Why Bhutan has no mosque: जपानमधील कावागोए शहरातून एक बातमी अलीकडेच समोर आली. तिथे पाकिस्तानी नागरिकांनी उभारलेल्या एका मशिदीचे उद्घाटन पाकिस्तानचे जपानमधील राजदूत अब्दुल हमीद यांच्या हस्ते करण्यात आले. परंतु, ही मशीद बेकायदेशीररित्या बांधल्याचा आरोप झाल्याने सध्या ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. वासेदा विद्यापीठातील प्राध्यापक हिरोफुमी तानादा यांनी संगितले की, २०२५-२०२६ पर्यंत जपानमध्ये मशिदींची संख्या १६० वर पोहोचली आहे. जपानमधील स्थानिक नागरिक मशिदींच्या या वाढत्या संख्येला आणि नमाजच्या आवाजाला (अझान) विरोध करत आहेत.
एकही मशीद नसलेला भूतान
वासेदा विद्यापीठातील प्राध्यापक हिरोफुमी तानादा यांनी संगितले की, २०२५ पर्यंत जपानमध्ये मशिदींची संख्या १६० वर पोहोचली आहे. फुजिसावा आणि कानाजावा या शहरांमध्येही स्थानिक जपानी नागरिक आणि मुस्लिम समुदाय यांच्यात संघर्षमय परिस्थिती निर्माण झाली होती. जपानमधील या घडामोडींमुळे जागतिक स्तरावर ‘धार्मिक स्वातंत्र्य विरुद्ध स्थानिक संस्कृतीचे रक्षण’ या विषयावर पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर, भारताच्या शेजारील एका अशा देशाचे नाव समोर येते, ज्या देशाची सीमा भारताला जोडलेली आहे, जिथे मुस्लिम नागरिकांची संख्या तुलनेने जास्त आहे. मात्र आपल्या सीमेवरील या देशात एकही अधिकृत मशीद अस्तित्वात नाही.
मशिदींशिवाय असणारा भारताचा एकमेव शेजारी
भारत आणि चीन या दोन महासत्तांच्या दरम्यान वसलेला भूतान हा एक लहान, पर्वतीय आणि निसर्गरम्य देश आहे. भारतामध्ये दर शुक्रवारी पढला जाणारा नमाज, मशिदींमधून येणारा अझानचा आवाज हे अत्यंत सवयीचे आणि परिचयाचे दृश्य आहे. भारताच्या इतर शेजारी देशांमध्ये उदा. पाकिस्तान, बांगलादेश किंवा मालदीवमध्ये इस्लाम हा मुख्य किंवा राजधर्म अर्थात त्या देशांचा धर्म आहे. नेपाळ आणि श्रीलंकेतही मोठ्या प्रमाणावर मशिदी उघडपणे दिसतात. परंतु, भूतानची स्थिती या सर्वांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. भूतानमध्ये मशिदींमधून जाहीर अझान दिली जात नाही, सार्वजनिक ठिकाणी नमाज पढले जात नाही आणि सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे, संपूर्ण देशात एकही अधिकृत मशीद नाही.
भूतानमधील धार्मिक लोकसंख्या आणि मुस्लिम समुदाय
सुमारे ८ लाख लोकसंख्या असलेल्या भूतानमध्ये बहुतांश लोक बौद्ध धर्माचे पालन करतात. एकूण लोकसंख्येच्या ७५ टक्क्यांहून अधिक लोक ‘वज्रयान बौद्ध’ (Vajrayana Buddhism) पंथाचे अनुयायी आहेत, तर उर्वरित लोकसंख्येमध्ये प्रामुख्याने हिंदू (सुमारे २२ ते २३ टक्के) आहेत.
भूतानमधील मुस्लिम समुदायाची लोकसंख्या अत्यंत मर्यादित आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, संपूर्ण देशात काही हजारच मुस्लिम नागरिक राहतात. यामध्ये प्रामुख्याने शेजारील देश भारत आणि बांगलादेशातून आलेले व्यापारी, कंत्राटी कामगार, स्थलांतरित मजूर आणि वर्षानुवर्षे तिथे स्थायिक झालेल्या काही कुटुंबांचा समावेश आहे. हा समुदाय आकाराने खूप लहान असल्यामुळे आणि देशातील कडक नियमांमुळे तिथे मशिदीची उभारणी झालेली नाही. मग हे नागरिक आपली प्रार्थना कशी करतात? तर, मुस्लिम नागरिक त्यांच्या खाजगी घरांमध्ये किंवा वैयक्तिक जागांमध्ये एकत्र येऊन शांततेत नमाज पढतात करतात, यासाठी प्रशासनाचा कोणताही विरोध नाही.

घटनात्मक चौकट आणि कडक कायदे
भूतानमध्ये मशीद किंवा चर्च न बांधले जाण्यामागे तिथली राज्यघटना आणि धार्मिक धोरणे कारणीभूत आहेत. भूतानने २००८ साली आपली नवीन राज्यघटना (Constitution) स्वीकारली. या संविधानात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, ‘वज्रयान बौद्ध धर्म हा भूतानचा आध्यात्मिक वारसा (Spiritual Heritage) आहे.’
भूतानचे संविधान आपल्या नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्याची हमी नक्कीच देते, परंतु त्याच वेळी त्यावर काही कडक मर्यादाही घालते.
- धर्मांतरावर बंदी: देशात कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाला बळी पाडून किंवा सक्तीने धर्मांतर (Religious Conversion) करण्याच्या कृतीवर पूर्णपणे बंदी आहे.
- धार्मिक स्थळांसाठी मंजुरी: देशात कोणत्याही नवीन धार्मिक संरचनेचे (मशीद, चर्च किंवा मंदिर) बांधकाम करायचे असल्यास सरकारची अधिकृत आणि विशेष मंजुरी आवश्यक असते.
- धार्मिक संस्थांची नोंदणी आणि देखरेख: भूतानमधील सर्व धार्मिक संस्थांची नोंदणी ‘छोएडे ल्हेंटशॉग’ (Choedey Lhentshog) या धार्मिक व्यवहार आयोगाकडे करणे बंधनकारक असते.
- आजपर्यंत भूतान सरकारने कोणत्याही नवीन मशीद किंवा चर्चच्या बांधकामाला अधिकृत मंजुरी दिलेली नाही. जी जुनी हिंदू मंदिरे किंवा बौद्ध मॉनेस्ट्रीज (गोम्पा) आहेत, त्यांनाच केवळ कायदेशीर मान्यता आहे.
‘ग्रॉस नॅशनल हॅपीनेस’ (GNH) आणि सांस्कृतिक संवर्धन
भूतान हा जगातील एकमेव असा देश आहे जो आर्थिक विकासापेक्षा (GDP) नागरिकांच्या आनंदाला म्हणजेच ‘ग्रॉस नॅशनल हॅपीनेस’ला (Gross National Happiness – GNH) अधिक महत्त्व देतो. या GNH च्या संकल्पनेत चार मुख्य स्तंभ आहेत, ज्यापैकी एक अत्यंत महत्त्वाचा स्तंभ म्हणजे ‘सांस्कृतिक संवर्धन आणि जतन’ (Cultural Preservation).
भूतानच्या राज्यकर्त्यांचे आणि प्रशासनाचे असे स्पष्ट मत आहे की, भूतान हा भौगोलिकदृष्ट्या अत्यंत लहान आणि सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील देश आहे. देशाची पारंपारिक मूल्ये, बौद्ध वारसा आणि सामाजिक एकजूट टिकवून ठेवायची असेल, तर बाह्य सांस्कृतिक प्रभावांना मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. पाश्चिमात्य किंवा इतर आशियाई देशांमध्ये ज्याप्रमाणे वेगवेगळ्या धर्मसंस्कृतींच्या उदयामुळे सामाजिक संघर्ष निर्माण झाले (सध्या जपानमध्ये पाहायला मिळणारा संघर्ष), तसा संघर्ष आपल्या शांतताप्रिय देशात होऊ नये, अशी भूतानची भूमिका आहे.
जागतिक संदर्भ: मशिदी नसलेले इतर देश
फक्त भूतानच असा देश आहे का, जिथे मशीद नाही? तर असे नाही. जागतिक स्तरावर मशिदी नसलेल्या देशांच्या यादीत भूतान व्यतिरिक्त इतरही काही देशांचा प्रामुख्याने समावेश होतो. आशिया खंडातील भूतानमध्ये वज्रयान बौद्ध संस्कृतीचे जतन करण्यासाठी आणि बाह्य प्रभाव रोखण्यासाठी कडक कायदे करण्यात आले आहेत, ज्यामुळे तिथे मशीद अस्तित्वात नाही. युरोप खंडाचा विचार केला तर, व्हॅटिकन सिटी हे संपूर्ण जगातील रोमन कॅथलिक चर्चचे मुख्य केंद्र असल्यामुळे, तिथे केवळ ख्रिश्चन धर्मीय वास्तू आढळतात आणि इतर कोणत्याही धर्माच्या प्रार्थनास्थळाला परवानगी नाही. युरोपमधीलच मोनॅको या देशाचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ अत्यंत लहान आहे आणि तेथील कडक नियमांमुळे तिथे स्वतंत्र मशीद उभारली गेलेली नाही. याशिवाय, स्लोव्हाकिया हा युरोपियन युनियनमधील असा देश आहे, जिथे इस्लामला अधिकृत धर्माचा दर्जा दिलेला नाही आणि तेथील कायदेशीर अडथळ्यांमुळे तिथे एकही अधिकृत मशीद बांधता आलेली नाही.
या सर्व देशांमध्ये आशिया खंडाचा विचार केला तर भूतानचे मॉडेल सर्वात वेगळे आणि लक्षवेधी ठरते. याचे कारण असे की, भूतानमध्ये आधुनिक लोकशाही आणि राजेशाही यांचा योग्य मेळ घालत आपल्या मूळ संस्कृतीचे अत्यंत काटेकोरपणे रक्षण केले जाते.
शांततापूर्ण सहअस्तित्वाचे भूतानी मॉडेल
जपानमध्ये मशिदीच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला तणाव हा दर्शवतो की, जेव्हा नवीन संस्कृती स्थानिक कायद्यांचे किंवा परंपरांचे उल्लंघन करते, तेव्हा समाजात अस्वस्थता पसरते. याउलट, भूतानचे मॉडेल हे दाखवून देते की, भौतिक धार्मिक वास्तू (मशीद किंवा चर्च) नसली तरीही एखादा अल्पसंख्याक समुदाय बहुसंख्य बौद्ध समाजात अत्यंत सुरक्षितपणे आणि आदराने राहू शकतो.
भूतानमधील मुस्लिम रहिवासी तेथील कायदे आणि बौद्ध संस्कृतीचा आदर करतात, तर भूतानी प्रशासन त्यांच्या वैयक्तिक धार्मिक भावनांचा आदर करते. त्यामुळेच, कोणतीही अधिकृत मशीद नसतानाही भूतान हे जागतिक शांतता, धार्मिक सलोखा आणि सांस्कृतिक संवर्धनाचे एक अनोखे आणि आदर्श उदाहरण ठरले आहे.
