संजय जाधव

अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक बुडाली आणि बँकिंग क्षेत्रातील एका नव्या संकटाची चाहूल लागली. बडय़ा तंत्रज्ञान कंपन्या आणि नवउद्यमी (स्टार्टअप) हे बँकेचे प्रामुख्याने ग्राहक होते. अमेरिकेतील नियामकांनी सिलिकॉन व्हॅली बँक (एसव्हीबी) फायनान्शियल ग्रुपवर कारवाई करून ती बंद केली. यामुळे जागतिक बँकिंग आणि भांडवली बाजारात भयकंप उडाला. अमेरिकेतील भांडवली बाजाराला यामुळे शुक्रवारी ( १०मार्च) ८० अब्ज डॉलरचा फटका बसला. अमेरिकेतील २००८ मधील आर्थिक संकटानंतर बुडणारी सिलिकॉन व्हॅली बँक ही सर्वात मोठी बँक ठरली आहे.

Pune model of co-working space From start-ups to large companies everyone is getting preference
को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती
economy of engineering sector marathi news
अर्थचक्राचे शिल्पकार – अभियांत्रिकी आणि भांडवली उद्योग क्षेत्र
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन  
Sensex jump over 500 point to hit
सेन्सेक्सची पाच शतकी दौड

संकटाची सुरुवात कोठून झाली?

बँकेने ताळेबंदातील तूट भरून काढण्यासाठी २ अब्ज डॉलरचा निधी उभारण्याची घोषणा केली होती. ही घोषणा होताच गुंतवणूकदार आणि बँकेच्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. गुंतवणूकदारांकडून मोठय़ा प्रमाणात बँकेच्या समभागांची विक्री सुरू झाली. यामुळे परिस्थिती आणखी बिघडली. अखेर बँकेला निधी उभारण्याची योजना रद्द करावी लागली. परंतु, वेळ निघून गेली होती. केवळ ४८ तासांत बँक कोसळली.
बँकेची वाताहत कशी झाली?
कॅलिफोर्नियातील नियामकांनी शुक्रवारी (ता. १०) बँक बंद केली. त्याच वेळी अमेरिकेतील ‘फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन’च्या (एफडीआयसी) नियंत्रणाखाली ही बँक गेली. त्यानंतर बँकेचे समभाग गडगडले. भयभीत झालेले ठेवीदार ठेवी काढण्यासाठी धावाधाव करू लागले. निधीउभारणीचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर बँकेकडे स्वत:च्या विक्रीचाही पर्याय होता. परंतु, हा पर्याय स्वीकारण्याआधीच बँकेकडील ठेवी संपल्या. हे एवढय़ा वेगाने घडले की काही तासांच्या कालावधीत बँकेने कर्मचाऱ्यांना पुढील सूचना मिळेपर्यंत घरून काम करण्यास सांगितले.

बँकेच्या हाताबाहेरची कारणे किती?
बँक केवळ दोन दिवसांच्या कालावधीत बुडाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले तरी त्याची सुरुवात आधीपासून झालेली होती. बँकेने सातत्याने जादा व्याजदर दिले होते. आगामी काळातील व्याजदरवाढीची भीती तिच्यासमोर होती. करोना संकटाच्या काळात जगभरातील मध्यवर्ती बँकांनी व्याजदर नीचांकी पातळीवर आणले होते. त्यानंतर वाढलेल्या महागाईचा सामना करण्यासाठी सर्वच मध्यवर्ती बँकांनी व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली. याचा परिणाम गुंतवणूकदारांवर झाला. व्याजदर वाढल्यामुळे गुंतवणूकदार त्यांच्याकडील पैशांवर जोखीम स्वीकारण्यास तयार नव्हते. गुंतवणूक महाग झाल्यामुळे तंत्रज्ञान कंपन्या आणि स्टार्टअपसमोर निधीचा प्रश्न निर्माण झाला. त्यांनी बँकेतील ठेवी काढून आपली गरज पूर्ण करण्यास सुरुवात केली. ग्राहकांच्या पैसे काढण्याच्या ओघामुळे बँकेतील ठेवी दिवसेंदिवस कमी होत गेल्या. हा दबाव वाढू लागल्यानंतर बँकेने मागील आठवडय़ात २१ अब्ज डॉलरची रोखे विक्री केली. यात बँकेला १.८ अब्ज डॉलरचा तोटा झाला. तो भरून काढण्यासाठी बँकेने २ अब्ज डॉलरचा निधी भांडवली बाजारातून उभारण्याचा निर्णय घेतला होता. बँकेला हे पाऊल महागात पडले आणि बँकेचा समभाग ६० टक्क्यांनी कोसळला.

बँक बुडण्याचा फटका कोणाला?
बँक बुडण्याचा सर्वाधिक फटका तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या आणि स्टार्टअपना बसला. कर्मचाऱ्यांना वेतन कसे करायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. निधी उपलब्ध होईपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतनासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. याच वेळी अनेक कंपन्यांना नवीन प्रकल्प गुंडाळावे लागणार आहेत. बँकेतील प्रत्येक खात्यातील प्रत्येकी अडीच लाख डॉलर रकमेला विमा संरक्षण आहे. त्यामुळे यापेक्षा अधिक रक्कम असणाऱ्या ग्राहकांचे धाबे दणाणले आहेत. मागील वर्षांच्या अखेरीस बँकेची एकूण मालमत्ता २०९ अब्ज डॉलर इतकी होती आणि बँकेकडे सुमारे १७५ अब्ज डॉलरच्या एकूण ठेवी होत्या. ठेवीदारांना विमा संरक्षित अडीच लाख डॉलरच्या ठेवी काढून घेता येतील. त्यापेक्षा जास्त निधी असलेल्या ठेवीदारांना असंरक्षित निधीसाठी प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. त्यामुळे मोठय़ा रकमा अडकलेल्या ठेवीदारांना लवकर त्यांचे पैसे परत मिळण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही.

२००८ च्या संकटाची पुनरावृत्ती?
सिलिकॉन व्हॅली बँक बुडाल्याने २००८ च्या आर्थिक संकटाची पुनरावृत्ती होण्याची चर्चा सुरू आहे. तज्ज्ञांनी मात्र, ही शक्यता फेटाळून लावली आहे. ही बँक मोठी असली तरी तिचा बँकिंग क्षेत्रातील प्रभाव मर्यादितच आहे. कारण तंत्रज्ञान कंपन्या आणि स्टार्टअप यांच्यापुरता मर्यादित ग्राहक वर्ग या बँकेचा आहे. इतर बँकांचा ग्राहक वर्ग विस्तारलेला असतो, त्यात अनेक उद्योग आणि वेगवेगळय़ा प्रकारचे ग्राहक असतात, तसे या बँकेबाबत नसल्याने संकट सौम्य असेल.