आहे. अनेक आर्थिक आघाड्यांवर अमेरिकेची कामगिरी चांगली दिसून येत आहे. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेचा आर्थिक विकासदर चांगला राहिला आहे. अर्थव्यवस्थेचा मोठा आकार आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्या कार्यकाळात घेतलेल्या अनेक धोरणात्मक निर्णयांमुळे निर्माण झालेले अडथळे असूनही अमेरिकेच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात (GDP) वाढ झाली आहे. जानेवारी २०२५ मध्ये ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा अमेरिकेचा जीडीपी सुमारे २९.९ ट्रिलियन डॉलर होता. त्यानंतर दोन तिमाहींचा अपवाद वगळता अमेरिकेच्या जीडीपीने अनेकदा अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. आता हा आकडा ३३ ट्रिलियन डॉलरवर पोहोचला आहे.

अमेरिकेच्या दरडोई उत्पनात वाढ; शेअर बाजारातही तेजी

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) अंदाजानुसार, २०२४ मध्ये अमेरिकेतील दरडोई उत्पन्न ८६ हजार ४०० डॉलर होते. २०२६ मध्ये ते वाढून ९५ हजार २०० डॉलर झाले आहे. म्हणजेच ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या दोन वर्षांत अमेरिकेच्या दरडोई जीडीपीमध्ये सुमारे ८ हजार ८०० डॉलरची वाढ झाली आहे. त्या तुलनेने याच काळात भारताचा दरडोई जीडीपी २ हजार ५९० डॉलरवरून २ हजार ७५० डॉलर, चीनचा १३ हजार ४४० डॉलरवरून १५ हजार ३७० डॉलर, तर फ्रान्सचा ४६ हजार ३०० डॉलरवरून ५१ हजार ४५० डॉलर झाला आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील या वाढीचा परिणाम शेअर बाजारातही दिसून येत आहे. अमेरिकेतील शेअर बाजारांमध्ये मोठी तेजी पाहायला मिळत आहे. जीडीपीमध्ये वेगाने वाढ होत असल्यामुळे अमेरिकेतील बेरोजगारीचा दरही तुलनेने कमी आणि स्थिर राहिला आहे.

आर्थिक विकासाचा वेग कायम, मग मतदार नाराज का?

डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळापूर्वीही अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर ही प्रमुख समस्या नव्हती. करोना महामारीपूर्वीच्या आर्थिक विकासाच्या पातळीवर पुन्हा पोहोचणारी अमेरिका ही एकमेव प्रमुख अर्थव्यवस्था ठरली होती. म्हणजेच करोना आला नसता, तर अमेरिकन अर्थव्यवस्थेला अधिकच भरभराट मिळाली असती. अमेरिकेतील खरी समस्या आर्थिक विकासदराची नसून सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या खर्चाची आहे. त्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. पहिली म्हणजे वस्तू आणि सेवांच्या किमती म्हणजेच महागाईचा दर किती वेगाने वाढत आहेत, तर दुसरी म्हणजे नागरिकांचे वेतन किंवा उत्पन्न किती वेगाने वाढत आहे. ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर महागाईचा दर पुन्हा वाढू लागल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. जानेवारी २०२५ मध्ये महागाईचा दर २.४ टक्के होता. मात्र, त्यानंतर तो पुन्हा या पातळीवर आलेला नाही. उपलब्ध ताज्या आकडेवारीनुसार, महागाईचा दर ३.७ टक्क्यांवर पोहोचला आहे. हा दर अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने निश्चित केलेल्या दोन टक्क्यांच्या उद्दिष्टाच्या जवळपास दुप्पट आहे.

ट्रम्प यांच्या कार्यकाळात महागाईचा दर ३.७ टक्क्यांवर

महागाई वाढण्यामागे ट्रम्प प्रशासनाच्या धोरणात्मक निर्णयांचा मोठा वाटा आहे. अमेरिकेने आजवर विविध देशांवर आयात शुल्क लादले आहे. या शुल्काचा आर्थिक भार अखेरीस अमेरिकेतील ग्राहकांवरच पडत आहे. त्यानंतर इराणविरोधातील युद्धामुळे इंधनाच्या किमती आणखी वाढल्या आहेत. इराण युद्ध सुरू झाल्यापासून किरकोळ इंधनाच्या किमतींमध्ये जवळपास ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकीकडे महागाईत वाढत असताना दुसरीकडे अमेरिकेतील सर्वसामान्यांच्या उत्पन्नात प्रत्यक्षात कोणतीही वाढ झाली नाही. महागाईचा परिणाम वजा केल्यानंतर मिळणाऱ्या उत्पन्नवाढीला वास्तविक उत्पन्नवाढ असे म्हणतात. मार्चच्या सुरुवातीपासून अमेरिकेतील कर्मचाऱ्यांच्या वास्तविक उत्पन्नवाढीचा दर प्रत्येक महिन्यात नकारात्मक राहिल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे.

याशिवाय, अमेरिकी सरकारवरील कर्जाचा बोजाही चिंताजनक पातळीवर वाढत आहे. त्यामुळे अमेरिकन सरकारला कर्ज देण्यासाठी गुंतवणूकदारांकडून अधिक व्याजदराची मागणी केली जात आहे. याचा परिणाम सर्वसामान्य अमेरिकन नागरिकांवरही होत आहे. कर्जावरील व्याजदर वाढल्यामुळे घर खरेदीसाठी घेतल्या जाणाऱ्या गृहकर्जासह इतर कर्जेही महाग झाली आहेत. काही प्रकरणांमध्ये गृहकर्जाचे व्याजदर जवळपास ५० टक्यांहून अधिक आहेत. याच कारणांमुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असतानाही आणि शेअर बाजारात तेजी असतानाही अनेक मतदारांमध्ये नाराजी असल्याचे जनमत चाचण्यांमधून दिसून येत आहे. आर्थिक विकासाचे आकडे चांगले असले, तरी त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांच्या खिशापर्यंत पोहोचत नसल्याने ही बाब ट्रम्प प्रशासनासाठी चिंतेची ठरत आहे.

ट्रम्प यांच्या धोरणांचा नागरिकांना कसा बसतोय फटका?

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या धोरणात्मक निर्णयांमुळे अमेरिकन नागरिकांचे नुकसान होत असल्याचे कधीही मान्य केलेले नाही. अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक महिने अर्थव्यवस्थेची स्थिती बिघडत असल्याबाबत त्यांना प्रश्न विचारले गेले. त्यावर प्रत्युत्तर देताना त्यांनी आपले पूर्वसुरी आणि माजी अध्यक्ष जो बायडेन यांनाच जबाबदार धरले. लोकशाहीत मतदारांना सरकारला त्याच्या कामाचा जाब विचारण्याचा अधिकार असतो. अमेरिकेतील मध्यावधी निवडणूक ही ट्रम्प यांच्या धोरणांबाबत मतदारांना आपली भूमिका स्पष्ट करण्याची महत्त्वाची संधी आहे. त्यांच्या निर्णयावर आपण समाधानी आहोत की देशाच्या कारभारात बदल हवा आहे हे मतदार या निवडणुकीच्या माध्यमातून दाखवू शकतात. त्यामुळेच या निवडणुकीच्या कलांकडे भारतासह जगभरातील अन्य देशांचे लक्ष लागून आहे.