Iran shut the Strait of Hormuz इराणने मंगळवारी (१७ फेब्रुवारी) होर्मुझच्या सामुद्रधुनीचे काही भाग तात्पुरते बंद केल्यामुळे जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी मार्ग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. इराणच्या शस्त्र सरावामुळे आणि जिनिव्हामध्ये सुरू झालेल्या अण्वस्त्र चर्चेमुळे इराणने हा निर्णय घेतला. इराणने स्पष्ट केले की सुरक्षिततेच्या कारणास्तव हा मार्ग काही वेळासाठी बंद होता. परंतु, या घटनेने प्रादेशिक तणावाच्या काळात जागतिक ऊर्जा मार्गाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. खाडीतील तेल आणि वायू बाहेर पडण्यासाठी हा मुख्य मार्ग आहे, त्यामुळे या सामुद्रधुनीतील कोणत्याही निर्बंधाचा जागतिक बाजारपेठेवर विशेषतः आशियावर मोठा परिणाम होतो.
इराणने यापूर्वीही जहाजांना अडवण्यात आल्याच्या घटना नोंदवल्या आहेत. परंतु, १९८० च्या दशकापासून त्यांनी अशा प्रकारे मार्ग बंद केला नव्हता. ही हालचाल अमेरिकेची वाढती लष्करी तैनाती, अमेरिकेकडून शक्तीच्या वापराच्या धमक्या आणि आंदोलकांवरील हिंसक कारवाईनंतर इराणमध्ये निर्माण झालेली अशांतता, या पार्श्वभूमीवर झाली आहे. हा मार्ग भारतासह जगासाठी किती महत्त्वाचा आहे? या निर्बंधांचा जागतिक बाजारपेठेवर कसा परिणाम होतो? मार्ग बंद होण्याच्या भीतीनं जगाची चिंता का वाढली? जाणून घेऊयात….
होर्मुझ सामुद्रधुनी महत्त्वाची का?
होर्मुझची सामुद्रधुनी हा एक अरुंद जलमार्ग आहे. हा मार्ग पर्शियन खाडी आणि ओमानच्या खाडीला जोडतो, त्यामुळे हिंदी महासागर आणि जागतिक व्यापारी मार्गांपर्यंत पोहोचणे शक्य होते. या जलमार्गाची रुंदी सर्वात अरुंद ठिकाणी सुमारे ३३ किलोमीटर आहे. या सामुद्रधुनीतील प्रादेशिक पाण्यावर इराण आणि ओमानचे नियंत्रण आहे. तसेच आंतरराष्ट्रीय सागरी कायदा सर्व देशांच्या जहाजांना येथून प्रवास करण्याची परवानगी देणाऱ्या ‘शिपिंग कॉरिडॉर’ला मान्यता देतो.
संयुक्त अरब अमिराती (यूएई) या मार्गाच्या अगदी जवळ आहे. शतकानुशतके हा मार्ग आशियाला या प्रदेशाशी जोडत आला आहे. ऐतिहासिक काळात चीनमधून आलेली मातीची भांडी, हस्तिदंत, रेशीम आणि कापड या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या सागरी मार्गांद्वारे वाहून नेले जात असे. आधुनिक काळात हा मार्ग जागतिक ऊर्जा व्यवस्थेसाठी अपरिहार्य ठरत आहे. सौदी अरेबिया, कुवेत, इराक, कतार, बहरीन, यूएई आणि इराणमधील कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू वाहून नेणारे टँकर्स आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचण्यासाठी याच सामुद्रधुनीवर अवलंबून असतात. यातील बहुतांश पुरवठा आशियाई अर्थव्यवस्थांकडे जातो.
‘केपलर’ या मार्केट इंटेलिजन्स फर्मच्या आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये होर्मुझच्या सामुद्रधुनीतून दररोज सुमारे १३ दशलक्ष बॅरल कच्चे तेल वाहून नेले गेले. हे प्रमाण जागतिक सागरी कच्च्या तेलाच्या वाहतुकीच्या सुमारे ३१ टक्के होते. यूएस एनर्जी इन्फॉर्मेशन ॲडमिनिस्ट्रेशनने म्हटले आहे की, “या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या बहुतांश मालासाठी या प्रदेशातून बाहेर पडण्याचा कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध नाही.” जर हा मार्ग विस्कळीत झाला, तर मालाची वाहतूक वळवण्यासाठी फार कमी पर्याय उपलब्ध आहेत, त्यामुळे हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद होणार असल्याची चर्चा जरी झाली तरी तेलाच्या किंमतींवर परिणाम होतो. जूनमध्ये इस्रायल-इराण संघर्षासह भूतकाळातील तणावाच्या घटनांमध्ये ऊर्जेच्या किमतीत मोठी वाढ झाली होती.
इराणच्या सरावादरम्यान काय घडले?
इराणी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सरावादरम्यान सुरक्षिततेच्या कारणास्तव हा मार्ग काही काळासाठी बंद करण्यात आला होता. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डशी जवळीक असलेल्या ‘तसनीम’ या निमशासकीय वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, या सरावाचा भाग म्हणून इराणी भूभागातून आणि किनारपट्टीवरून डागलेली क्षेपणास्त्रे सामुद्रधुनीतील लक्ष्यांवर आदळली. इराणी अधिकाऱ्यांनी या सरावाचे वर्णन होर्मुझच्या सामुद्रधुनीचे स्मार्ट नियंत्रण’ असे केले. या धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या मार्गावर आणि आसपासच्या भागात आपली क्षमता दाखवण्यावर इराणचा भर असल्याचे हे संकेत आहेत.
इराण आणि अमेरिका यांच्यातील सागरी चकमकींमुळे तणाव आधीच वाढला आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला, अमेरिकन नौदलाच्या फायटर जेटने अरबी समुद्रात यूएसएस अब्राहम लिंकन या विमानवाहू युद्धनौकेच्या जवळ येणारा इराणी ड्रोन नष्ट केला होता. दुसऱ्या एका घटनेत, अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांच्या मते, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या अमेरिकन ध्वज असलेल्या आणि अमेरिकन कर्मचारी असलेल्या व्यापारी जहाजाला इराणी सैन्याने अडवले. या घटना काही आठवड्यांपूर्वी सामुद्रधुनी नजीक झालेल्या इराणी नौदल सरावानंतर घडल्या आहेत.
अमेरिकन लष्कराच्या सेंट्रल कमांडने यापूर्वीच इराणला इशारा दिला आहे की अमेरिकन सैन्य, मित्र राष्ट्रांची जहाजे किंवा व्यापारी जहाजांना अडवल्यास अनपेक्षित संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी अमेरिकन युद्धनौकांच्या अगदी जवळ जाणे किंवा त्यांच्यावर शस्त्रे रोखणे यांसारख्या कृतींविरुद्ध इशारा दिला आहे. यूएसएस अब्राहम लिंकन आणि त्याबरोबरच्या युद्धनौका संभाव्य मोहिमांना पाठिंबा देण्यासाठी गेल्या काही आठवड्यांपासून अरबी समुद्रात तैनात आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यूएसएस जेराल्ड आर. फोर्ड ही युद्धनौका कॅरिबियनमधून पश्चिम आशियात तैनात करण्याची योजना जाहीर केली आहे, त्यामुळे या भागातील अमेरिकन लष्करी क्षमता वाढली आहे.
जागतिक बाजारपेठ आणि प्रादेशिक सुरक्षेसाठी धोके
इराणने इशारा दिला आहे की, बाह्य हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ते व्यापारी वाहतूक रोखू शकतात, त्यामुळे जागतिक तेलाच्या पुरवठ्याच्या मोठ्या वाट्यावर याचा परिणाम दिसून येईल. ताज्या घटनेत हा मार्ग थोड्या काळासाठी बंद होता, मात्र या निर्णयाने तणावाच्या काळात सागरी वाहतुकीत हस्तक्षेप करण्याची इराणची क्षमता अधोरेखित केली आहे. उत्पादकांसाठी पर्यायी निर्यात मार्गांची कमतरता पाहता, अल्पकालीन निर्बंध किंवा लष्करी सरावदेखील व्यापाऱ्यांच्या अस्वस्थतेचे कारण ठरत आहे. दीर्घकाळ व्यत्यय आल्यास त्याचा परिणाम केवळ तेलाच्या किमतींवरच नाही, तर जहाजांच्या विमा हप्त्यांवर, मालवाहतूक दरांवर आणि विशेषतः आशियातील ऊर्जा-आयात करणाऱ्या देशांवर होईल.
इराणच्या देशांतर्गत आंदोलनांना आणि त्यांच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने लष्करी बळाचा वापर करण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी सुरुवातीला आंदोलकांवरील कारवाईनंतर हल्ल्याचा इशारा दिला होता, परंतु नंतर त्यांनी अण्वस्त्र करारासाठी इराणवर दबाव आणण्यासाठी या धमकीचा वापर केला. इराणनेही आपल्या इशाऱ्यांनी उत्तर दिले असून, हल्ला झाल्यास पश्चिम आशियातील अमेरिकन हितसंबंधांना आणि इस्रायलला लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. इराणकडे शेजारील खाडी देशांना लक्ष्य करण्याची क्षमता असलेले कमी आणि मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा मोठा साठा आहे.
गेल्या वर्षी १२ दिवसांच्या संघर्षादरम्यान, इराणने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली होती, तर इस्रायलने इराणच्या लष्करी साठ्यांना लक्ष्य केले होते. त्या संघर्षावेळीही इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद केली नव्हती आणि त्यामुळेच अलीकडील तात्पुरता बंद अधिक महत्त्वाचा ठरला आहे. सध्या सुरू असलेल्या तणावादरम्यान इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी अमेरिकेवर टीका केली. इराणी सरकारी टेलिव्हिजननुसार ते म्हणाले, “जगातील सर्वात शक्तिशाली सैन्याला अशी चपराक बसू शकते की ते पुन्हा उभे राहू शकणार नाही. अर्थातच युद्धनौका हे एक धोकादायक यंत्र आहे, परंतु युद्धनौकेपेक्षाही धोकादायक ते शस्त्र आहे, जे युद्धनौकेला समुद्राच्या तळापर्यंत बुडवू शकते.”
