Dharmendra Deol Political Career : बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ८९ व्या वर्षी मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीसह राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त होत आहे. धर्मेंद्र यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली होती. २००४ मध्ये त्यांनी राजकारणातही प्रवेश केला होता. भाजपाच्या तिकिटावर निवडणुकीत विजय मिळवल्यानंतरही त्यांनी अचानक राजकारणातून माघार घेतली होती. नेमके काय होते त्यामागचे कारण? त्याविषयीचा हा आढावा…

धर्मेंद्र यांनी राजकारणात का केला होता प्रवेश?

आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या धर्मेंद्र यांनी २००४ मध्ये पहिल्यांदा राजकारणात प्रवेश केला होता. त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या इंडिया शायनिंग या मोहिमेने प्रभावित होऊन आपण राजकारणात आल्याचे त्यांनी सांगितले होते. भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि अरुण जेटली यांच्या भेटीनंतर त्यांनी हा निर्णय घेतला होता. अभिनेते तथा राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांनीच धर्मेंद्र यांना राजकारणात येण्याचा सल्ला दिल्याचे त्यांचे सहकारी सांगतात. भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर धर्मेंद्र यांना २००४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीचे तिकीट देण्यात आले.

काँग्रेसच्या उमेदवाराचा केला होता पराभव

सुरुवातीला भाजपाने धर्मेंद्र यांना राजस्थानमधील चुरू मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार बलराम जाखड यांच्याविरोधात उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास नकार दिला होता. अखेरीस तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने त्यांना बिकानेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला असला तरी धर्मेंद्र विजयी झाले. त्यांची प्रचंड लोकप्रियता आणि मनमोकळेपणाचा स्वभाव मतदारांच्या पसंतीस उतरला. या निवडणुकीत धर्मेंद्र यांनी काँग्रेसचे उमेदवार रामेश्वर लाल डुडी यांचा तब्बल ६० हजार मतांनी पराभव केला. या विजयानंतर त्यांनी पहिल्यांदाच लोकसभेत प्रवेश केला होता.

आणखी वाचा : Maharashtra Politics : भाजपाची कोंडी करण्याचे शिंदेंचे प्रयत्न? भरसभेत घेतली शपथ, नेमके काय म्हणाले?

धर्मेंद्र राजकारणात का रुळले नाहीत?

सुरुवात दमदार असूनही धर्मेंद्र यांना लवकरच जाणवले की, राजकारण हे त्यांच्यासाठी योग्य क्षेत्र नाही. निवडणुकीच्या प्रचारावेळी धर्मेंद्र यांना काँग्रेसच्या काही नेत्यांनी सातत्याने लक्ष्य केले. त्यामागचे कारण त्यांनी प्रचारादरम्यान केलेले विधान होते. “लोकशाहीसाठी आवश्यक असलेले मूलभूत शिष्टाचार शिकविण्यासाठी माझी कायमस्वरूपी हुकूमशहा म्हणून निवड करा”, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते. काँग्रेसच्या नेत्यांनी याच मुद्द्याला हाताशी धरून भाजपासह धर्मेंद्र यांच्यावर टीकेचा भडिमार केला होता. त्यानंतर संसदेत वारंवार अनुपस्थित राहत असल्याने धर्मेंद्र यांना चहुबाजूंनी टीकेला सामोरे जावे लागले. त्यावेळी देशात पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार होते.

धर्मेंद्र यांनी टीकेला कसे उत्तर दिले होते?

चित्रपट आणि राजकारण यापैकी निवड करताना धर्मेंद्र यांनी अनेकदा चित्रपटांना प्राधान्य दिले. वृत्तानुसार, त्यांनी आपला बहुतेक वेळ चित्रपटांच्या सेट आणि फार्महाऊसवर घालवला. सत्ताधारी खासदारांनी याच गोष्टीचा फायदा घेत, त्यांच्या सभागृहातील गैरहजेरीबाबत वारंवार प्रश्न विचारले. अहवालांनुसार, बिकानेर मतदारसंघातील काही लोकांनाही त्यांची भाजपाकडे तक्रार केली होती. तरीही त्यांच्या अनेक समर्थकांनी सांगितले की, ‘धरम पाजी’ (धर्मेंद्र यांचे टोपणनाव) नेहमीच वेळ काढून जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचे. मी मतदारसंघात उपस्थित नसलो तरीही माझे कार्यकर्ते जनतेचे प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करतात. त्यासाठी मी कार्यालयही उघडले आहे, असे उत्तर धर्मेंद्र यांनी सत्ताधाऱ्यांच्या टीकेला दिले होते.

राजकारण सोडल्यानंतर धर्मेंद्र काय म्हणाले होते?

खासदारकीचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर २००९ मध्ये धर्मेंद्र यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला. ”राजकारण नव्हे, तर माझे क्षेत्र अभिनयाचे आहे. राजकीय पटलावरची गणिते हाताळण्यात मी नक्कीच कमी पडलो. मतदारसंघातील अनेक कामे मी करीत होतो; पण श्रेय मात्र दुसऱ्यालाच जात होते,” अशी खंत त्यांनी एका कार्यक्रमात बोलून दाखवली होती. २०१० मध्ये लुधियाना येथील एका कार्यक्रमात त्यांनी राजकारण सोडण्यामागचे कारण सांगितले होते. “भावनेच्या भरात मी राजकारणात प्रवेश केला होता, पण नंतर मला गुदमरल्यासारखे वाटत होते. राजकीय पक्षात प्रवेश केल्याच्या दिवशीच मी वॉशरूममध्ये जाऊन आरशावर डोके आपटले होते. कारण- राजकारणात येण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती,” असे धर्मेंद्र म्हणाले होते. त्यांचे दोन्ही मुले- सनी देओल आणि बॉबी देओलनेही आमच्या वडिलांना राजकारणात रस नसल्याचे अनेकदा स्पष्ट केले होते.

हेही वाचा : Top Political News : ठाकरे गटासाठी मनसेची माघार, भाजपाचा शिंदेसेनेला पुन्हा धक्का; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान, वाचा ५ घडामोडी…

धर्मेंद्र यांच्या कुटुंबाचा राजकारणात प्रवेश

धर्मेंद्र यांनी राजकारणातून माघार घेतल्यानंतर त्यांच्या कुटुंबाने मात्र सक्रियपणे राजकारणात प्रवेश सुरू केला. त्यांच्या पत्नी अभिनेत्री हेमा मालिनी यांनी २०११ ते २०१२ दरम्यान राज्यसभेच्या सदस्य होत्या. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी मथुरा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. तेव्हापासून त्या या मतदासंघाचे प्रतिनिधfत्व करीत आहेत. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी हेमा मालिनी यांनी जाटबहुल मतदारसंघात स्वतःची पकड मजबूत करण्यासाठी धर्मेंद्र यांच्याकडे प्रचारासाठी मदत मागितली होती. धर्मेंद्र यांनी त्यांना साथ देत, एकाच दिवसात मथुरा मतदारसंघात तीन जाहीर सभांना संबोधित केले होते.

२०२० मध्ये दिला होता शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

धर्मेंद्र यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मुलगा सनी देओल यांच्यासाठीही प्रचार केला होता. सनी यांनी गुरदासपूरमधून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे सुनील जाखड यांना पराभूत केले होते. मात्र, धर्मेंद्र यांच्याप्रमाणे सनी यांनीही पुढील निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता. २०२० मध्ये धर्मेंद्र यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देऊन केंद्र सरकारने या प्रकरणात लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी विनंती केली होती. मला आशा आहे की, माझ्या शेतकरी बांधवांना न्याय मिळेल, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते. धर्मेंद्र यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.