Colorectal Cancer Risk Factors : जीवनशैलीतील बदल आणि चुकींच्या सवयींमुळे गेल्या काही वर्षांत गंभीर आजारांचे प्रमाण वाढले आहे. कोलोरेक्टल म्हणजेच मोठ्या आतड्याचा कर्करोग हा अनेक दशकांपासून प्रामुख्याने वयोवृद्धांमध्ये आढळणारा आजार मानला जात होता. त्यामुळे जगभरातील तपासणी कार्यक्रम आणि जनजागृती मोहिमा ५० वर्षांवरील व्यक्तींना केंद्रस्थानी ठेवून राबवले जात होते. आता मात्र या आजाराने जगभरातील तरुण-तरुणींना विळखा घालण्यास सुरुवात केल्याचे समोर आले आहे. भारतातही आतड्याच्या कर्करोगाची अनेक प्रकरणे नोंदवली जात आहेत. या पार्श्वभूमीवर कोलोरेक्टल कॅन्सर वाढण्याची कारणे काय? भारत कर्करोगाच्या विळख्यात का अडकतोय? त्याविषयीचा हा आढावा…
जगभरात कर्करोगाची अनेक प्रकरणे
मोठ्या आतड्याचा कर्करोग पूर्वी केवळ ५० वर्षांवरील लोकांचा आजार मानला जात होता. आता मात्र परिस्थिती बदलली असून तरुण पिढीमध्ये या कर्करोगाचे प्रमाण वेगाने वाढताना दिसत आहे. ब्रिटनमध्ये दरवर्षी सुमारे ४४,००० लोकांना या आजाराचे निदान होत आहे. अमेरिकेतही २०२५ मध्ये आतड्याच्या कर्करोगाचे तब्बल एक लाख ४५ हजार नवीन रुग्ण आढळून आले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे, १९९० च्या दशकापासून २० ते ३९ या वयोगटातील तरुणांमध्ये दरवर्षी मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचे प्रमाण दोन टक्क्यांनी वाढत आहे. भारतातही ही समस्या आता अधिक प्रकर्षाने समोर येऊ लागली आहे. बेंगळुरू येथील ‘किदवाई मेमोरियल इन्स्टिट्यूट ऑफ ऑन्कोलॉजी’ या संस्थेने नुकत्याच केलेल्या अभ्यासातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतात आतड्याच्या कर्करोगाचे निदान हे आजाराच्या प्रगत टप्प्यावर होत असल्याचे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.
भारतातील नवीन आकडेवारी काय सांगते?
मोठ्या आतड्याचा कर्करोग हा जगभरात सर्वाधिक आढळणाऱ्या कर्करोगांपैकी एक आहे. नियमित तपासणीमुळे वृद्धांमधील या आजाराचे प्रमाण कमी झाले असले तरीही त्याचा तरुणांमध्ये धोका वाढतो आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, २०२२ मध्ये जगभरात मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचे सुमारे १९ लाख नवे रुग्ण असून त्यामधील ९ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. फुफ्फुसाच्या कर्करोगानंतर होणाऱ्या मृत्यूंच्या बाबतीत हा दुसऱ्या क्रमांकाचा आजार ठरला आहे. भारतातही मोठ्या आतड्यांच्या कर्करोगामुळे गंभीर समस्या निर्माण झाल्या आहे. देशात या आजाराचे दरवर्षी ७०,००० हून अधिक नवीन रुग्ण आढळून येत असल्याचे समोर आले आहे. सध्या भारतात आढळणाऱ्या प्रमुख कर्करोगांमध्ये हा चौथ्या क्रमांकाचा कर्करोग आहे. सर्वात चिंतेची बाब म्हणजे त्यामधील सर्वाधिक रुग्ण ४० वर्षांखालील आहे. पाश्चात्य देशांच्या तुलनेत भारतातील तरुणांमधील हे प्रमाण खूपच जास्त आहे.
आणखी वाचा : जगावर तेलसंकट असतानाही भारताने बांगलादेशात ५,००० टन डिझेल का पाठवले? कारण काय?
तरुणांमध्ये का वाढतोय कॅन्सरचा धोका?
बेंगळुरूच्या किदवाई मेमोरियल इन्स्टिट्यूट ऑफ ऑन्कोलॉजीच्या अभ्यासात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. भारतात मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचे बहुतांश निदान तिसऱ्या (Stage III) किंवा चौथ्या टप्प्यात होते. या परिस्थितीत कर्करोग शरीराच्या इतर भागांत पसरलेला असल्यामुळे त्यावर उपचार करणे अत्यंत कठीण होते. या अभ्यासात असेही आढळले की- या आजाराने ग्रस्त असलेले सुमारे ३० टक्के रुग्ण ४५ वर्षांखालील आहेत. अनेकदा तरुण वयात कर्करोग असू शकतो याची शंका येत नसल्याने लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते आणि निदानाला उशीर होतो. तरुणांमध्ये हा कर्करोग वाढण्यामागे कोणतेही एक ठराविक कारण नसून जीवनशैलीशी संबंधित अनेक घटक त्याला कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
कॅन्सरसाठी कोणत्या सवयी कारणीभूत?
मुंबईतील एचसीजी कॅन्सर सेंटरचे वरिष्ठ सल्लागार डॉ. तीरथराम कौशिक यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत ५० वर्षांखालील लोकांमध्ये मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचा धोका वाढला आहे. पूर्वी हा आजार प्रामुख्याने वृद्धांमध्ये आढळून येत होता; पण जीवनशैली आणि पर्यावरणीय घटकांमुळे आता तो तरुणांमध्ये वाढताना दिसून येत आहे. डॉ. कौशिक यांनी या आजारामागची काही प्रमुख कारणेही सांगितली आहेत. तासनतास एकाच जागी बसून काम करणे आणि व्यायामाचा अभाव, प्रक्रिया केलेले पदार्थ जास्त खाणे आणि आहारात तंतुमय पदार्थांची कमतरता, मद्यपान आणि धूम्रपानाचे वाढते प्रमाण, लठ्ठपणा आणि वाढता मानसिक ताण यांसारख्या गोष्टी मोठ्या आतड्यांच्या कर्करोगाला कारणीभूत असल्याचे डॉ. कौशिक यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : होर्मुझची सामुद्रधुनी ताब्यात घेण्याची अमेरिकेची तयारी? काय आहे या जागतिक जलमार्गाचे महत्व?
आतड्यांच्या कर्करोगाची लक्षणे कोणती?
मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे त्याची सुरुवातीची लक्षणे अत्यंत सौम्य असतात, जी सहजपणे दुर्लक्षित केली जातात. तरुण वयात हा आजार होऊच शकत नाही, या गैरसमजामुळे अनेकदा त्याच्या निदानाला उशीर होतो. विष्ठेतून रक्त येणे हे सर्वात मोठे लक्षण आहे; परंतु अनेक तरुण याकडे मूळव्याध किंवा पचनाची किरकोळ समस्या म्हणून दुर्लक्ष करतात. सतत जुलाब, बद्धकोष्ठता किंवा विष्ठेचा आकार बदलणे (बारीक होणे) हे मोठ्या आतड्याच्या समस्येचे संकेत असू शकतात. विनाकारण वजन कमी होणे, सतत थकवा जाणवणे, पोटात दुखणे किंवा पोट पूर्णपणे साफ न झाल्याची भावना होणे यांसारखी लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे डॉ. कौशिक यांनी सांगितले. लवकर निदान झाल्यास आतड्याच्या कर्करोगावर मात करता येते. हा कर्करोग बहुतेक वेळा मोठ्या आतड्यातील गाठीपासून पासून हळूहळू विकसित होतो. तपासणीद्वारे या गाठी कर्करोगात रूपांतर होण्यापूर्वी काढून टाकता येतात, असेही डॉ. कौशिक यांनी स्पष्ट केले.
