मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मंगळवारी इंडिया आघाडीच्या वतीने राजधानी दिल्लीत मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. पोलिसांना चकवा देऊन दोन्ही नेत्यांनी आकाशवाणी भवन परिसरातच ठिय्या मांडल्यामुळे त्यांची संपूर्ण देशभरात जोरदार चर्चा झाली. मात्र, गांधी-बहीण भावंडांच्या या कृतीवर काँग्रेसच्या काही मित्रपक्षांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते. इंडिया आघाडीचे हे महाआंदोलन फक्त ‘गांधी भावंडांचाच शो’ ठरल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाल्याचे सांगितले जाते.
मंगळवारी राजधानीत नेमके काय घडले?
मंगळवारी राजधानी दिल्लीतील आंदोलनात विरोधी पक्षांचे सुमारे २०० खासदार संसद भवनाजवळ एकत्र जमले होते आणि तिथून त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. या आंदोलनाला परवानगी नसल्यामुळे दिल्ली पोलिसांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे जाणारे सर्व रस्ते आधीच बॅरिकेड्स लावून बंद केले होते. यादरम्यान विरोधकांचा हा मोर्चा आकाशवाणी भवनाजवळ पोहोचताच पोलिसांनी खासदारांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह विरोधी पक्षांच्या अनेक ज्येष्ठ खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेऊन बसमधून पोलीस ठाण्यात नेले.
गांधी भावंडांचा ऐनवेळी धक्कातंत्राचा निर्णय
आकाशवाणी भवनाबाहेर पोलिसांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना ताब्यात घेण्यासाठी बसेस उभ्या केल्या होत्या. प्रियांका गांधी वाड्रा यातील एका बसमध्ये आधीच जाऊन बसल्या होत्या; तर राहुल गांधी हेदेखील बसमध्ये चढण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी दोन्ही भावंडांनी एकमेकांकडे पाहिले आणि ते पोलिसांना चकवा देऊन आकाशवाणी भवनाच्या आवारात शिरले. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी तिथेच तासनतास ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यांना बघून काँग्रेसच्या इतर नेत्यांमध्येही उत्साह संचारला आणि तेदेखील आकाशवाणी भवनात शिरले. त्यामुळे शांत होत आलेले इंडिया आघाडीचे आंदोलन पुन्हा एकदा तीव्र झाले. काँग्रेसच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांचा आकाशवाणी भवनात शिरून मागील दरवाजातून बाहेर पडण्याचा बेत होता. कारण तो दरवाजा थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर उघडतो. मात्र, पोलिसांनी हा दरवाजा कुलूप लावून आधीच बंद केल्याने त्यांनी आकाशवाणी भवनातच ठाण मांडले. अखेर मंगळवारी उशिरा पोलिसांनी गांधी भावंडांसह तिथे उपस्थित असलेल्या इतर काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेतले आणि नंतर सोडून दिले. या प्रकरणी पोलिसांनी एफआयआरही दाखल केल्याचे समजते.
इंडिया आघाडीतील मित्रपक्ष का भडकले?
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी आकाशवाणी भवन परिसरात ठिय्या देत सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वळवले. त्याचवेळी विरोधी पक्षांतील इतर नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी नेले. त्यामुळे आंदोलनात सहभागी होऊनही आपल्याला अपेक्षित महत्व मिळाले नसल्याची भावना काँग्रेसच्या मित्रपक्षांमध्ये निर्माण झाल्याचे सूत्रांनी सांगितले. याशिवाय आंदोलनाचा उद्देशच निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरोधात निषेध व्यक्त करणे हा असताना काँग्रेस नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेण्याचा आग्रह का धरला, असा सवालही काही मित्रपक्षांनी उपस्थित केल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी ‘इंडिया’ आघाडीतील इतर पक्षांशी संवाद साधत सारवासारव करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. काँग्रेसच्या नेतृत्वाने अगदी शेवटच्या क्षणी ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेतला. मित्रपक्षांना विश्वासात न घेता ऐनवेळी हा निर्णय घेण्यात निर्माण झालेल्या अविश्वासाबद्दल खेद वाटतो, अशी भूमिका वेणुगोपाल यांनी मित्रपक्षांसमोर मांडल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.
काँग्रेसकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न
यादरम्यान इंडिया आघाडीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर काँग्रेसकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. आकाशवाणी भवन येथे करण्यात आलेले ठिय्या आंदोलन काँग्रेसच्या मूळ नियोजनाचा भाग नव्हते, असा दावा पक्षातील नेत्यांनी केला. राहुल आणि प्रियांका गांधी यांनी अचानक हा निर्णय घेतल्याचेही काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले. काँग्रेसच्या नेत्यांनाच या आंदोलनाची माहिती नव्हती; पण वरिष्ठ नेते ठाण मांडून बसल्यामुळे आम्हाला तिथे जावे लागले, असे पक्षाच्या एका खासदाराने सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार, इंडिया आघाडीतील नेत्यांची नाराजी व्यक्त करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करणार आहेत. दिल्लीतील जनपथ येथील सागर रत्ना रेस्टॉरंटमध्ये हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती आहे. इंडिया आघाडीतील मित्रपक्षांमध्ये नाराजी निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर खर्गे यांच्या या भोजनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. आघाडीतील समन्वय आणि परस्परांमधील गैरसमज दूर करण्याच्या दृष्टीने या बैठकीकडे पाहिले जात आहे.
काँग्रेसचे मित्रपक्ष नाराज का झाले?
दिल्लीतील आंदोलन हे इंडिया आघाडीचे संयुक्त आंदोलन होते; पण सरतेशेवटी ते केवळ काँग्रेस आणि राहुल गांधींचे वैयक्तिक आंदोलन बनून राहिले, अशी खंत इंडिया आघाडीतील एका नेत्याने खासगीत बोलून दाखवली. तसेच काही ज्येष्ठ नेत्यांनी तर काँग्रेसच्या भूमिकेवर थेट आक्षेप नोंदवला. काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट मागण्याचा घेतलेला निर्णय मित्रपक्षांना मान्य होणारा नव्हता, असे या नेत्यांचे म्हणणे आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असतानाच निवडणूक आयोगाला का भेटायचे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तसेच या निर्णयावर आधी मित्रपक्षांशी चर्चा झाली असती, तर आम्ही त्याला कधीही संमती दिली नसती, असे परखड मत डाव्या पक्षांच्या एका खासदाराने मांडले. यादरम्यान काँग्रेसने मित्रपक्षांना अंधारात ठेवून परस्पर निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यानही असाच प्रकार घडला होता. पेपरफुटीच्या मुद्द्यावरून तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा राहुल गांधींचा बेत मित्रपक्षांना आधी सांगण्यात आला नव्हता. त्यावेळी काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनी तातडीने इतर पक्षांशी संपर्क साधला होता. त्यानंतर अखिलेश यादव आणि सुप्रिया सुळे यांच्यासह इतर नेत्यांनी राहुल गांधींच्या त्या आंदोलनात सहभाग घेतला होता.
