रशियाने ९ जानेवारी रोजी युक्रेनच्या ल्विव शहरावर ओर्शेनिक हे क्षेपणास्र सोडले. या क्षेपणास्त्राने प्रचंड नुकसान झाले नाही, तरी हल्ल्याचे ठिकाण आणि क्षेपणास्त्राचे स्वरूप सामरिक विश्लेषकांसाठी चिंताजनक बाब ठरली. ल्विव शहर पोलंडच्या सीमेपासून जवळ आहे. शिवाय ओर्शेनिक हे अति स्वनातीत (hypersonic) प्रकारातील क्षेपणास्त्र आहे. शिवाय अण्वस्त्रक्षम आहे, त्यामुळे पोलंडसारख्या ‘नाटो’ देशाच्या जवळ त्याचा वापर होणे हे युक्रेनसाठीच नव्हे, तर संपूर्ण नाटो देशांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. विशेषतः अलिकडे अमेरिका नाटो संघटनेविषयी फार ममत्व दाखवत नसताना, रशियाने ओरेश्निकच्या निमित्ताने बाहू थोपटले आहेत. 

ओरेश्निक क्षेपणास्त्र काय आहे?

ओरेश्निक हे अण्वस्त्रक्षम, हायपरसॉनिक मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र म्हणून ओळखले जाते. रशियन भाषेत ओरेश्निकचा अर्थ विशिष्ट प्रकारचे झाड. या झाड्याच्या फांद्यांप्रमाणे ओरेश्निक क्षेपणास्त्रातून अनेक स्फोटकांचा मारा होतो. हे मल्टिपल इंडिपेंडंटली टार्गेटेड रिएण्ट्री (MIRV) प्रकारातील क्षेपणास्त्र आहे. म्हणजे तळावरून सुटल्यानंतर पृथ्वीच्या वातावरणाबाहेर जाऊन पुन्हा एकदा पृथ्वीकडे झेपावताना अनेक छोटी क्षेपणास्त्रे सोडते, जी एकापेक्षा अधिक लक्ष्यांचा वेध  घेऊ शकतात. या क्षेपणास्त्राचा वेग ध्वनीपेक्षा पाचपट (Mach 5) असून तो अंदाजे ताशी १३ हजार किलोमीर असावा असे मानले जाते. या क्षेपणास्त्राचा पल्ला १००० ते १६०० किलोमीटरचा आहे. 

हे क्षेपणास्त्र अति धोकादायक कसे?

रशियाने यापूर्वी नोव्हेंबर २०२४मध्ये या क्षेपणास्त्राचा प्रथम वापर केला. पण ते ‘चाचणी उड्डाण’ असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. तो हल्ला डिनिप्रो या युक्रेनच्या शहरातील एका बंद शस्त्रास्त्रनिर्मिती कारखान्यावर करण्यात आला. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनला अमेरिका-निर्मित ATACMS क्षेपणास्त्रे वापरण्याची परवानगी दिली होती. त्या निर्णयाला प्रतिसाद आणि क्षेपणास्त्राची चाचणी असे त्या हल्ल्यामागील दुहेरी कारण होते. गतवर्षाच्या अखेरीस म्हणजे डिसेंबर महिन्यात काही ओरेश्निक क्षेपणास्त्रे रशियाने बेलारूसमध्ये हलवली. या देशातून युरोपातील अनेक देश ओरेश्निकच्या टप्प्यात येतात. हे हायपरसॉनिक आणि अण्वस्त्रक्षम क्षेपणास्त्र आहेच, शिवाय वारंवार मार्गबदल करण्याची त्याची क्षमता असल्यामुळे क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेला त्याचा वेध घेऊन ते नष्ट करणे अजिबात सोपे नाही. या क्षेपणास्त्राचा सामना करायचा असेल, तर ब्रिटन आणि फ्रान्स अशा मोठ्या युरोपिय देशांनाही अमेरिकेची मदत घ्यावी लागेल. शिवाय अतिस्वनातीत प्रकारातील ते असल्यामुळे अवघ्या काही मिनिटांत युक्रेन किंवा वेळ पडल्यास युरोपातील एखाद्या शहराचा ते वेध घेऊ शकते. ज्या ल्विव शहरावर रशियाने ते सोडले, ते शहर पोलंडच्या सीमेपासून अवघ्या काही तासांवर आहे. प्रत्यक्ष हल्ल्यात ४ जण ठार आणि २०हून अधिक नागरिक जखमी झाले. पण सामरिक विश्लेषकांच्या मते ओरेश्निक क्षेपणास्त्रामध्ये पूर्ण क्षमतेने स्फोटके भरली तर ती कितीतरी अधिक विध्वंस घडवू शकते. शिवाय यात अण्वस्त्रांचा समावेश केला तर युरोपात हाहाकार उडू शकतो. 

रशियाने आताच हे क्षेपणास्त्र का वापरले?

हा हल्ला युक्रेनने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या नोवोगोराड येथील निवासस्थानावर केलेल्या कथित हल्ल्याचा प्रतिसाद असल्याचे रशियाचे म्हणणे आहे. पण त्या हल्ल्याची वैधता सिद्ध झालेली नाही. पण विश्लेषकांच्या मते अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील ताज्या कारवाईनंतर अमेरिकेला इशारा देण्याचा हा रशियाचा प्रयत्न असू शकतो. व्हेनेझुएलाची तेलवाहू जहाजे रशियाचा ध्वज लावून विहार करतात, तरीही अमेरिकेने त्यांना लक्ष्य केले आहे. अलीकडेच उत्तर अटलांटिक सागरी भागात रशियाची पाणबुडी असूनही अमेरिकेच्या नौदलाने एका व्हेनेझुएलन जहाजावर हल्ला करून ते ताब्यात घेतले. भविष्यात अशा प्रकारचे हल्ले सहन केले जाणार नाही यासाठी अमेरिकेवर जरब बसवण्याच्या हेतूनेही ओरेश्निक क्षेपणास्त्राचा वापर रशियाने केला असावा. युक्रेन युद्धाची चर्चा अद्याप अनिर्णित आहे. पुढील फेब्रुवारी महिन्यात या युद्धाला चार वर्षे पूर्ण होतील. ते संपवण्यासाठी अमेरिकेने मांडलेला प्रस्ताव युक्रेनला मान्य नाही. तो मान्य करावा यासाठी दबावतंत्र म्हणूनही हे क्षेपणास्त्र वापरले असू शकते. युक्रेनकडे सध्या उपलब्ध असलेल्या क्षेपणास्त्र प्रणालीमध्ये ओरेश्निकला रोखण्याची क्षमता नाही. रशियाने या क्षेपणास्त्राचे उत्पादन वाढवले, त्याची प्रहारक्षमता वाढवली तर युक्रेनला फार काही करता येणार नाही असा विश्लेषकांचा होरा आहे.