Glass bottles hanging on the India Pakistan border सीमा सुरक्षा दलाचे जवान सीमेवर गस्त घालून देशाचे संरक्षण करतात. पाकिस्तानी सैन्याची घुसखोरी होऊ नये, यासाठी सैन्य हाय अलर्टवर असते. अशात सैन्याकडून सीमेवरील कुंपणावर काचेच्या बाटल्या लावल्या जातात. भारत-पाकिस्तान सीमा क्षेत्रातील काही भागांत विशेषतः ग्रामीण भागात असणाऱ्या सीमेवरील कुंपणाला रिकाम्या काचेच्या बाटल्या बांधलेल्या असतात. या बाटल्या उन्हात चमकतात, वाऱ्याने एकमेकांवर आदळून आवाज करतात. अनेकांना ही शोभेची वस्तू किंवा हे विनाकारण लावण्यात आलेय, असे वाटू शकते. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने ते महत्त्वाचे मानले जाते. भारत-पाक सीमेच्या कुंपणावर काचेच्या बाटल्या लटकवण्यामागील कारणे काय? जाणून घेऊयात…
भारत-पाक कुंपणावर काचेच्या बाटल्या
भारत-पाकिस्तान सीमेवर विशेष म्हणजे ग्रामीण आणि शेती क्षेत्रांजवळील कुंपणावर काचेच्या बाटल्या लटकवल्याचे पाहायला मिळते. जर तुम्ही भारत-पाकिस्तान सीमेचे फोटो किंवा व्हिडीओ पाहिले असतील, तर तुमच्या लक्षात आले असेल की, काटेरी तारांच्या कुंपणावर ठिकठिकाणी रिकाम्या काचेच्या बाटल्या बांधलेल्या असतात. अनेकांना हा कचराही वाटू शकतो; पण जगातील सर्वांत संवेदनशील आणि कडक सुरक्षा असलेल्या सीमांपैकी एक असलेल्या क्षेत्रात कोणतीही गोष्ट विनाकारण नसते. सीमेच्या कुंपणावर काचेच्या बाटल्या टांगण्यामागचे मुख्य कारण म्हणजे त्या ‘ध्वनी-आधारित घुसखोरी सूचना प्रणाली’ म्हणून काम करतात.
जेव्हा वारा वाहतो, तेव्हा या बाटल्या एकमेकांवर व कुंपणावर आदळतात आणि त्यामुळे एक विशिष्ट प्रकारचा आवाज येतो. जर कोणी कुंपण कापण्याचा, त्यावरून चढण्याचा किंवा खालून रांगत जाण्याचा प्रयत्न केला, तर या बाटल्यांचा जोरात आवाज होतो. आवाज आल्याने जवळच तैनात असलेले सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) जवान सावध होतात. ज्या भागात रात्रीच्या वेळी दृश्यमानता कमी असते आणि जिथे कुंपणाचे लांबच लांब पट्टे शेतातून किंवा नद्यांच्या प्रदेशातून जातात, तिथे ही युक्ती अतिरिक्त पाळत ठेवण्याचे काम करते.
काचेच्याच बाटल्यांचा वापर का?
अनेकांना असा प्रश्न पडतो की, काचेच्या बाटल्याच का वापरल्या जातात? तर, काचेच्या बाटल्या सहज उपलब्ध होतात, स्वस्त असतात, बाहेरच्या हवामानात त्या टिकून राहतात. धातूवर आदळल्यावर त्यांचा मोठा आणि स्पष्ट आवाज ऐकू येतो. धातूशी संपर्क आल्यावर त्यांचा मोठा आणि स्पष्ट आवाज ऐकू येतो. इलेक्ट्रॉनिक यंत्रणांना वीजपुरवठा आवश्यक असतो; मात्र त्यांना वीज लागत नाही. त्यांच्या देखभालीचा खर्च नाही आणि कोणतीही गुंतागुंतीची मांडणी करावी लागत नाही. सीमेवरील दुर्गम भागात म्हणजेच जिथे वीजपुरवठा किंवा प्रगत सेन्सर उपयोगी ठरत नाही, अशा ‘लो-टेक’ उपाययोजना हाय-टेक पाळत ठेवणाऱ्या यंत्रणांना पूरक ठरतात.
भारत-पाकिस्तान सीमा, विशेषतः पंजाब आणि जम्मूच्या काही भागांत काटेरी तारांचे कुंपण, फ्लडलाइट्स, थर्मल इमेजिंग उपकरणे, नाईट व्हिजन यंत्रणा, मोशन सेन्सर्स व नियमित गस्ती आहे. या बाटल्या प्राथमिक संरक्षण यंत्रणा नाहीत. हा उपाय एक पूरक इशारा देणारी यंत्रणा ठरते. विशेषतः ज्या ठिकाणी पूर्वी घुसखोरी, तस्करी किंवा कुंपण कापण्याचे प्रकार घडले आहेत, त्या ठिकाणी अशा उपाययोजना प्रभावी ठरतात. कधी कधी तस्कर अमली पदार्थ किंवा शस्त्रे कुंपणावरून पलीकडे आणण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी कुंपणाची थोडीशी जरी हालचाल झाली, तर या बाटल्यांमुळे ती लगेच लक्षात येऊ शकते.
अति-संवेदनशील भागात जुन्या काळातील तंत्राचा वापर
ड्रोन, थर्मल कॅमेरे व पाळत ठेवणाऱ्या टॉवर्सच्या युगात काचेच्या रिकाम्या बाटल्या कालबाह्य वाटू शकतात. परंतु, सीमा सुरक्षा ही नेहमीच विविध स्तरांच्या यंत्रणांवर अवलंबून असते. त्यात प्रगत तंत्रज्ञान आणि साध्या, पण विश्वासार्ह पद्धतींचाही समावेश असतो. तणावपूर्ण आणि संवेदनशील आंतरराष्ट्रीय सीमेवर, एक साधी काचेची बाटलीसुद्धा सतर्कता राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. कारण- सीमा सुरक्षा हा अखेर महत्त्वाचा विषय असतो.
या बाटल्या सर्वच ठिकाणी लावल्या आहेत का?
भारत-पाकिस्तान सीमेच्या प्रत्येक भागात ही पद्धत वापरली जात नाही. भारत-पाकिस्तान सीमा राजस्थानचे वाळवंट, गुजरातमधील कच्छ, पंजाबची मैदाने व जम्मू-काश्मीरचा डोंगराळ भाग अशा विविध भूप्रदेशांतून जाते. ज्या शेती क्षेत्रांत कुंपण अगदी गावांजवळ आहे किंवा शेतांजवळ आहे, तिथे अधिकृत सुरक्षेबरोबरच बाटल्या टांगण्यासारख्या स्थानिक पातळीवर विकसित केलेल्या पद्धती पाहायला मिळतात.
भारत-पाकिस्तान सीमेवरील अंतर किती?
भारत-पाकिस्तान सीमेची एकूण लांबी ३,३२३ किलोमीटर आहे. या सीमांना राज्यांनुसार विभागले तर, जम्मू-काश्मीर पाकिस्तान सीमेची लांबी १२२५ किलोमीटर आहे. राजस्थान-पाकिस्तान सीमेची लांबी १०३७ किलोमीटर, पंजाब-पाकिस्तान सीमेची लांबी ५५३ किलोमीटर आणि गुजरात-पाकिस्तान सीमेची लांबी ५०८ किलोमीटर आहे. या सर्व सीमाभागात जवान तैनात आहेत. श्रीगंगानरची सीमा सर्वांत संवेदनशील मानली जाते. या सीमेजवळ तारांच्या कुंपणाजवळ शेतकरी शेती करतात. या परिसरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे बीएसएफ जवान नेहमीच गस्त घालत राहून सीमेवरील हालचालींवर लक्ष ठेवत असतात.

