Amit Malviya BJP Replaced Reason : ‘जुन्यांना निरोप आणि नव्यांना संधी’ या धोरणाचा अवलंब करत भाजपाने सोमवारी मोठ्या संघटनात्मक फेरबदलांची घोषणा केली. त्यातील सर्वात महत्वाचा निर्णय पक्षाच्या सोशल मीडिया संयोजकपदी दीपक म्हस्के यांची करण्यात आलेली नियुक्ती हा मानला जात आहे. त्यांनी गेल्या ११ वर्षांपासून या पदाची अत्यंत जबाबदारीने धुरा सांभाळणारे अमित मालवीय यांची जागा घेतली आहे. त्यामुळे आतापर्यंत फारसे परिचित नसलेले दीपक म्हस्के नेमके आहे तरी कोण? भाजपाने अमित मालवीय यांना कशामुळे हटवले? अशी चर्चा सगळीकडेच सुरू आहे, त्याविषयी…

दीपक म्हस्के नेमके आहे तरी कोण?

भाजपाचे नवे सोशल मीडिया प्रमुख दीपक म्हस्के यांचा आजवरचा प्रवास अत्यंत वैविध्यपूर्ण राहिला आहे. १९६८ मध्ये रायपूर येथे जन्मलेल्या म्हस्के यांची कारकीर्द राजकीय चौकटीबाहेरची आहे. त्यांनी रसायनशास्त्र विषयाची पदव्युत्तर पदवी असून, सिमेंट तंत्रज्ञानातील डिप्लोमा आणि कॉम्प्युटर प्रोग्रामिंगचा प्रमाणित अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे. ‘इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड’ या कंपनीकडे असलेल्या त्यांच्या माहितीनुसार, दीपक म्हस्के यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एका महाविद्यालयात रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून केली. त्यानंतर काही काळासाठी ते शेती क्षेत्राकडे वळले. त्यांच्याकडे फलोत्पादन आणि सेंद्रिय शेतीचा तीन दशकांहून अधिक काळाचा मोठा अनुभव आहे. याशिवाय त्यांनी रस्ते बांधकाम क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. म्हस्के यांना डेटा संकलन आणि त्याच्या विश्लेषणाची विशेष आवड असल्याचे सांगितले जाते. विशेषतः निवडणुकीशी संबंधित आकडेवारी आणि सरकारच्या विविध लाभार्थी योजनांच्या डेटाचा ते अभ्यास करतात. त्यांनी तयार केलेले अहवाल खाजगी आणि सरकारी संस्थांनीही वापरले असल्याचे इंजिनिअर्स इंडिया लिमिटेडच्या वेबसाईटवर नमूद आहे.

२००९ मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश

दीपक म्हस्के यांनी २००९ मध्ये राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील ब्राह्मण कुटुंबात झाला असून जुना जनसंघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचे पूर्वीपासून संबंध असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच भाजपातील प्रवेश हा त्यांच्यासाठी स्वाभाविक पर्याय ठरल्याचे मानले जाते. गेल्या अनेक वर्षांत म्हस्के यांनी छत्तीसगड भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख आणि प्रवक्ते म्हणून काम केले आहे. निवडणूक प्रचार आणि डेटा विश्लेषणासाठीही त्यांनी आपल्या कौशल्याचा वापर केलेला आहे.‘द प्रिंट’च्या एका वृत्तानुसार, छत्तीसगडमध्ये जिल्हानिहाय फेसबुक अकाउंट्सची रणनीती तयार करण्यात म्हस्के यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांनी छत्तीसगड मेडिकल सर्व्हिसेस कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. या पदावर त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला होता. याशिवाय ते इंजिनिअर्स इंडिया लिमिटेडच्या संचालक मंडळावर स्वतंत्र संचालक म्हणूनही कार्यरत होते. विशेष म्हणजे, भाजपामध्ये अनेक वर्षे सक्रिय असूनही दीपक म्हस्के यांनी आजवर कोणतीही निवडणूक लढवलेली नाही. तरीदेखील ते पक्षातील पहिल्या पिढीतील नेते मानले जातात. त्यांचे बंधू तेज प्रताप म्हस्के हे मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याचे सांगितले जाते.

म्हस्के यांच्यासमोर कोणकोणती आव्हाने?

अमित मालवीय यांची जागा घेत भाजपाच्या राष्ट्रीय सोशल मीडिया विभागाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या दीपक म्हस्के यांच्यासमोर आता मोठी आव्हाने असणार आहेत. राष्ट्रीय पातळीवर भाजपाच्या सोशल मीडिया रणनीतीचे नेतृत्व करताना पक्षाला विशेषतः तरुणांशी जोडण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आहे. यादरम्यान म्हस्के यांच्या नावाची घोषणा होताच त्यांना तरुणांशी संवाद कसा साधणार, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी ‘रील्स’च्या माध्यमातून तरुणांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील बहुतांश तरुण आधीपासूनच सोशल मीडियावर सक्रिय आहेत आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याच माध्यमाचा वापर केला जाईल. जनतेची सेवा करण्यासाठी भाजपाला निवडणुका जिंकाव्या लागतील. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आमची संपूर्ण टीम पूर्ण ताकदीने काम करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सोशल मीडियावरील प्रचार आणि विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांबाबतही म्हस्के यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. विरोधकांच्या अपप्रचारामुळे काही काळासाठी वातावरण तयार होऊ शकते. मात्र, दीर्घकाळ योग्य उत्तरे आणि वस्तुस्थिती जनतेसमोर मांडत राहिल्यास लोकांचे गैरसमज दूर होतात. भाजपाही याच दिशेने पुढे जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

छत्तीसगडमध्ये काँग्रेसविरोधात आक्रमक मोहीम

अमित मालवीय यांच्याप्रमाणे आक्रमक शैलीसाठी म्हस्के सध्या फारसे परिचित नसले तरी, त्यांना जवळून ओळखणाऱ्यांच्या मते परिस्थितीनुसार स्वतःला झटपट बदलण्याची आणि रणनीती आखण्याची त्यांची क्षमता आहे. याचे उदाहरण २०२३ मध्ये झालेल्या छत्तीसगड विधानसभा निवडणुकीपूर्वीची त्यांची सोशल मीडिया मोहीम मानली जाते. त्यावेळी म्हस्के यांनी भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारविरोधात भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर सातत्याने हल्लाबोल केला होता. समाजमाध्यमांवर संबंधित पोस्ट, छायाचित्रे आणि मुद्देसूद मजकुराच्या माध्यमातून काँग्रेस सरकारला लक्ष्य करण्याची रणनीती त्यांनी राबवली होती. आता राष्ट्रीय पातळीवर भाजपाच्या सोशल मीडिया विभागाची धुरा त्यांच्या हाती आल्याने तरुण मतदारांपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचवणे, विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देणे आणि डिजिटल माध्यमातून निवडणूक प्रचाराला नवी दिशा देणे, ही म्हस्के यांच्यासमोरील प्रमुख आव्हाने असतील.

भाजपाने अमित मालवीय यांना का हटवले?

दरम्यान, भाजपाने दीपक म्हस्के यांची राष्ट्रीय सोशल मीडिया संयोजकपदी नियुक्ती केल्यानंतर पक्षाने २०१५ पासून हे पद सांभाळणारे अमित मालवीय यांना का हटवले? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षांत भाजपमध्ये अनेक संघटनात्मक बदल झाले असतानाही त्यांना पदावर कायम ठेवले होते. त्यामुळे मालवीय त्यांच्या जागी अचानक म्हस्के यांची नियुक्ती होणे अनेकांसाठी आश्चर्यकारक ठरले आहे. या निर्णयामागे अमित मालवीय यांच्या आक्रमक कार्यशैलीचा काही प्रमाणात प्रभाव असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. समाजमाध्यमांवर पक्षाचा प्रचार करताना नेहमीच आक्रमकता उपयोगी पडत नाही आणि अनेकदा तर्कशुद्ध दृष्टिकोनही आवश्यक असतो, असे भाजपाच्या एका नेत्याने द प्रिंटला सांगितले. पक्षातील काही वरिष्ठ नेते अलीकडील काही घटनांमुळे अमित मालवीय यांच्यावर नाराज असल्याचेही सांगितले जाते. नुकत्याच झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांना मालवीय यांचा तरुण पिढीशी असलेला तुटलेला संवाद स्पष्टपणे जाणवला, असे द प्रिंटच्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान तरुणांशी प्रभावी संवाद साधण्यात मालवीय अपयशी ठरल्याची भावनाही पक्षातील काही नेत्यांनी व्यक्त केली.

नागरिकांची खिल्ली उडवल्याचा झाला आरोप

मालवीय यांनी कठीण प्रसंगात भाजपाची भक्कम बाजू मांडण्याऐवजी समाजमाध्यमांवर नागरिकांची खिल्ली उडवण्याचा मार्ग स्वीकारल्याचा आरोप झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारवंत रतन शारदा यांनी २०२४ मध्ये याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात मालमत्ता विक्रीवरील ‘इंडेक्सेशन’चा लाभ रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर देशातील विविध स्तरांतून नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया दिला होत्या. त्यावर अमित मालवीय यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत आज रात्री प्रत्येकजण इंडेक्सेशन तज्ज्ञ बनला आहे, अशी टिप्पणी केली होती. या पोस्टवर प्रतिक्रिया देताना रतन शारदा यांनी लिहिले होते की, भाजपाच्या आयटी सेलची ही वृत्ती गंभीर समस्या आहे. अर्थसंकल्पातील सकारात्मक बाबी सोप्या भाषेत समजावून सांगण्याऐवजी नागरिकांची खिल्ली उडवली जात आहे. लोकांच्या शंका आणि भीती दूर करा, त्यांचा अपमान करू नका, अशी कानउघडणी त्यांनी केली होती. यादरम्यान दीपक म्हस्के यांची नियुक्ती झाल्यानंतर भाजपाच्या सोशल मीडिया रणनीतीत कोणते बदल होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.