Dog Cancer Human Health: आजच्या शहरी घरात कुत्र्याची केवळ पाळीव प्राणी अशीच ओळख नसते, तर तो कुटुंबाचा एक अविभाज्य सदस्य असतो. त्यामुळे जेव्हा एखाद्या पाळीव कुत्र्याला कॅन्सर असल्याचं निदान होतं, तेव्हा तो धक्का…, केवळ व्हेटरनरी क्लिनिकपुरता मर्यादित राहत नाही; तर तो संपूर्ण घराला हादरवून सोडतो. अशा घटनांची संख्या सध्या वाढताना दिसत असल्यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे; कुत्र्यांमध्ये कॅन्सर खरोखर वाढतोय का, की तो आज अशी प्रकरणे अधिक प्रमाणात समोर येत आहेत?

या प्रश्नाचं उत्तर सरळ नाही. आयुष्यमान वाढणं, तपासण्या वाढणं, शहरी जीवनशैली, पर्यावरणातील बदल या सगळ्यांचा गुंता उलगडल्याशिवाय या कॅन्सरच्या वाढीमागचं शास्त्रीय चित्र स्पष्ट होत नाही.

कुत्र्यांचं आयुष्य वाढलं, त्यामुळे कॅन्सरचं प्रमाण अधिक प्रमाणात समोर येत आहे का?

कॅन्सर हा बहुतांश वेळा वयाशी संबंधित (age-related) आजार मानला जातो. एखादा सजीव जितका जास्त काळ जगतो, तितका त्याच्या शरीरातील पेशींमध्ये जनुकीय बदल होण्याचा आणि त्यातून कॅन्सरसारखे आजार निर्माण होण्याचा धोका वाढतो, हाच भाग माणसांप्रमाणेच कुत्र्यांनाही लागू होतो.

पूर्वी बहुतेक कुत्रे संसर्गजन्य आजार, अपघात, कुपोषण किंवा उपचारांच्या अभावामुळे लवकर दगावत होते. आज मात्र परिस्थिती मोठ्या प्रमाणावर बदलली आहे. नियमित लसीकरण, डी-वर्मिंग, संतुलित आहार, स्वच्छता आणि वेळेवर उपचार यामुळे पाळीव कुत्र्यांचं आयुष्य लक्षणीयरीत्या वाढलं आहे. शहरी भागात व्हेटर्नरी दवाखाने, तज्ज्ञ डॉक्टर, आधुनिक तपासण्या आणि औषधोपचार सहज उपलब्ध झाले आहेत.

आयुष्य वाढणं ही नक्कीच सकारात्मक बाब आहे. मात्र त्याचा एक अनिवार्य परिणाम असा होतो की, वय वाढल्यावर दिसणारे आजार विशेषतः कॅन्सर अधिक प्रमाणात समोर येऊ लागतात. शास्त्रज्ञ यालाच ‘longevity effect’ असं म्हणतात. हाच ट्रेंड माणसांमध्येही दिसतो. आयुर्मान वाढलं की कॅन्सरचे निदान वाढतं, असं संशोधकांना वाटतं.

जास्त निदान आणि जास्त रिपोर्टिंग (Detection Bias)

कुत्र्यांमध्ये कॅन्सर वाढतोय असं वाटण्यामागे दुसरं मोठं कारण म्हणजे जास्त निदान आणि जास्त रिपोर्टिंग. पूर्वी अनेकदा अंगावर आलेल्या गाठी, वजन कमी होणं, भूक न लागणं किंवा थकवा ही लक्षणं ‘वयाची’ किंवा ‘सामान्य आजाराची’ म्हणून दुर्लक्षित केली जात होती. आवश्यक तपासण्या न झाल्यामुळे अनेक केसेस कॅन्सर म्हणून ओळखल्या जातच नव्हत्या. आज परिस्थिती वेगळी आहे. स्कॅन, बायोप्सी, हिस्टोपॅथोलॉजीसारख्या तपासण्या सहज उपलब्ध आहेत. अनेक शहरांमध्ये स्वतंत्र व्हेटर्नरी ऑन्कोलॉजी सेंटर्स सुरू झाली आहेत. शिवाय पाळीव प्राण्यांकडे कुटुंबातील सदस्य म्हणून पाहण्याची मानसिकता वाढल्यामुळे मालक उपचारांवर खर्च करण्यासही तयार असतात. परिणामी, जे आजार पूर्वी निदान होत नव्हते, ते आज कॅन्सर म्हणून नोंदवले जात आहेत. यालाच शास्त्रीय भाषेत डिटेक्शन बायस म्हटलं जातं. म्हणजेच आज कॅन्सरच्या केसेस जास्त दिसतात, याचा अर्थ कॅन्सर अचानक प्रचंड वाढलाय असं नसून तो अधिक अचूकपणे शोधला आणि नोंदवला जात आहे.

स्थूलपणा आणि कमी हालचाल: सर्वात महत्त्वाचे आधुनिक कारण

आज अनेक पाळीव कुत्र्यांचं आयुष्य घरातल्या जीवनशैलीशी जुळून गेलं आहे. कमी धावणं-फिरणं, कमी खेळ, आणि जास्त कॅलरी असलेला आहार. परिणामी स्थूलपणा (obesity) वाढते. स्थूलपणा हा केवळ बाह्य जाडेपणा नसून ती शरीरातील संपूर्ण जैविक यंत्रणेला प्रभावित करणारी अवस्था आहे.

…तर कॅन्सरची शक्यता वाढते

चरबी वाढली की, शरीरात दीर्घकालीन, सौम्य दाह (chronic low-grade inflammation) निर्माण होतो. हा दाह पेशींमध्ये सतत दुरुस्तीची प्रक्रिया सुरू ठेवतो. या प्रक्रियेत जर चुका होत राहिल्या, तर कॅन्सरसारख्या आजारांची शक्यता वाढते. शिवाय स्थूलपणामुळे हार्मोन्स आणि इन्सुलिन सिग्नलिंगमध्ये बदल होतात, जे पेशींच्या अनियंत्रित वाढीस पोषक ठरू शकतात. म्हणजेच स्थूलपणा कॅन्सरचं थेट कारण नसला, तरी तो जोखीम वाढवणारा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.

घर आणि शहरातील पर्यावरण: प्रदूषण आणि रसायने

कुत्र्यांना आपल्या पर्यावरणाचे ‘सेंटिनेल’ मानले जाते. ते जमिनीच्या जवळ श्वास घेतात, धूळ-रसायनं सहज त्यांच्या शरीरात जातात आणि पायांवर किंवा फरवर बसलेली घाण ते चाटून घेतात. शहरातील कुत्र्यांचा संपर्क फ्लोअर क्लिनर, डिटर्जंट, कीटकनाशके, पेंट-सॉल्व्हेंट्सची वाफ आणि वायूप्रदूषणाशी सातत्याने येतो. सगळ्या कुत्र्यांना कॅन्सर होतो असं नाही, पण काही टॉक्सिन्सचा दीर्घकालीन संपर्क काही विशिष्ट कॅन्सर प्रकारांच्या जोखमीशी जोडला जाऊ शकतो, असं संशोधन सूचित करतं.

पॅसिव्ह स्मोकिंगचाही परिणाम

घरात कुणी धूम्रपान करत असेल, तर त्याचा परिणाम कुत्र्यावरही होऊ शकतो. काही अभ्यासांनी पॅसिव्ह स्मोकिंग आणि नाक, श्वसनमार्ग किंवा मूत्राशयाशी संबंधित कॅन्सर यांच्यात संभाव्य संबंध तपासला आहे. निष्कर्ष सर्व अभ्यासांत समान नसले, तरी धूम्रपानापासून कुत्र्यांना दूर ठेवणं हे आरोग्यदृष्ट्या महत्त्वाचं ठरतं.

प्रजनन-हॉर्मोन्स आणि मॅमरी ट्यूमर्स

फिमेल कुत्र्यांमध्ये मॅमरी ट्यूमर्स हे वारंवार आढळणारा कॅन्सरचा प्रकार आहे. यामागे इस्ट्रोजेन-प्रोजेस्टेरोनसारख्या हॉर्मोन्सचा दीर्घकाळचा प्रभाव महत्त्वाचा ठरतो. सुरुवातीच्या टप्प्यातील गाठी अनेकदा दुर्लक्षित केल्या जातात, पण या प्रकारात लवकर निदान अत्यंत निर्णायक ठरू शकतं.

जाती आणि जीवनशैलीचा संयोग

काही जातींमध्ये विशिष्ट कॅन्सर्सचा आनुवांशिक धोका अधिक असतो. त्यात जर कमी व्यायाम, जास्त कॅलरी, प्रदूषण आणि केमिकल संपर्क अशी शहरी जीवनशैली जोडली गेली, तर “genetic risk + lifestyle triggers” असा धोकादायक संयोग तयार होतो.

कुत्र्यांमध्ये कॅन्सर म्हणजे आपलाच आरसा?

भारतात कुत्र्यांमध्ये कॅन्सर वाढतोय असं वाटण्यामागे अनेक घटक एकत्र काम करत आहेत. आयुष्य वाढणं, तपासण्या वाढणं, स्थूलपणा, प्रदूषण आणि शहरी जीवनशैली. हे सगळे घटक भारतीय तरुणांमध्ये दिसणाऱ्या कॅन्सर ट्रेंडशीही साधर्म्य दाखवतात.
म्हणून कुत्र्यांमध्ये कॅन्सर वाढतोय हा मुद्दा केवळ प्राण्यांच्या आरोग्यापुरता मर्यादित न राहता, तो आपल्या आधुनिक जीवनशैलीचं आणि पर्यावरणाचं प्रतिबिंब बनतो. कुत्र्यांचं आरोग्य पाहणं म्हणजे, एका अर्थानं, आपल्याच भविष्यात आपण डोकावून पाहणं आहे, असं संशोधकांना वाटतं.