Urban Indians Stress Reasons Shocking Report : भारतातील शहरी भागात राहणारे तब्बल ८२ टक्के नागरिक मानसिक तणावात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. जागतिक मानसिक आरोग्य अभ्यासात ८४ देशांमध्ये भारताचे स्थान ६० व्या क्रमांकावर आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, भारतीयांच्या या तणावामागे आरोग्यविषयक समस्या नसून दुसरेच कारण असल्याचे एका सर्वेक्षणातून उघड झाले आहे. त्यामुळे भारतीयांना नेमके कशाची चिंता सतावत आहे, असा प्रश्न सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे, त्याविषयीचा हा आढावा…
८२ टक्के शहरी नागरिकांना कशाचा तणाव?
आरोग्य हा आपल्या सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय आहे. चांगले आरोग्य ठेवण्यासाठी सारेच प्रयत्नशील असतात, पण तरीही अनेकांना आरोग्याच्या तक्रारी उद्भवतच असतात. त्यामुळेच बहुतांश भारतीयांमध्ये विविध आजार, रुग्णालयाचे बिल, विमा संरक्षण किंवा चांगल्या उपचारांची गरज, या विषयांवर चर्चा होत असते. मात्र, नुकत्याच समोर आलेल्या एका सर्वेक्षणातून एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. शहरी भागात राहणाऱ्या तब्बल ८२ टक्के नागरिकांच्या तणावामागे आरोग्यविषयक समस्या नसून आर्थिक चिंता हे प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘इंडिया हेल्थ कोशंट’ या संस्थेच्या सर्वेक्षणात भारताचा एकूण आरोग्य निर्देशांक १०० पैकी ६५ गुणांसह चांगल्या श्रेणीत दाखवण्यात आला आहे. त्यात भारतीयांच्या शारीरिक आरोग्याला सर्वाधिक ६८ गुण मिळाले आहेत. मात्र, या सकारात्मक चित्रामागे एक चिंताजनक वास्तवही समोर आले आहे. तब्बल ८२ टक्के शहरी भारतीयांनी आपण तीव्र मानसिक तणावाखाली असल्याचे मान्य केले आहे.
सर्वेक्षण नेमके कसे करण्यात आले?
मणिपालसिग्ना हेल्थ इन्शुरन्स आणि युगोव्ह इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. देशातील १६ शहरांमधील दोन हजार शहरी नागरिकांचा या सर्वेक्षणात समावेश करण्यात आला आहे. या अहवालातून भारतीयांचे बाह्य आरोग्य आणि प्रत्यक्ष मानसिक स्थिती यामधील वाढती दरी अधोरेखित झाली आहे. सर्वेक्षणानुसार शहरी भागात राहणारे अनेक नागरिक आरोग्याबाबत जागरूक आहेत. सुमारे ६७ टक्के लोक चांगल्या आरोग्यासाठी संतुलित आहार घेत आहेत, तर ६४ टक्के नागरिक स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करत आहेत. तरीही त्यांच्यातील तणावाचे प्रमाण अत्यंत जास्त असल्याचे आढळून आले आहे. १० पैकी जवळपास आठ अधिक नागरिकांनी आपण तणावाखाली असल्याचे मान्य केले आहे. यापैकी जवळपास १४ टक्के लोकांनी आपला तणाव नियंत्रणाबाहेर गेल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे २५ ते ३४ वयोगटातील तरुणांमध्ये हे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.
शहरी नागरिकांना नेमकी कशाची चिंता?
जीवनावश्यक वस्तूंवरील वाढता खर्च, पैशांच्या बचतीची चिंता, कर्जाचा बोजा आणि भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेबाबतची अनिश्चितता यामुळे अनेक भारतीयांना मानसिक तणावाचा सामना करावा लागत बाब सर्वेक्षणातून समोर आली आहे. या अभ्यासात सहभागी झालेल्या नागरिकांना त्यांच्या आयुष्यात कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक सुधारणा आवश्यक आहे, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यातील ८२ टक्के लोकांनी आर्थिक प्रश्नांवर सहमती दर्शवली आहे. या सर्वेक्षणाचा सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे पैशांशी संबंधित चिंता आता केवळ आर्थिक समस्या राहिलेली नाही, तर ती आरोग्याची समस्याही होत चालली आहे. वाढते खर्च, महागाई, बचतीबाबतची चिंता आणि भविष्याची आर्थिक असुरक्षितता यामुळे मानसिक तणाव वाढत असल्याचे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. सर्वेक्षणानुसार, सुमारे ४१ टक्के शहरी भारतीय आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या धडपडीमुळेच तणाव आणि चिंतेचा सामना करत आहेत, तर ४० टक्के नागरिकांनी तणावाचा परिणाम त्यांच्या शारीरिक आरोग्यावर होत असल्याचे सांगितले आहे. याशिवाय, ३६ टक्के लोकांनी सकस आहार, सप्लिमेंट्स, नियमित आणि आरोग्याशी संबंधित इतर गोष्टींवर होणाऱ्या खर्चामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीवर प्रचंड ताण येत असल्याचे नमूद केले आहे.
तरुणांमध्येही का वाढतेय तणावाचे प्रमाण?
तरुणांमध्येही मानसिक तणावाचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. वाढते घरभाडे, गृहकर्जाचे हप्त, नोकरीबाबतची अनिश्चितता, परीक्षांची तयारी, वृद्ध होत चाललेल्या पालकांची जबाबदारी आणि स्वतःच्या कुटुंबाचे नियोजन या सर्व गोष्टींचा ताण तरुणांवर वाढत आहे. विशेष बाब म्हणजे, शारीरिकदृष्ट्या सुदृढ असूनही २५ ते २४ वयोगटातील तरुणांचा एकूण आरोग्य गुणांक १०० पैकी फक्त ६३ इतका नोंदवण्यात आला आहे. हा गुणांक ३५ ते ४९ वयोगट तसेच ५० वर्षांवरील नागरिकांच्या तुलनेत खूपच कमी आहे. यामुळे तरुण भारतीय शारीरिकदृष्ट्या सक्रिय आणि तंत्रज्ञानाशी जोडलेले असले तरी आर्थिक असुरक्षितता आणि वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे मानसिक तणावाच्या मोठ्या ओझ्याखाली असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. या वयोगटातील निम्ह्याहून अधिक म्हणजेच ५४ तरुणांच्या मते, शारीरिक आरोग्यापेक्षा मानसिक आरोग्य अधिक महत्त्वाचे आहे. तर ५६ तरुणांनी सांगितले की, आर्थिक दबावामुळे निर्माण होणाऱ्या तणावाचे व्यवस्थापन करणे ही त्यांच्यासमोरील सर्वात मोठी चिंता आहे.
शहरांपेक्षा ग्रामीण भागातील जीवन सुखी!
या अहवालात समोर आलेल्या सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, शहरी भागातील नागरिक पहिल्यांदाच मानसिक आणि शारीरिक आरोग्याला एकूण आरोग्याच्या दृष्टीने समान महत्त्व देत आहेत. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या नागरिकांना मानसिक आणि शारीरिक आरोग्य यापैकी कोणते अधिक महत्त्वाचे वाटते, असा प्रश्न विचारण्यात आला असता दोन्ही पर्यायांना समान म्हणजेच ५०-५० टक्के प्रतिसाद मिळाला आहे. विशेष म्हणजे, तरुण भारतीयांमध्ये मानसिक आरोग्याला शारीरिक आरोग्यापेक्षा अधिक प्राधान्य दिले जात असल्याचे आढळून आले. मात्र, जागरूकता वाढली असली तरी ती प्रत्यक्ष कृतीत पूर्णपणे दिसून येत नाही. महानगरांपेक्षा ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य अधिक चांगले असल्याचे दिसून आले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचा एकूण आरोग्य गुणांक १०० पैकी ६७ इतका नोंदवण्यात आला, तर देशातील प्रमुख महानगरांमध्ये हा गुणांक ६३ इतकाच आहे. शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि व्यावसायिक आरोग्य या सर्वच बाबींमध्ये ग्रामीण भागाने महानगरांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. अहवालानुसार, जास्त आर्थिक उत्पन्न म्हणजे चांगले आरोग्य हे समीकरण नेहमीच खरे ठरत नाही. लांबचा प्रवास, वाढते प्रदूषण, राहणीमानाचा वाढता खर्च, कामाचा तीव्र ताण आणि सामाजिक एकाकीपणा, यामुळे मोठमोठ्या शहरांमधील नागरिकांना जीवनशैलीचे फायदे कमी होत आहेत.
