Dettol China Controversial Ad : ब्रिटिश हायजिन ब्रँड असलेल्या डेटॉलवर चीनमध्ये मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. डेटॉलने एक जाहिरात प्रकाशित केली होती. ती जाहिरात वादग्रस्त ठरली. त्यानंतर चीनमधील नेटिझन्सने सोशल मीडियावर डेटॉलवर प्रचंड टिका केली. महिलांना उपभोगाची वस्तू म्हणून दाखवले तसेच लिंगभेदाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप डेटॉलवर केला जात आहे. या जाहिरातीबद्दल डेटॉलने माफी देखील मागितली आहे. तसेच जाहिरात का केली याचा अर्थ सांगितला आहे. टीका झाल्यानंतर ही जाहिरात काढून घेण्यात आली. चीनमध्ये डेटॉलला बॉयकॉट करण्याची मागणी होत आहे. एका जाहिरातीमुळे निर्माण झालेला हा वाद नेमका काय? जाहिरातीत महिलांबाबत आक्षेपार्ह असे काय होते? याबाबत जाणून घेऊयात.

वादग्रस्त जाहिरातीत नेमकं काय?

जाहिरातीची सुरूवात एका तरूणापासून होते. तो तरूण एका तरूणीला डेट करत असतो. ती तरूणी तिच्या घरातल्या कडक नियमांमुळे उशिरापर्यंत बाहेर थांबण्यास घाबरत असते. हे दृश्य सुरूवातीला दाखवण्यात आले आहे. त्यानंतर भूतकाळातील एक दृश्य दाखवण्यात आले. त्यात हाच तरूण एका मोकळ्या विचारांच्या व आधुनिक तरूणीबरोबर नात्यात असतो. त्या तरूणीचे भूतकाळात काही संबंध होते हे जेव्हा त्याला कळते तेव्हा तो तिच्याशी नाते तोडतो. तिच्यावर द्वेषपूर्ण टिप्पणी करतो. “तुला आधीच दुसऱ्या कोणीतरी व्यक्तिने तयार (ट्रेन) केले आहे”, असे तो तिला म्हणतो. तसेच ती “अस्वच्छ” व “दूषित” असल्याची टीका तिच्यावर करतो.

त्यानंतर जाहिरातीचा शेवटचा टप्पा दाखवण्यात आला आहे. त्यात तो तरूण सुरूवातीला ज्या तरूणीला डेट करत असतो, तिच्यासोबत त्याला दाखवण्यात आले आहे. तो तिच्यासोबत नात्यात येतो. परंतु, जुन्या मैत्रिणीचा अपमान करणे सुरूच ठेवतो. त्याची सध्याची मैत्रीण “स्वच्छ” असून तिला इतर कोणत्याही पुरूषाने स्पर्श केलेला नाही, असे म्हणून त्या तरूणीचे सतत कौतुक करतो. त्याच्या या वर्तणुकीला ती तरूणी कंटाळते. ती तरूणी आपले कपडे स्वच्छ ठेवण्यासाठी ‘डेटॉल’चा वापर करते. ती त्या तरूणाला म्हणजेच तिच्या बॉयफ्रेंडला तिचे अंतर्वस्त्र असलेल्या कपड्यांमध्ये त्याचे अस्वच्छ पायमोजे न टाकण्याची विनंती करते, तरीही तो ते त्यात टाकतोच. हा तिचा सहनशीलतेचा शेवटचा क्षण ठरतो आणि ती त्याच्याबरोबरचे नाते संपवून टाकते.

जाहिरातीत त्या तरूणाची तुलना “बॅक्टेरिया”शी करण्यात आली आहे. बॅक्टेरियासारख्या टॉक्सिक असलेल्या पुरूषांवर डेटॉल उत्तम उपाय आहे, असे जाहिरातीत दाखवण्यात आले आहे. जाहिरातीत महिलेच्या भूतकाळातील संबंधांबाबत तिला दूषित किंवा अस्वच्छ दाखवण्यात आले, तर पुरूषाच्या भूतकाळातील संबंधांसाठी त्याला काहीही दोष देण्यात आला नाही, असे दाखवण्यात आल्याचा आरोप चीनमधील नेटिझन्सने केला आहे.

डेटॉलची प्रतिक्रिया काय ?

जाहिरात वादग्रस्त ठरल्यानंतर डेटॉलने ती काढून टाकली आहे. सोमवारी जारी केलेल्या निवेदनात डेटॉलने म्हटले आहे की, लिंगभेदभाव करणाऱ्यांच्या मानसिकतेवर टीका करण्याच्या उद्देशाने जाहिरात तयार करण्यात आली होती. परंतु, जाहिरातीचे काही भाग मोडून तोडून व्हायरल केले जात असल्याने जाहिरातीचा मूळ संदेश हरवला आहे.

“आम्हाला याची जाणीव आहे की यामुळे अनेक लोकांच्या, विशेषतः महिलांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या जाहिरातीची निर्मिती आणि परीक्षण करताना झालेल्या कोणत्याही स्वरूपाच्या निष्काळजीपणाची आम्ही जबाबदारी स्वीकारतो”, असे डेटॉलने म्हटले आहे. जाहिरात परीक्षण प्रक्रियेत सुधारणा केल्या जातील, असेही डेटॉलकडून सांगण्यात आले आहे.

कुटुंबांच्या आरोग्याचे रक्षण करणे हे डेटॉलचे मिशन आहे, असेही डेटॉलने म्हटले आहे. तसेच प्रत्येक व्यक्तिचा सन्मान केल्याने व तिला समान वागणूक दिल्याने तिचे खऱ्या अर्थाने रक्षण होते, असेही डेटॉलने नमूद केले आहे.

“स्वच्छतेचा ब्रँड असूनही झाला गोंधळ”

बीबीसीच्या वृत्तानुसार, ‘आय ऑन डिजिटल चायना’ हे न्यूजलेटर चालवणाऱ्या मान्या कोएत्से यांनी म्हटले आहे की, “ज्या ब्रँडचा संपूर्ण व्यवसाय स्वच्छतेभोवती फिरतो, अशा ब्रँडकडून झालेला हा एक मोठा गोंधळ आहे.” त्या म्हणाल्या, “जाहिरातीतील पुरुष पात्राला चुकीचे दाखवण्याचा उद्देश असला, तरीही हा संदेश वाईट पद्धतीने मांडला गेला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम पूर्णपणे उलट झाला आहे.”

याआधी डेटॉलच्या कोणत्या जाहिरातीवरून झाला होता वाद?

चीनमध्ये डेटॉल वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. ‘रेकिट’ या ब्रिटिश ग्राहकोपयोगी वस्तू कंपनीच्या मालकीच्या या ब्रँडवर गेल्या वर्षीही एका जाहिरातीवरून तीव्र टीका झाली होती. त्या जाहिरातीमध्ये एक वाक्य होते: “लग्नाच्या अगदी आधी त्या महिलेला ‘परत’ पाठवण्यात आले; याचे कारण ती स्वच्छ नसावी हेच असणार.” या वाक्यामुळे त्याहीवेळी जाहिरातीवर चिनी नागरिकांनी टीकेची झोड उठवली होती. आता चीनमध्ये डेटॉल ब्रँड दुसऱ्यांदा वादात अडकला असून त्याला बॉयकॉट करण्याची मागणी सोशल मीडियावर केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणी डेटॉलने माफी मागितली आहे. तसेच जाहिरातीतून लिंगानुसार भेदभाव करणाऱ्यांच्या मानसिकतेवर टीका करण्याचा उद्देश होता,असे डेटॉलने म्हटले आहे.