रशियाच्या डिझेल प्रकल्पावरील हल्ले युक्रेनने तातडीने थांबवावे, अशी विनंती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका पत्रकार परिषदेतून केली. या हल्ल्यांमुळे जागतिक बाजारात इंधनाची प्रचंड टंचाई निर्माण होत असून त्याचा मोठा फटका जगभरातील देशांना बसत असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. त्याचबरोबर रशिया आणि युक्रेन या दोघांनीही एकमेकांच्या पायाभूत सुविधांवर हल्ले न करण्याबाबत सहमी दर्शवल्याचे अमेरिकन अध्यक्षांनी सांगितले; पण या सामंजस्यामुळे जागतिक डिझेल बाजाराला लगेच दिलासा मिळू शकेल का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
सध्या इराण युद्धाच्या संकटामुळे मध्यपूर्वेतील तेल शुद्धीकरण कारखाने आणि इंधनाची वाहतूक पूर्णत: विस्कळीत झाली आहे. त्यातच होर्मुझ सामुद्रधुनी मार्ग अजूनही मोठ्या अनिश्चिततेच्या छायेत आहे. जगातील इतर भागांतील तेल शुद्धीकरण कारखाने पूर्ण क्षमतेने काम करीत असले तरी जागतिक पातळीवरील इंधनाचा राखीव साठा वेगाने घटत चालला आहे. या परिस्थितीवर जगातील सर्वात मोठी स्वतंत्र तेल व्यापारी संस्था असलेल्या विटोल ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी रसेल हार्डी यांनी चिंता व्यक्त केली आहे. ९ सप्टेंबर रोजी ब्लूमबर्गने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना इंधनसाठ्यात होणारी घट रोखण्यासाठीही आपल्याकडे पुरेशी रिफायनिंग क्षमता नाही. त्यामुळे जगभरात उपलब्ध असलेल्या अतिरिक्त साठ्यावर सातत्याने ताण येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
युक्रेनचा डिझेल संकटाशी काय संबंध?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक स्तरावर निर्माण होत असलेल्या डिझेल टंचाईचा संबंध थेट युक्रेन युद्धाशी जोडला आहे. युक्रेनने रशियाच्या डिझेल प्रकल्पांवरील ड्रोन हल्ले तातडीने थांबवायला हवेत, कारण त्याचा मोठा फटका संपूर्ण जगाला बसत आहे, असे ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. रशिया हा पारंपरिकरित्या जगातील डिझेल आणि इतर पेट्रोलियम उत्पादनांचा प्रमुख पुरवठादार राहिला आहे. मात्र, युक्रेनकडून होत असलेल्या हल्ल्यांमुळे या देशातील खनिज तेलाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या माहितीनुसार युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यांत रशियातील अव्वल सहा डिझेल शुद्धीकरण प्रकल्पांपैकी निम्म्या प्रकल्पांचे काम सप्टेंबरपासून पूर्णपणे ठप्प आहे. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून रशियाने इंधन निर्यातीवर निर्बंध लादल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात डिझेलची आणखीनच कमतरता भासत आहे. या टंचाईचा परिणाम खुद्द रशियावरही जाणवत असून तेथील डिझेलच्या किमतीतही अस्थिरता निर्माण झाली आहे. शुद्धीकरण क्षमता ढासळल्याने पेट्रोल पंपांवर विकल्या जाणाऱ्या तेलाच्या गुणवत्तेतही घट होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
जागतिक बाजारात डिझेलचा प्रचंड तुटवडा
ऊर्जा क्षेत्रातील माहिती देणाऱ्या केपलर या संस्थेच्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट महिन्यात रशियाची खनिज तेल निर्यात दररोज ५ लाख ९१ हजार बॅरलवर आली आहे. २०२५ मध्ये हीच सरासरी निर्यात दररोज सुमारे ८.६ लाख बॅरल होती. सध्या रशियाची डिझेल निर्यात दररोज सुमारे १ लाख ५० हजार बॅरलवर आली असून, ती पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत तब्बल ८१ टक्क्यांनी घसरली आहे. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी लादलेले निर्यात निर्बंध आणि युक्रेनचे ड्रोन हल्ले या दोन्ही कारणांमुळे ही घसरण झाल्याचे सांगितले जात आहे. रशिया आणि आखाती देशांचा एकत्रित विचार केल्यास जागतिक इंधन पुरवठ्यावरील संकट आणखीनच गडद असल्याचे दिसून येते. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये या दोन्ही प्रदेशांतून होणारी डिझेल निर्यात फेब्रुवारीच्या तुलनेत दररोज १६ लाख बॅरलने कमी झाली आहे. फेब्रुवारीमध्ये रशिया आणि आखाती देशांचा जागतिक डिझेल व्यापारातील वाटा जवळपास ४५ टक्के इतका होता. त्यामुळेच जागतिक स्तरावर डिझेलचा तुटवडा तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
डिझेल इतके महाग का होत आहे?
सप्टेंबरमध्ये डिझेलच्या दरांनी अनेक नवे विक्रम नोंदवत प्रति गॅलन ६ डॉलरचा टप्पा गाठला. गेल्या वर्षी याच काळात डिझेलचा सरासरी दर ३.६९ डॉलर प्रति गॅलन होता. म्हणजेच वर्षभरात डिझेलच्या दरात जवळपास ६९ टक्क्यांची वाढ झाली आहे. यावरून पेट्रोलच्या तुलनेत डिझेलचे दर अधिक वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. लवकरच याचा मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कारण, मालवाहतूक, अवजड उद्योग, शेती आणि बांधकाम क्षेत्रासाठी डिझेल हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंधनाची निर्मिती खनिज तेलापासून केली जाते. पेट्रोलची मागणी प्रामुख्याने खासगी वाहनांच्या वापराशी संबंधित असते, तर डिझेलची मागणी मालवाहतूक, बांधकाम, शेती आणि औद्योगिक क्षेत्रातील हालचालींशी अधिक जोडलेली असते. त्यामुळे डिझेलच्या पुरवठ्यात निर्माण होणारी टंचाई व्यवसायांसाठी विशेष महत्त्वाची ठरते. डिझेलच्या वाढत्या किमतींचा परिणाम इतर वस्तू आणि सेवांच्या किमतींवरही वेगाने होऊ शकतो.
डिझेलच्या रिफायनिंग क्षमतेत मोठी घट
भूराजकीय घडामोडींमुळे डिझेल दरवाढीच्या दबावात आणखीनच भर पडली आहे. इराणमधील संघर्षामुळे मध्यपूर्वेतील महत्त्वाच्या मार्गांमधून होणाऱ्या ऊर्जा पुरवठ्यावर धोका वाढला आहे. त्याचवेळी रशियातील रिफायनरीजमधील अडथळे आणि सरकारकडून करण्यात आलेल्या धोरणात्मक उपायांमुळे निर्यातीसाठी उपलब्ध होणाऱ्या शुद्धीकरण केलेल्या इंधनाचे प्रमाण कमी झाले आहे. इराणशी संबंधित जोखमींमुळे या वर्षात कच्च्या तेलाच्या किमती अनेकदा प्रति बॅरल १०० डॉलरच्या वर गेल्या आहेत. त्यामुळे एकूणच ऊर्जा बाजारावरील दबाव वाढला आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या सप्टेंबरमधील आढाव्यानुसार, ऑगस्टमध्ये जगभरातील रिफायनरीजमधून दररोज ८.१४ कोटी बॅरल कच्च्या तेलाचे शुद्धीकरण झाले. गेल्या वर्षी याच महिन्याच्या तुलनेत हे प्रमाण दररोज ४२ लाख बॅरलने कमी आहे. २०२६ मध्ये जागतिक रिफायनरीजचे सरासरी उत्पादन दररोज २६ लाख बॅरलने घटण्याचा अंदाज संस्थेने व्यक्त केला आहे. दुसरीकडे, ऑगस्टमध्ये जगभरातील उपलब्ध तेलसाठ्यात आणखी ९.५ कोटी बॅरलची घट झाली. फेब्रुवारीपासून आतापर्यंत तेलसाठ्यात तब्बल ५०.७ कोटी बॅरलची घट झाली आहे. म्हणजेच दररोज सरासरी सुमारे २८ लाख बॅरल तेलसाठ्यातून वापरले गेले आहे. याचा अर्थ रिफायनिंग यंत्रणा पुरेसे नवीन इंधन तयार करण्यासाठी संघर्ष करत असतानाच डिझेलच्या पुरवठ्यातील तूट भरून काढण्यासाठी जगाला आपल्या आधीपासून उपलब्ध असलेल्या तेलसाठ्याचा आधार घ्यावा लागत आहे.
या संकटात भारताची भूमिका का महत्त्वाची?
रशिया आणि मध्यपूर्वेकडून खंडित झालेल्या डिझेल पुरवठ्याची भरपाई करण्यासाठी झगडत असलेल्या जागतिक बाजारासाठी भारत एक अत्यंत महत्त्वाचा आधार ठरला आहे. एका आकडेवारीनुसार, ऑगस्ट महिन्यात बाब-अल-मंदेब जलमार्गावरून युरोपच्या दिशेने दररोज सुमारे २ लाख बॅरल्स डिझेल आणि गॅसऑइल पाठवण्यात आले आहे. या पुरवठ्यापैकी सुमारे ६० टक्के वाटा एकट्या भारतीय रिफायनरीजचा होता. रशियन निर्यातीवर निर्बंध असतानाच्या काळात युरोपच्या इंधन सुरक्षेत भारताने मोठी भूमिका बजावली आहे. मात्र, भारतासमोरील आव्हानेही मोठी आहेत. देशांतर्गत बाजाराची गरज भागवून आणि कच्च्या तेलाचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करूनच भारतीय रिफायनरीज आपली निर्यात चालू ठेवू शकतात. कच्च्या तेलाच्या पुरवठ्यातील व्यत्ययांमुळे तेलाचे दर भडकल्याने भारताने ऊर्जा सुरक्षेसाठी जैवइंधनाचा (बायोफ्युएल) वापर वाढवण्यावर भर दिला आहे. आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी देशांतर्गत पर्यायी इंधनांचा वापर हाच सर्वोत्तम मार्ग असल्याचे सरकारचे मत आहे. इराणच्या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावरील धोके पुन्हा एकदा समोर आले असून, भू-राजकीय तणावामुळे तेल बाजारावर कसा तत्काळ परिणाम होतो हे अधोरेखित झाले आहे. याशिवाय केंद्र सरकारने इथेनॉल मिश्रित इंधनाचा वापर सुरू केला आहे. परदेशातून आयात होणाऱ्या महागड्या इंधन आयातीला कात्री लावणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. मात्र, या बदलाबाबत वाहनचालक आणि स्वतंत्र विश्लेषकांनी काही चिंताही व्यक्त केल्या आहेत. पेट्रोलमध्ये इथेनॉलचे जास्त प्रमाण असल्यास वाहनांची कार्यक्षमता (मायलेज) आणि इंजिनच्या क्षमतेवर परिणाम होत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
डिझेलच्या पुरवठ्याबाबत पुढे काय?
ऑगस्टमध्ये जागतिक रिफायनिंग नफ्याने नवे विक्रम नोंदवले असले तरी संपूर्ण शुद्धीकरण यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. कारण, डिझेलचा राखीव साठा वेगाने कमी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भू-राजकीय तणाव काही प्रमाणात निवळला, तरीही डिझेलचे संकट लगेच शमण्याची चिन्हे नाहीत. आता प्रश्न केवळ जग किती कच्चे तेल काढू शकते हा राहिलेला नाही; तर नुकसान झालेल्या रिफायनरीज किती वेगाने पूर्ववत होतात, विस्कळीत वाहतूक मार्गांवरून किती इंधन सुरक्षित पोहोचू शकते आणि उर्वरित रिफायनरीज कोणत्याही बिघाडाशिवाय इतक्या उच्च क्षमतेने सातत्याने चालू शकतात का असा आहे. जोपर्यंत या अडथळ्यांमध्ये काही प्रमाणात शिथिलता येत नाही, तोपर्यंत ट्रक वाहतूक सुरू ठेवणारे, शेतीला चालना देणारे, कारखाने चालवणारे आणि संपूर्ण पुरवठा साखळी सुरळीत ठेवणारे डिझेल जागतिक ऊर्जा बाजारातील सर्वात संवेदनशील आणि चिंतेचे केंद्र बनून राहील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
