Ruchir Sharma on BJP Dominance And Opposition Weakness : भारतीय जनता पक्षाचे राजकारणात वर्चस्व राहण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे त्यांना उजव्या विचारसरणीचा कोणताही ठोस प्रतिस्पर्धी नाही, असे मत प्रसिद्ध लेखक व आघाडीचे गुंतवणूकदार रुचिर शर्मा यांनी व्यक्त केले. २८ एप्रिल रोजी मुंबईत आयोजित ‘एक्सप्रेस अड्डा’ या कार्यक्रमात ते बोलत होते. दी इंडियन एक्सप्रेसचे कार्यकारी संचालक अनंत गोएंका यांनी रुचिर शर्मा यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी भाजपाला विजय नेमका कशामुळे मिळतो आणि विरोधक का पराभूत होतात? याबाबत सविस्तर भाष्य केले, त्याविषयीचा हा आढावा…

भाजपाला विजय नेमका कशामुळे मिळतो?

रुचिर शर्मा म्हणाले की, उजव्या विचारसरणीचे समर्थन करणाऱ्यांसाठी प्रत्यक्षात भाजपा हा एकमेव पक्षच उपलब्ध आहे. याउलट दुसऱ्या बाजूला (विरोधी पक्षात) प्रचंड स्पर्धा असल्यामुळे तिथली मते मोठ्या प्रमाणात विभागली जातात. यावेळी शर्मा यांनी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचा संदर्भ दिला. नुकताच त्यांनी या राज्याचा दौरा केला होता. त्या अनुभवावरून शर्मा म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसला मुस्लीम समुदायाचा मोठा पाठिंबा आहे. मात्र, तिथेही ‘एमआयएम’ (AIMIM) आणि ‘ऑल इंडिया सेक्युलर फ्रंट’ (AISF) सारखे छोटे पक्ष रिंगणात असल्यामुळे तृणमूलच्या अल्पसंख्याक मतांमध्ये मोठे विभाजन होत आहे. उजव्या विचारसरणीच्या मतदारांकडे भाजपाशिवाय दुसरा कुठलाही सक्षम पर्याय नसल्यामुळे त्यांचे मत एकवटले जाते; तर दुसरीकडे अनेक पक्षांच्या स्पर्धेमुळे विरोधी मते विभागली जाऊन भाजपाच्या विजयाचा मार्ग सुकर होतो. भाजपा किंवा त्यांच्या मित्रपक्षांची मतांची टक्केवारी कधीही ५० टक्क्यांच्या पुढे गेलेली नसली तरी उरलेली सर्व मते इतर पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर विभागली जातात, असे निरीक्षण शर्मा यांनी नोंदवले.

निवडणुकीत विकासाचा मुद्दा किती महत्त्वाचा?

निवडणुका जिंकण्यासाठी विकासाचा मुद्दा महत्त्वाचा असला तरीही केवळ याच मुद्द्यावर कोणत्याही पक्षाला विजय मिळतोच असे नाही. निवडणुकीत आघाडी मिळवून देणाऱ्या ६ ते ७ प्रमुख घटकांपैकी विकास हा केवळ एकच घटक असल्याचे रुचिर शर्मा यांनी स्पष्ट केले. आपल्या ‘डेमॉक्रसी ऑन द रोड’ (२०१९) या पुस्तकातील संशोधनाचा दाखला देताना ते म्हणाले की, आम्ही गेल्या तीन-चार दशकांतील विविध राज्यांच्या सरासरी विकासदराचा अभ्यास केला. ज्या राज्यांनी पाच वर्षांच्या कार्यकाळात वार्षिक ८ टक्क्यांहून अधिक विकासदर नोंदवला, तिथे सत्ताधारी पक्ष पुन्हा निवडून येण्याची शक्यता केवळ ५० टक्के इतकीच होती. हा आकडा खरोखरच धक्कादायक आहे. पाच वर्षांत ८ टक्के आर्थिक विकास करूनही सत्ताधाऱ्यांची पुन्हा निवडून येण्याची शक्यता ५० टक्के इतकीच असावी, हे आश्चर्यकारक आहे, असेही शर्मा म्हणाले.

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे दिले उदाहरण

केवळ ‘विकास’ हाच निवडणुकीचा मुख्य अजेंडा असू शकत नाही, हे पटवून देण्यासाठी रुचिर शर्मा यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे उदाहरण दिले. २००४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चंद्राबाबू यांच्या तेलगू देसम पार्टीने विकासाच्या मुद्द्यावर प्रचार केला होता. तरीदेखील त्यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या घटनेने केवळ विकासाच्या जोरावर निवडणूक जिंकता येते, हा सिद्धांत मोडीत काढला असल्याचे शर्मा म्हणाले. विकासासोबतच जातीय समीकरणे, उमेदवाराची प्रतिमा, पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि विचारधारेची पकड यांसारखे इतर घटकही निवडणुकीत तितकेच निर्णायक ठरतात, असेही त्यांनी नमूद केले.

बंगालच्या निवडणुकीत विकासाचा मुद्दा बेपत्ता!

पश्चिम बंगालमधील आपल्या अलीकडील दौऱ्यातील अनुभवाचा दाखला देत शर्मा म्हणाले की, निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी आणि विरोधकांनी विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला नाही. जेव्हा आम्ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना विचारले की, तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर अधिक का नाही बोलत आहात? तेव्हा विकासाबद्दल बोलण्यापूर्वी लोकांच्या सुरक्षेसंदर्भातील मूलभूत अधिकारांवर प्रथम विचार होणे आवश्यक आहे, असे उत्तर त्यांनी आम्हाला दिले. या परिस्थितीचे वर्णन करताना शर्मा म्हणाले की, विकासाच्या मुद्द्यावरून भाजपाला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची प्रत्यक्षात कोंडी करता आली असती, पण आमच्या संपूर्ण प्रवासादरम्यान ‘विकास’ हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा असल्याचे आम्हाला कुठेही दिसून आले नाही. निवडणुका जिंकण्यासाठी राजकीय पक्ष मतदारांच्या मूलभूत अधिकारांची भीती आणि सुरक्षिततेच्या मुद्द्यांवर अधिक भर देत असल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले.

बंगालमध्ये १० टक्के मतांचा फरक निर्णायक?

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेससमोरील सर्वात मोठे आव्हान सत्ताविरोधी लाटेचे असल्याचे रुचिर शर्मा यांनी सांगितले. पश्चिम बंगालमधील यंदाची विधानसभा निवडणूक अपेक्षेपेक्षा जास्त चुरशीची होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेसमध्ये गेल्या निवडणुकीत फक्त १० टक्केच मतांचा फरक होता. यंदाच्या निवडणुकीत हा फरक नक्कीच कमी होऊ शकतो. मात्र, सत्तांतर घडवून आणण्याइतपत तो कमी होईल का हे सांगणे कठीण आहे, असे शर्मा यांनी मुलाखतीत सांगितले. कोणत्याही पक्षासाठी १० टक्के मतांची तफावत भरून काढणे ही साधी गोष्ट नाही आणि त्यासाठी एखाद्या लाटेची गरज असते. पश्चिम बंगालमध्ये सध्या सत्ताविरोधी लाट तर आहेच, पण १० टक्क्यांचे अंतर कापण्यास पुरेसे ठरेल का, याबाबत आम्हालाही शंका आहे असेही रुचिर शर्मा यांनी नमूद केले.