हैदराबादचे रहिवासी अरुण कुमार तिवारी यांनी गेल्या आठवड्यात माऊंट एव्हरेस्ट सर करू आपले अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण केले. मात्र, शिखरावरून खाली उतरत असताना अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांचा मृत्यू झाला. पर्वतांप्रती असलेले प्रेम लक्षात घेता कुटुंबियांनी त्यांचा मृतदेह तिथेच ठेवण्याचा निर्णय घेतला. तिवारी यांच्याबरोबर असलेले ४७ वर्षीय गिर्यारोहक संदीप आरे यांचेही त्याच दिवशी निधन झाले. मात्र, आरे यांचा मृत्यू तुलनेने कमी उंचीवर झाल्यामुळे त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले. तिवारी यांच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबाने विचारपूर्वक निर्णय घेतला असला तरी प्रत्यक्षात मात्र एव्हरेस्टवरून मृतदेह खाली आणणे अत्यंत कठीण आणि प्रचंड खर्चिक काम मानले जाते.
एव्हरेस्टवर कित्येक गिर्यारोहकांचे मृतदेह
माऊंट एव्हरेस्ट या उंच शिखरावर गेल्या कित्येक वर्षांपासून अनेक गिर्यारोहकांचे मृतदेह तसेच पडून आहेत. दरवर्षी एव्हरेस्टचे शिखर सर करण्यासाठी आलेल्या गिर्यारोहकांसाठी हे मृतदेह एकप्रकारे मार्गदर्शक म्हणून काम करतात. त्यापैकी सर्वाधिक चर्चेत असलेला मृतदेह ‘ग्रीन बूट्स’ या नावाने ओळखला जातो. लडाखचे गिर्यारोहक चेवांग पाल्जोर यांचा हा मृतदेह असल्याचे सांगितले जाते. गेल्या ३० वर्षांपासून त्याचे पार्थिव एव्हरेस्टच्या मार्गावरच पडून असून पायात असलेल्या हिरव्या रंगाच्या बुटामुळे त्यांची ओळख पटते. दुसरा एक मृतदेह ‘स्लीपिंग ब्युटी’ म्हणून ओळखला जातो, जो १९९८ मध्ये मृत्यू झालेल्या अमेरिकन गिर्यारोहक फ्रान्सिस अर्सेंटिएव्ह यांचा आहे. गेल्या काही वर्षांत नेपाळ सरकारने हिमालयात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहिमा राबवल्या. माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी वाढती गर्दी आणि पर्वतांवर वाढणारा कचरा यामुळे ही मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेदरम्यान काही मानवी अवशेष खाली आणण्यात यश आले असले, तरी अजूनही १०० हून अधिक जण बेपत्ता असल्याचे मानले जाते.
एव्हरेस्टवरून मृतदेह आणणे का असते कठीण?
अरुण कुमार तिवारी हे हैदराबादस्थित ‘बूट्स अँड क्रॅम्पन्स’ आणि नेपाळच्या ‘पायोनियर ॲडव्हेंचर’ या कंपन्यांमार्फत आयोजित करण्यात आलेल्या मोहिमेचा भाग होते. त्यांच्या निधनानंतर पायोनियर ॲडव्हेंचरचे कार्यकारी संचालक निवेष कार्की यांनी दी इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधला. “तिवारी यांचा मृत्यू जवळपास एव्हरेस्टच्या सुमारे ८,७९० मीटर उंचीवर झाला. या शिखराची उंची ८,८४८ मीटर असल्यामुळे एवढ्या उंचीवरून मृतदेह खाली आणणे जवळपास अशक्य असते. त्यामध्ये तांत्रिक आणि आर्थिक अडचणी आहेतच, पण बचाव पथकाच्याही जीवाला मोठा धोका असतो,” असे ते म्हणाले. साधारणत: ८,००० मीटरपलीकडचा भाग हा ‘डेथ झोन’ म्हणून ओळखला जातो. या भागात समुद्रसपाटीवरील ऑक्सिजनच्या केवळ एकतृतीयांश प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध असतो. त्यामुळे गिर्यारोहकांना चक्कर येणे, मेंदूला सूज येणे किंवा फुफ्फुसांमध्ये द्रव साचणे यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. यातील शेवटचे दोन आजार जीवघेणे ठरू शकतात. त्यामुळे या भागात बचावकार्य करणाऱ्या व्यक्तींच्या जीवालाही मोठा धोका असतो. याशिवाय तेथील खडकाळ आणि घसरणारा रस्ता अत्यंत आव्हानात्मक असतो. त्यातच एव्हरेस्टवरील तापमान खूपच कमी असल्यामुळे कडाक्याच्या थंडीत मृतदेह अतिशय वेगाने गोठतो. त्यामुळे तो बर्फातून बाहेर काढणे अत्यंत अवघड बनते. त्यानंतर कमी ऑक्सिजनमध्ये अरुंद आणि धोकादायक मार्गातून मृतदेह खाली आणावा लागतो. मृत्यूनंतर शरीर अधिक जड होते आणि अनेकदा शरीर अनैसर्गिक अवस्थेत गोठलेले असते.
मृतदेह खाली आणण्यात कोणत्या अडचणी येतात?
निवेष कार्की यांनी सांगितले की, माऊंट एव्हरेस्टवर एखाद्या गिर्यारोहकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह खाली आणण्यासाठी ८ ते १० प्रशिक्षित बचावकर्त्यांची आवश्यकता असते. कारण- मृतदेह दोऱ्यांच्या साहाय्याने एका शीटवर ठेवून खाली ओढावा लागतो. अशा परिस्थितीत पारंपारिक स्ट्रेचर वापरता येत नाहीत. एव्हरेस्टवरील रस्ते इतके अरुंद असतात की, एका व्यक्तीलाही व्यवस्थित उभे राहणे कठीण जाते. अशा मोहिमेसाठी जवळपास एक कोटी रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. मात्र, तिवारी यांचा मृत्यू ज्या उंचीवर झाला, तिथून आजपर्यंत कोणाचाही मृतदेह खाली आणता आलेला नाही. माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या गिर्यारोहकांसाठी आपत्कालीन बचावकार्याचा खर्च भागवण्यासाठी विमा घेणे बंधनकारक असते. मात्र, कोणतीही विमा कंपनी प्रत्यक्ष मानवी बचाव मोहिमेचा खर्च देत नाही. त्या केवळ वाहतुकीचा खर्च उचलतात. तसेच ‘डेथ झोन’मध्ये हेलिकॉप्टर चालवणेही अत्यंत कठीण असते, कारण त्या उंचीवर हवा खूप विरळ असते.
एव्हरेस्टवरील ‘दुपारी २ वाजेचा नियम’ काय आहे?
एव्हरेस्टवरील वाढते धोके आणि अत्यंत कठीण बचावकार्य लक्षात घेता नेपाळ सरकारने अनेक नियम लागू केले आहेत. त्यातील एक नियम हा दुपारी दोन वाजेचा असल्याचे सांगितले समोर आले आहे. नेपाळ गेटवे ट्रेकिंग प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राम अधिकारी यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, एव्हरेस्ट चढताना जितके लोक मृत्युमुखी पडतात, त्यापेक्षा अधिक लोक शिखरावरून खाली उतरताना मृत्युमुखी पडतात. कारण, अनेक गिर्यारोहकांची प्रकृती खालावत असतानाही ते शिखर गाठण्याचा प्रयत्न करत राहतात. ‘दुपारी २ वाजेचा नियम’ म्हणजे तुम्ही शिखराच्या कितीही जवळ असलात तरी दुपारी २ वाजता खाली उतरण्यास सुरुवात करणे बंधनकारक असते. शिखरावरून दुपारनंतर उतरण्यास सुरुवात करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. कारण- तेथील उंच भागातील हवामान क्षणार्धात बदलू शकते. अचानक हिमवादळ निर्माण होणे किंवा वेगाने अंधार पडणे यामुळे आधीच धोकादायक असलेला परतीचा प्रवास आणखीनच जीवघेणा ठरू शकतो, असेही राम अधिकारी यांनी नमूद केले.
