Shia Muslims protesting across India इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर भारतातील शिया मुस्लीम संतापले आहेत. खामेनी यांच्या निधनानंतर रविवारी शिया समुदायाने रस्त्यावर उतरून शोक व्यक्त केला. उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे बडा इमामबाडा मशिदीजवळ मोठ्या संख्येने लोक जमले होते आणि त्यांनी आंदोलनादरम्यान घोषणाबाजी केली. तसेच काश्मीरमध्येही आंदोलकांनी एकत्र जमून आपला संताप आणि दुःख व्यक्त केले. महिला खामेनी यांचे फोटो हातात धरून रडताना दिसल्या, तर अनेकांनी अमेरिका आणि इस्रायल राजवटीविरुद्ध घोषणाबाजी केली. भारतात शिया मुस्लीम आंदोलने का करत आहेत? त्यांच्या संतापाचे कारण काय? खामेनी यांच्याशी नेमका संबंध काय? जाणून घेऊयात…
भारतात शिया मुस्लीम आंदोलने का करत आहेत?
शिया समुदायासाठी इराणचे सर्वोच्च नेते हे केवळ एक राजकीय व्यक्तिमत्त्व नाहीत. त्यांना ‘मर्जा-ए-तकलीद’ मानले जाते. याचाच अर्थ भारत, विशेषतः श्रीनगर, लखनऊ आणि हैदराबादमधील शिया समुदाय त्यांच्याकडे धार्मिक आणि आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून पाहतात. त्यांचे अनुयायी त्यांच्या मृत्यूला राजकीय हत्या मानत नाहीत. ते त्यांच्या हत्येला ‘शहादत’ (हुतात्मा होणे) म्हणून पाहतात आणि याला शिया समुदायामध्ये खोलवर महत्त्व आहे. एका आंदोलकाने पत्रकारांना म्हटले की, हा सर्वांसाठी एक संदेश आहे की जिथे कुठे शोषितांची हत्या होईल, तिथे आम्ही त्यांच्यासाठी आवाज उठवू. खामेनी मारले गेले आहेत, पण त्यांच्या पश्चात आज हजारो खामेनी जन्माला आले आहेत.”
काश्मीरला कवी मुहम्मद इक्बाल यांनी ‘इराण-ए-सगीर’ म्हटले आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, डोगरा राजवटीत १८८९ मध्ये उर्दूने जागा घेण्यापूर्वी सुमारे पाच शतके जम्मू-काश्मीरची अधिकृत भाषा पर्शियन (फारसी) होती. अनेक आंदोलक इराणी नेतृत्वाकडे पॅलेस्टिनी मुद्द्याचे खंबीर समर्थक आणि मध्यपूर्वेतील पाश्चात्य, विशेषतः अमेरिका आणि इस्रायली प्रभावाविरुद्ध उभे राहणाऱ्या काही मोजक्या आवाजांपैकी एक म्हणून पाहतात. अनेक भारतीय मुस्लीम संघटनांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी हा आंतरराष्ट्रीय कायदा आणि राष्ट्रीय सार्वभौमत्वाचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.
खामेनी यांची भारत भेट
१९८९ मध्ये अयातुल्ला अली खामेनी यांनी भारताच्या काही भागांना भेट दिली होती. १९८०-८१ मध्ये, वयाच्या ४१ व्या वर्षी इस्लामिक क्रांतीनंतरच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी कर्नाटक आणि काश्मीरला भेट दिली होती. अनेक वर्षांनंतर, इराणमध्ये भारतीय नेत्यांची भेट घेताना त्यांनी महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि मौलाना अबुल कलाम आझाद यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वांचा उल्लेख केला होता. त्यांनी भारताच्या धार्मिक विविधतेचेही कौतुक केले होते.
इराणमधील सरकारी कागदपत्रांच्या नोंदीनुसार, १९७९ च्या क्रांतीनंतर दोन वर्षांनी खामेनी यांनी रुहोल्लाह खोमेनी यांच्या सरकारने सुरू केलेल्या जनसंपर्क मोहिमेचा भाग म्हणून भारताला भेट दिली होती. त्यांच्या हत्येविरोधात नवी दिल्ली, बिहार, झारखंड आणि तेलंगणामध्येही तीव्र आंदोलने पाहायला मिळाली. आंदोलकांनी खामेनी यांची पोस्टर्स हातात धरली होती आणि अमेरिका व इस्रायलच्या लष्करी कारवायांविरोधात घोषणाबाजी करत आपला तीव्र संताप व्यक्त केला.
खामेनी यांचे उत्तर प्रदेशशी असलेले नाते
रुहोल्लाह यांचे पूर्वज सय्यद अहमद मुसावी हिंदी यांचा जन्म १८३० साली उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यातील किंतूर या गावी झाला. ते शिया धर्मगुरू आणि विद्वान म्हणून ओळखले जायचे. ब्रिटिश भारताला सोडून त्यांनी धार्मिक शिक्षण घेण्यासाठी इराणची वाट धरली. इराणमध्ये गेल्यानंतर त्यांनी तिथे आध्यात्मिक आणि धार्मिक कार्य करण्यास सुरुवात केली आणि कालांतराने ते तिथेच स्थायिक झाले. सय्यद अहमद मुसावी यांनी नावापुढे हिंदी हा शब्द जोडून आपली भारतीय ओळख कायम ठेवली.
इराणच्या खामेन या शहरात मुसावी स्थायिक झाले. तिथेच त्यांनी लग्न करून कुटुंब वाढवले. त्यांचा मुलगा मुस्तफा हिंदी हादेखील एक धर्मगुरू झाला. बीबीसी पत्रकार बाकर मोईन यांच्या मते, अहमद यांनी आपल्या भारतीय मुळांची ओळख जपण्यासाठी ‘हिंदी’ हे नाव लावले होते. अहमद यांनी १८३० मध्ये बाराबंकी सोडले. त्यांचे वडील दिन अली शाह यांनी १७०० च्या सुमारास मध्य इराणमधून भारतात स्थलांतर केले होते.
तो काळ मुघल साम्राज्याच्या ऱ्हासानंतर भारतात ब्रिटिशांचे नियंत्रण वाढत असलेला काळ होता. इस्लामला पुनरुज्जीवनाची गरज आहे आणि मुस्लिमांनी समाजात आपले स्थान पुन्हा मिळवले पाहिजे, असे मानणाऱ्या विद्वानांपैकी ते एक होते. अहमद हिंदी यांना असे जीवन जगायचे होते जिथे ते धर्मात प्रगती करू शकतील आणि इतरांनाही तसे करण्यास मदत करू शकतील, म्हणूनच १८०० च्या सुरुवातीस त्यांनी भारत सोडला आणि १८३० मध्ये नजफमधील अली यांच्या समाधीला भेट देण्यासाठी इराक (तत्कालीन पर्शियाचा भाग) येथे गेले.
१८३४ पर्यंत ते इराणमधील खोमेन शहरात स्थायिक झाले, तिथे त्यांनी घर विकत घेतले. खोमेनमध्ये त्यांनी तीन लग्न केली आणि त्यांना पाच मुले झाली. त्यापैकी एक मुस्तफा होते, जे रुहोल्लाह यांचे वडील होते. बाकर मोईन यांच्या माहितीनुसार खामेनी यांचा जन्म १९०२ मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सय्यद जवाद खामेनी होते. त्यांचे वडीलही धार्मिक विद्वान होते. अयातुल्ला खामेनी यांनीही वडिलांप्रमाणेच १९५८ ते १९६४ या काळात धर्मगुरूचे शिक्षण घेतले. शाह राजवटीत त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला होता. १९७९ च्या चळवळीत भाग घेतल्यानंतर १९८१ ते १९८९ काळात ते इराणचे राष्ट्राध्यक्ष झाले.
