भारत हा प्राचीन काळापासून सुजलाम-सुफलाम देश आहे. ‘जिस डाल डाल पे, सोने की चिडिया करती है बसेरा’ अशी या देशाची ख्याती. या भूमीने अनेक संस्कृतींना आपल्यात सामावून घेतले, त्यांचे भरणं पोषण केले. यातील काही कृतज्ञ होते, तर काही कृतघ्न निघाले. ज्या भूमीच्या उरावर लोणी चाखायला आले, त्याच मातेच्या गर्भात खंजीर खुपसले. कित्येक शतकं तिचा गर्भ रक्त सांडत राहिला. तिच्या अब्रूची लक्तर वेशीवर टांगली गेली. हे घडत होतं, उघड्या डोळ्यांनी बघितलं जात होत. पण क्रांती मात्र घडत नव्हती. याच अन्यायाविरुद्ध एक धगधगती ज्वाला पेटली. एका मातेची हाक दुसऱ्या मातेने ऐकली. जिजाऊंनी आपल्या रक्ताने या भूमीच्या रक्षणाचा विडा उचलला. आणि त्याचीच परिणती म्हणून आजचा दिवस इतिहासात सुवर्णाक्षराने कोरला गेला. महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासात हा दिवस अजरामर झाला. त्यानंतर ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशीला किल्ले रायगडावर हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. त्याच दिवसाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या राजधानीसाठी राजगडाचा त्याग करून रायगडाची निवड केली, महाराजांनी असे का केले हे आजच्या दिवसाच्या निमित्ताने जाणून घेणे समयोचित ठरावे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सक्षम नौदल आणि सागरी व्यापार

भौगोलिकदृष्ट्या कोकण किनारपट्टी व्यापारासाठी पोषक होती. म्हणूनच प्राचीन काळापासून या भागात परदेशी व्यापाऱ्यांचा वावर होता. ही बाब लक्षात घेऊनच पोर्तुगीज, डच, इंग्रज यांनी कोकणातील समुद्रावर आपले अधिपत्य निर्माण केले. त्याच सागरी व्यापारातून आर्थिक सबलता आली; ही सबलताच कोणत्याही प्रगत व यशस्वी देशाचे लक्षण आहे. जो देश किंवा प्रांत आर्थिक सबल असतो, तो जगावर राज्य करतो. हेच मध्ययुगात भारताच्या भूमीवर आलेल्या इंग्रजांच्या रूपात दिसते. इतकेच नाही तर या इंग्रजांनी कोकण किनारपट्टीचे महत्त्व जाणून मुंबईसारख्या शहराची पायाभरणी केली.

आणखी वाचा: विश्लेषण: चुंबनाची परंपरा नक्की कोणाची? भारताची की मेसोपोटेमियाची? काय सांगतेय नवीन संशोधन ?

रायगडाचे भूराजकीय महत्त्व

इंग्रज, पोर्तुगीज यांचे या समुद्री व्यापाराच्या रक्षणासाठी असलेले नौदल सक्षम होते. त्याच वेळी मात्र स्थानिक राजसत्ताना या गोष्टीचा विसर पडला होता. याच पार्शवभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज मात्र अपवाद ठरले. व्यापाराचे स्वराज्यासाठी असलेले आर्थिक महत्त्व लक्षात घेऊन समुद्री व्यापाराला चालना दिली. स्वराज्याचा ८०% महसूल याच व्यापारातून येत होता. म्हणूनच शिवाजी महाराजांनी या व्यापाराच्या संरक्षणासाठी नौदल स्थापन केले. मराठ्यांच्या नौदलाची स्थापना सोळाव्या शतकातील पन्नासच्या दशकात करण्यात आली. त्यावेळी मुंबईकडे ब्रिटिश , गोव्या-वसईकडे पोर्तुगीज होते. रायगड या किल्ल्याचे स्थान भूराजकीयदृष्ट्या (स्ट्रॅटेजिक) महत्त्वाचे होते. भू तसेच जल मार्गातून होणाऱ्या दोन्ही व्यापारावर लक्ष ठेवता येते होते. तेच लक्षात घेऊन शिवाजी महाराजांनी राजधानीसाठी रायगड किल्ल्याची निवड केली.

राजगड का नको

प्रारंभीच्या कालखंडात महाराजांनी राजगडाची निवड आपले राजधानीचे ठिकाण म्हणून केली होती. मूलतः शहाजी महाराज यांनी निजामशाहीच्या स्वतंत्र राज्य स्थापनेचा प्रयत्न केला होता, परंतु ते त्यात अपयशी ठरले. त्यानंतर त्यांनी १६३६ साली आदिलशाहीत नोकरी धरली. आदिलशहाने त्यांना बारा हजारांच्या घोडदळाची जहागिरी देऊन त्यांच्याकडील आधीच असलेली पुणे-सुप्याची जहागिरी तशीच ठेवून; त्यांना संकटमानून लांब कर्नाटकात धाडले. त्यामुळेच शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीच्या प्राथमिक कालखंडात त्यांच्याकडे मर्यादित सुभे-किल्ले होते. बहुतांश भाग हा पुण्याच्याच आजूबाजूचा होता. परंतु जसजसा कारभार वाढत गेला – राज्यविस्तार होत गेला, तसतशी त्यावेळेस दुर्गम भागात असलेल्या या राजगडावरून राजधानी म्हणून राज्यकारभार करण्यास मर्यादा जाणवू लागल्या. इतकेच नव्हे तर वारंवार शत्रूंचे या किल्ल्यावर होणारे आक्रमण, हे ही महत्त्वाचे कारण होते. त्यामुळेच महाराजांनी राजगडावरून राजधानी हलविण्याचा निर्णय घेतला, असे इतिहासकार मानतात.

रायगडाची विविध नावे

रायरी, नंदादीप, राजगिरी, बंदेनूर, भिवेगड, रेड्डी, शिवलंका, राहीर, रायगड, जंबुद्वीप, रायगिरी, ईस्लामगड, तणस, रासविटा ही रायगड किल्ल्याची नावे वेगवेगळ्या कालखंडात वापरली गेली. इस्लामिक कागदपत्रांमध्ये रायगडाचा उल्लेख ‘राहीर’ असा संदर्भ सापडतो. तर युरोपियनांच्या कागदपत्रांमध्ये ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे, औरंगजेबाच्या काळात या किल्ल्याला ‘उत्तम गढ’ असे म्हटले जात होते.

रायगडाचे स्थान कसे निश्चित करण्यात आले?

महाराजांच्या राज्यविस्ताराच्या मोहिमेत अदिलशाहीतील रायगडचे वतनदार यशवंतराव मोऱ्यांविरुद्ध झालेली मोहिम ही महत्त्वाची मानली जाते. १६५६ च्या एप्रिलमध्ये शिवाजी महाराजांनी रायरीला वेढा घातला आणि याच काळात रायरी (रायगड) किल्ला शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. रायगड हा किल्ला मूलतः ‘रायरी’ या डोंगरावर आहे. ज्या वेळेस शिवाजी महाराजांनी हा प्रांत ‘यशवंतराव मोरे’ यांच्याकडून हस्तगत केला, त्यावेळेस या डोंगराच्या भौगोलिक-धोरणात्मक स्थानाचे महत्त्व जाणून महाराजांनी या ठिकाणी मोठा किल्ला बांधण्याचे ठरविले. या किल्ल्याच्या बांधकामासाठी मुख्य स्थपती म्हणून ‘हिरोजी इंदलकर’ यांची नेमणूक करण्यात आली होती. या ठिकाणचे जुने स्थापत्य शिलाहारकालीन असल्याचे अभ्यासक मानतात. हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात येण्यापूर्वी अनुक्रमे बहमनी, निजामशाही, आदिलशाही यांच्या ताब्यात होता. रायगड हा किल्ला सर करण्यासाठी कठीण व बांधकामाच्या बाबतीत मजबूत होता. किल्ला उंचावर आहे. त्यामुळे शत्रूपासून या किल्ल्याचे संरक्षण होण्यास मदत होत होती. शिवाय येथे मोठ्या दरबाराची सोय करण्यात आली होती. जी राजगडावर नव्हती. रायगडचे बुरुज प्रचंड तोफखान्याच्या गोळीबाराला तोंड देण्यास सक्षम होते. म्हणूनच हे राजधानीचे ठिकाण म्हणून महाराजांनी निवडले असे अभ्यासक मानतात.

आणखी वाचा: बारसूचा वाद: राज ठाकरे यांनी उल्लेख केलेले मायनाक भंडारी कोण होते?

सह्याद्री पर्वत रांगांमधील रायगडाचे भौगोलिक स्थान

रायगड किल्ला हा महाड पासून २४ किमी अंतरावर आहे. महाड हे प्राचीन प्रसिद्ध बंदर आहे. रायगड किल्ला अनेक पर्वत रांगांनी व वेगवेगळ्या नद्यांनी वेढलेला आहे. या किल्ल्याच्या ईशान्येकडे काल ही नदी आहे. तर दक्षिणेकडे गांधारी नदी आहे. त्यामुळेच शिवाजी महाराजांनी या ठिकाणी किल्ला बांधून त्याची निवड राजधानीसाठी केली होती.

रायगडाचे मध्ययुगीन व्यापारातील महत्त्व

रायगड हा मध्ययुगीन काळातील सह्याद्रीच्या रांगांमधील एक महत्त्वाचा किल्ला आहे. सह्याद्री पर्वतरांगा या गुजरातपासून ते केरळपर्यंत सुमारे ६३५ किमी भागात विस्तारलेल्या आहेत. या पर्वत श्रेणीमध्ये २००० ते ३५०० फुटांपर्यंत सरासरी उंची असलेली शिखरे आहेत. काही ठिकाणी या शिखरांची उंची ४००० फुटांपर्यंत जाते. या पर्वत रांगांमुळे महाराष्ट्राचे कोकण व देश या दोन भागात विभाजन होते. सह्याद्री पर्वत शृंखलेत सातमाला, बालघाट, महादेव यासारख्या वेगवेगळ्या पर्वतरांगांचा समावेश होतो. रायगड किल्ला हा महादेव या पर्वत रांगांमध्ये आहे. प्राचीन काळापासून पैठण, जुन्नर यांसारख्या वेगवेगळ्या बाजारपेठा घाट मार्गातून कोकण किनारपट्टीशी जोडल्या गेल्या होत्या. महाराष्ट्र हा गिरी दुर्गांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या पूर्व रांगांमध्ये महाराष्ट्रातले प्राचीन तसेच मध्ययुगीन किल्ले मोठ्या प्रमाणात आहेत. या किल्ल्यांपैकी बरेचसे किल्ले या व्यापारी मार्गांवर नजर ठेवण्यासाठी बांधण्यात आले होते. रायगड किल्ला देखील त्याच श्रेणीत मोडणारा किल्ला आहे. रायगड किल्ल्याने मराठा साम्राज्याला अनेक फायदे मिळवून दिले. या किल्ल्यामुळे कोकणातील सर्व प्रमुख व्यापारी मार्ग आणि डोंगरी खिंडी शिवाजी महाराजांच्या ताब्यात आल्या. त्यामुळे या भागावरील व्यापार आणि लष्करी वाहतुकीवर नियंत्रण मिळण्यास मराठ्यांना मदत झाली.

महाडचे प्राचीन महत्त्व

महाड हे प्राचीन व्यापारी बंदर गांधारी नदीच्या किनाऱ्यावर आहे. ‘पेरिप्लस ऑफ एरिथ्रिअन सी’ मध्ये (इसवीसन पहिल्या शतकातील भारताविषयी माहिती पुरविणारे ग्रीक साहित्य) या बंदराचा उल्लेख पलाइपटमई (Palapatamai ) असा करण्यात आलेला आहे. प्राचीन काळात इतर देशांशी या बंदराचा व्यापारी संबंध येत होता. बाणकोट बंदरावर येणारी परदेशी जहाजे सावित्री नदीच्या मार्गे या बंदरावर येत होती. तर दुसऱ्या बाजूला महाड हे दक्खनशी घाट मार्गे जोडलेले होते. या बंदरावर येणारा व्यापारी परदेशी माल घाट मार्गे तिथल्या बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्यात येत होता. त्यामुळे प्राचीन काळापासून आर्थिकदृष्टया या बंदराला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले होते. उपलब्ध पुरातत्त्वीय पुराव्यांच्या आधारे महाडचे बंदर हे मध्ययुगीन काळापर्यंत परदेशी व्यापारात व्यग्र बंदर होते. कोकणात तसेच घाटावर असणारे अनेक किल्ले याच व्यापारी बंदराच्या व मार्गाच्या संरक्षणासाठी बांधण्यात आले होते, हे सिद्ध झालेले आहे. शिवाजी महाराजांनी हीच गोष्ट लक्षात ठेवून स्वराज्याची आर्थिक बाजू सबळ करण्यासाठी रायगडची राजधानीचे ठिकाण म्हणून निवड केली. म्हणूनच हे उदाहरण महाराजांच्या सार्वभौमिक विद्ववत्तेचे प्रतीक आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why chhatrapati shivaji maharaj left rajgad and chose raigad as his capital what is the equation behind this svs
First published on: 02-06-2023 at 19:05 IST