Why Honey Bee Attack? अलीकडच्या काळात मधमाश्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या घटनांमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. फेब्रुवारी महिन्यात उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे एका क्रिकेट सामन्यादरम्यान मधमाश्यांनी खेळाडूंवर हल्ला केला. या हल्ल्यात ६० वर्षीय पंचाचा मृत्यू झाला. त्याआधी डिसेंबरमध्ये गुजरातमधील सूरत जिल्ह्यातील महुवा तालुक्यात शेतात काम करत असताना एका आरोग्य कर्मचाऱ्याला १५० हून अधिक डंख बसल्याने त्याचा मृत्यू झाला होता.
महाराष्ट्रातही अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. ८ मार्च रोजी पुण्याजवळील सिंहगड किल्ल्यावर मधमाश्यांनी पर्यटकांवर हल्ला करून दीड वर्षांच्या बालकासह किमान २५ जणांना डंख केले. याच वर्षी शिवनेरी किल्ल्याजवळ झालेल्या अशाच एका हल्ल्यात किमान चार जण जखमी झाले, तर मागील वर्षभरात मढे घाट परिसरातही अनेक घटना घडल्या आहेत. अजिंठा लेणी परिसरातही गेल्या काही दिवसांपासून मधमाश्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या दीड महिन्यात तब्बल सहापेक्षा अधिक वेळा मधमाश्यांनी पर्यटकांवर हल्ला चढवला केला असून ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत.
ही परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, उत्तर प्रदेश सरकार मधमाश्यांच्या हल्ल्यांना ‘राज्य-घोषित आपत्ती’ (state-notified disaster) म्हणून वर्गीकृत करण्याचा विचार करत आहे. नेमके कोणत्या कारणांमुळे मधमाश्या माणसांवर हल्ला करतात आणि अशा प्रसंगी नेमकी कोणती योग्य कृती जीव तुमचा वाचवू शकते, याचे हे विश्लेषण.
या हल्ल्यामागे नेमकी कोणती प्रजाती आहे?/Species behind the attacks
या बहुतांश घटनांसाठी जबाबदार असलेली प्रजाती (Apis dorsata) म्हणजेच ‘जायंट रॉक बी’ (मोठ्या खडकांवर राहणारी मधमाशी). ही प्रजाती कड्यांच्या भिंतींवर, किल्ल्यांच्या तटबंदीवर आणि उंच झाडांवर मोठ्या आकाराचे पोळे बांधते.
“मधमाश्या सहसा उंच आणि सुरक्षित ठिकाणे निवडतात, जिथे वातावरण तुलनेने थंड आणि स्थिर असते. एका पोळ्यात सुमारे ६०,००० मधमाश्या राहू शकतात. ही प्रजाती अत्यंत संरक्षक स्वभावाची असते. धोका जाणवल्यास त्या आपल्या समूहातील मोठ्या संख्येने एकत्रितपणे सक्रिय होतात. चिडलेल्या मधमाश्या सुमारे ताशी ३५ किमी वेगाने लांब अंतरापर्यंत पाठलाग करू शकतात,” असे पुण्यातील मधमाशी संवर्धक देवेंद्र जानी यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले.

“हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की, मधमाश्या स्वतःहून हल्ला करत नाहीत. त्यामागे नेहमी बाह्य व्यत्यय किंवा संभाव्य धोका असतो. मधमाशीने डंख केल्यानंतर तिचा मृत्यू होतो. त्या सैनिकांप्रमाणे वागतात, पोळ्याचे संरक्षण करण्यासाठी स्वतःचे प्राण देतात,” असेही ते म्हणाले.
मधमाश्या हल्ला का करतात?/What triggers a bee attack?
ट्रेकिंगशी संबंधित स्थळांवर होणारे मधमाश्यांचे हल्ले बहुतेक वेळा मानवी वर्तनामुळेच होतात. “उन्हाळ्यात मधमाश्या अधिक आक्रमक होतात, कारण त्या वेळी मधाने भरलेल्या पोळ्याचे संरक्षण करण्याची गरज अधिक असते. पोळ्याजवळ दगड फेकणे, ड्रोन उडवणे, मोठा आवाज करणे आणि अरुंद वाटांवर गर्दी करणे ही सर्व हल्ल्याची प्रमुख कारणं असतात,” असे जानी यांनी सांगितले.
“पोळ्याजवळ शेकोटी पेटवणे, स्वयंपाक करणे किंवा धूर करणे यामुळेही मधमाश्या चिडतात. परफ्यूम, सुगंधी लोशन, केसांचे तेल किंवा अगरबत्ती यांसारख्या तीव्र वासांकडे त्या आकर्षित होतात आणि त्यामुळे त्यांचा आक्रमकपणा वाढतो,” असे त्यांनी पुढे सांगितले.
अलीकडे वाढलेला आणखी एक धोका म्हणजे पर्यटकांनी सेल्फी स्टिक वापरून पोळ्याजवळ जाऊन फोटो काढणे. मधमाश्या याला थेट धोका मानतो.
मधमाश्यांचे हल्ले किती धोकादायक असतात?
एक-दोन मधमाश्या चावल्या तर साधी वेदना होते आणि थोडी सूज येते, जी बहुतेक वेळा गंभीर नसते. परंतु, जर मोठ्या संख्येने मधमाश्यांनी हल्ला केला की धोका खूप वाढतो. एकाच वेळी खूप डंख बसल्यास, अॅलर्जी नसलेल्या व्यक्तीलाही गंभीर त्रास (टॉक्सिक शॉक) होऊ शकतो. लहान मुले, वृद्ध आणि आधीपासून आजार असलेले लोक यांच्यासाठी हा धोका जास्त असतो.

काही लोकांना मधमाश्यांच्या डंखाची अॅलर्जी असते. अशा वेळी कमी डंख झाले तरी शरीरात तीव्र प्रतिक्रिया (अॅनाफायलॅक्सिस) होऊ शकते. घसा सूजणे, श्वास घेण्यास त्रास होणे, चक्कर येणे अशी लक्षणे दिसतात, ही लक्षणे जीवघेणी ठरू शकतात. विशेषतः डोंगर-किल्ल्यांसारख्या दुर्गम ठिकाणी मदत पोहोचायला वेळ लागतो, त्यामुळे अशा प्रसंगी वेळेत उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते.
ट्रेकिंगदरम्यान घ्यायची काळजी
ट्रेकला जाण्यापूर्वी तीव्र सुगंध असलेले परफ्यूम, लोशन्स आणि सनस्क्रीन वापरणे टाळा. “जर कड्याजवळ, भिंतीजवळ किंवा झाडाजवळ सतत भुणभुण ऐकू येत असेल, तर अचानक हालचाल न करता सावकाश दूर व्हा. ओरडू नका, वस्तू फेकू नका, पोळ्याचे फोटो काढण्याचा प्रयत्न करू नका आणि खडकाळ किंवा जंगल भागात आग लावू नका,” असे सह्याद्री ट्रेकर्सचे सचिन पानसरे यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले.
मधमाश्यांनी हल्ला केल्यास काय करावे?
ताबडतोब एखाद्या बंदिस्त जागेकडे जसे की खोली, वाहन किंवा दाट झुडुपामध्ये धाव घ्या. “मधमाश्यांना मारण्याचा प्रयत्न करू नका, कारण त्यामुळे फेरोमोन्स (वासावर आधारित संकेत) बाहेर पडतात आणि आणखी मधमाश्या आकर्षित होतात. पळून जाणे शक्य नसेल तर चेहरा आणि महत्त्वाचे अवयव जाड कपड्यांनी झाका,” असे जानी यांनी सांगितले.
सुरक्षित ठिकाणी पोहोचल्यानंतर डंख नखाने किंवा कार्डच्या कडेला बाजूने खरवडून काढा. चिमटा काढू नका किंवा ओढू नका. सूज कमी करण्यासाठी बर्फ लावा.
खालील परिस्थितीत तात्काळ वैद्यकीय मदत घेणे अत्यंत आवश्यक आहे: जर रुग्ण लहान मूल किंवा वृद्ध असेल, त्याला अनेक ठिकाणी मधमाश्यांचे डंख बसलेले असतील किंवा अॅनाफायलॅक्सिसची लक्षणे दिसत असतील. अॅनाफायलॅक्सिसमध्ये घशात घट्टपणा जाणवणे, श्वास घेण्यास त्रास होणे, चक्कर येणे किंवा उलटी होणे अशी गंभीर लक्षणे दिसू शकतात, जी जीवघेणी ठरू शकतात. अशा वेळेस तातडीने जवळच्या डॉक्टरची मदत घ्या. अनावश्यक मानवी वर्तनामुळे होणारे मधमाशांचे हल्ले आपल्याच चांगल्या कृतीने टाळणे सहज शक्य आहे!
