देशात गाड्यांची विक्री मंदावली आहे. लोक सहा महिन्यांपूर्वी बेस्ट सेलिंग कार मॉडेल्सच्या प्रतीक्षेत होते; परंतु आज त्याच कार लोकांना ऑफर्ससह सवलतीच्या दरात मिळत आहेत. कोरोनात या व्यवसायांना मोठा फटका बसल्यानंतर देशातील कार निर्माते पुन्हा एकदा व्यवसाय वाढवण्यासाठी सज्ज झाले होते. मात्र, कारविक्रीचा व्यवसाय हळूहळू मंदावत चालला आहे. त्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. कारची विक्री लक्षणीयरीत्या कमी होण्यामागील पाच महत्त्वाची कारणे जाणून घेऊ…
१. विक्रीचे चक्र मंदावले
कोरोना महामारीनंतर कारमध्ये आवश्यक असणार्या चिपचा तुटवडा वाढला होता. त्यामुळे कार उद्योगात मागणी आणि पुरवठ्यात एक अंतर तयार झाले होते; ज्यामुळे उत्पादकांना त्यावेळी उत्पादनात कपात करणे भाग पडले. ही चिपची कमतरता आता पूर्णपणे कमी झाली आहे आणि कारची डिलिव्हरी पूर्णपणे रुळावर आली आहे. कारची मागणी वाढल्याने अतिपुरवठ्याची परिस्थिती निर्माण झाली. गेल्या वर्षी सणासुदीनंतरच्या हंगामात असे दिसून आले होते की, कार निर्माते आणि डीलर्स दोघांनीही याकडे मोठी समस्या म्हणून पाहिले नाही आणि दुर्लक्ष केले.
हेही वाचा : ‘या’ देशात आर्थिक संकटामुळे लठ्ठ लोकांचा आकडा होतोय गलेलठ्ठ; कारण काय?
भारतातील ऑटोमेकर्स सामान्यतः डीलर्सना घाऊक प्रमाणात माल पाठवतात. मागणी मंदावली असतानाही ऑटो कंपन्यांकडून डीलरशिपकडे गाड्या पाठविण्याचे प्रमाण कमी-अधिक प्रमाणात चालू राहिले. त्यामुळे अखेरीस डीलरकडे गाड्यांचा ढीग वाढला. इन्व्हेंट्रीतील या गाड्या कंपन्यांच्या स्टॉकयार्ड्सपर्यंत पुढे सरकणे आवश्यक आहे. हे डीलर्स समोरचे एक मोठे आव्हान आहे.
२. अनेक नवीन लाँच, कमी मागणी
दुसरे कारण म्हणजे गेल्या १२ महिन्यांत नवीन कार आणि वैशिष्ट्यपूर्णतेने अद्ययावत केली गेलेली विद्यमान कार अशा दोन्ही प्रकारची अनेक मॉडेल्स लाँच केली गेली. त्यामुळे जुन्या मॉडेल्सची आणि अद्ययावत केल्या गेलेल्या मॉडेल्सच्या आधीच्या आवृत्त्यांची मागणी कमी झाली आहे; ज्यामुळे डीलरकडे या गाड्या तशाच पडून आहेत. एका आघाडीच्या कार निर्मात्याच्या कार्यकारिणीनुसार, दुचाकीवरून कारकडे वळणार्या ग्राहकांचे प्रमाण पूर्वीसारखे राहिलेले नाही. त्यामुळे हॅचबॅक कारची विक्री कमी झाली आहे. हॅचबॅक कार ही भारतातील सर्वांत लोकप्रिय कार असल्याचे म्हटले जाते. त्यांचे कॉम्पॅक्ट डिझाईन, परवडणारी किंमत आदींमुळे भारतीय खरेदीदारांमध्ये या कार खूप लोकप्रिय आहेत. परंतु, आता देशातील सर्वांत मोठी कार निर्माता कंपनी असलेल्या मारुती सुझुकीला वगळता बहुतांश कार निर्मात्यांनी एंट्री-लेव्हल हॅचबॅक कारची विक्री कमी केली आहे किंवा या उत्पादन श्रेणीतून ते पूर्णपणे बाहेर पडले आहेत.
३. काही कार मॉडेलच्या लोकप्रियतेत घट
काही वाहनांच्या लोकप्रियतेत घट झाली आहे; ज्यात बॅटरी इलेक्ट्रिक व्हेइकल्सही (BEVs) समाविष्ट आहेत. देशातील सर्वांत मोठी इलेक्ट्रिक वाहन निर्माती कंपनी टाटा मोटर्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, समस्या ही आहे की सर्वांत आधी लोकांनी ईव्ही गाड्यांचा स्वीकार केला होता; मात्र आता ईव्ही कारकडे लोकांचा कल कमी होत आहे. हा ट्रेंड सर्व बाजारांमध्ये दिसत आहे आणि भारतातही ईव्ही कारची विक्री पूर्णपणे मंदावण्याची चिन्हे आहेत. मारुती सुझुकी जिमनी यांसारख्या काही आयसीई कार मॉडेल्सदेखील अपेक्षेनुसार ग्राहकांना आकर्षित करू शकली नाहीत. त्यामुळे निर्मात्यांना स्टॉक क्लीअर करण्यासाठी मोठी सवलत द्यावी लागली. दुसरीकडे काही हायब्रिड कारची विक्री वाढली आहे. त्यात टोयोटाच्या हाय रायडर आणि इनोव्हा हायक्रॉस हायब्रीड मॉडेल्सची चांगली विक्री झाली. मात्र, होंडाची सिटी ई : एचईव्ही हायब्रिड कार बाजारात चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरली.
४. हवामानातील बदलामुळे कारविक्रीत घट
सर्व कारणांमधील महत्त्वाचे कारण म्हणजे हवामान बदल. मारुती सुझुकीच्या विक्री संघातील एका कार्यकारिणीने या वर्षाच्या सुरुवातीला सांगितले होते की, उन्हाळ्यात देशातील बहुतांश भागांत वाढलेल्या तापमानामुळे आणि जूनमध्ये संपलेल्या राष्ट्रीय निवडणुकांमुळे ग्राहकांनी शोरूमला भेट दिली नाही. त्यानंतर देशाच्या दक्षिण आणि पूर्वेकडील भागांमध्ये मुसळधार पावसामुळे विक्रीवर आणखी परिणाम केला. उदाहरणार्थ- केरळ आणि तेलंगणामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे मागणीला फटका बसला. देशातील दुसरी सर्वांत मोठी कार निर्माती कंपनी ह्युंदाई मोटर्ससह एका कार्यकारिणीने सांगितले की, डिझेल कारची मोठी बाजारपेठ असलेल्या केरळमध्ये विलक्षण मुसळधार पावसाच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे बहुतांश कार निर्मात्यांच्या डिझेल मॉडेल्सच्या विक्रीवर वाईट परिणाम झाला.
५. खरेदीचा निर्णय पुढे ढकलणे
कार निर्माते आणि डीलर जेव्हा वाढीव कालावधीसाठी आपला स्टॉक क्लीअर करण्यासाठी उच्च सवलती व किमतीत कपात करतात, तेव्हा ग्राहक त्यांचे खरेदीचे निर्णय पुढे ढकलतात आणि किमती आणखी घसरण्याची किंवा भविष्यात अधिक सवलती मिळण्याची प्रतीक्षा करतात. ग्राहकांच्या या मानसिकतेचाही मागणीवर वाढता प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे इन्व्हेंट्रीची पातळी दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठत असल्याचे, फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (एफएडीए द्वारे गोळा केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. ‘एफएडीए’नुसार गेल्या महिन्यात अंदाजे ७७ हजार कोटी किंवा त्याहून अधिक किमतीच्या इन्व्हेंट्रीज ऑटो डीलरकडे असल्याचे लक्षात आले.
ऑटो डीलर्स इन्व्हेंट्री विक्री होत नसलेल्या कारने भरलेले असतात. त्याच वेळी त्यांच्याकडे कार निर्मात्यांद्वारे पाठवलेल्या नवीन आणि वेगवान मॉडेल्सना सामावून घेण्यासाठी जागा नसते. स्टॉकयार्ड इन्व्हेंट्रीची ही समस्या डीलरशिपमधून कार निर्मात्यांना हस्तांतरित करणे, हे अधिक महत्त्वाचे आहे. स्टॉक क्लीअर करण्यासाठी कार निर्माते अशा मॉडेल्सवर मोठ्या सवलती देत आहेत; ज्या मॉडेल्ससाठी काही महिन्यांपूर्वी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली होती. महिंद्राची एक्सयूव्ही ७०० व स्कॉर्पिओ एन, टाटाची हॅरियर व सफारी, मारुती सुझुकीची ग्रॅण्ड विटारा व सुझुकी एर्टिगा यांसारख्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या एसयूव्ही आता मोठ्या सवलतीसह बऱ्याच ठिकाणी सहज उपलब्ध आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd