गेल्या आठवड्यात अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने चीनच्या शिनजियांग प्रांताला जोडणाऱ्या नव्या रस्त्याचे उद्घाटन केले. हा रस्ता सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या वाखान कॉरिडॉरमधून जात असल्याने त्याकडे विशेष लक्ष वेधले गेले आहे. वाखान कॉरिडॉर हा अफगाणिस्तान, ताजिकिस्तान आणि चीनच्या सीमांजवळ असून भारताच्या गिलगिट-बाल्टिस्तान या प्रदेशाला लागून आहे. पाकिस्तानने १९४८ पासून या प्रदेशावर बेकायदा ताबा मिळवल्याची भारताची भूमिका आहे. त्यातच आता अफगाणिस्तानने बांधलेला नवा रस्ता चीनसाठी फायदेशीर ठरणार असल्याने भारतासाठी ही चिंतेची बाब मानली जात आहे, त्याविषयी…

चीनसाठी वाखान कॉरिडॉर का महत्त्वाचा?

अफगाणिस्तानने केलेली नव्या रस्त्याची निर्मिती चीनसाठी मोठी फायदेशीर मानली जात आहे. या मार्गामुळे चीनचे महत्त्वाचे आर्थिक आणि सुरक्षाविषयक हितसंबंध साध्य होण्यास मदत होणार आहे. या घडामोडीबाबत चीनच्या राजकीय नेतृत्वाने अद्याप मौन बाळगले असले तरी तालिबानच्या या उपक्रमामागे चीनची प्रमुख भूमिका असल्याचे मानले जात आहे. गेल्या अनेक दशकांपासून अफगाणिस्तानमधील विविध राजवटींशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी चीन प्रयत्नशील होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आता मिळाल्याचे दिसून येत आहे. हा नवनिर्मित रस्ता प्रामुख्याने चीनचे दोन हेतू साध्य करण्यास मदत करू शकतो. पहिले म्हणजे या रस्त्यामुळे वायव्येकडील सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या शिनजियांग प्रांतात चीनची उपस्थिती अधिकच मजबूत होऊ शकते. या प्रांताला मंगोलियापासून भारताच्या लडाख केंद्रशासित प्रदेशापर्यंत सुमारे ५,५०० किलोमीटर लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा लाभलेली आहे. ही सीमा मंगोलिया, रशिया, कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत अशा आठ देशांना लागून आहे. त्यामुळे या भागातील दळणवळण व्यवस्था मजबूत करणे चीनच्या सुरक्षाविषयक दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे.

चीनने तालिबानशी कशी जवळीक वाढवली?

अफगाणिस्तानने बांधलेल्या नव्या रस्त्यामुळे चीनला भारत वगळता इतर शेजारील देशांशी सीमापार व्यापार आणि दळणवळण वाढवण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या महत्त्वाच्या मार्गाच्या उभारणीसाठी मदत करून आणि त्यासाठी आर्थिक पाठबळ पुरवून चीनने अस्थिरतेचा सामना करणाऱ्या शिनजियांग प्रांतातील सुरक्षाविषयक चिंता दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर शेजारी देशांशी संबंध अधिक मजबूत करण्यावरही चीनचा भर आहे. १९९६ मध्ये अफगाणिस्तानच्या राजकारणात तालिबानचा प्रभाव वाढू लागल्यापासून चीनने या संघटनेशी जवळीक साधली होती. १५ ऑगस्ट २०२१ रोजी अफगाणिस्तानमधून आंतरराष्ट्रीय सैन्य माघारी गेल्यानंतर तालिबानने पुन्हा सत्तेवर कब्जा केला होता. त्यानंतर चीन आणि तालिबान यांच्यातील संबंध अधिक दृढ झाल्याचे दिसून येत आहे. तेव्हापासून अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील तालिबान सरकार चीनकडे आपल्या सर्वात विश्वासार्ह आंतरराष्ट्रीय भागीदारांपैकी एक म्हणून पाहत आहे.

चीनसाठी हा रस्ता कसा ठरू शकतो फायदेशीर?

गेल्या काही वर्षांत पाकिस्तानमध्ये विविध अडचणींचा सामना करावा लागल्याने चीनने अफगाणिस्तानमार्गे समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी नव्या पर्यायी मार्गाचा शोध सुरू केला होता. आता हा नवीन रस्ता त्यांना भविष्यात अफगाणिस्तानमार्गे इराणपर्यंत पोहोचण्याचा मार्ग उपलब्ध करून देऊ शकतो. तालिबानकडून या मार्गाच्या सुरक्षेची हमी मिळाल्यास चीनसाठी हा पर्याय अधिक महत्त्वाचा ठरू शकतो. सध्या पाकिस्तानमधील काही चिनी प्रकल्पाच्या व्यवहार्यतेवरही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. बलुचिस्तान प्रांतातील सातत्यपूर्ण आंदोलने आणि असुरक्षिततेमुळे या प्रकल्पाला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. चीनच्या मदतीने आणि देखरेखीखाली ग्वादर बंदराचा विकास सुरू झाल्यापासून बलुच बंडखोरांनी चीनच्या हितसंबंधांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. तसेच त्यांनी चीनच्या महत्त्वाकांक्षी चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गालाही विरोध केला आहे. गेल्या वर्षभरात पाकिस्तानमधील चिनी प्रकल्पांना बलुच बंडखोरांनी सातत्याने लक्ष्य केले आहे. त्यामुळे चीनला मनुष्यबळ, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.

नव्या रस्त्यामुळे भारताची चिंता का वाढली?

अफगाणिस्तानने वाखान कॉरिडॉरमधून नव्या रस्त्याची केल्याने ही घडामोड भारतासाठी चिंतेची बाब मानली जात आहे. भारताच्या दाव्यानुसार हा रस्ता पाकिस्तानच्या बेकायदा ताब्यात असलेल्या गिलगिट-बाल्टिस्तान प्रदेशाच्या जवळ आहे. तसेच, भारत आणि चीन यांच्यात गेल्या सहा दशकांपासून सुरू असलेल्या सीमावादातील महत्त्वाचा भाग असलेल्या लडाखच्या परिसरापासूनही तो अगदी जवळ आहे. जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांमधील तणाव अधिक वाढला होता. १९४८ मध्ये पाकिस्तानने गिलगिट-बाल्टिस्तानवर ताबा मिळवण्यापूर्वी वाखान कॉरिडॉर हा भारताला मध्य आशियाशी जोडणाऱ्या व्यापारी मार्गांचा एक भाग होता. १९९१ मध्ये सोव्हिएत संघाचे विघटन होऊन मध्य आशियात पाच स्वतंत्र देशांची निर्मिती झाल्यानंतर भारताला या भौगोलिक परिस्थितीची अधिक जाणीव झाली. आजवर भारताला मध्य आशियात जाण्यासाठी थेट जमिनीवरील मार्ग उपलब्ध नसल्याने या संसाधनसमृद्ध प्रदेशातील ऊर्जा क्षेत्रातील संधींचा पुरेपूर लाभ घेण्यात अडचणी आल्या आहेत.

भारताने बांधलेल्या रस्त्याचाही थेट चीनला फायदा?

चिंतेची बाब म्हणजे भारताच्या आर्थिक मदतीतून बांधण्यात आलेल्या झरांज-डेलाराम रस्त्याचा वापर करून चीन थेट इराणमधील चाबहार आणि बंदर अब्बास या बंदरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू शकतो. एकेकाळी भारतासाठी अफगाणिस्तानमार्गे मध्य आशियात जाण्याचे प्रवेशद्वार मानले गेलेले चाबहार बंदर सध्या पश्चिम आशियातील तणावामुळे आधीच अनिश्चिततेत आहे. त्यातच २०२१ मध्ये इराणसोबत झालेल्या २५ वर्षांच्या ४०० अब्ज डॉलर्सच्या सहकार्य करारामुळे चाबहार आणि बंदर अब्बास बंदरांमध्ये चीनची गुंतवणूक आणि उपस्थिती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. भारताच्या रणनीतिक गुंतवणुकीचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करण्याची चीनची खेळी भारताच्या हितसंबंधांना थेट सुरुंग लावणारी ठरू शकते.

चीन आपला प्रभाव कसा वाढवत आहे?

मध्य आशियातील कझाकस्तान आणि उझबेकिस्तान, दक्षिण आशियातील अफगाणिस्तान आणि पाकिस्तान तसेच संयुक्त अरब अमिराती या देशांनी मिळून मध्य आशिया-दक्षिण आशिया रेल्वे कॉरिडॉर उभारण्याची योजना आखली आहे. या संदर्भात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात यूएई कझाकस्तान आणि उझबेकिस्तान यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्याचे समजते. सध्या चीनने या उपक्रमात प्रत्यक्ष सक्रिय सहभाग घेत नसला, तरी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामागे त्याची प्रमुख भूमिका असल्याचे मानले जात आहे. एवढ्या मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी सहभागी देशांकडे पुरेशी आर्थिक क्षमता नसल्याने त्यांना चीनकडून आर्थिक आणि तांत्रिक मदत घ्यावी लागू शकते. त्यामुळे या रेल्वे मार्गाच्या प्रत्यक्ष उभारणीत चीनचा वाढता प्रादेशिक प्रभाव महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

या घडामोडीनंतर भारताने काय करावे?

भारताने आपल्या व्यापक सामरिक हितसंबंधांचे आणि प्रादेशिक सुरक्षेचे संरक्षण करण्यासाठी योग्य धोरण आखणे आवश्यक आहे. विशेषतः संवेदनशील वाखान कॉरिडॉरच्या आसपासच्या भागांतील घडामोडींवर भारताला लक्ष ठेवावे लागणार आहे. या सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रदेशातील विविध देशांपैकी पाकिस्तानकडून भारताला फारसे सहकार्य मिळण्याची अपेक्षा करता येणार नाही. चीनचा दक्षिण आणि मध्य आशियातील वाढता प्रभाव लक्षात घेता, भारताने बीजिंगशी संवाद साधणे आणि त्याला विश्वासात घेणे आवश्यक आहे. वाखान कॉरिडॉरमधील घडामोडींमुळे भारताच्या राष्ट्रीय हितसंबंधांना किंवा प्रादेशिक हितांना बाधा पोहोचू नये, यासाठी दोन्ही देशांमध्ये नियमित आणि अर्थपूर्ण चर्चा होणे महत्त्वाचे आहे. अफगाणिस्तानमध्ये सध्या सत्तेवर असलेल्या तालिबान प्रशासनाशीही भारताने सकारात्मक आणि रचनात्मक संबंध प्रस्थापित करण्याची गरज आहे. अशा संवादातून वाखान कॉरिडॉरच्या परिसरातील बदलत्या भू-राजकीय परिस्थितीला प्रभावीपणे सामोरे जात भारताला आपले सामरिक हितसंबंध सुरक्षित ठेवता येऊ शकतात.

(टीप : हा लेख नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय अध्ययन संस्थेतील तज्ज्ञ महेश रंजन देबता लिहिलेला असून तो फर्स्टपोस्टमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.)