China Missile Test Indo Pacific Tension : भारताच्या सीमेला लागून असलेल्या चीनने अलीकडेच प्रशांत महासागरात एका लांब पल्ल्याच्या अत्याधुनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. अण्वस्त्रधारी पाणबुडीतून करण्यात आलेल्या या चाचणीमुळे इंडो-पॅसिफिक देशांत मोठी खळबळ उडाली. गेल्या काही वर्षांत चीनने अधिकृतपणे जाहीर केलेल्या शस्त्रास्त्र चाचण्यांपैकी ही महत्वाची चाचणी मानली जाते. यादरम्यान चीनच्या या लष्करी शक्तीप्रदर्शनावर अमेरिकेसह ऑस्ट्रेलिया, जपान, न्यूझीलंड आणि तैवान या देशांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. ही चाचणी चीनच्या वेगाने बळकट होत असलेल्या आण्विक प्रतिबंधक क्षमतेचा आणखी एक भक्कम पुरावा असल्याचे मत संरक्षणविषयक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे, त्याविषयी…
आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ६ जुलै रोजी प्रशांत महासागरात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने पाणबुडीतून लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. या क्षेपणास्त्रात प्रत्यक्ष अण्वस्त्राऐवजी बनावट वॉरहेड बसवण्यात आले होते. हे क्षेपणास्त्र नियोजित उड्डाण पूर्ण करून दक्षिण पॅसिफिकमधील निश्चित करण्यात आलेल्या क्षेत्रात सुरक्षितपणे कोसळले. ही चाचणी देशाच्या वार्षिक लष्करी प्रशिक्षण कार्यक्रमाचा एक भाग असून ती कोणत्याही देशाला किंवा लष्करी लक्ष्याला उद्देशून करण्यात आलेली नसल्याचा दावा चीनने केला. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनीही या चाचणीचे समर्थन करताना संपूर्ण प्रक्रिया सुरक्षित पार पडल्याचे सांगितले. तसेच संबंधित देशांनी या घटनेचा वेगळा अर्थ काढू नये असे आवाहनही त्यांनी केले.
कोणते क्षेपणास्त्र वापरण्यात आले?
चीनने अधिकृतपणे क्षेपणास्त्राचे नाव जाहीर केलेले नसले, तरी सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने लष्करी तज्ज्ञांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात या चाचणीसाठी जुलांग-३ हे क्षेपणास्त्र वापरले गेल्याचे नमूद केले आहे. हे चीनचे सर्वात आधुनिक पाणबुडीवरून डागले जाणारे क्षेपणास्त्र मानले जाते. गेल्या वर्षी लष्करी संचलनात प्रथमच त्याचे सार्वजनिक प्रदर्शन करण्यात आले होते. अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या अहवालानुसार, चीनच्या किनारपट्टीजवळील समुद्री भागातून डागल्यास हे क्षेपणास्त्र अमेरिकेच्या मुख्य भूभागापर्यंत पोहोचू शकते. यापूर्वीही चीनने २०२४ मध्ये आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली होती; परंतु प्रशांत महासागरात कार्यरत असलेल्या अण्वस्त्रधारी पाणबुडीतून अशी खुली चाचणी घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. संरक्षण तज्ज्ञांच्या मते, या मोहिमेसाठी चीनने ‘Type 094’ किंवा पुढच्या पिढीची ‘Type 096’ पाणबुडीचा वापरल्याचा अंदाज आहे. मात्र, याबाबत चीनने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. विशेष म्हणजे, हे क्षेपणास्त्र ज्या भागात कोसळले तो परिसर १९८५ च्या रारोटोंगा करारानुसार स्थापन करण्यात आलेल्या दक्षिण पॅसिफिक अण्वस्त्रमुक्त क्षेत्रात येतो.
अमेरिकेची चिंता कशामुळे वाढली?
चीनकडून करण्यात आलेल्या या चाचणीवर अमेरिकेने बारकाईने लक्ष ठेवले होते. आम्ही पाणबुडीवरून डागण्यात आलेल्या या अण्वस्त्रहीन आंतरखंडीय क्षेपणास्त्र चाचणीचा मागोवा घेतला असल्याने अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले. त्यांनी चीनला अण्वस्त्र नियंत्रणासंदर्भात अर्थपूर्ण चर्चेत सहभागी होण्याचे आवाहनही केले. यापूर्वी चीन मुख्यत्वे जमिनीवरील क्षेपणास्त्रांवर अवलंबून होता, ज्यांच्यावर उपग्रहांद्वारे लक्ष ठेवणे इतर देशांसाठी अधिक सोपे होते. आता मात्र चीनच्या अण्वस्त्रवाहू पाणबुड्या समुद्राच्या खोलवर दीर्घकाळ लपून राहू शकतात. त्यामुळे शत्रूने पहिला हल्ला केल्यानंतरही या पाणबुडीवरून प्रत्युत्तरादाखल प्रतिहल्ला केला जाऊ शकते. यालाच ‘सेकंड-स्ट्राइक क्षमता’ असे म्हटले जाते. अण्वस्त्र प्रतिबंधक धोरणातील हा सर्वात महत्त्वाचा आधारस्तंभ मानला जातो.
अमेरिकेसमोर सर्वात मोठे आव्हान?
अमेरिकेची क्षेपणास्त्र संरक्षण व्यवस्था मुख्यतः उत्तर ध्रुवीय मार्गाने येणाऱ्या क्षेपणास्त्रांचा शोध घेण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. अलास्का आणि कॅलिफोर्नियातील इंटरसेप्टर प्रणाली तसेच रडार नेटवर्क त्याच पद्धतीने कार्य करतात. मात्र, प्रशांत महासागरात शांतपणे फिरणारी पाणबुडी कोणत्याही अनपेक्षित ठिकाणाहून क्षेपणास्त्र डागू शकते. त्यामुळे अमेरिकेच्या विद्यमान संरक्षण व्यवस्थेसमोर नवे धोरणात्मक आव्हान निर्माण झाले आहे. २०२५ मध्ये अमेरिकेच्या संरक्षण विभागाने काँग्रेससमोर सादर केलेल्या अहवालानुसार, चीनकडे सध्या सुमारे ६०० कार्यरत अण्वस्त्रे आहेत. हा विस्तार असाच कायम राहिल्यास २०३० पर्यंत चीनकडे १,००० हून अधिक अण्वस्त्रे असू शकतात, असा अंदाजही या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि तत्कालीन सोव्हिएत संघाने अण्वस्त्र नियंत्रण, पूर्वसूचना आणि पडताळणीसाठी अनेक करार केले होते. मात्र, चीन आणि अमेरिकेदरम्यान अशा प्रकारची औपचारिक द्विपक्षीय यंत्रणा अद्याप अस्तित्वात नाही.
इंडो-पॅसिफिक देशांच्या प्रतिक्रिया काय?
चीनने प्रशांत महासागरा घेतलेल्या क्षेपणास्त्र चाचणीचे पडसाद आता संपूर्ण इंडो-पॅसिफिक क्षेत्रात उमटले. ऑस्ट्रेलिया, जपान आणि न्यूझीलंड या देशांनी त्यावर तीव्र आक्षेप घेत संताप व्यक्त केला. चीनने क्षेपणास्त्र चाचणीपूर्वी काही देशांना आगाऊ सूचना दिली होती. मात्र, ही सूचना अगदी वेळेवर देण्यात आल्याचा आरोप होत आहे. ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वँग यांनी चीनच्या लष्करी विस्तारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे. चीन जेवढ्या वेगाने लष्करी सज्जता वाढवत आहे, त्यामध्ये पारदर्शकतेचा प्रचंड अभाव असल्याची टीका त्यांनी केली आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनीही या चाचणीचा तीव्र निषेध केला आहे. त्याशिवाय जपान, न्यूझीलंड आणि तैवानमधील नेत्यांनीही चीनच्या या भूमिकेवरून नाराजी व्यक्त केली आहे. चीनची ही कृती निश्चितच चिथावणीखोर असून त्यामुळे आमच्या प्रदेशातील स्थैर्य धोक्यात येत असल्याचा आरोप न्यूझीलंडने केला आहे. तैवानच्या राष्ट्रपती कार्यालयाने चीन या क्षेपणास्त्र चाचणीअंतर्गत आंतरराष्ट्रीय समुदायाला धाक दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. एकंदरीत चीनच्या या क्षेपणास्त्र चाचणीमुळे इंडो-पॅसिफिकमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचे दिसून येत आहे.
