ज्ञानेश भुरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत स्पेन फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष लुईस रुबियालेस यांनी स्पेनच्या विजयी संघाची एक खेळाडू जेनी हेर्मोसो हिचे चुंबन घेतले. अनेक आरोप प्रत्यारोप होऊन अखेर रुबियालेस यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्याविरुद्ध स्पॅनिश न्यायालयात खटलाही सुरू झाला. पण, स्पेनच्या खेळाडू अजूनही राष्ट्रीय संघातून खेळण्यास तयार नाहीत. काय आहेत या मागची कारणे हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न.

स्पॅनिश महिला फुटबॉलपटू आणि संघटना वाद नेमका कसा सुरू झाला?

महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यास रुबियालेस यांनी स्पेनच्या विजयी संघातील खेळाडू जेनी हेर्मोसो हिचे चुंबन घेतले. ही कृती पूर्वसंमतीने होती असे रुबियालेस यांचे म्हणणे होते. पण, हे चुंबन जबरदस्तीने हेर्मोसोने घेतल्याचे सांगितले आणि या संघर्षाला सुरुवात झाली. महिला खेळाडूंनी रुबियालेस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. रुबियालेस यांनी अर्थातच ती फेटाळून लावली.

आणखी वाचा-खलिस्तान समर्थकांच्या मुद्द्यावरून अनेकवेळा भारत-कॅनडा आमनेसामने, जाणून घ्या…

रुबियालेस यांच्याबरोबरीने प्रशिक्षक जॉर्ज विल्डा या प्रकरणात कसे ओढले गेले?

रुबियालेस हे स्पॅनिश फुटबॉल संघटनेचे सर्वेसर्वा होते. प्रत्येक जण हा त्यांचाच पाठीराखा होता. चुंबन प्रकरणावरून वातावरण पेटले, तेव्हा सुरुवातीला विल्डा यांनी रुबियालेस यांचे समर्थन केले होते. या वेळी महिला खेळाडू अधिक आक्रमक झाल्या. त्यांनी थेट स्पेन संघाकडून न खेळण्याचा इशाराच दिला. आपला बचाव करण्यासाठी विल्डा यांनी माघारीची भूमिका घेत रुबियालेस यांना विरोध केला होता.

रुबियालेस आणि विल्डा यांच्यावर सध्या जबाबदारी काय?

फिफाने केलेली निलंबनाची कारवाई, स्पेनमधून होणारा विरोध लक्षात घेता रुबियालेस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. रुबियालेस यांच्यावर स्पॅनिश न्यायालयात लैंगिक शोषणाचा खटलादेखील सुरू झाला आहे. अर्थात, त्यापूर्वी रुबियालेस यांनी कोलांट उडी घेत विरोधात गेलेल्या विल्डा यांची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी केली. सध्या विल्डा यांच्याकडे कुठलीच राष्ट्रीय जबाबदारी नाही.

आणखी वाचा-महिला आरक्षण विधेयकानंतरही अनेक प्रश्न अनुत्तरित?

यानंतरही स्पेनच्या महिला खेळाडूंचा विरोध कायम का?

स्पेनच्या महिला खेळाडूंना केवळ रुबियालेस यांचा राजीनामा नकोय, तर त्यांना सुरक्षा, सुव्यवस्था आणि स्पॅनिश फुटबॉल महासंघात अमूलाग्र बदल हवा आहे. खेळाडूंच्या संघटनेबरोबर (फुटप्रो युनियन) झालेल्या बैठकीनंतर त्यांनी संघटनेमधील व्यापक बदलाबरोबर उच्चपदस्थ अधिकारी आणि माजी अध्यक्ष रुबियालेस यांच्या जवळच्या व्यक्तींची संघटनेतून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर पुरुष वरिष्ठ संघाप्रमाणे सर्व सोयी, सुविधा महिला संघालाही मिळाव्यात अशी मागणी केली आहे.

आपल्या मागणीसाठी महिला खेळाडूंनी कुठले पाऊल उचलले?

पुढील आठवड्यात नेशन्स लीग ही प्रमुख स्पर्धा सुरू होत आहे. मागण्यांकडे लक्ष वेधण्याची हीच योग्य वेळ साधून विश्वचषक विजेत्या संघातील २३ आणि अतिरिक्त १८ खेळाडूंनी सह्या करून राष्ट्रीय संघाचा राजीनामा दिल्याचे एकत्रित निवेदन स्पॅनिश फुटबॉल महासंघाला सादर केले. विश्वचषक विजेत्या संघातील अथेनिया डेल कॅस्टिलो आणि क्लॉडिया झोर्नोझा या दोनच खेळाडूंनी या निवेदनावर सह्या केलेल्या नाहीत. अर्थात, झोर्नोझा हिने फुटबॉलमधूनच निवृत्त होत असल्याची घोषणा केली.

आणखी वाचा-निज्जरच्या हत्येवरून कॅनडा-भारत संबंध बिघडणार? भारतीय गुप्तहेरांची खरेच ‘मोसाद’ शैलीत कारवाई? 

निवेदनात काय म्हटले आहे?

फुटबॉल महासंघाला दिलेल्या निवेदनात महिला खेळाडूंनी एकूण महासंघाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. महिला खेळाडूंबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जराशीही सहानुभूती नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. महिला खेळाडूंना संरक्षण हवे असून, महिला खेळाडूंकडे बघण्याचा योग्य दृष्टिकोन नसलेल्या प्रत्येकाला दूर करण्यात यावे. त्याचबरोबर पुढील निवडणूका होईपर्यंत नियुक्त हंगामी अध्यक्ष पेड्रो रोचा यांच्याकडे जबाबदारी राहायला हवी.

स्पॅनिश फुटबॉल महासंघाची भूमिका काय?

स्पॅनिश फुटबॉल महासंघाच्या निश्चित भूमिकेबद्दल अजून नेमके चित्र समोर आले नसले, तरी महासंघ खेळाडूंशी चर्चा करण्याच्या तयारीत आहेत. विल्डा यांच्या जागी माजी सहाय्यक प्रशिक्षक माँटसे टोम यांची नियुक्ती केली होती. नेशन्स करंडकासाठी शुक्रवारी संघ निवडदेखील जाहीर होणार होती. पण, महिला खेळाडूंच्या आक्रमक भूमिकेमुळे महासंघाला ही निवड पुढे ढकलावी लागली आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why are women players still opposed to playing for the spain football team print exp mrj
First published on: 21-09-2023 at 09:24 IST