शेख हसीना यांची सत्ता बांगलादेशमधील हिंसक आंदोलनाने उलथवून लावली. या हिंसक आंदोलनांची धग इतकी वाढली की, शेख हसीना यांना बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन भारताकडे पलायन करण्याची वेळ आली. सोमवारी (५ ऑगस्ट) त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडला. शेख हसीना आणि त्यांच्या बहीण शेख रेहाना संध्याकाळी सी-१३० विमानातून भारतात हिंडन विमानतळावर उतरल्या. आता शेख हसीना लंडनला जाणार असल्याची माहिती आहे. त्यांनी ब्रिटनकडे आश्रय मागितला असल्याचे सांगितले जात आहे. सध्या त्या भारतातच असून ब्रिटनकडून परवानगी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. राजकीय आश्रय म्हणजे काय? आणि शेख हसीना यांना लंडनलाच का जायचे आहे? याविषयी जाणून घेऊ. राजकीय आश्रय म्हणजे काय? संबंधित व्यक्तींना त्यांच्या मातृभूमीत छळाची भीती असल्यास देशांद्वारे संरक्षण दिले जाते, त्यालाच राजकीय आश्रय किंवा आश्रय म्हणतात. ब्रिटन सरकारच्या म्हणण्यानुसार, व्यक्तींना शरणार्थी म्हणून देशात राहायचे असल्यास आश्रयासाठी अर्ज करावा लागतो. जे लोक त्यांच्या देशातून पळून आले आहेत आणि त्यांच्या जीवाला धोका असल्यामुळे किंवा छ्ळाची भीती असल्यामुळे परत जाण्यास असमर्थ आहेत, अशी व्यक्ती अर्ज करण्यास पात्र आहे. ब्रिटन सरकारकडे गेल्या वर्षी आश्रयासाठी १,१२,००० अर्ज आले असल्याचे वृत्त 'द गार्डियन'ने दिले आहे. शेख हसीना यांची सत्ता बांगलादेशमधील हिंसक आंदोलनाने उलथवून लावली. (छायाचित्र-रॉयटर्स) हेही वाचा : PM Sheikh Hasina Resign Live Updates : बांगलादेश संदर्भातील सर्वपक्षीय बैठकीत राहुल गांधींनी मांडली भूमिका; म्हणाले, “राष्ट्रीय हितासाठी…” राजीनाम्यानंतर शेख हसीनांचे भारताकडे पलायन लंडनला जाण्यापूर्वी शेख हसीना दिल्लीत उतरल्या आहेत. दिल्लीपासून ३० किमी अंतरावर असलेल्या हिंडन हवाई दलाच्या विमानतळावर त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली. 'द प्रिंट रिपोर्ट'नुसार, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याची जाणीव होताच त्यांनी देश सोडून दिल्ली गाठली. बांगलादेशमध्ये राखीव जागांच्या मुद्दयावरून गेल्या महिनाभरापासून विद्यार्थ्यांची निदर्शने सुरू आहेत. जुलैपासून सुरू झालेल्या सरकारविरोधी निदर्शनांमध्ये २८० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हसीना यांच्या टीमने भारतीय हवाई क्षेत्रात सुरक्षित प्रवेशासाठी भारतीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, जो तात्काळ स्वीकारला गेला, असे 'द प्रिंट'ने दिलेल्या वृत्तात सांगण्यात आले आहे. आंदोलकांनी हल्ला करण्याच्या काही क्षणापूर्वी त्यांनी त्यांचे अधिकृत निवासस्थान सोडले. शेख हसीना यांनी देशातून पलायन केल्याची बातमी पसरताच ढाक्यातील निदर्शकांनी जल्लोष केला. माजी पंतप्रधान भारतात किती काळ राहणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हसीना लंडनमध्ये आश्रय का मागत आहेत? अलीकडेच प्राप्त झालेल्या महितीनुसार शेख हसीना लंडनला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 'द हिंदू'च्या वृत्तानुसार, त्यांनी ब्रिटनला आश्रय देण्याची विनंती केली आहे. त्यांच्याबरोबर प्रवास करणार्या त्यांच्या बहिणीकडे ब्रिटनचे नागरिकत्व आहे. ब्रिटन आशियातील बंडखोर आणि निर्वासित लोकांसाठी एक गंतव्यस्थान म्हणून उदयास आले आहे. ब्रिटनने बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचा मुलगा तारिक रहमान यांच्यासह इतर राजकारण्यांना आश्रय दिला आहे. तारिक रहमान यांच्या आईला २०१८ मध्ये हसीना सरकारने दोषी ठरवून तुरुंगात टाकले होते. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) चे उपाध्यक्ष लंडनमधून बांगलादेशमधील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे नेतृत्व करत आहेत. बीएनपीने जानेवारीच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकला होता, ज्यामुळे हसिना सलग चौथ्यांदा सत्तेवर आल्या होत्या. विरोधी पक्षाने या निवडणुकांचा उल्लेख ‘बनावट’ असा केला होता. हसीना सरकारवर विरोधी पक्ष, कार्यकर्ते आणि नागरिकांना लक्ष्य केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. शेख हसीना लंडनला आश्रयासाठी जाणार असल्याच्या अटकळींदरम्यान ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर म्हणाले की, बांगलादेशमध्ये लोकशाही टिकेल याची खात्री करण्यासाठी लवकरात लवकर पावले उचलणे आवश्यक आहे. 'डाउनिंग स्ट्रीट'च्या अधिकृत प्रवक्त्याने सांगितले की, ब्रिटीश पंतप्रधान बांगलादेशमध्ये अलीकडच्या आठवड्यात झालेल्या हिंसाचारामुळे खूप दुःखी आहेत. ते म्हणाले, "मला आशा आहे की बांगलादेशात लोकशाही टिकून राहण्यासाठी आणि लोकांची सुरक्षा टिकून राहण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील." ब्रिटनच्या राजधानीतील व्हाईटचॅपल भागात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी लोक राहतात. या भागात शेख हसीनांच्या हकालपट्टीचा आनंद साजरा करण्यासाठी अनेक जण रस्त्यावर उतरले होते. “बांगलादेशने आता दुसरे स्वातंत्र्य मिळवले आहे. खरे तर आपल्याला १९७१ मध्ये पहिल्यांदा स्वातंत्र्य मिळाले, परंतु शेख हसीना बळजबरीने देशावर राज्य करत होत्या. त्यांनी आमचे हक्क हिरावून घेतले आहेत. त्यांनी हजारो मुलांना मारले आहे,” असे बांगलादेशी नागरिक अबू सायम यांनी 'रॉयटर्स'ला सांगितले. हेही वाचा : बांगलादेशमधील अस्थिरता, शेख हसीना यांनी देश सोडल्यामुळे भारताच्या चिंतेत वाढ; काय आहेत कारणं? नवाझ शरीफ यांनीही घेतला होता लंडनमध्ये आश्रय पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन)चे अध्यक्ष नवाझ शरीफ भ्रष्टाचाराच्या आरोपात दोषी ठरल्यानंतर चार वर्षे लंडनमध्ये होते. २०१९ मध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना भ्रष्टाचारासाठी १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर ते वैद्यकीय उपचारांसाठी लंडनला रवाना झाले. २०१७ मध्ये पनामा पेपर्स घोटाळ्याशी संबंधित प्रकरणावरून पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना राजकारणापासून आजीवन बंदी घातली. शरीफ गेल्या ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानात परतले. त्यांचा पक्ष सत्तेत परत आल्यास शरीफ आर्थिक संकटग्रस्त देशाची सूत्रे हाती घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु, त्यांच्याऐवजी त्यांचे धाकटे बंधू शाहबाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान झाले.