Why Couples Are Choosing Therapy Before Marriage: पीआर क्षेत्रात काम करणाऱ्या साक्षी उनियाल यांच्यासाठी थेरपी हा नंतरचा नव्हे तर उलट, लग्नाचा विचार करण्याआधीची ती पहिलीच अट होती. “याआधी मी माझी अरेंज एंगेजमेंट मोडली होती. वातावरण जुळत नव्हतं; काहीतरी आतून चुकीचं वाटत होतं,” त्या सांगतात. दुसऱ्यांदा, पुन्हा अरेंजमेंट सेटअप असल्याने आणि समोरच्या व्यक्तीला नीट ओळखण्यासाठी फारसा वेळ नसल्याने, त्यांना स्वतःसाठी काही गोष्टी अधिक स्पष्ट होण्याची गरज भासली. तरीही थेरपी घेण्याचा निर्णय सरळ नव्हता. त्यांचे पालक सुरुवातीला ठामपणे विरोधात होते. “त्यांच्या मते काऊंन्सेलिंग म्हणजे माझं लग्न कधीच होणार नाही. लोक मला ‘प्रश्न विचारणारी मुलगी’ म्हणून पाहतील, अशी त्यांची भीती होती,” त्या हसत सांगतात. हा समज अनेकांच्या मनात आजही खोलवर रुजलेला आहे, त्या सांगतात.
थेरपीने शेवटी साक्षी उनियाल यांना पुन्हा भावनिकदृष्ट्या उभं राहायला मदत केली. “पहिल्या एंगेजमेंटमध्ये जे काही घडलं, त्यानंतर स्वतःकडे पत्नी म्हणून पाहण्याबद्दल मी खूप साशंक झाले होते. माझ्या थेरपिस्टने मला स्व-मूल्य आणि स्व-करुणा यावर काम करायला मदत केली. त्यामुळे मी भीतीशिवाय वैवाहिक जीवनात पाऊल टाकण्याइतकी आत्मविश्वासू झाले,” त्या सांगतात. त्यांना भीती होती की, त्यांच्या नव्या कुटुंबाला त्यांच्या भूतकाळाबद्दल काय वाटेल. अरेंज मॅरेजमध्ये ही चिंता सर्वसाधारणपणे असतेच. “मला पूर्वग्रहांची भीती वाटत होती. माझी आधीची एंगेजमेंट माझ्या ओळखीवर ठप्पा ठरू नये, असं मला वाटत होतं.”
आज, आई झाल्यानंतरही साक्षी यांनी थेरपी सुरू ठेवली आहे. “घरातील स्त्री संतुलित असेल, तर सगळं घर व्यवस्थित चालतं. मातृत्वाने माझा दृष्टीकोनच बदलून टाकला. हे एक सामायिक उत्तरदायित्व आहे. काऊंन्सेलिंगमुळे माझी आणि माझ्या नवऱ्यातील संवाद साधण्याची क्षमता खूप सुधारली आहे,” त्या सांगते.
लग्नाआधी काऊंन्सेलिंगकडे जोडपी का वळत आहेत?
लग्नसंबंधांची व्याख्या कालांतराने बदलली आहे. लग्न म्हणजे फक्त आयुष्यभराची जबाबदारी म्हणून स्वतःला जुळवून घेणे एवढ्यावर मर्यादित राहिलेले नाही. आजच्या काळात टिकाऊ नातेसंबंध हे जोडीदार एकमेकांना किती खोलवर समजून घेतात यावर अवलंबून असतात. वाढती व्यक्तिगतता (individualism) आणि आर्थिक स्थैर्य हे एका मजबूत नात्याचे अत्यंत महत्त्वाचे घटक ठरले आहेत. आजूबाजूला पाहिल्यास हे बदल स्पष्ट जाणवतात. उदाहरणार्थ भारताचीच स्थिती घ्या. एकेकाळी जगातील सर्वात कमी म्हणजे फक्त १ टक्के घटस्फोटाचा दर असलेला देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात आता स्थिती बदलत आहे. Periodic Labour Force Survey नुसार, “सात वर्षांपूर्वीच्या तुलनेत आज अधिक भारतीय घटस्फोट घेत आहेत आणि ग्रामीण भागात घटस्फोट किंवा वेगळं राहणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढत आहे.” घटस्फोटांच्या या वाढत्या संख्येमुळे लोक मदत शोधू लागले आहेत. नात्यात निर्माण झालेली दरी भरून काढण्यासाठी ते काऊंन्सेलिंगची मदत घेत आहेत. विशेषतः शहरी भागात प्री-मॅरिटल काऊंन्सेलिंग म्हणजे लग्नाआधीचे समुपदेशन झपाट्याने वाढत आहे.
हृदयभंगातूनच उपचाराची सुरुवात होते
एकता पांडेय यांच्यासाठी काऊंन्सेलिंग हा एक विध्वंसक ब्रेकअपनंतरचा निर्णायक टप्पा ठरला. त्यांनी कानपूरमधील मनो सृजन वेलनेस सेंटर सायकोलॉजिस्ट अँड काऊंन्सेलिंग सर्व्हिसेस येथे समुपदेशक मानसशास्त्रज्ञ डॉ. आशिष पांडे यांच्याकडे थेरपी सुरू केली. डिप्रेशनशी झुंज देत आणि स्वतःची ओळख हरवल्यासारखं वाटत असताना, थेरपीने मला वेदनांमधूनच स्वतःचं ओळख शोधण्याची सवय सोडायला मदत केली, असे एकता सांगतात. “डॉ. पांडे यांनी मला मानवी नाती किती साधी असू शकतात हे दाखवून दिलं आणि माझा भूतकाळ माझ्या अपेक्षा ठरवण्यासाठी गरजेचा नाही हे समजावलं,” त्या सांगतात. “मी दोन वर्षे स्वतःवर काम केलं. डॉ. पांडे यांच्याशी झालेल्या संवादांमुळे माझं स्वतःबद्दलचं भान बदलत गेलं.
थेरपिस्ट काय पाहत आहेत?
डॉ. पांडे यांच्या मते, आजच्या काळात नातेसंबंध टिकून राहतील की नाही, हे समजून घेण्यासाठी प्री-मॅरिटल काऊंन्सेलिंग अत्यंत महत्त्वाचे ठरू लागले आहे. “अनेक जोडपी एंगेजमेंटनंतर किंवा लग्नाची तारीख ठरल्यावर आमच्याकडे येतात,” ते सांगतात. “त्यांना त्रास देणाऱ्या गोष्टीही जवळजवळ सारख्याच असतात. संवादातील कमीपणा, मूल्यांतील फरक, आर्थिक वाद आणि कुटुंबीयांचा अतिहस्तक्षेप, इत्यादी.”

सहा-सात वर्षे रिलेशनशिपमध्ये असलेल्या एका जोडप्याचा अनुभव ते सांगतात. “काऊंन्सेलिंग हा त्यांच्यासाठी शेवटचा उपाय होता. कंपॅटिबिलिटी आणि सायकोसोशल मूल्यांकनातून त्यांना जाणवलं की, त्यांच्या अपेक्षा पूर्णतः जुळत नाही. मात्र योग्य संवाद कौशल्ये आणि भावनिक जागरूकता वाढवण्याच्या सरावाने काही समस्यांवर काम होऊ शकतं, हेही लक्षात आलं.” डॉ. पांडे म्हणतात, “अनेक जोडप्यांना थेरपीदरम्यान लक्षात येतं की, त्यांचे प्रश्न खरे तर फार मोठे नसतात. फक्त त्या समस्या नीट व्यक्त केल्या जात नाहीत.” तरी सर्व परिणाम सुखद नसतात. “कधी कधी आमच्या विश्लेषणातून स्पष्ट संकेत मिळतो की, हे लग्न टिकणार नाही. जसं एका जोडप्याच्या बाबतीत झालं, त्यांची मैत्री अप्रतिम होती, पण लग्नासाठी आवश्यक असलेली भावनिक स्थिरता आणि संघर्ष सोडवण्याची क्षमता नव्हती. आम्ही त्यांना लग्न करू नका असा सल्ला दिला. तरीही त्यांनी लग्न केलं… आणि आज, दुर्दैवाने, ते विभक्त होण्याच्या प्रक्रियेत आहेत.”
कंपॅटिबिलिटीमध्ये अंतर निर्माण करणारे घटक
१. वय
वयातील फरक हा वारंवार दिसणारा संघर्षाचा मुद्दा असतो, विशेषतः जेव्हा स्त्री वयाने मोठी असेल तेव्हा हे प्रकर्षाने जाणवते. “यामुळे नकळतच एक प्रकारचा सत्तासंतुलनाचा असमतोल निर्माण होतो,” असे डॉ. पांडे सांगतात. “संवाद कमकुवत होतो आणि दोघांच्या प्राथमिकता वेगळ्या होतात.” ते एका जोडप्याचा अनुभव सांगतात. ३५ वर्षांची स्त्री आणि २९ वर्षांचा पुरुष होता. “सांस्कृतिक फरक आणि एकमेकांपासून वेगळ्या अपेक्षा यामुळे ते अनेक वर्षे झुंजत राहिले. तिला लग्नानंतर आपल्या जीवनशैलीत बदल करायचा नव्हता. तर धार्मिक कार्यक्रमांमध्ये ती ‘योग्य पोशाखात’ यावी अशी त्याची अपेक्षा होती. दोघांनी तडजोड मान्य केली, पण दीर्घकाळ ती टिकली नाही. शेवटी जुन्या समस्या पुन्हा उफाळून आल्या आणि आता ते विभक्त होण्याच्या मार्गावर आहेत.”
२. अपुरा आणि कमकुवत संवाद
थेरपिस्ट्सच्या मते, कमकुवत संवाद हा नातं तुटण्यासाठी सर्वात मोठं कारण आहे. यावर भर देत डॉ. पांडे सांगतात, “हे संवादातील अंतर अगदी छोट्याशा गोष्टींपासून सुरू होत. न सांगितलेल्या अपेक्षा, भावना दाबून ठेवणे, अस्पष्ट सीमा इत्यादी. हळूहळू हेच अंतर कायमस्वरूपी राग आणि नाराजीमध्ये बदलत जातं.”
३. सांस्कृतिक आणि मूल्यांतील फरक
जोडपी अनेकदा भावनिक अभिव्यक्ती, संघर्ष हाताळण्याची पद्धत, आर्थिक निर्णय आणि कुटुंबीयांचा हस्तक्षेप याबाबी हाताळताना त्यांच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीचा किती खोलवर परिणाम होतो ते विसरतात.
डॉ. पांडे सांगतात, “वयातील फरक असलेले जोडपे हेच सर्वोत्तम उदाहरण आहे. सांस्कृतिक आणि मूल्यांतील फरक कसा नातं तुटण्याच्या दिशेने ढकलू शकतो.” स्त्रीच्या स्वाभिमानाला कमी लेखणे हा नात्यातील धोक्याचा इशारा आहे. मनोज सृजन वेलनेस सेंटरचे सायकोलॉजिस्ट अँड काऊंन्सेलिंग सर्व्हिसेस, कानपूर येथील कौटुंबिक आणि नातेसंबंध समुपदेशक डॉ. वार्तिका आहुजा यांच्या मते, नात्यांमध्ये वारंवार दुर्लक्षित होणारा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्त्रीच्या स्वाभिमान आणि महत्त्वाकांक्षेला कमी लेखणे. त्या सांगतात, “अनेक नात्यांमध्ये स्त्रियांकडून पुरुषांपेक्षा अधिक तडजोडीची अपेक्षा केली जाते. त्यांच्या मर्यादा, करिअरची इच्छा किंवा भावनिक गरजा दुर्लक्षिल्या गेल्या तर विश्वास आणि जवळीक या दोन्हींवर त्याचा परिणाम होतो. ही भावनिक झीजच विवाहातील दुरावा निर्माण करणाऱ्या प्रमुख कारणांपैकी एक आहे.”
प्री-मॅरिटल काऊंन्सेलिंग: अरेंज्ड विरुद्ध लव्ह मॅरेज
अरेंज्ड मॅरेजमध्ये, अनेक व्यक्ती काऊंन्सेलिंगकडे स्वत:ची तयारी म्हणून पाहतात. स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे आणि भविष्याच्या जोडीदारात काय शोधायचे हे ओळखणे, हा प्रमुख हेतू असतो. डॉ. पांडे हे वारंवार सांगतात, “ज्यांची लग्नाची तयारी सुरू असते किंवा जे जोडीदार शोधत असतात, ते स्पष्टता मिळवण्यासाठी काऊंन्सेलिंगला येतात.” “त्यांना जाणून घ्यायचं असतं, कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, कंपॅटिबिलिटी ठरवणारे गुण कोणते आणि पहिल्या काही भेटींमध्ये साथ कशी ओळखायची.” लव्ह मॅरेजमध्ये, प्री-मॅरिटल काऊंन्सेलिंगची मागणी जास्त असते आणि लक्षही अधिक गुंतागुंतीच्या मुद्द्यांवर असते. भावनिक गुंतवणूक आधीच झालेली असल्यामुळे जोडप्यांना दीर्घकालीन नात्याबद्दल खात्री हवी असते किंवा न सुटलेल्या समस्या हाताळण्यासाठी मदत शोधत असतात. डॉ. पांडे म्हणतात, “जेव्हा दोन लोक आधीच कमिटेड असतात, तेव्हा त्यांना त्यांच्या नात्याचा टिकाऊपणा निश्चित करायची इच्छा असते.”
डॉ. आहुजा यांचे निरीक्षणही असेच आहे. त्या सांगतात की, “प्रेम आणि लग्न हे दोन वेगळे प्रवाह आहेत. प्रेम एक गोष्ट आहे, पण लग्न हा आयुष्यभर चालणारा प्रवास आहे.” त्या म्हणतात, “आम्हाला अनेकदा अशी जोडपी भेटतात जी दहा वर्षे एकत्र असतात, पण त्यांना भांडणाचा मुद्दा अगदी किरकोळ वाटतो. मात्र हे छोटे दिसणारे मुद्दे आतल्या खोलवर परिणाम करतात. ” एका प्रकरणात, सखोल विश्लेषणानंतर त्यांनी एका दीर्घकालीन जोडप्याला कमी कंपॅटिबिलिटीमुळे लग्न न करण्याचा सल्ला दिला. “पण त्यांनी पुढे लग्न केलं,” त्या सांगतात. “आजही ते त्याच समस्यांवर काम करण्यासाठी स्वतंत्र काऊंन्सेलिंग सत्रांना येतात.”
जोडपी अनेकदा अपुरी तयारी करूनच का लग्न करतात?
प्री-मॅरिटल तयारीची गरज जगभर वाढत आहे. पाश्चिमात्य देशांमधील Renovation Marriage चे समुपदेशक टॉड स्टीव्हन्स सांगतात की, जोडप्यांमध्ये एक मोठा गैरसमज वारंवार दिसतो, “डेटिंग छान चाललं म्हणजे आपण लग्नासाठी तयार आहोत, असं अनेकांना वाटतं. हे म्हणजे ‘मी स्विमिंग पूलमध्ये पोहू शकतो, म्हणजे समुद्रातही सहज पोहू शकेन.’ असं वाटण्यासारखं आहे.” स्टीव्हन्स याला डेटिंग सक्सेस सिंड्रोम म्हणतात. त्यांच्या मते अनेक जोडपी असा समज करून घेतात की, एंगेजमेंटपर्यंत पोहोचलो म्हणजे आपण नात्यात उत्तम आहोत, आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आमचा संवादही चांगला आहे, असं त्यांना वाटत असतं. ते कधीही मोठ्या भांडणाला सामोरे गेले नसतात, त्यामुळे लग्नातही सगळं सुरळीतच राहील अशी त्यांची अपेक्षा असते.
परंतु स्टीव्हन्स स्पष्ट करतात की, डेटिंगमध्ये आवश्यक कौशल्ये आणि लग्नानंतर लागणारी कौशल्ये पूर्णपणे भिन्न असतात. डेटिंगमध्ये आपण स्वतःची सर्वोत्तम बाजू दाखवतो, तर लग्न म्हणजे थकवा, भांडणं, भावनिक जखमा यांच्यासह एकमेकांबरोबर राहण्याचा प्रवास आहे. त्यासाठी भावनिक सहनशक्ती, समजूतदारपणा आणि नातं सांभाळण्यासाठी आवश्यक काही कौशल्ये गरजेची असतात आणि ही कौशल्ये बहुतेक जोडप्यांना कधी शिकवलीच गेलेली नसतात. स्टीव्हन्स यांचा आणखी एक मुद्दा महत्त्वाचा आहे. बहुतेक जोडपी लग्नाच्या तयारीत फुले, ठिकाण, कपडे, मेन्यू यावर अनेक महिन्यांचा वेळ घालवतात, पण लग्नानंतरच्या वास्तवासाठी संवाद कसा साधायचा, भांडण कसे सोडवायचे, भावनिक जखमा कशा भरून काढायच्या, विश्वास कसा निर्माण करायचा यांसाठी जवळजवळ काहीच तयारी करत नाहीत.
म्हणूनच, काऊंन्सेलिंगही ‘समस्या असल्यावरच करावयाची गोष्ट’ ही धारणाच बदलायला हवी. अनेक जोडपी आज नात्यात प्रवेश करण्यापूर्वी स्वतःला आणि एकमेकांना समजून घेण्याची निवड करत आहेत. लग्न म्हणजे काही औपचारिक करार नव्हे तर जाणतेपणाने सहानुभूतीपूर्ण दोघांनी एकत्र जगावयाचे नाते आहे,हे मुळातून समजून घ्यायला हवे. त्यासाठी कौन्सिलिंग हा सर्वात महत्त्वाचा आधार आहे.
