अमेरिका व इस्रायलने इराणविरोधात ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ राबवत युद्ध पुकारले आहे. हे युद्ध सुरू होऊन आता तिसरा आठवडा उजाडला आहे. या युद्धाची सर्वात जास्त झळ जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनला बसेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. अमेरिकेने व्हेनेझुएलावर कारवाई केल्यानंतर चीनने जाहीरपणे अमेरिकेविरोधात भूमिका व्यक्त केली होती. दरम्यान, इराण युद्धावर चीनची भूमिका सौम्य असल्याचे दिसत आहे. चीनने इराण युद्धावर सौम्य प्रतिक्रिया का दिली, या युद्धाचा चीनवर काय परिणाम होत आहे, चीनची भूमिका नेमकं काय आहे याबाबत जाणून घेऊया.
“चीनचे अब्जावधी डॉलर धोक्यात आहेत”
अमेरिका व इस्रायलने इराणच्या राजवटीविरोधात तसेच इराणवर हल्ले सुरू केल्यानंतर पश्चिम आशियात तणाव निर्माण झाला आहे. या युद्धाने आता तिसऱ्या आठवड्यात प्रवेश केला आहे. पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाने चीनला सर्वाधिक नुकसान होईल, अशी शक्यता पश्चिमेकडील माध्यमांकडून व्यक्त केली जात होती. ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये याबाबत नुकताच एक अहवाल प्रकाशित झाला. चीनची पश्चिम आशियात मोठी गुंतवणूक आहे. त्यामुळे “चीनचे अब्जावधी डॉलर धोक्यात आहेत”, असे त्या अहवालात म्हटले आहे. “इराण युद्धाने चीनला अस्वस्थ तसेच त्याच्या महत्वाकांक्षांना ठेच पोहोचवली”, असे ‘बीबीसी’ने म्हटले आहे. चीन हा जगाच्या पाठीवरील एक महत्वाचा देश आहे. त्यामुळे पश्चिम आशियातील परिस्थितीवर चीनने काय प्रतिक्रिया दिली ते पाहणे महत्वाचे ठरते.
चीनची इराणबाबत सौम्य प्रतिक्रिया
अमेरिका व इस्रायलने इराणवर हल्ले केल्यानंतर चीनची पहिली प्रतिक्रिया २८ फेब्रुवारीच्या रात्री आली. चीनमधील वृत्तसंस्था ‘शिन्हुआ’वर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याचे विधान दाखवण्यात आले. इराणवर झालेल्या लष्करी कारवाईबाबत चीनने चिंता व्यक्त केली. त्यानंतर आतापर्यंत सात अधिकृत निवेदनं चीनकडून जारी करण्यात आले. त्यात चीनची भाषा अधिक सौम्य होत गेली. अमेरिका, इस्रायलची कारवाई ‘अस्वीकार्य’ आहे, तसेच चीन याचा ‘विरोध’ करतो असे निवेदनांत सांगण्यात आले. परंतु, चीनने अमेरिका व इस्रायलच्या कारवाईचा ‘निषेध’ केला नाही. दरम्यान, अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांवर कारवाई केल्यानंतर चीनने त्याला ‘अपहरण व अटक’ म्हणत कडक शब्दात अमेरिकेला विरोध केला होता. ती भूमिका मात्र इराणबाबत दिसली नाही.
अमेरिकेच्या कृत्याला चीनने ‘दादागिरी’ का म्हटले होते?
चीनने इराणबाबत घेतलेल्या भूमिकेत दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. त्या प्रकर्षाने दिसून येतात. पहिली गोष्ट म्हणजे अमेरिका व इस्रायलने पुकारलेल्या युद्धाचा चीनने अद्याप निषेध केलेला नाही. परंतु, इराणमध्ये शाळेवर झालेल्या हल्ल्यात १५० हून अधिक शाळकरी मुला-मुलींचा मृत्यू झाला होता. त्या घटनेचा चीनने निषेध केला. तसेच अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूचा देखील चीनने निषेध केला. परंतु, अमेरिका व इस्रायलने पुकारलेल्या युद्धाचा मात्र अद्याप इराणकडून निषेध करण्यात आलेला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प किंवा अमेरिकेकडून चीनवर थेट टीका होऊ नये, म्हणून देखील चीनने सौम्य भूमिका घेतल्याचे मानले जात आहे. व्हेनेझुएला प्रकरणात चीनने अमेरिकेच्या कृत्याला ‘दादागिरी’ असे खुलेआम म्हटले होते. दरम्यान, चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी पत्रकार परिषदेत इराणवर विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना अमेरिकेवर टीका करणे टाळले.
चीन तेल व गॅसच्या बाबतीत निश्चिंत का आहे?
पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाने चीनला ऊर्जेची कमतरता भासणार नाही, असे चीनमधील संरक्षण तज्ज्ञांनी म्हटले आहे. या युद्धाचा चीनवर कोणताच परिणाम होणार नाही. त्यामुळे चीनला कोणतीही फिकीर नसल्याचे म्हटले जात आहे. चीन आखाती देशांकडून खरेदी करत असलेले ३० टक्के तेल हे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून चीनकडे पाठवले जाते. इराण हा चीनला कच्च्या तेलाचा पुरवठा करणारा महत्वाचा देश आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद पडली तरी चीनवर फार परिणाम नाही. चीन हा विविध देशांकडून तेल आयात करणारा देश आहे. तसेच चीनमध्ये मोठ्या प्रमाणात अपारंपरिक ऊर्जा (सौर ऊर्जा, पवन ऊर्जा) स्रोतांचा वापर केला जातो. त्यामुळे चीन तेलाच्या किंवा गॅसच्या बाबतीत इराणवर अवलंबून नाही. चीनची ४१ टक्के इंधनाची गरज ही पश्चिम आशियातून भागवली जाते. पश्चिम आशियात युद्धजन्य परिस्थितीमुळे चीन रशियाकडून तेल, गॅसची गरज भागवेल, असा अंदाज ‘द गार्डियन’मध्ये व्यक्त करण्यात आला.
चीनची पश्चिम आशियातील देशांकडून होणारी तेल, गॅस आयात
सौदी अरेबिया – १४ टक्के
इराण – १२ टक्के
इराक -११ टक्के
ओमान – ६ टक्के
कुवैत – ३ टक्के
कतार – १ टक्का
यूएई – ७ टक्के
चीनला वेगळीच भीती
पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाने ऊर्जेचा तुटवडा होण्याचे भय चीनला नाही. आखाती देशांमध्ये सुरू असलेले प्रकल्प व पायाभूत सुविधा युद्धात उद्ध्वस्त होऊ नये याची भीती चीनला आहे. युरेशियात चीनचे अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू आहेत. त्यातीलच एक म्हणजे ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ (BRI) होय. बिजिंग मधील एका रणनीती तज्ज्ञाने चीनच्या आखाती देशांमधील प्रकल्पांबाबत चिंता व्यक्त केली. चीनला मुख्यत: बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह उद्ध्वस्त होण्याची भीती आहे. तसेच चीन-किर्गिस्तान-उझबेकिस्तान रेल्वे मार्ग चीनला बांधायचा होता. तो देखील अपूर्ण राहील, याची चिंता चीनला आहे. इराणमध्ये अमेरिकाधार्जिणे सरकार आले, तर चीनच्या प्रकल्पांचे, पायाभूत सुविधांचे अस्तित्व धोक्यात येईल, असे चीनला वाटते.
पश्चिम आशियात चीनला रस का नाही?
अमेरिका हा त्याच्या मित्र राष्ट्रांबरोबर संरक्षण भागीदारी करतो. वेळ पडल्यास लष्करी कारवाई करण्यासाठी मित्र राष्ट्रांना मदत देखील करतो. परंतु, चीनची भूमिका मात्र अमेरिकेसारखी नाही. चीन कोणत्याही देशाला त्याचा जवळचा मित्र अथवा सहकारी मानत नाही. चीन हा त्याच्या मित्रराष्ट्रांकडे रणनीतीतील भागीदार म्हणून पाहतो. चीनमधील प्रसिद्ध ब्लॉगर झाओ हान यांनी चीनच्या भूमिकेबाबत एका वेबसाईटवर लिहिले आहे. ते म्हणतात “चीनने इराणला आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले होते. ती मदत चीनकडून प्रलंबित ठेवली जात आहे. ती इराणला अजून पाठवण्यात आलेली नाही.” हान पुढे लिहितात, “मध्य पूर्व हा चीनसाठी महत्वाचा भाग आहे. परंतु चीनला त्यात फार रस नाही. चीनला तैवान, साऊथ चायना सी, शाश्वत विकास, तंत्रज्ञानात स्वावलंबी होणे, या गोष्टींमध्ये रस आहे”, असे हान म्हणाले.
