India Defence Export Record Brahmos Missile : एकेकाळी शस्त्रांची आयात करणारा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताने आता जागतिक संरक्षण बाजारपेठेत निर्यातदार म्हणून आपले स्थान मजबूत केले आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात भारताच्या संरक्षण निर्यातीने सर्वकालीन उच्चांक गाठला असून ती ३८,४२४ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यामध्ये तब्बल १४ हजार ८०२ कोटी (६२.६६ टक्के) वाढ नोंदवण्यात आली आहे. या संरक्षण निर्यातीत ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र प्रणालीचा अत्यंत मोलाचा वाटा असल्याचे समोर आले आहे. या अत्याधुनिक सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची आशियाई देशांमध्ये झपाट्याने मागणी वाढली आहे.

‘ब्रह्मोस’ इतके लोकप्रिय का ठरत आहे?

अत्यंत प्रगत आणि घातक समजली जाणारी ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र प्रणाली व्हिएतनामला विकण्यासाठी भारताने नुकताच करार केला आहे. तसेच इंडोनेशियासोबतचा अशाच प्रकारचा एक मोठा संरक्षण करार अंतिम टप्प्यात असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे, भारताने यापूर्वीच फिलिपिन्सला या क्षेपणास्त्रांची यशस्वी विक्री केली असून तिची डिलिव्हरीही सुरू झाली आहे. चीनच्या वाढत्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आशियाई देश भारताच्या या अचूक आणि वेगवान क्षेपणास्त्राला आपली पहिली पसंती देत आहेत. त्यामुळेच एकेकाळी शस्त्रास्त्रांसाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून असलेला भारत आता जगाला शस्त्रे पुरवणारा एक प्रमुख देश बनला आहे. आग्नेय आशियासह जगातील इतर अनेक देशही ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यास उत्सुक आहे. त्यामुळे हे क्षेपणास्त्र इतके लोकप्रिय आणि आकर्षक का ठरत आहे, असा प्रश्न काहींना पडला आहे.

ब्रह्मोस क्षेपणास्त्राची नेमकी वैशिष्ट्ये काय?

ब्रह्मोस सध्या जगातील सर्वात वेगवान आणि अचूक क्रूझ क्षेपणास्त्र मानले जाते. त्याचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा २.८ ते ३ पट असून ते एका सेकंदात १ किमी अंतर पार करते. भारतातील ब्रह्मपुत्रा आणि रशियातील मॉस्क्वा या दोन नद्यांच्या नावावरून या क्षेपणास्त्राला ब्रह्मोस हे नाव देण्यात आले आहे. ब्रह्मोस हे दोन टप्प्यांचे (स्टेजेस) क्षेपणास्त्र आहे असून त्यातील पहिला टप्पा घनरूप इंधनावर आधारित बुस्टरचा आहे, तर दुसरा टप्पा द्रवरूप इंधनावर आधारित रॅमजेट इंजिनाचा आहे. हे क्षेपणास्त्र पाणबुडी, युद्धनौका, लढाऊ विमान तसेच जमिनीवरील प्रक्षेपण यंत्रणांमधून डागता येते. त्याची मारक क्षमता सुमारे ३०० किलोमीटर असून ते २०० ते ३०० किलो वजनाचा स्फोटके वाहून नेऊ शकते. ब्रह्मोसचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे क्षेपणास्त्र सहजपणे शत्रूच्या रडारवर येत नाही. तसेच ते विविध प्रकारच्या उड्डाण मार्गांचा वापर करू शकते. ‘फायर अँड फॉरगेट’ तंत्रज्ञानावर आधारित असलेले हे क्षेपणास्त्र १५ किलोमीटर उंचीवरून प्रवास करते आणि आपल्या लक्ष्याजवळ पोहोचल्यानंतर केवळ १० मीटर उंचीवरून अचूक हल्ला करते. २००१ मध्ये पहिली यशस्वी चाचणी झाल्यानंतर ब्रह्मोसच्या अनेक सुधारित आवृत्त्या विकसित करण्यात आल्या आहेत.

कोणकोणत्या देशांकडून ब्रह्मोसची खरेदी?

गेल्या वर्षी पाकिस्तावर हल्ला करण्यासाठी भारतीय लष्कराने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान ब्रह्मोसची खरी ताकद सगळ्या जगाने पाहिली. पाकिस्तानमधील ‘नूर खान’ आणि ‘रहीमयार खान’ हे लष्करी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी या क्षेपणास्त्राचा प्रभावी वापर करण्यात आला होता. ब्रह्मोसच्या या अभूतपूर्व कामगिरीमुळे जगभरातील देशांचे लक्ष या क्षेपणास्त्राकडे वेधले गेले. फिलिपिन्स हा ब्रह्मोसची खरेदी करणारा पहिला विदेशी देश ठरला. सुमारे ३७५ दशलक्ष डॉलरच्या कराराअंतर्गत भारताने या देशाला क्षेपणास्त्र प्रणाली पुरविण्याचे काम केले. यानंतर व्हिएतनामनेही ब्रह्मोसच्या खरेदीसाठी भारताबरोबर करार केला. हा करार सुमारे ५,८०० कोटी रुपयांचा असल्याचे सांगितले जाते. त्यामध्ये किनारी संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली, प्रारंभिक क्षेपणास्त्रांचा साठा, प्रशिक्षण आणि लॉजिस्टिक सहाय्य यांचा समावेश आहे. भविष्यात व्हिएतनाम आपल्या हवाई दलासाठी ब्रह्मोसची एअर-लॉन्च आवृत्तीही खरेदी करण्याची शक्यता आहे. तसेच इंडोनेशियाबरोबरचा करारही अंतिम टप्प्यात असून त्याची संभाव्य किंमत सुमारे ४५० दशलक्ष डॉलर असल्याचे सांगितले जात आहे. पश्चिम आशियातील सौदी अरेबिया, कतार, ओमान आणि इजिप्त या देशांनी ब्रह्मोस खरेदीची इच्छा व्यक्त केली आहे. याशिवाय, लॅटिन अमेरिकेतील ब्राझील, चिली, अर्जेंटिना आणि व्हेनेझुएला या देशांवरही ब्रह्मोसने आपली छाप पाडली असून तेही हे क्षेपणास्त्र मिळवण्यासाठी उत्सुक आहेत.

चीनशी वाद असलेल्या देशांची ब्रह्मोसला पसंती

ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या क्षमतेव्यतिरिक्त त्याच्या वाढत्या मागणीमागे चीनची वाढती लष्करी ताकद व सागरी विस्तारवादी धोरण कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. प्रसिद्ध भारतीय भू-राजकीय रणनीतीकार आणि स्तंभलेखक डॉ. ब्रह्म चेलानी यांच्या मते, फिलिपिन्स, व्हिएतनाम आणि इंडोनेशिया यांसारख्या देशांकडे चीनच्या अवाढव्य नौदल शक्तीचा आणि सागरी विस्तारवादाचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेला प्रचंड संरक्षण खर्च करण्याची क्षमता नाही. त्यामुळे हे देश आपल्या किनारपट्ट्यांवर ब्रह्मोसची जहाजविरोधी क्षेपणास्त्र प्रणाली तैनात करून चीनच्या नौदलाला रोखण्यासाठी प्रभावी संरक्षण व्यवस्था उभी करू शकतात. ब्रह्मोस हे तुलनेने कमी खर्चिक असले तरी ते अधिक शक्तिशाली प्रतिस्पर्ध्याला मोठी किंमत मोजण्यास भाग पाडणारे प्रभावी शस्त्र आहे. त्यामुळे हे क्षेपणास्त्र आर्थिकदृष्ट्या मर्यादित देशांसाठी नौदल सामर्थ्याचे संतुलन राखणारे साधन ठरत आहे.

ब्रह्मोसमुळे चीनची धडधड का वाढली?

निवृत्त लष्करी अधिकारी गौरव आर्या यांनीही याकडे लक्ष वेधले आहे. त्यांच्या मते, भारताकडून ब्रह्मोस खरेदी करण्यास उत्सुक असलेल्या बहुतांश देशांचा चीनबरोबर सीमावाद किंवा सागरी क्षेत्रावरील वाद सुरू आहे. ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या एका अहवालानुसार, भारताकडून ब्रह्मोसची होत असलेली निर्यात चीनसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. चीनच्या संरक्षण तज्ज्ञांनी तर ब्रह्मोसच्या अफाट क्षमतेमुळे आणि अचूकतेमुळे त्याचे वर्णन आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी एक अडचण निर्माण करणारे शस्त्र असे केले आहे. ब्रह्मोसचे हे करार आग्नेय आशियाई प्रदेशात भारताच्या भविष्यातील इतर शस्त्रास्त्रांच्या विक्रीसाठी एक मजबूत पाया ठरतील. ही रणनीती दक्षिण आशियामध्ये चीनच्या वाढत्या प्रभावाला आणि त्याच्या शस्त्रास्त्र पुरवठादार म्हणून असलेल्या मक्तेदारीला प्रभावीपणे शह देणारी ठरेल, असेही अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्रामुळे भारताची संरक्षण क्षेत्रातील विश्वासार्हता वाढत असून, भविष्यात आणखी काही देश भारताच्या संरक्षण तंत्रज्ञानाकडे वळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.