ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स राज्याच्या सेसनॉक शहरात भारतीयांना लक्ष्य करणारे स्टिकर्स आढळून आले. या स्टिकर्समध्ये रस्त्यावर शौच करणाऱ्या भारतीय व्यक्तीचे चित्र दाखवण्यात आल्याने त्यावरून मोठा वाद निर्माण झाला. या प्रकाराचा एका स्थानिक खासदाराने तीव्र शब्दांत निषेध केला असून स्थानिकांनी पुढाकार घेऊन तातडीने हे स्टिकर्स हटवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. या स्टिकर्सवर भारतीयांना उद्देशून ‘हीच तुमची संस्कृती आहे का? आम्हाला हे अजिबात आवडत नाही असा मजकूर लिहिण्यात आला आहे. तसेच स्थलांतरितांना तातडीने त्यांच्या मायदेशी पाठवा, अशी मागणीही त्यात करण्यात आली आहे. सेसनॉक शहरातील हंटर परिसरात राहणाऱ्या भारतीय स्थलांतरितांना लक्ष्य करण्यासाठी हे स्टिकर्स लावण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियात भारतविरोधी भावना का वाढत आहे? त्यामागील नेमकी कारणे कोणती? त्याविषयीचा हा आढावा…
भारतीयांना लक्ष्य करणाऱ्या स्टिकर्समध्ये नेमके काय?
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हंटर परिसरात लावण्यात आलेल्या या स्टिकर्समध्ये ऑस्ट्रेलियात परदेशी स्थलांतरितांचे प्रमाण झपाट्याने वाढल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच या यादीत भारतीयांचा क्रमांक सर्वाधिक असल्याचे नमूद करून त्यांना लक्ष्य करण्यात आले आहे. या स्टिकर्सवर ‘स्थलांतरितांना त्यांच्या मायदेशी पाठवा’ असा मजकूर असून त्यात रस्त्यावर शौच करणाऱ्या भारतीय व्यक्तीचे चित्र दाखवण्यात आले आहे. हंटर क्षेत्राचे खासदार डॅन रेपाचोली यांनी १५ ऑक्टोबर रोजी समाजमाध्यमांवर पोस्ट करत भारतीयांना लक्ष्य करणाऱ्या स्टिकर्सचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी या प्रकाराचे वर्णन घृणास्पद वर्णद्वेष असे करताना समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न सहन केले जाणार नाही, असा इशारा दिला आहे. “हा वर्णद्वेषी मूर्खपणा आता थांबायला हवा. असा घाणेरडा प्रचार करणारे भ्याड लोक समाजात राहण्याच्या प्रवृत्तीचे नाही. सेसनॉक तसेच हंटर भागात वर्णद्वेषाला अजिबात स्थान नाही. अशा प्रवृत्तीच्या लोकांकडून पसरवल्या जाणाऱ्या द्वेषापेक्षा आपला समाज कितीतरी चांगला आणि एकसंध आहे,” असे खासदार रेपाचोली यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे. तसेच शहरात वर्णद्वेषी स्टिकर्स आढळून आल्यास स्थानिकांनी ते तातडीने हटवावे. या प्रकाराला जबाबदार असलेल्या लोकांना उगाच प्रसिद्धी देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
जुलै महिन्यातही उफाळून आला होता वाद
ऑस्ट्रेलियात यावर्षी जुलै महिन्यातही असाच वाद निर्माण झाला होता. त्यावेळी हंटर परिसरातील कुर्री कुर्री शहरातील काही समाजकंटकांनी भारतीय स्थलांतरितांना लक्ष्य करणारी पत्रके वाटली होती. हा प्रकार समोर येताच भारतीयांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती. या पत्रकांमध्ये स्थलांतरितांना त्यांच्या देशात परत पाठवण्याची आणि स्थानिक संस्कृती टिकवून ठेवण्याची चिथावणीखोर मागणी करण्यात आली होती. त्यावेळीही खासदार डॅन रिपाचोली यांनी या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध केला होता. हा प्रकार उघडपणे वर्णद्वेषी प्रचार असून समाजात द्वेष आणि फूट पाडण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला होता. “हा वर्णद्वेषी मूर्खपणा आता थांबायला हवा. कुरी परिसरातील घरांच्या लेटरबॉक्समध्ये अशी अत्यंत घाणेरडी आणि वर्णद्वेषी पत्रके टाकण्यात आली असून हे खूपच संतापजनक आहे, असे त्यांनी समाजमाध्यमांवर केलेल्या पोस्टमध्ये नमूद केले होते. या परिसरातील भारतीय व्यावसायिकांना मिळणाऱ्या वागणुकीबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली होती. यापूर्वीही काही भारतीय डॉक्टरांना वर्णद्वेषी टिप्पण्या आणि अपमानास्पद वागणुकीला सामोरे जावे लागले आहे. आता हे भ्याड लोक समाजात अशा घाणेरड्या पत्रकांच्या माध्यमातून द्वेष पसरवण्याचे काम करत आहेत, असे ते म्हणाले होते.
भारतीयांना लक्ष्य करणारे स्टिकर्स कोणी लावले?
सेसनॉक शहरातील भारतीयांना लक्ष्य करणारे स्टिकर्स लावण्यात ‘ऑस्ट्रेलिया फर्स्ट’ या अतिउजव्या विचारसरणीच्या पक्षाचा हात असल्याचा आरोप होत आहे. कारण, या पक्षाने सुरुवातीपासूनच श्वेतवर्णीय राष्ट्रवादाचा पुरस्कार केला असून बहुसांस्कृतिकतेला विरोध करणाऱ्या मोहिमाही राबवल्या आहेत. मात्र, सध्याची स्टिकर्स नेमकी कोणी लावली याबाबत अद्याप कोणाचीही ओळख पटली नसल्याचे स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल आणि दोषींना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील, असे पोलिसांनी सांगितले आहे. गेल्या काही वर्षांत ऑस्ट्रेलियात भारतविरोधी भावना वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. यामागे तेथील आर्थिक, सामाजिक आणि राजकीय घटकांचे एक गुंतागुंतीचे जाळे कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे.
ऑस्ट्रेलियात भारतविरोधी भावना का वाढत आहे?
ऑस्ट्रेलियात भारतविरोधी भावना वाढण्यामागे स्थलांतराचा मुद्दा कारणीभूत असल्याचे समजते. आकडेवारीनुसार, जून २०२५ पर्यंत ऑस्ट्रेलियात जन्मलेल्या भारतीय नागरिकांची संख्या सुमारे ९.७१ लाख होती. २०१५ मध्ये ही संख्या सुमारे ४.४९ लाख होती. म्हणजेच दहा वर्षांत भारतीय वंशाच्या स्थलांतरितांची संख्या दुपटीपेक्षा अधिक झाली आहे. या वाढीमुळे ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदाय अधिक मोठा आणि प्रभावशाली झाला आहे. मात्र, स्थलांतरितांची संख्या वाढत असताना काही स्थानिक नागरिकांमध्ये रोजगार, सार्वजनिक सुविधा आणि लोकसंख्येवरील दबाव याबद्दल चिंता निर्माण झाली आहे. याच अस्वस्थतेचा वापर भारतीय स्थलांतरितांविरोधात केला जात आहे. विशेषतः सोशल मीडियावर ‘ऑस्ट्रेलियात खूप भारतीय आले आहेत’ किंवा ‘आता स्थलांतर थांबवले पाहिजे’ अशा प्रकारच्या पोस्ट फिरताना दिसून येत आहे. ऑस्ट्रेलियन मानवाधिकार आयोगाच्या २०२६ च्या अहवालातही स्थलांतरविरोधी भावना वाढत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. स्थलांतरितांना आर्थिक आणि सामाजिक समस्यांसाठी जबाबदार धरले जात असल्याची चिंता आयोगाने व्यक्त केली आहे. ऑस्ट्रेलियातील घरांच्या उपलब्धतेचा प्रश्न हा स्थलांतरावरील वादातील महत्त्वाचा मुद्दा आहे. सिडनी, मेलबर्न आणि ब्रिस्बेन यांसारख्या शहरांमध्ये घर खरेदी करणे किंवा भाड्याने मिळवणे अनेकांसाठी कठीण झाले आहे. स्थलांतरितांच्या वाढत्या संख्येमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा तेथील नागरिकांचा समज आहे.
स्थलांतरितांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिकांमध्ये अस्वस्थता
ऑस्ट्रेलियातील काही राजकीय नेत्यांनी स्थलांतर कमी केल्यास घरांच्या किमती आणि भाड्यावरील दबाव कमी होईल, असा दावा केला आहे. दुसरीकडे, या समस्येवर उपाय शोधताना केवळ स्थलांतरितांना दोष देणे पुरेसे नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. स्थलांतरावरील राजकीय चर्चा आणि आर्थिक असंतोष याबरोबरच ऑस्ट्रेलियात वंशभेदाच्या घटनाही घडत आहेत. भारतीय वंशाच्या काही नागरिकांना त्यांच्या त्वचेचा रंग, भाषा, उच्चार किंवा मूळ देशावरून अपमानास्पद वागणूक मिळाल्याचे काही वृत्तांमधून समोर आले आहे. ऑस्ट्रेलियन मानवाधिकार आयोगाच्या २०२६ च्या अहवालानुसार, ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या अनेक भारतीयांनी आपल्याला वंशभेदाचा अनुभव आल्याचे सांगितले आहे. ऑस्ट्रेलियात भारतीय वंशाचे अनेक नागरिक माहिती तंत्रज्ञान, आरोग्यसेवा, अभियांत्रिकी, शिक्षण, व्यवसाय आणि इतर क्षेत्रांत काम करतात. कुशल भारतीय व्यावसायिकांची उपस्थिती ऑस्ट्रेलियाच्या अर्थव्यवस्थेला फायदा देत असली, तरी यामुळे काही क्षेत्रांमध्ये नोकऱ्यांसाठी स्पर्धा असल्याची भावना स्थानिक कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.
