इराण आणि इस्त्रायलमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. दोन्ही देश एकमेकांवर क्षेपणास्त्र, बॉम्बगोळ्यांच्या माध्यमातून मोठे हल्ले करत आहेत. या दोन देशांतील युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होताना दिसत आहे. इस्त्रायल आता थेट इराणच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करत आहे, त्यामुळे इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या चिंता आता वाढल्या आहेत. इराणमधील भारतीय नागरिकांमध्ये बहुतांश विद्यार्थी आहेत.
इराणमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारे भारतीय विद्यार्थी आता या परिस्थितीमुळे घाबरले आहेत. भारताने या युद्धग्रस्त भागातून त्यांना बाहेर काढण्याची व्यवस्था करावी अशी विनंती ते करत आहेत. भारतासमोर दुसऱ्यांदा ही परिस्थिती उद्भवली आहे. २०२२ मध्ये रशिया-युक्रेन युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना भारताने सुरक्षितपणे भारतात आणले होते. त्यामुळे हा प्रश्न निर्माण होतो की, विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी विदेशात का जातात? त्याविषयी जाणून घेऊयात.

इराणमध्ये किती भारतीय विद्यार्थी अडकलेत?
गेल्या शुक्रवारपासून इस्त्रायलने इराणवर हल्ले सुरू केल्याने इराणमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी तेथे गेलेले हजारो भारतीय विद्यार्थी या संघर्षात अडकले आहेत आणि हा संघर्ष वाढत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तेहरानमधील इस्लामिक आझाद युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेसमधील एमबीबीएसच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनी फातिमा खाखीने ‘इकॉनॉमिक टाईम्स’ला सांगितले की, आम्ही भीतीत जगत आहोत, आमची रात्रीची झोप उडाली आहे आणि चिंता वाढत आहे. आमच्या घरी कुटुंबही तितकेच चिंतेत आहेत. प्राप्त माहितीनुसार, भारतातील सुमारे १,५०० विद्यार्थी सध्या इराणमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहेत.
विद्यार्थी शाहिद बेहेश्ती युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेस, इस्लामिक आझाद युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेस, इराण युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेस, तेहरान युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेस, हमादान युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेस, गोलस्तान युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेस आणि केरमन युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेस यांसारख्या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत आहेत. तेहरान युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेसमधील एका भारतीय विद्यार्थ्याने ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, “मला नेमके काय चालले आहे हेदेखील माहीत नाही, पण आम्ही चार रात्रीपासून जागे आहोत. आज त्यांनी आमच्या विद्यापीठाजवळील एका ठिकाणी बॉम्ब हल्ला केला. ही परिस्थिती खरोखरच वाईट आहे.” शाहिद बेहेश्ती युनिव्हर्सिटीमध्ये शिकणाऱ्या दुसऱ्या एका विद्यार्थ्यानेही भीती व्यक्त केली. तो म्हणाला, “हे एखाद्या युद्धावर आधारित चित्रपटात जगण्यासारखे आहे. आम्ही घाबरलो आहोत, कारण आम्हाला माहिती मिळाली आहे की इराणची संरक्षण व्यवस्था कोलमडली आहे.”
केरमन युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेसमधील एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यानेही चिंता व्यक्त केली. तो म्हणाला, “मला माझ्या पालकांकडून रोज १० फोन येत आहेत. इंटरनेट इतके मंद आहे की, मी व्हॉट्सअॅप मेसेजही पाठवू शकत नाही. आम्ही इथे डॉक्टर होण्यासाठी आलो आहोत. मात्र, आता आम्ही केवळ जिवंत राहण्याचा प्रयत्न करत आहोत.” या परिस्थितीमुळे हे विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीय केंद्राला विनंती करत आहेत की, त्यांना इराणमधून बाहेर काढण्यात यावे. ऑपरेशन गंगादरम्यान रशियन आक्रमणानंतर युक्रेनमधूनदेखील विद्यार्थ्यांना वाचवण्यात आले होते. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, विद्यार्थ्यांना दूतावासाच्या मदतीने इराणमधील सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे. सोमवारी (१६ जून) काही बातम्यांमध्ये असे म्हटले आहे की, इराणमधील भारतीय दूतावासाने अरक युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेस आणि शिराझ युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेस यांना पत्र पाठवून भारतीय विद्यार्थ्यांचे स्थलांतर करण्यास सांगितले आहे.
भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी इराणची निवड का करतात?
परराष्ट्र मंत्रालयाने उपलब्ध केलेल्या आकडेवारीनुसार, विशेषतः जम्मू आणि काश्मीरमधील विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी इराणची निवड करतात. परराष्ट्र मंत्रालयाच्या विदेशात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या अंदाजे आकडेवारीनुसार, २०२२ मध्ये तेहरान युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेस, शाहिद बेहेश्ती युनिव्हर्सिटी आणि इस्लामिक आझाद युनिव्हर्सिटीसारख्या संस्थांमध्ये सुमारे २,०५० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. त्यातील बहुतेक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी गेले होते. भारतातील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या मते, तेहरान विद्यापीठातील १४० वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह सुमारे १,५९५ भारतीय विद्यार्थी सध्या इराणमध्ये अडकले आहेत.
तज्ज्ञांनी इराणची निवड करण्याचे कारण स्पष्ट केले आहे. त्यांच्या मते, हे विद्यार्थी अनेक कारणांमुळे वैद्यकीय शिक्षणासाठी इराणची निवड करतात. पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतातील मर्यादित वैद्यकीय जागांसाठी असणारी स्पर्धा. उदहारण द्यायचे झाल्यास, भारतात जवळजवळ २३ लाख विद्यार्थी NEET-UG परीक्षेला बसतात. ही संख्या संपूर्ण भारतातील १.१ लाख एमबीबीएस जागांसाठी विचारात घेतल्यास तुम्हाला फरक दिसून येईल. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना विदेशात जाण्याचा पर्याय निवडावा लागतो. त्याव्यतिरिक्त सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये फक्त ५५,००० जागा आहेत. या महाविद्यालयांमधील शिकवणी फी मध्यमवर्गीय कुटुंबाच्या आवाक्यात आहे. खाजगी विद्यापीठांमधील उर्वरित जागांसाठी शिकवणी फी खूप जास्त आहे आणि बहुतेक कुटुंबांना ते परवडत नाही.
इराणची निवड करण्याचे आणखी एक कारण म्हणजे तेथील अभ्यासक्रमांची परवडणारी शिकवणी फी. तेहरान युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेस आणि इस्फहान युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेससारख्या विद्यापीठांमधील शिकवणी फी युरोप किंवा अमेरिकेतील विद्यापीठांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी आहे. इराणमध्ये राहण्याचा खर्चदेखील परवडणारा आहे. हा खर्च मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांना परवडणारा असतो. काही शैक्षणिक तज्ज्ञांनी हेदेखील सांगितले आहे की, सुरुवातीला एमबीबीएस पदवीसाठी बांगलादेशची निवड करणारे अनेक भारतीय आता राहणीमानाच्या खर्चामुळे आणि अभ्यासक्रमामुळे इराणचा पर्याय निवडत आहेत. एज्युकेशन झोनचे व्यवस्थापकीय संचालक आदिल शेख यांनी ‘इकॉनॉमिक टाईम्स’ला सांगितले की, शिष्यवृत्ती लक्षात घेऊन शिकवणी आणि राहण्याचा खर्च बांगलादेशमध्ये ४० लाख रुपयांच्या जवळ आहे, मात्र हाच खर्च इराणमध्ये पाच वर्षांच्या एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी १४ ते १५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे.”
इराण अनेक शिष्यवृत्तीही देते, त्यामुळे भारतीय विद्यार्थी इराणकडे आकर्षित होतात. खर्चाव्यतिरिक्त आधुनिक पायाभूत सुविधा, अभ्यासक्रम आणि लवकर मिळणारे क्लिनिकल एक्सपोजर यांसारख्या घटकांमुळे भारतीय विद्यार्थी इराणी वैद्यकीय विद्यापीठांकडे आकर्षित होत आहेत. इराणमधील वैद्यकीय विद्यापीठांना भारताच्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) मान्यता दिली आहे, त्यामुळेच या विद्यापीठांमधून पदवीधर झालेले भारतीय विद्यार्थी FMGE (NEXT) परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर भारतात वैद्यकीय प्रॅक्टिस करण्यास पात्र ठरतात. याव्यतिरिक्त, अनेक इराणी विद्यापीठे वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मेडिकल स्कूल्स (WDOMS) मध्येदेखील सूचीबद्ध आहेत.
वैद्यकीय शिक्षणासाठी इतरही पर्याय
भारतीय विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घ्यायचे असल्यास इराण हा एकमेव पर्याय नाही. युक्रेन हे भारतीयांसाठी आणखी एक लोकप्रिय ठिकाण आहे. २०२२ मध्ये जवळजवळ २०,००० विद्यार्थ्यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी सुमारे ३० युक्रेनियन विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतला होता. शिक्षणतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, स्वस्त अभ्यासक्रम आणि वाजवी प्रमाणात चांगले शिक्षण, यामुळे युक्रेन हे तीन दशकांहून अधिक काळापासून भारतीयांसाठी वैद्यकशास्त्र, दंतचिकित्सा आणि नर्सिंगचा अभ्यास करण्याचे एक पसंतीचे ठिकाण आहे. तेथील खर्चही फार कमी आहे. उदाहरणार्थ, सहा वर्षांच्या एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमध्ये सुमारे ३५,००० डॉलर्स भरावे लागतात. भारतात त्याच अभ्यासक्रमासाठी त्यांना या रकमेच्या किमान चार पट खर्च येईल. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, युक्रेनमध्ये मिळवलेल्या वैद्यकीय पदव्या जागतिक आरोग्य संघटना, युरोपियन परिषद आणि इतर जागतिक संस्थांसह जगभरात मान्यताप्राप्त आहेत.