Hanuman statue controversy गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अमेरिकेच्या टेक्सासमध्ये महाबली हनुमानाच्या ९० फूट उंचीच्या कास्य मूर्तीचे अनावरण करण्यात आले आणि या मूर्तीचे नामकरण ‘स्टॅच्यू ऑफ युनियन’ असे करण्यात आले. मात्र, या अनावरणानंतरच मूर्तीला विरोध करण्यास सुरुवात झाली. अलीकडे हा विरोध वाढल्याचे चित्र आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांचे सहकारी ख्रिस्ती राष्ट्र म्हणून अमेरिकेची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशातच आता भारतीय अमेरिकन, विशेषतः हिंदू अडचणीत सापडल्याचे चित्र आहे. अमेरिकेत नक्की काय घडतंय? या मूर्तीला विरोध का होतोय? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात…
हनुमानाच्या मूर्तीला का होतोय विरोध?
अमेरिकेतील हिंदू आणि ख्रिश्चन समुदायांमधील वादाचे कारण म्हणजे टेक्सासमधील शुगर लँड येथे उभारली गेलेली हनुमानाची ९० फूट उंच मूर्ती. वर्षभरातच या मूर्तीने अमेरिकेने अनेक वर्षांपासून प्रचारित केलेल्या ‘अमेरिकन ड्रीम’वर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. ’न्यूयॉर्क टाइम्स’ने याला अमेरिकेच्या सर्वांत यशस्वी प्रयोगाचा अडथळा, असे संबोधले आहे. कारण- ही मूर्ती विविध समुदायांमध्ये वादाचा मुद्दा ठरत आहे. या मूर्तीच्या उभारणीसाठी सुमारे आठ दशलक्ष डॉलर्स इतका खर्च आला आहे. या मूर्तीला ‘असुर’ (Devil) व ‘प्लॅनेट ऑफ द एप्स’मधील पात्रांपैकी एक, असे म्हटले गेले आहे.
ख्रिश्चन देश समजल्या जाणाऱ्या अमेरिकेत या मूर्तीच्या स्थापनेमुळे ख्रिश्चन समाज नाराज आहे. सोशल मीडियावरील अमेरिकेतील इन्फ्लूएन्सर हिंदू धर्माला आणि त्याचे पालन करणाऱ्यांना ‘लो आयक्यू’ असल्याचे म्हणत टीका करीत आहेत. अनेकांनी टीका करताना असेही म्हटले आहे की, भारतीय असुरांची पूजा करतात आणि फसवणूक करून, ते या देशात घुसले आहेत.
हनुमानाच्या ९० फूट उंच मूर्तीचा अनावरण सोहळा
शुगर लँड येथील श्री अष्टलक्ष्मी मंदिरात असलेली ही ‘पंचलोह अभय हनुमान’ मूर्ती उत्तर अमेरिकेतील हिंदू देवतेची सर्वांत उंच मूर्ती आहे, असे मंदिराच्या वेबसाइटमध्ये म्हटले आहे. हनुमानाची शक्ती, भक्ती व नि:स्वार्थी सेवेचे प्रतीक म्हणून बांधलेल्या या मूर्तीला ‘स्टॅच्यू ऑफ युनियन’, असे नाव देण्यात आले आहे. या प्रकल्पाची संकल्पना भारतीय आध्यात्मिक गुरू चिन्नाजीयर स्वामी यांनी मांडली होती.
या मूर्तीचे अनावरण एका भव्य सोहळ्यात करण्यात आले होते. या सोहळ्यात ‘वंदे मातरम’ (भारतीय राष्ट्रगीत) आणि ‘द स्टार-स्पँगल्ड बॅनर’ (अमेरिकन राष्ट्रगीत) अशी दोन्ही देशांची राष्ट्रगीते वाजवण्यात आली. हे भारतीय अमेरिकन नागरिक त्यांच्या राष्ट्रीय ओळखीच्या दोन्ही बाजू साजरी करत असल्याचे एक उत्तम सादरीकरण होते. परंतु, ‘न्यूयॉर्क टाइम्स’नुसार त्या दिवशी मंदिराच्या बाहेर डझनभर विरोधक गोळा झाले होते. ते या मूर्तीला ‘असुरी देव’ म्हणत होते आणि मूर्तीचा निषेध करीत होते. सोहळ्यानंतर लगेचच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टीमधील एका नेत्याने हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या हनुमानााबत वादग्रस्त वक्तव्य केले. “आपण टेक्सासमध्ये एका खोट्या हिंदू देवाच्या खोट्या मूर्तीला परवानगी का देत आहोत?” असे त्यांनी लिहिले.
नेत्याने हनुमानाच्या मूर्तीवर नक्की काय टीका केली?
भगवान हनुमानाच्या मूर्तीचा एक व्हिडीओ रिपब्लिकन पार्टीचे नेते अलेक्झांडर डंकन यांनी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केला. तसेच त्यांनी म्हटले, “आपण इथे टेक्सासमध्ये खोट्या हिंदू देवांच्या खोट्या मूर्ती उभारण्याची परवानगी का देतोय? आपण एक ख्रिस्ती राष्ट्र आहोत.” अलेक्झांडर यांनी आणखी एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी बायबलचा (ख्रिस्ती धर्मग्रंथ) दाखला देत म्हटले, “बायबलमध्ये म्हटलंय की, तुमच्याकडे माझ्याशिवाय दुसरा कोणताही देव असता कामा नये. तुम्ही तुमच्यासाठी पृथ्वी किंवा समृद्रात कुठल्याही प्रकारची मूर्ती किंवा प्रतिमा उभारता कामा नये.”
हिंदू अमेरिकन फाउंडेशनने नोंदवला आक्षेप
रिपब्लिकन पार्टीमधील नेत्याच्या या कमेंटनंतर, हिंदू अमेरिकन फाउंडेशनने (HAF) आक्षेप नोंदवला. त्यांनी ‘एक्स’वरील पोस्टद्वारे टेक्सासमधील रिपब्लिकन पार्टीकडे तक्रार नोंदवली. हिंदू अमेरिकन फाउंडेशनने डंकन यांच्या टिप्पण्यांना ‘हिंदूविरोधी व प्रक्षोभक’ म्हटले आणि हे अमेरिकेच्या पहिल्या घटनादुरुस्तीच्या ‘एस्टॅब्लिशमेंट क्लॉज’चे स्पष्ट उल्लंघन असल्याचे सांगितले. हा कायदा सरकारला एका धर्माला दुसऱ्या धर्मापेक्षा जास्त पसंती देण्यास मनाई करतो.
संस्थेने अलेक्झांडर यांची पोस्ट रिपोस्ट करीत म्हटलं आहे, ”तुमचं वक्तव्य हिंदूविरोधी आणि चिथावणीखोर आहे.” हिंदू अमेरिकन फाउंडेशनने रिपब्लिकन पार्टी ऑफ टेक्सासला पोस्टमध्ये टॅग करत म्हटले होते की, तुम्ही तुमच्या पक्षाच्या सिनेट उमेदवाराला अनुशासन शिकवाल का? कारण- ते खुलेआम भेदभाव पसरवीत आहेत. तुमच्या पक्षाच्या मार्गदर्शक सूचनांना त्यांनी केराची टोपली दाखवली आहे.
सोशल मीडियावर गोंधळ
एका ‘एक्स’ वापरकर्त्याने म्हटले की, हिंदू ही मूर्ती उभारू शकले याचे एकमेव कारण म्हणजे ख्रिश्चनांनी येशू किंवा व्हर्जिन मेरीची मोठी मूर्ती तयार न करण्याची चूक केली. दुसऱ्या एका ‘एक्स’ वापरकर्त्याने असा प्रश्न विचारला की, ही मूर्ती अमेरिकन समाजात काय योगदान देते. अजूनही या मूर्तीवर आक्षेप घेण्यात येत आहे. नुकत्याच केल्या गेलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले गेले, “शुगरलँड टेक्सासमधील हनुमानाची ९० फुटी मूर्ती हा अहंकार, उद्दामपणा आणि स्वतःची जाहिरात करण्याचा प्रकार आहे. त्यात दृष्टिकोनाचा अभाव दिसून येतो. त्याऐवजी हिंदू भारतीय संस्कृतीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या संडे स्कूल्सना निधी द्या.”
सध्या नॉर्थ कॅरोलिनामध्ये हिंदू देवतेची आणखी एक मूर्ती उभारली जात आहे आणि पुराणमतवादी लोकांनी आतापासूनच त्याविरुद्ध दंड थोपटले आहेत. कॅरोलिना मुरुगन मंदिरातील जगातील सर्वांत उंच मुरुगन मूर्तीबद्दल एका ‘एक्स’ वापरकर्त्याने लिहिले, “बहुधा नॉर्थ कॅरोलिनामध्ये हिंदू देव मुरुगनची १५५ फूट उंच मूर्ती बांधली जात आहे. हे विसरू नका की, टेक्सासमध्ये आणखी एक हिंदू देव हनुमानाची मूर्ती आहे. जर तुम्ही ख्रिश्चन असाल आणि तुम्हाला यात काही गैर वाटत नसेल, तर फक्त देशासाठी प्रार्थना करा.”

