Why is Crypto Crashing : जगातील सर्वात लोकप्रिय आभासी चलन असलेल्या बिटकॉइनला अचानक उतरती कळा लागली. गुरुवारी सकाळच्या सत्रात बिटकॉइन तब्बल १२.६ टक्क्यांनी घसरून थेट ६३,००० डॉलरपर्यंत खाली आले. गेल्या १६ महिन्यांनंतर पहिल्यांदाच इतकी मोठी घसरण झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. काही महिन्यांपूर्वी बिटकॉइनच्या किमतींमध्ये मोठी तेजी दिसून आली होती. ऑक्टोबर २०२५ मध्ये बिटकॉइनने १,२२,२०० डॉलरचा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी क्रिप्टो करन्सीला उघडपणे पाठिंबा दिल्यानंतरही बिटकॉइनमध्ये मोठी पडझड झाल्याचे दिसून येत आहे. नेमकी काय आहे त्यामागची कारणे? त्याविषयीचा हा आढावा…

जानेवारी २०२५ मध्ये दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला जगाची क्रिप्टो राजधानी करण्याच्या उद्देशाने एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली होती. याव्यतिरिक्त त्यांनी स्वतःचा क्रिप्टो ब्रँड सुरू करून त्याला ‘वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल’ या गुंतवणूक संस्थेशी जोडले होते. त्यानंतरही बिटकॉइनच्या किमतीत एवढी मोठी घसरण का झाली, असा प्रश्न आता बाजारात उपस्थित केला जात आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, बिटकॉइनमध्ये या आठवड्यात तब्बल १७ टक्क्यांची घसरण झाली असून या वर्षात आतापर्यंत एकूण २८ टक्क्यांचा तोटा झाला आहे.

बिटकॉइनच्या घसरणीमागची कारणे कोणती?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षपदी केविन वॉर्श यांची केलेली नियुक्ती हे घसरणीचे बिटकॉइनच्या मुख्य घसरणीमागचे कारण सांगितले जात आहे. महागाईवर कठोर भूमिका घेणारे अर्थतज्ज्ञ म्हणून केविन वॉर्श यांची ओळख आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे चलनविषयक धोरण अधिक कडक होण्याची शक्यता वाढली आहे. २०१० मध्ये त्यांनी फेडच्या शून्य व्याजदर धोरणावर तीव्र टीका केली होती. त्यावेळी बेरोजगारीचा दर १० टक्क्यांवर असतानाही वॉर्श यांनी महागाईच्या धोक्याचा इशारा दिला होता. ओबामा प्रशासनाच्या काळात त्यांनी व्याजदर वाढवण्याची मागणी केली होती; पण डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात वॉर्श यांनी आपली भूमिका बदलल्याचे दिसून आले.

आणखी वाचा : Gold-Silver Prices : सोन्या-चांदीच्या तेजीला कशामुळे लागला ब्रेक? घसरणीमागची नेमकी कारणं काय?

बिटकॉइन इतका का घसरतोय?

जबरदस्तीने करण्यात आलेली विक्री हेदेखील बिटकॉइन घसरण्याचे दुसरे मोठे कारण सांगितले जात आहे. बिटकॉइनच्या किमती बऱ्याचदा तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअर बाजारानुसार बदलतात. या आठवड्यात अँथ्रॉपिकच्या नवीन एआय (AI) टूलमुळे आयटी शेअरमध्ये मोठी घसरण झाली. त्याचा मोठा फटका बिटकॉइनलाही बसला. सुवर्ण बाजारातील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदार सावध झाले असून त्यांनी क्रिप्टो करन्सीमधून गुंतवणूक काढून घेतली आहे, त्यामुळेही बिटकॉइला मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे. केवळ बिटकॉइनच नव्हे तर संपूर्ण क्रिप्टो बाजारात सध्या मोठी घसरण सुरू आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला ४.३७९ ट्रिलियन डॉलर्स असलेल्या जागतिक क्रिप्टो मार्केटचा एकूण आकडा दोन ट्रिलियन डॉलर्सने कमी झाला आहे. गेल्या एका महिन्यातच क्रिप्टो मार्केटमधील ट्रिलियनहून डॉलर्सहून अधिक मूल्य कमी झाले आहे. बिटकॉइन पाठोपाठ दुसरी सर्वात मोठी क्रिप्टो करन्सी ‘इथर’ गुरुवारी १३ टक्क्यांहून अधिक घसरली आहे. या वर्षात आतापर्यंत इथरमध्ये तब्बल ३८ टक्क्यांची घसरण झाली आहे.

घसरणीनंतर गुंतवणूकदारांनी काय करावे?

बिटकॉइनच्या किमतीत झालेल्या मोठ्या घसरणीनंतर गुंतवणूकदार धास्तावले आहेत. क्रिप्टोमधील गुंतवणुकीबाबत नेमका काय निर्णय घ्यावा असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते, हा निर्णय पूर्णपणे बिटकॉइन तुमच्या एकूण आर्थिक नियोजनात कुठे बसतो आणि तुम्ही किती जोखीम सहन करू शकता यावर अवलंबून आहे. StackWealth या संस्थेच्या संस्थापक आणि प्रमाणित आर्थिक नियोजक वेरड फ्रँक यांनी सीएनबीशी बोलताना सांगितले की- बिटकॉइनमधील अलीकडील अस्थिरतेमुळे असे लक्षात येते की, क्रिप्टोमधील गुंतवणूक अजूनही जोखमीची आहे, त्यामुळे गुंतवणुकीचे एकमेव साधन म्हणून त्यावर अवलंबून राहणे धोकादायक आहे. बिटकॉइनची सतत होत असलेली विक्री ही पारंपरिक गुंतवणूकदार क्रिप्टोमधून बाहेर पडत असल्याचे संकेत देते. सध्याच्या अस्थिरतेच्या काळात संपूर्ण क्रिप्टो बाजाराबाबत निराशावाद वाढत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : अमेरिकेतून ३८०० भारतीयांची हकालपट्टी; कोणकोणत्या देशांनी केलं भारतीयांना हद्दपार

क्रिप्टो गुंतवणुकीत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

बिटकॉइन गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक बाब म्हणजे गुरुवारी झालेली ही घसरण काही नवी बाब नाही. याआधीही बिटकॉइनमध्ये अशा तीव्र पडझडी झाल्या आहेत, त्यानंतर पुन्हा बिटकॉइनमध्ये तेजीही पाहायला मिळाली आहे. क्रिप्टो गुंतवणुकीत देशात उत्तर प्रदेश पहिल्या स्थानी तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे. देशातील एकूण क्रिप्टो गुंतवणुकीत उत्तर प्रदेशचा वाटा १३ टक्के असून, महाराष्ट्राचा वाटा १२.१ टक्के आहे. देशातील क्रिप्टो व्यवहार रात्री उशिरा जास्त होत असून, रात्री १० ते ११ ही वेळ व्यवहारासाठी सर्वात व्यग्र असल्याची बाब समोर आली आहे. देशातील क्रिप्टो गुंतवणूकदारांमध्ये २६ ते ३५ वयोगटाचा वाटा सर्वाधिक ४५ टक्के आहे. तसेच १८ ते २५ वयोगटाचा वाटा २५.३ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

गुंतवणूकादारांचा सहभाग सातत्याने वाढतोय

डिसेंबर २०२५ मध्ये आभासी चलन व्यवहार मंच कॉइनस्विचने देशातील क्रिप्टो गुंतवणुकीचा वार्षिक अहवाल जाहीर केला होता. अडीच कोटींहून अधिक वापरकर्त्यांकडून संकलित केलेल्या माहितीच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला. या अहवालानुसार लोकसंख्येच्या दृष्टीने, महाराष्ट्रातील क्रिप्टो बाजारपेठेत तरुणांचे प्रमाण सर्वाधिक आहे. राज्यातील क्रिप्टो गुंतवणूकदारांमध्ये महिलांचे प्रमाण २०.३ टक्के, तर पुरुषांचे प्रमाण ७९.८ टक्के आहे. मुंबई आणि पुणे या महानगरांव्यतिरिक्त इतर शहरांमधून गुंतवणूकादारांचा सहभाग सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे.