Somnath Temple and the Ghazni Gates: महमूद गझनीने १०२६ साली सोमनाथ मंदिरावर केलेल्या हल्ल्याला १००० वर्षे पूर्ण झाली आहेत. अलीकडेच त्या कटू आठवणीच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक आणि आध्यात्मिक शक्तीचे सोमनाथ स्वाभिमान पर्व आयोजित करण्यात आले होते. या पर्वाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी सोमनाथ येथे दोन दिवस मुक्काम केला होता. त्याच पार्श्वभूमीवर आधुनिक इतिहासाच घेतलेला हा आढावा. भारतीय इतिहासातील अनेक वादग्रस्त घटनांपैकी ‘गझनीचे दरवाजे’ ही घटना आजही अभ्यासक, इतिहासकार आणि संशोधकांसाठी महत्त्वाची मानली जाते. १८४२ साली अफगाणिस्तानातून भारतात आणले गेलेले हे दरवाजे आज उत्तर प्रदेशातील आग्रा किल्ला येथील शस्त्रागारात ठेवण्यात आले आहेत. ब्रिटिश सत्तेने हे दरवाजे सोमनाथ मंदिराशी संबंधित असल्याचा दावा केला होता; मात्र नंतर तो दावा ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचा ठरला.

सोमनाथ आणि महमूद गझनी

११ व्या शतकात महमूद गझनी याने भारतावर अनेक स्वाऱ्या केल्या. यामध्ये गुजरातमधील सोमनाथ मंदिर उद्ध्वस्त केल्याची घटना मध्ययुगीन इतिहासात नमूद केली जाते. पुढील शतकांमध्ये या घटनेभोवती अनेक कथा तयार झाल्या. त्यापैकी एक कथा अशी होती की, महमूद गझनीने सोमनाथ मंदिरातील चंदनाचे दरवाजे गझनीला नेऊन कबरीवर बसवले. मात्र या कथेला भारतीय किंवा तुर्की-फारसी प्राथमिक ऐतिहासिक स्रोतांचा ठोस आधार नव्हता.

सोमनाथ मंदिर

Proclamation of the Gates; १८४२ गझनीचे दरवाजे भारतात आणले

ब्रिटिश भारताचे तत्कालीन गव्हर्नर-जनरल एडवर्ड लॉ (लॉर्ड एलेनबरो) यांनी १८४२ साली Proclamation of the Gates हा आदेश जारी केला. हा काळ ब्रिटिशांसाठी अत्यंत कठीण होता. काबूल मोहिमेतील पराभवामुळे ब्रिटिश सत्तेची प्रतिष्ठा मोठ्या प्रमाणावर धुळीस मिळाली होती. या पार्श्वभूमीवर भारतात आपली प्रतिमा मजबूत करण्यासाठी आणि राजकीय संदेश देण्यासाठी एलेनबरो यांनी हा प्रतीकात्मक निर्णय घेतल्याचे इतिहासकार मानतात. या आदेशानुसार, अफगाणिस्तानातील गझनी येथे असलेल्या महमूद गझनीच्या कबरीवरील दरवाजे काढून भारतात परत आणण्याचे आदेश देण्यात आले. ब्रिटिश प्रशासनाने हे दरवाजे ‘सोमनाथ मंदिराचे पवित्र अवशेष’ असल्याचा दावा केला.

Gates from the tomb of Mahmud of Ghazni
Gates from the tomb of Mahmud of Ghazni

गझनीच्या दरवाजांचे राजकीय महत्त्व

एलेनबरो यांच्या आदेशानुसार जनरल विल्यम नॉट यांच्या नेतृत्वाखाली सप्टेंबर १८४२ मध्ये हे दरवाजे गझनी येथून काढून घेण्यात आले. विशेष बाब म्हणजे, हे दरवाजे भारतात आणण्यासाठी ६व्या जाट लाइट इन्फंट्री या संपूर्ण शिपाई तुकडीची नेमणूक करण्यात आली होती. यावरून ब्रिटिश सरकारने या घटनेला दिलेले राजकीय आणि प्रतीकात्मक महत्त्व स्पष्ट होते.

तपासणी आणि दाव्याची पडताळणी

दरवाजे भारतात आल्यानंतर त्यांची सखोल तपासणी करण्यात आली. तपासणीत पुढील तथ्ये समोर आली :

  • दरवाज्यांची रचना गुजरात किंवा भारतीय स्थापत्यशैलीशी जुळणारी नव्हती
  • ते चंदनाच्या लाकडाचे नसून देवदारच्या लाकडाचे होते (सोमनाथ मंदिराचे दरवाजे चंदनाच्या लाकडाचे होते)
  • देवदार हे लाकूड गझनी आणि आसपासच्या प्रदेशात नैसर्गिकरीत्या आढळते
  • या निष्कर्षांमुळे हे स्पष्ट झाले की, या दरवाज्यांचा सोमनाथ मंदिराशी थेट किंवा अप्रत्यक्ष ऐतिहासिक संबंध नाही. त्यामुळे ब्रिटिश प्रशासनाचा मूळ दावा चुकीचा ठरला.

ब्रिटनमध्ये राजकीय वाद

या घटनेमुळे ब्रिटनमध्येही राजकीय वाद निर्माण झाला. १८४३ साली लंडनमधील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये या प्रकरणावर सविस्तर चर्चा झाली. विरोधी पक्षाने लॉर्ड एलेनबरो यांच्या निर्णयावर तीव्र टीका केली. अनेक खासदारांनी हा निर्णय राजकीय देखावा आणि इतिहासाचा गैरवापर असल्याचे म्हटले. इतिहासकार रोमिला थापर यांच्या मते, कोणत्याही विश्वासार्ह ऐतिहासिक स्रोतात सोमनाथ मंदिरातील दरवाजे गझनीला नेल्याचा उल्लेख आढळत नाही. त्या म्हणतात की, “जर असे दरवाजे अस्तित्वात असतीलच, तर ते कदाचित एखाद्या किल्ल्याचे दरवाजे असावेत.” त्यांच्या मते, ही घटना वसाहतवादी हस्तक्षेपाचे उत्तम उदाहरण आहे.

आग्रा किल्ल्यातील आजचे वास्तव

ब्रिटिश प्रशासनाला आपल्या चुकीच्या दाव्याची जाणीव झाल्यानंतर, हे दरवाजे सोमनाथमध्ये प्रतिष्ठापित न करता आग्रा किल्ल्यातील शस्त्रागाराच्या गोदामात ठेवण्यात आले. विशेष म्हणजे, हे दरवाजे आजही तेथेच आहेत. हे दरवाजे कोणत्याही धार्मिक वापरात किंवा सार्वजनिक प्रदर्शनात नाही.

Somnath gate aka Ghaznin gate
Somnath gate aka Ghaznin gate

ऐतिहासिक महत्त्व

गझनीचे दरवाजे ही घटना केवळ एका लाकडी वास्तूची कथा नाही. ही घटना वसाहतवादी काळात इतिहासाचा वापर कसा राजकीय उद्दिष्टांसाठी करण्यात आला, याचे द्योतक आहे. धार्मिक भावना, सांस्कृतिक प्रतीक आणि ऐतिहासिक कथन यांचा वापर करून ब्रिटिश सत्तेने आपल्या अपयशांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. १९व्या शतकातील ब्रिटिश साहित्यातही या घटनेचे पडसाद उमटले. विल्की कॉलिन्स यांच्या The Moonstone या कादंबरीतील सोमनाथ मंदिरातून चोरी झालेल्या हिऱ्याची कल्पना, इतिहासकारांच्या मते, याच ‘गेट्स’ प्रकरणामुळे ब्रिटनमध्ये निर्माण झालेल्या उत्सुकतेचे प्रतिबिंब होती.

आज आग्रा किल्ल्यात शांतपणे पडून असलेले गझनीचे दरवाजे आपल्याला एक महत्त्वाचा धडा देतात. इतिहास समजून घेताना भावनांपेक्षा पुरावे आणि कथांपेक्षा तथ्ये अधिक महत्त्वाची असतात. गझनीचे दरवाजे हे वसाहतवादी काळातील ऐतिहासिक गैरसमजाचे जिवंत उदाहरण असून, ते इतिहासाच्या चिकित्सक व वस्तुनिष्ठ अभ्यासाची गरज अधोरेखित करतात.