China Japan Relations PM Sanae Takaichi : जपानमधील मधील संसदेच्या कनिष्ठ सभागृहासाठी झालेल्या निवडणुकीत जपानी जनतेने भरभरून मतदान केले. जपानमध्ये बर्फ पडलेला असताना मतदानासाठी लोक बाहेर पडले. जपानमध्ये लिबरल डेमोक्रेटिक पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले. ८ फेब्रुवारी रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता. पंतप्रधान सनाई तकाईची यांनी निवडणूक हा एक सट्टा असल्याचे म्हटले होते. दरम्यान सनाई तकाईची यांच्या लिबरल डेमोक्रेटिक पक्षाने निवडणुकीत प्रचंड मोठा विजय मिळवला आहे. जपानच्या पंतप्रधान सनाई तकाईची यांच्या पक्षाने ४६५ जागांपैकी ३१६ जागांवर विजय मिळवत प्रचंड मोठा विजय संपादन केला आहे. लिबरल डेमोक्रेटिक पक्षाची स्थापना १९५५ मध्ये झाली होती. त्यानंतर पक्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतका मोठा विजय या पक्षाला मिळाला आहे. सनाई तकाईची या चीनच्या कट्टर विरोधक मानल्या जातात. त्यांच्या विजयाने जपान व चीनमधील संबंध सुधारण्याची शक्यता कमीच आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

जपानमध्ये तकाईची यांचा विजय झाल्यानंतर चीनमधील माध्यमांवर चर्चा रंगल्या. जपानच्या घसरत्या अर्थव्यवस्थेवर तकाईची यांच्या विजयाने काय परिणाम होईल याबाबत चीनमध्ये चर्चा रंगली. तकाईची यांचा विजय जपानच्या अर्थव्यवस्थेसाठी चांगला कि वाईट यावर चीनमधील माध्यमांवर चर्चा रंगली होती. तसेच चीनने जपानबाबत आता कशी भूमिका घेतली पाहिजे याबाबत देखील चर्चा झाली. दरम्यान, चीन व जपानमधील संबंध सध्या बिघडलेले आहेत.

चीनमधील एका ऑनलाइन प्लॅटफॉर्मने ब्लुमबर्गचा रिपोर्ट शेअर केला आहे. “तकाईची यांच्या विजयाने चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. जपानमधील सर्वाधिक लोकप्रिय नेत्याबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करायचे की संबंध आहेत तशेच पुढे रेटायचे असा प्रश्न जिनपिंग यांच्या समोर निर्माण झाला आहे. जपान हा अमेरिकेचा आशियातील सर्वात महत्वाचा भागीदार आहे.”, असे ब्लुमबर्गच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

चीन तकाईची यांना शत्रू का मानतो?

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात सनाई तकाईची यांची जपानच्या पंतप्रधान पदावर निवड झाली होती. त्यावेळी चीनने तकाईची यांची नियुक्ती ही चीनसाठी धोका असल्याचे समजले होते. ६४ वर्षीय तकाईची या उजव्या विचारसरणीच्या एलडीपी या पक्षाच्या नेत्या आहेत. चीन तकाईची यांना कट्टर विरोधक मानतो. तकाईची यांनी सत्तेवर येताच जपानचे लष्करी सामर्थ्य वाढवण्यास सुरूवात केली. दरवर्षी होणाऱ्या ऑटुमन फेस्टिवलला तकाईची हजेरी लावतात. युद्धात शहीद झालेल्या जपानी सैनिकांना श्रद्धांजली या फेस्टिवलमधून दिली जाते.

मागील वर्षी तकाईची यांचे नाव जगभरातील माध्यमांमध्ये झळकल्यानंतर चीनच्या भुवया उंचावल्या होत्या. उजव्या विचारसरणीचे जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची धोरणे तकाईची राबवत आहेत. विशेषत: चीन व तैवानबाबत तकाईची यांनी आक्रमक भूमिका घेतली. “तैवानबरोबर सुरक्षेबाबत भागीदारी करण्यास तयार असल्याचे तकाईची यांनी खुलेआम बोलून दाखवले होते. ही चीनच्या ‘वन चायना’ तत्वाला छेद देणारी बाब आहे.”, असे तकाईची पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर फोर्ब्सने दिलेल्या एका वृत्तात नमूद करण्यात आले होते.

चीनबरोबर भागीदारी करणाऱ्या देशांनी तैवानला चीनचाच एक भाग समजले पाहिजे असा चीनचा आग्रह आहे. त्यामुळे चीनबरोबर भागीदारी करणाऱ्या देशांनी तैवानबरोबर कोणतेही संबंध ठेवू नये, असा इशाराच चीनने इतर देशांना दिलेला आहे. तकाईची यांनी तैवानबरोबर सुरक्षा भागीदारी करण्यासाठी इच्छुक असल्याचे विधान केल्यानंतर चीन व जपानच्या संबंधांमध्ये कटुता आली. तैवानवरून दोन्ही देशांमधील संबंध बिघडले. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी तकाईची यांनी जपानच्या संसदेत बोलताना तैवानबाबत विधान केले होते. चीनने जर लष्कर वापरून तैवानची कोंडी करण्याचा प्रयत्न केला तर तो जपानच्या अस्तित्वाला धोका मानला जाईल, असे तकाईची म्हणाल्या होत्या. तैवानबाबत चीनने काही पाऊल उचलले तर जपान थेट सैन्य हस्तक्षेप करेल, असा इशारा तकाईची यांनी दिला असल्याचे चीनने समजले होते.

तकाईची यांची ‘आयर्न लेडी’ प्रतिमा 

तकाईची यांच्या विधानाला चीनने गांभीर्याने घेतले होते. जपानने ‘रेड लाइन’ पार केल्याचे चीनने म्हटले होते. तसेच या विधानामुळे चीनने जपानवर आर्थिक निर्बंध लादले होते, तसेच जपानला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटे पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तकाईची यांनी माफी मागावी किंवा त्यांचे विधान मागे घ्यावे, असे आवाहन चीनने केले होते.

तकाईची यांना आंतरराष्ट्रीय राजकारणाची उत्तम जाण आहे. तसेच त्यांना अनुभवही आहे. “जपानच्या अस्तित्वाला धोका” असे विधान तकाईची यांनी जाणूनबूजून केले होते. जपान लष्कराला बळकटी देत असल्याचा इशारा यातून तकाईची यांनी चीनला दिला होता. चीनने तकाईची यांच्यावर विधान मागे घेण्यासाठी जितका जोर लावला, तितकीच कठोर भूमिका तकाईची यांनी चीनबाबत घेतली. किंबहुना कठोर भूमिकेत त्यांनी आणखी वाढ केली होती.

दुसऱ्या महायुद्धानंतर तकाईची यांच्या इतकी आक्रमक भूमिका कोणत्याही जपानच्या कोणत्याही पंतप्रधानांनी घेतली नव्हती. तैवानबाबत संघर्ष निर्माण झाल्यास तो जपानच्या अस्तित्वाला धोका मानला जाईल, असे तकाईची यांनी चीनला ठणकावून सांगितले. दरम्यान, त्यांच्या या विधानानंतर चीनमधील ‘१६३ डॉट कॉम’ या पोर्टलने “चिनी सैनिकांसाठी मियाको खाडी व ओसुमी खाडी ताब्यात घेण्याची ही संधी असल्याचे म्हटले होते.”

सनाई तकाईची यांच्या विजयाचे विश्लेषण चीनने कसे केले?

चीनमधील तज्ज्ञांनी व विश्लेषकांनी तकाईची यांच्या विजयाची दोन कारणे सांगितली आहे. एक म्हणजे जपानमधील उजव्या विचारसरणीच्या लोकांनी जपानला चीनपासून धोका आहे, असे वातावरण तयार केले होते. त्यामुळे उजव्या विचारसरणीच्या तकाईची यांना जपानी जनतेने भरभरून मतदान केले. तर दुसरे कारण म्हणजे तकाईची यांची आक्रमक भूमिका तरुणांना आकर्षक वाटली. तसेच तकाईची यांनी त्यांचा कालावधी पूर्ण होण्याच्या आधीच निवडणुका लावल्याने विरोधकांना निवडणुकांची तयारी करण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही. तकाईची यांच्या विजयाची ही दोन कारणे चीनमधील माध्यमांवर तज्ज्ञांकडून सांगण्यात आली होती. दरम्यान, चीनमधील विश्लेषकांनी तकाईची यांचा निवडणुकीत पराभव होईल, अशी शक्यता व्यक्त केली होती. ती साफ चुकीची ठरली आहे. एप्रिल महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चीनमधील बिजिंगच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर चीन जपानबाबत नेमकं काय भूमिका घेतो ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.