चीनमधील ‘डोंगफेंग ई-पीईआय७’च्या ई-कार अपघाताची चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर ईव्ही कारमधील फ्लश हँडलच्या वापरावर प्रथम बंदी घालण्याचा निर्णय चीन सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे तेथील उत्पादकांवर संकट आले आहे.

फ्लश हँडलवर चीनमध्ये बंदी का?

कारच्या दरवाजाचे मागे घेता येईल असे तंत्र असलेले हँडल प्रत्यक्षात धोकादायक ठरू लागल्याने चीनने अशा उपकरणाच्या निर्मितीवरच मनाई आणली आहे. एका ईव्ही (विजेवर चालणाऱ्या) कारच्या अपघातानंतर त्यातील दोष लक्षात आल्याने उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने कारवाईचा बडगा उगारला. ‘डोंगफेंग ई-पीईआय७’च्या ई-कार अपघाताची चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर ईव्ही कारमधील अशा हँडलच्या वापरावर प्रथम बंदी घालण्याचा निर्णय चीन सरकारने घेतला आहे. 

तंत्रज्ञान कालबाह्य?

डोंगफेंग मोटार कंपनीने अपघाताच्या वृत्ताला दुजोरा दिला. १९ मार्च २०२५ रोजी युनान प्रांतातील वेन्शान येथे हा अपघात झाला. या घटनेच्या चित्रफितीत, सेडान ईव्ही कार एका ट्रकला धडकून काही अंतर फरफटत गेली. त्यानंतर रस्त्यालगत उभारलेल्या कुंपणाला जाऊन ती धडकली. सुरुवातीला या अपघाताची तीव्रता जरी कमी जाणवली असली तरी, काही क्षणांतर कारमधील बॅटरीचा भडका उडाला.

अपघातानंतर काही लगेचच ड्रायव्हरने कारमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, कारच्या दरवाजाचे हँडल पूर्वस्थितीत (रिट्रॅक्टेबल हँडल) येऊ शकले नाही. त्यामुळे ड्रायव्हरला तातडीने दरवाजा उघडणे शक्य झाले नाही. ड्रायव्हरच्या बाजूकडील दरवाजा बंद झाल्यानंतर तो पुन्हा उघडता आला नाही. अवघ्या ३० सेकंदांच्या आत प्रवाशांच्या आसनांतून धूर येण्यास सुरुवात झाली.

संपूर्ण कार धुराने भरली गेल्याने आतील अन्य तीन प्रवासी बाहेर पडू शकले नाहीत. त्यामुळे ड्रायव्हर व रस्त्याकडेला उभ्या असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी कारमधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी दरवाजाचा काचा दगडाने फोडण्यास सुरुवात केली. अपघातानंतर ५२ सेकंदांच्या आत संपूर्ण कारभोवती आगीचे लोळ पसरले. त्या काळात कारमधील प्रवाशांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात मदत करणाऱ्यांना शक्य झाले.

मदत करणाऱ्यांचे करिअरही अधांतरी?

या अपघातात कोणीही गंभीररीत्या जखमी झाले नसले तरी ते आगीत काही प्रमाणात होरपळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातानंतर ट्रक ड्रायव्हरनेही प्रवाशांना कारबाहेर काढण्यासाठी मदत केली. मात्र, त्याचेही हात कारमधील आगीत बऱ्याच अंशी पोळले गेल्याने तो पुन्हा ट्रक चालवू शकेल की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

चित्रफित अर्धवट?

५ फेब्रुवारी रोजी डोंगफेंग मोटार कंपनीने ‘ई-पाय’ कारला झालेल्या अपघाताच्या चित्रीकरणाबाबत शहानिशा केली व जखमींबद्दल सहानुभूती व्यक्त केली. डोंगफेंग मोटार कंपनीच्या पथकाने अपघातस्थळी चौकशी समितीला पूर्ण साह्य केले आहे. त्याच वेळी समाजमाध्यमावर प्रसारित झालेली चित्रफित अर्धवट आहे. या अपघाताचे गांभीर्य अद्याप तपासण्यात आलेले नाही, असे कंपनीचे म्हणणे आहे. कारमधील छानदार गोष्टी या प्रत्यक्षात काम करीत नसतील तर त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसू शकतो, या मुद्द्यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. कार निर्मिती कंपन्यांनी कारमधील दरवाजाच्या पूर्वस्थितीत येऊ शकतील, अशा अर्थात वायुगतीशास्त्राचा उपयोग केलेल्या हँडलबाबत आग्रही असतील तर त्यांनी प्रवासी सुरक्षेचा मुद्दा दुर्लक्षित केला असे म्हणायचे का, सवाल काही जणांनी उपस्थित केला आहे.

अति अभियांत्रिकीमुळे मृत्यूचे सावट?

१ जानेवारी २०२७ पासून फ्लश हँडलवरील बंदी अमलात येईल. त्यानंतर चीनमध्ये उत्पादित होणाऱ्या मोटारी या ‘मेकॅनिकल रिलीज हँडल’ असलेल्या दरवाजाच्या असतील. जुलै २०२४ पासून फ्लश हँडल असलेल्या दरवाजाच्या कार चीनमध्ये उत्पादित केल्या जात होत्या. त्यानंतर चीनमध्ये ईव्ही कार अपघातांत दरवाजाचे हँडल पूर्ववत स्थिती न आल्याने दरवाजा प्रवाशांना उघडता येणे शक्य झाले नाही. पश्चिम चीनमध्ये क्षिओमी एसयू ७ अल्ट्रा सेडान कार एका अडथळ्याला धडकून झालेल्या अपघातात कारचे दरवाजे उघडले नाहीत. या घटनेचे वर्णन काहींनी एका ओळीत असे केले की, अति अभियांत्रिकीमुळे कारमध्ये अनावश्यक जोखीम ड्रायव्हर आणि प्रवाशांना स्वीकारावी लागत आहे. यात प्रवाशांना मृत्यूने दर्शन दिले.

अमेरिकेत टेस्लाच्या कारबाबत काय घडले?

दरम्यान, अमेरिकेत अशा लोकप्रियतेपासून अर्थात ईव्ही कारमध्ये डामडौल करण्याच्या कृतीपासून टेस्ला कंपनी काही पावले दूर आहे. तरीही अमेरिकेत असे प्रकार घडले आहेत. डिसेंबर २०२३ मध्ये टेस्लाच्या मॉडेल वाय एसयूव्हीला आग लागली आणि कारचे दरवाजे उघडले नाहीत. त्यात चालक वाचू शकला नाही. कारण स्पष्ट होते, इलेक्ट्रानिक तंत्राने बंद-उघड होत असलेले दरवाजे काम करू शकले नाहीत. त्यानंतर टेस्लाच्या वाय मॉडेल वाय व मॉडेल ३ची अमेरिकेच्या राष्ट्रीय महामार्ग वाहतूक सुरक्षा प्रशासनाने चौकशी आरंभली.

भारतात कार उत्पादकांमध्ये चिंता?

भारतात प्रमुख कार उत्पादकांनीही त्यांच्या ईव्ही मोटारींमध्ये फ्लश हँडलचा वापर सुरू केला आहे. किंबहुना, हा आता बऱ्यापैकी ‘फॅशनेबल’ पर्याय आहे.  पण अशा अपघातांमध्ये आणीबाणी उद्भवल्यास नेमके करायचे काय, याविषयी तपासणी झाली आहे का हे सांगता येत नाही. अर्थात भारतातील कार उत्पादक जबाबदार मानले जातात, त्यामुळे चीनमधील घटनेची दखल त्यांनी घेतली असेल असे मानायला जागा आहे.