अमेरिका-चीन व्यापार युद्ध तीव्र होत असताना टिकटॉकवर एक वेगळाच ट्रेंड आला आहे. चीनमधील कारखाने कुठल्या डान्स चॅलेंज किंवा ब्युटी हॅकसाठी नाही, तर लक्झरी वस्तू कशा बनवल्या जातात हे उघड करण्यासाठी व्हायरल होत आहेत. अमेरिकन ग्राहक थेट स्रोताकडून वस्तू खरेदी करून मध्यस्थ आणि शुल्कांना कसे टाळू शकतात यावर या व्हिडीओमार्फत प्रकाश टाकण्यात आला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणांतर्गत लागू केल्या गेलेल्या नवीन करप्रणालीबाबतची माहिती देण्यासाठी हे व्हिडीओ बनवले जात असल्याची चर्चा होत आहे. आयात शुल्क वाढल्याने चीनमधील उत्पादक आता लेगिंग्जपासून हँडबॅग्सपर्यंत सर्व काही दाखविण्यासाठी आणि ते तयार करण्यासाठी नेमका खर्च किती येतो हे स्पष्ट करण्यासाठी टिकटॉकचा वापर करीत आहेत. या व्हिडीओंमध्ये कारखान्याच्या मजल्यांचे आणि पॅकिंगचे फुटेज, तसेच लेगिंग्ज आणि हँडबॅग्स अशा लोकप्रिय वस्तूंच्या उत्पादनासाठी किती खर्च येतो याची माहिती दिली जात आहे.

चीनमध्ये टिकटॉकवर नक्की काय सुरू आहे?
या वाढत्या ट्रेंडला अनौपचारिकपणे ‘ट्रेड वॉर टिकटॉक’, असे नाव देण्यात आले आहे. व्हिडीओंमध्ये सोर्सिंग एजंट्स किंवा कारखान्यातील कामगार उत्पादन साखळी दाखवताना दिसतात. तसेच खर्चाचे ब्रेकडाऊन शेअर करतात आणि अमेरिकन ग्राहक थेट ऑर्डर कशी देऊ शकतात याबाबतही माहिती देतात. ट्रिब्यूनमधील एका वृत्तानुसार, ताओबाओ, विचॅट, व अगदी व्हॉट्सअ‍ॅप यांसारख्या प्लॅटफॉर्मचा वापर ग्राहकांना उत्पादकांशी जोडण्यासाठी केला जात आहे.

काही व्हिडीओ असा दावा करतात की, ब्रँडेड उत्पादन आणि स्वस्त उत्पादनात फक्त लेबलचा फरक असतो. म्हणजे एका व्हिडीओमध्ये लुलुलेमॉनच्या त्याच कारखान्यात बनवलेल्या योगा पँट फक्त ४३० ते ५२० रुपयांमध्ये विकल्याचा दावा करण्यात आला आहे, ज्याची किरकोळ किंमत ८,५०० रुपये एवढी आहे. मटेरियल आणि कारागिरी मुळात सारखीच आहे. कारण- ती एकाच उत्पादन साखळीतून येते, असे एका व्हिडीओमध्ये म्हटले आहे. तसेच एका व्हिडीओमध्ये टाइड पॉड्ससारख्या २० लाँड्री पॉड्सचा एक मोठा पॅक दाखवण्यात आला आहे, जो चीनमध्ये फक्त एक डॉलर म्हणजे ८५ रुपयांत विकला जात आहे, ज्याची अमेरिकेतील किंमत १३ डॉलर्स म्हणजे ११०० ते १२०० रुपये एवढी आहे.

लक्झरी वस्तूच का?
लक्झरी वस्तू वा उत्पादने हा या ट्रेंडचा केंद्रबिंदू आहे. कारण- ती उत्पादने बनवण्यासाठी किती खर्च येतो आणि ग्राहकांना त्यासाठी किती पैसे द्यावे लागतात यामध्ये मोठी तफावत असल्याचे दिसून येते. काही टिकटॉक निर्माते असा दावा करतात की, बर्किन हँडबॅगसारख्या वस्तू ज्या सुमारे ३८ हजार डॉलर्स म्हणजेच दोन लाख ७९ हजार ३२६ रुपयांत विकल्या जाऊ शकतात, त्या उत्पादनासाठी फक्त एक हजार डॉलर्स म्हणजे ८६ हजार ४२९ रुपये एवढा खर्च येतो. लाखो व्ह्युज मिळविलेल्या एका व्हिडीओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, ८० टक्के लक्झरी हँडबॅग्ज चीनमध्ये बनवल्या जातात. “पण मला या गोष्टीचा अभिमान नाही की, आम्ही फक्त मजुरी मिळवत होतो; पण बॅग बनवणाऱ्यांना प्रत्यक्ष नफा खूपच कमी होता. गुणवत्ता नियंत्रण, कारागिरी आणि पूर्णपणे एकत्रीकृत पुरवठा साखळी यांचा मला अभिमान आहे, असे एका व्हिडीओमध्ये सांगण्यात आले आहे.

या व्हिडीओत असाही युक्तिवाद करण्यात आला आहे की, उत्पादने चीनपासून दूर करण्याचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. त्याने म्हटले आहे, “आता अमेरिका आणि त्यांचे युरोपीय सहभागी चिनी वस्तूंपासून स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. लक्झरी ब्रँड चीनमधून उत्पादने हलवीत आहेत, असे तुम्हाला वाटत आहे का? तर हो, तसा प्रयत्न केला आहे. चीनबाहेरील ओईएम (ओरिजिनल एक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स) कारखान्यांमध्ये समान गुणवत्ता मानके नाहीत. त्यांचे कामगार एक तर खूप महाग आहेत किंवा आळशी आहेत आणि त्यांच्याकडे पुरवठा साखळीसाठी पायाभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळेच आम्ही नेहमीच लक्झरी ब्रँडसाठी सर्वोत्तम ओईएम असू. मग तुम्ही आम्हाला कॉल करून, थेट खरेदी का करू नये?”

दरम्यान, तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, यातील बरेच व्हिडीओ बनावट उत्पादनांना प्रोत्साहन देणारे असू शकतात. लक्झुरी उत्पादनांच्या उद्योगाबद्दलचे वृत्तपत्र डार्क लक्झुरीचे लेखक कॉनराड क्विल्टी हार्पर यांनी म्हटले, “हे व्हिडीओ चीनमधील बनावट उत्पादक आणि खऱ्या उत्पादक यांच्यासंदर्भात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते त्यांच्या सोशल मीडियाबाबत खूप हुशार आहेत आणि पश्चिमेकडील मागणी वाढवण्यात ते खूप प्रभावी आहेत.”

लुई व्हिटॉन यांनी सांगितले की, ते चीनमध्ये त्यांचा कोणताही माल बनवत नाहीत. लुलुलेमॉनच्या प्रवक्त्याने द इंडिपेडेंटकडे असेही स्पष्ट केले की, त्यांच्या अंतिम उत्पादनांपैकी फक्त तीन टक्के उत्पादने मुख्य चीनमध्ये बनवली जातात. तसेच कंपनी त्यांच्या वेबसाइटवर सर्व अधिकृत उत्पादन भागीदारांची यादी देते.

अमेरिकेविरुद्ध निषेध
हे व्हिडीओ ट्रेंड होण्यामागे काही वेगळा योगायोग नाही. ट्रम्प प्रशासनाने अलीकडेच सर्व चिनी आयातीवर १४५ टक्के कर लागू केला आणि मग चीननेही अमेरिकन वस्तूंवर १२५ टक्के कर लागू केला. अमेरिकेने त्यांचा ‘डी मिनिमिस’ नियमदेखील संपुष्टात आणला. या नियमांतर्गत ८०० डॉलर्सपेक्षा कमी किमतीच्या उत्पादनांना शुल्काशिवाय देशात प्रवेश करण्याची परवानगी दिली होती. आता चीन आणि हाँगकाँगमधून येणाऱ्या सर्व आयातींवर मूल्य काहीही असले तरी कर आकारला जातो. त्यामुळे चिनी बनावटीच्या उत्पादनांवर अवलंबून असलेल्या अमेरिकन लघु व्यावसायिक चिंताग्रस्त झाले आहेत. त्यापैकी बरेच जण गोदामांची आवश्यकता नसलेल्या वस्तू चीनमधून थेट अमेरिकेतील ग्राहकांना पाठवत असत. चीन आणि आग्नेय आशियातील उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या ‘नाईकी’सारख्या कंपन्या त्यांच्या पुरवठा साखळ्यांचा आढावा घेत आहेत. काही जण टॅरिफ गुंतागुंत टाळण्यासाठी उत्पादन पुन्हा अमेरिकेत हलविण्याचा विचारही करीत आहेत. उत्पादनांच्या वाढलेल्या किमतींचा नियमित खरेदीदारांवर परिणाम होणार आहे. वाढत्या किमतींमुळे बरेच जण आता स्वस्त असलेली पर्यायी उत्पादने कुठून येतात आणि ती बनविण्यासाठी किती खर्च येतो याबद्दल अधिक माहिती आणि पारदर्शकतेची माहिती देणारे व्हिडीओ पाहत आहेत.