गुजरातमध्ये आशियाई सिंहांची संख्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. एकेकाळी नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर असलेला हा प्राणी आता गिरच्या जंगलाच्या सीमाही ओलांडून सौराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांपर्यंत पोहोचला आहे. मात्र, संवर्धनाच्या या यशोगाथेला आता मानव-सिंह संघर्षाची किनार लाभली आहे. गेल्या काही महिन्यांत सिंहांच्या हल्ल्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली. त्यावर उपाय योजण्यासाठी आता गुजरात सरकारला डेहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेची मदत घ्यावी लागली आहे.

सिंहांचे वर्तन बदलले की परिस्थिती?

गुजरातमधील गिर अभयारण्याच्या परिसरात सिंह आणि माणसांचे सहअस्तित्व ही नवीन बाब नाही. अनेक दशकांपासून ही माणसे सिंहांच्या उपस्थितीत जगत आहे. मात्र, अचानक या ठिकाणी संघर्ष वाढला. या संघर्षामागे नेमके काय कारण आहे, याचा शोध घेणे महत्त्वाचे ठरते. यातील तज्ज्ञांच्या मते सिंहांच्या वर्तनात बदल झाला आहे का, हे तपासणे आवश्यक आहे. बरेचदा अति पर्यटनाचा परिणाम वन्यप्राण्यांच्या मानसिकतेवर होतो. त्यामुळे हे एक कारण ठरू शकते. दुसऱ्या बाजूला जंगलाबाहेर सिंहांचा वाढलेला विस्तार, शेती आणि मानवी वसाहतींच्या जवळ वाढलेली उपस्थिती हे घटक तितकेच महत्त्वाचे आहेत.

संवर्धनाचे यश की त्याची किंमत?

सिंहांची संख्या वाढणे हे वन्यजीव संवर्धनाचे मोठे यश आहे. मात्र, एखाद्या मोठ्या मांसाहरी प्राण्याची संख्या वाढली की मग अधिवासाचा प्रश्न निर्माण होतो. त्याला जागा अधिक लागते. त्यामुळे ताे संरक्षित क्षेत्राबाहेर नवीन अधिवास शोधू लागतो. गुजरातमध्ये आता मोठ्या प्रमाणात सिंह संरक्षित क्षेत्राच्या बाहेर आढळत आहेत. गावांच्या हद्दीत, शेती परिसरात आणि किनारी पट्ट्यातही सिंहांचा वावर वाढला आहे. या परिस्थितीत सिंह आणि माणूस रोजच एकमेकांच्या संपर्कात येत आहेत. मात्र, त्याच वेळी संघर्षाची ठिणगीदेखील पडली आहे. त्यामुळे एकीकडे संवर्धनाचे यश साजरे करायचे की त्याची किंमत मोजायची असा प्रश्न आहे.

सिंहांच्या हल्ल्यांमागे नेमकी कारणे कोणती?

सिंह काय किंवा वाघ, बिबटे काय, त्यांच्या हल्ल्याच्या प्रत्येक घटनेमागे एकच कारण असते असे नाही. बरेचदा भक्ष्याची उपलब्धता, तरुण सिंहांचे स्थलांतर, मानवी हस्तक्षेप, पर्यटनाचा दबाव, रस्ते व इतर पायाभूत सुविधा, तसेच काही भागातील अधिवासातील बदल हे घटक कारणीभूत असू शकतात. त्यामुळेच गुजरात सरकारने वैज्ञानिक अभ्यासाचा मार्ग निवडला आहे. अभ्यासातून सिंहांच्या हालचालींचे नमुने, जोखमीची क्षेत्रे आणि संघर्षाची कारणे स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. या अभ्यासातून सिंहांच्या हल्ल्यामागील नेमक्या कारणांचा शोध लागेल अशी अपेक्षा त्यांना आहे.

विदर्भासाठी धोक्याची घंटा?

गुजरातमध्ये अलीकडच्या काळात माणूस आणि सिंह हा संघर्ष वाढला, पण विदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून मानव-वाघ संघर्ष आहे. हा संघर्ष कमी होण्याऐवजी वाढतच आहे. चंद्रपूर जिल्ह्यांपूरता मर्यादित असलेला हा संघर्ष आता नागपूर, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यातही सुरू झाला आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पासह पेंच व्याघ्रप्रकल्प, उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य, ब्रम्हपुरी वनक्षेत्र, चंद्रपूर परिसर या ठिकाणी वाघांच्या वाढत्या वावरामुळे मानव-वन्यजीव संघर्ष सातत्याने समोर येत आहे. अधिवासांचे तुकडे, रस्ते, खाणी आणि इतर विकास प्रकल्पांमुळे वन्यजीव आणि माणसांमधील अंतर कमी होत आहे. त्यामुळे गुजरातमधील अभ्यासातून मिळणारे निष्कर्ष देशातील इतर राज्यांसाठीही मार्गदर्शक ठरू शकतात.

प्रश्न सिंहांचा की व्यवस्थापनाचा?

सिंहांच्या हल्ल्यांकडे केवळ वन्यजीवांच्या आक्रमकतेच्या दृष्टिकोनातून पाहणे चुकीचे ठरेल. वन्यजीवांची संख्या वाढणे ही संवर्धनाची अपेक्षित फलश्रुती आहे. खरी कसोटी त्यानंतर सुरू होते. वाढत्या वन्यजीव लोकसंख्येसाठी पुरेसा अधिवास, सुरक्षित स्थलांतर मार्ग, स्थानिक समुदायांचा सहभाग आणि वैज्ञानिक व्यवस्थापन यांचा समतोल साधण्यातच यश दडलेले आहे. गिरमधील वाढते सिंह हल्ले ही केवळ गुजरातची समस्या नाही. देशभरात वाढणाऱ्या मानव-वन्यजीव संघर्षाचे ते एक प्रतीक आहे. दोन्हींचा समतोल राखणारे व्यवस्थापन उभारण्याची वेळ आली आहे. गुजरातने त्यासाठी विज्ञानाचा आधार घेतला आहे.

अभ्यासातून कोणते उपाय?

डेहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेच्या अभ्यासातून सिंहांच्या हालचालींचे नमुने, हल्ल्यांची कारणे आणि जोखमीची क्षेत्रे ओळखली जाणार आहेत. त्याआधारे ड्रोन, जीपीएस कॉलर, सतर्कता यंत्रणा, गावस्तरीय प्रशिक्षण आणि अधिवास व्यवस्थापनासारखे उपाय सुचवले जाऊ शकतात. गुजरातने आधीच काही संवेदनशील भागांत ड्रोन आणि ट्रॅकिंग व्यवस्था वाढवण्याची तयारी सुरू केली आहे. वनविभागाच्या मते, काही सिंहांचे वर्तन बदलले आहे का, ते मानवी वस्त्यांकडे अधिक आकर्षित होत आहेत का किंवा त्यांच्या अधिवासात काही बदल झाले आहेत का, याचा शोध घेतला जाणार आहे.

संघर्षाचे प्रमुख कारण कोणते?

गुजरातमध्ये २०२५ च्या गणनेनुसार आशियाई सिंहांची संख्या ८९१ वर पोहोचली आहे. २०२० च्या तुलनेत ही ३२ टक्क्यांनी वाढ आहे. विशेष म्हणजे, निम्म्याहून अधिक सिंह आता संरक्षित जंगलाबाहेर फिरत आहेत. सौराष्ट्रातील ११ जिल्ह्यांमध्ये त्यांचा विस्तार झाला आहे. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, एखाद्या प्रजातीची संख्या वाढते तेव्हा तिचा विस्तारही वाढतो. परिणामी ती मानवी वस्त्या, शेती क्षेत्रे, रस्ते आणि औद्योगिक परिसरांच्या जवळ पोहोचते. संघर्षाचे हे एक प्रमुख कारण असू शकते.
rakhi.chavhan@expressindia.com