Meenakshi Natrajan Rajya Sabha : काँग्रेस नेत्या मीनाक्षी नटराजन यांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज मंगळवारी (९ जून) फेटाळण्यात आला. त्यानंतर काँग्रेसमध्ये संतापाची लाट उसळली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी नवी दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. राज्यसभेच्या २४ जागांसाठी निवडणुका होत आहेत. त्यांपैकी ३ जागा मध्य प्रदेशातील आहेत. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या आणि माजी लोकसभा खासदार मीनाक्षी नटराजन यांनी मध्य प्रदेशातून उमेदवारी अर्ज सादर केला होता. काँग्रेसने त्यांच्या विजयासाठी सर्व तयारी करून ठेवली होती. स्वत:च्या आमदारांकडून क्रॉस वोटिंग होणार नाही, याबाबत दक्षता बाळगली होती. परंतु, मीनाक्षी यांचा उमेदवारी अर्जच रिटर्निंग ऑफिसरने फेटाळला. त्यामुळे काँग्रेसच्या आशेवर पाणी फेरले. मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज का फेटाळण्यात आला? संसदेच्या वरिष्ठ सभागृहात (राज्यसभा) जाण्यासाठी एखाद्या व्यक्तीसाठी काय पात्रता आवश्यक आहे? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
मीनाक्षी नटराजन कोण आहेत?
मीनाक्षी नटराजन या युवक काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आहेत. तसेच हरयाणातील मंदसौरच्या (२००९ – १४) त्या माजी लोकसभा खासदार आहेत. त्यांनी काँग्रेसचे चिटणीस पदही भूषविले आहे. राहुल गांधी यांच्या त्या विश्वासू मानल्या जातात.
नटराजन यांच्या उमेदवारीला काँग्रेसमधूनच विरोध झाला होता. मध्य प्रदेशातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश ग्यानचंदानी यांनी सोमवारी पक्षाचा राजीनामा दिला. काँग्रेस आमदार क्रॉस वोटिंग करतील, असा इशारा देत त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्याच दरम्यान, भाजपाचे राज्य सरचिटणीस राहुल कोठारी यांनी नटराजन यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेत रिटर्निंग ऑफिसरकडे तक्रार केली. नटराजन यांनी उमेदवारीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या विरोधात दाखल झालेल्या एका प्रकरणाची नोंद केली नसल्याचे कोठारी यांनी सांगितले. माहिती दडपल्याचा आरोप कोठारी यांनी नटराजन यांच्यावर केला. हैदराबाद मधील एका न्यायालयात नटराजन यांच्याविरोधात एक खासगी प्रकरण प्रलंबित आहे. याच प्रकरणामुळे नटराजन यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला.
नटराजन यांच्या विरोधातील प्रकरण नेमके काय?
तेलंगणात २०२२ मध्ये एक फौजदारी गुन्हा दाखल झाला होता. काँग्रेसमधील एका महिला पदाधिकाऱ्याने काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. काँग्रेस नेत्यासोबत काही महिने असलेल्या वैयक्तिक संबंधांदरम्यान शिवीगाळ, जबरदस्ती, धमकावणे तसेच शोषण झाल्याचा आरोप महिला पदाधिकाऱ्याने केला होता. हे प्रकरण सध्या प्रलंबित आहे.
दरम्यान, नटराजन यांचे नाव या प्रकरणात नव्हते. परंतु, तक्रारदार महिलेने हैदराबाद न्यायालयात ऑगस्ट २०२५ मध्ये नटराजन यांच्या विरोधात एक खासगी तक्रार नोंद केली. वारंवार तक्रार करूनही एका बड्या काँग्रेस नेत्याला वाचविण्यात येत असल्याचा आरोप करत ही तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीचा संबंध वरील प्रकरणाशी होता. ही तक्रार दाखल करण्यात आली तेव्हा नटराजन ह्या तेलंगणाच्या काँग्रेस प्रभारी होत्या. नटराजन यांची भेट घेऊन आपण त्यांच्यासमोर सगळे मुद्दे मांडत मुख्य आरोपीवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी केल्याचे तक्रारदार महिलेने सांगितले. याचिकेत नमूद असलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपीला पक्षातून आधीच निलंबित केले आहे, असे नटराजन यांनी तक्रारदार महिलेला सांगितले. “निलंबनाचे पत्र दाखवा असे विचारले असता नटराजन यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही”, असे तक्रारदार महिलेने नमूद केले आहे.
याचिकेत नटराजन यांना आरोपी करण्यात आलेले नाही. तसेच त्यांचा मुख्य आरोपीने केलेल्या गुन्ह्यात सहभाग आहे, असेही नमूद नाही. पक्ष पातळीवर कारवाई करण्यास निष्क्रियता दाखवली तसेच ज्याच्यावर आरोप झाले त्या नेत्यावर कोणतीच कारवाई केली नाही म्हणून नटराजन यांच्याविरोधात खासगी तक्रार संबंधित महिलेने दाखल केली होती.
कोणतेही गैरकृत्य केलेले नाही, तसेच या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आले आहे, असे मीनाक्षी यांनी २४ ऑक्टोबर २०२५ रोजी हैदराबाद न्यायालयाला सांगितले होते. हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नाही, असा दावा काँग्रेसनेही केला आहे. काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि वरिष्ठ वकिल विवेक तनखा यांनी ‘एक्स’वर म्हटले, नटराजन यांना फक्त कायदेशीर नोटीस प्राप्त झाली आहे, त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाला नव्हता.
रिटर्निंग ऑफिसरने उमेदवारी अर्ज फेटाळताना काय म्हटले?
रिटर्निंग ऑफिसर अरविंद शर्मा यांनी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला आहे. त्यांच्या आदेशात त्यांनी नमूद केले की, “फॉर्म नं. २६ मध्ये नटराजन यांनी अपूर्ण प्रतिज्ञापत्र सादर केले आणि न्यायालयातील प्रकरणाबाबत महत्त्वाची माहिती लपवली.” मतदारांना उमेदवाराविषयीच्या संपूर्ण माहितीपासून वंचित ठेवले. संपूर्ण माहिती देण्याऐवजी अर्धवट माहिती दिली, असे आदेशात म्हटले आहे.
राज्यसभेचा उमेदवारी अर्ज बाद केव्हा होतो?
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर “संसदआणि राज्याच्या विधिमंडळाची (अपवाद जम्मू-काश्मीर) निवडणूक लढवण्यासाठी पात्रता आणि अपात्रता, नामांकन सादर करताना लागणारी कागदपत्रे व इतर बाबी” या मथळ्याखाली काही माहिती देण्यात आली आहे. गुन्ह्यांशी संबंधित माहिती (गुन्हा सिद्ध झालेली प्रकरणे किंवा प्रलंबित प्रकरणे),पॅन कार्ड, स्वत:चे, पती किंवा पत्नीचे आणि अवलंबून असलेल्यांचे आयटीआर भरल्याचा तपशील, स्थावर व जंगम मालमत्तेची माहिती, देणे बाकी असेल तर त्याबाबतची माहिती, सरकार किंवा सार्वजनिक वित्त संस्थांमध्ये पती किंवा पत्नी व अवलंबून असणारे कोणी काम करत असेल तर त्याबाबतची माहिती, प्रोफेशन किंवा ऑक्युपेशनची माहिती, शैक्षणिक माहिती फॉर्म क्र. २६ मध्ये सादर करावी लागते. या माहितीत तफावत आढळल्यास उमेदवारी अर्ज फेटाळला जाऊ शकतो. “मतांच्या चोरीपर्यंत जे सीमित होते ते आता जागांच्या चोरीपर्यंत येऊन पोहोचले आहे. देशात सध्या गंभीर परिस्थिती आहे. आम्ही याला आव्हान देऊ”, असे मीनाक्षी नटराजन म्हणाल्या. बुधवारी (११ जून) दुपारी निवडणूक आयोग काँग्रेसच्या शिष्टमंडळाची या प्रकरणी भेट घेणार आहे.
