अमोल परांजपे

एकीकडे पंजाब पोलिसांसह केंद्रीय तपास यंत्रणा अमृतपाल सिंगच्या शोधात असताना परदेशांमध्ये खलिस्तानवाद्यांना असलेला पाठिंबा पुन्हा अधोरेखित झाला आहे. अमृतपालच्या समर्थनार्थ ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये निदर्शने झाली. ब्रिटनमध्ये भारतीय उच्चायुक्तालयावर हल्ला करून राष्ट्रध्वज फाडण्यापर्यंत मजल गेली. अमेरिकेमध्ये भारतीय वकिलातीवरील हल्ल्याचा कट तेथील सुरक्षा यंत्रणांनी हाणून पाडला. भारतातून उच्चाटन झाले असले, तरी विदेशांमध्ये खलिस्तानी चळवळ अद्याप जिवंत असल्याचे या घटनांनी स्पष्ट केले असून ही चिंतेची बाब बनली आहे.

miller mathew
“दहशतवाद्यांना घरात घुसून मारू”, मोदींच्या वक्तव्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत-पाक वादात आम्हाला…”
What is Israel Iron Dome a defense system that prevents Iranian attacks
इराणी हल्ल्यांना रोखून धरले इस्रायलच्या ‘आयर्न डोम’ने… काय आहे ही बचाव यंत्रणा?
MP Supriya Sule criticized the leaders who left NCP
“रिश्ता तोडना आसान है, निभाना मुश्किल है…” राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर खासदार सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका
sheikh hasina
“आधी तुमच्या बायकांच्या साड्या जाळून टाका”, Boycott India मोहिमेवर बांगलादेशच्या पंतप्रधानांचे विरोधकांना आव्हान!

खलिस्तान चळवळीचा इतिहास काय?

भारत आणि पाकिस्तानची सरकारे पंजाबी जनतेवर अन्याय करीत असल्याची भूमिका मांडत पंजाबी नागरिकांचा स्वतंत्र देश, खलिस्तान असावा अशी मागणी सर्वप्रथम ६०च्या दशकात पुढे आली. पंजाबचे माजी वित्तमंत्री जगजीतसिंग चौहान हे खलिस्तान संकल्पनेचे जनक. पंजाबी जनमानसामध्ये अन्यायाची भावना रुजवत त्यांनी आपले अनेक समर्थक जमविले. जर्नेलसिंग भिंद्रनवाले हा त्यांच्यापैकी एक. हिंसाचारावर निष्ठा असलेल्या भिंद्रनवाले याने दहशतवादाचा मार्ग अवलंबिला आणि ८०च्या दशकात सगळा पंजाब वेठीस धरला. १ ते १० जून १९८४ या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ राबविले आणि सुवर्णमंदिरात सैन्य घुसवून भिंद्रनवालेचा बीमोड केला.

अन्य देशांमधील खलिस्तानचे समर्थक कोण?

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक शीख नागरिक उपजीविकेच्या शोधात ब्रिटन, अमेरिका, कॅनडा येथे गेले आणि तेथेच स्थायिक झाले. या तीन देशांमध्ये शीख नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. जगजीतसिंग चौहान, भिंद्रनवाले यांच्या कारवायांना या देशांमध्ये असलेल्या समर्थकांचे मोठे पाठबळ होते. भारतातील खलिस्तानी चळवळ संपुष्टात आली असली तरी या अन्य देशांमध्ये तिचे अनेक समर्थक आजही आहेत. अमृतपालसारख्या खलिस्तानवाद्यांना आजही रसद पुरविली जात असल्याची चर्चाही आहे. त्याच्या समर्थनात ब्रिटन, कॅनडा, अमेरिकेत होत असलेली निदर्शने याचेच द्योतक आहे.

आंदोलनांबाबत भारताची प्रतिक्रिया काय?

अमृतपालच्या समर्थनार्थ ब्रिटनमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनानंतर केंद्र सरकारने तीव्र प्रतिक्रिया दिली. ब्रिटनच्या उच्चायुक्तांना पाचारण करून भारतीय उच्चायुक्तालयाच्या सुरक्षेतील त्रुटी दाखवून देण्यात आल्याच, शिवाय रस्त्यातील अडथळ्याचे कारण देत ब्रिटनच्या उच्चायुक्तालयाबाहेर असलेल्या सिमेंटच्या संरक्षक विटाही दिल्ली पोलिसांनी हटविल्या. कॅनडाच्या उच्चायुक्तांनाही तेथे होत असलेली आंदोलने आणि जाहीर खलिस्तानवादी वक्तव्यांबाबत समज देण्यात आली आहे.

परकीय सत्तांचा सहभाग किती?

भारतातील फुटीरतावादी चळवळींना पाकिस्तान आणि तेथील गुप्तहेर संघटना आयएसआय नेहमीच खतपाणी घालत आलेली आहे. खलिस्तानवादी त्याला अपवाद नाहीत. मात्र अनेकदा आपले स्थानिक हितसंबंध जपण्यासाठी ब्रिटन, कॅनडा येथील राजकारणीही या खलिस्तानवाद्यांच्या पाठीशी उभे राहिल्याचे सांगितले जाते. कॅनडाच्या न्यू डेमोक्रेटिक पार्टी या पक्षाचे नेते जगमित सिंग यांनी अलीकडेच त्यांचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्याकडे खलिस्तानसाठी मध्यस्थी करण्याची जाहीर मागणी केली होती. कॅनडास्थित वर्ल्ड सिख ऑर्गनायझेशनने अमृतपालच्या अटक मोहिमेचा निषेध केला आहे. ब्रिटनमध्ये मजूर पक्षाचे मेंबर ऑफ पार्लमेंट तनमनजीत सिंग ढेसी यांची मते पूर्णत: खलिस्तानवादी आहेत.

खलिस्तानवादाची सद्य:स्थिती काय आहे?

आजघडीला पंजाबमध्ये ही चळवळ फारशी अस्तित्वात नाही. दीप सिद्धू, अमृतपाल यांच्यासारखे काही थोडे असले तरी त्यांचे खलिस्तान समर्थन हे बहुतांशी राजकीय स्वरूपाचे आहे. त्याचप्रमाणे परदेशांमध्ये स्थायिक झालेल्या शीख बांधवांची आता तिसरी किंवा चौथी पिढी आहे. त्यांची पंजाबच्या मातीशी नाळ केव्हाच तुटली आहे. त्यांच्या भूमिका या केवळ समाजमाध्यमांवर व्यक्त होण्यापुरत्या मर्यादित आहेत. ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ अन्यायकारक असल्याचे मानून भिंद्रनवाले याला ‘हुतात्मा’ मानणारे काही जण असले तरी त्यांचा सामान्य पंजाबी जनतेवर तितकासा पगडा नाही.

अमृतपालमुळे खलिस्तानी चळवळीला खतपाणी?

अमृतपालच्या निमित्ताने खलिस्तानवाद पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमृतपालने स्वत:ची सशस्त्र फौज तयार करण्यास सुरुवात केल्याचे वृत्त आहे. तो स्वत:ला ‘भिंद्रनवाले २.०’ समजत असल्याची वदंता असून हे देशाच्या ऐक्यासाठी घातक आहे. अमृतपाल अद्याप भारतातच असेल, तर त्याला पकडण्यात येत असलेले अपयशही चिंताजनक आहे. कारण यामुळे खलिस्तानवाद्यांचे जाळे पसरले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एकीकडे देशांतर्गत फुटीरतावादाचा बीमोड करतानाच केंद्र सरकारला मुत्सद्देगिरी दाखवून विदेशांमधील छुप्या आणि खु्ल्या समर्थकांचाही बंदोबस्त करावा लागणार आहे. दुसरीकडे शेतकरी आंदोलनासारख्या घटनांमुळे पंजाबी जनता मनाने लांब जाणार नाही, याचीही खबरदारी घ्यावी लागेल.

  • amol.paranjpe@expressindia.com