Why do we get nightmares? माणूस आयुष्याचा जवळपास एक तृतीयांश भाग झोपेत घालवतो. दिवसातील धावपळ, ताणतणाव, भावना, संवाद, आठवणी आणि अनुभव यांचे ओझे घेऊन आपण रात्री डोळे मिटतो; परंतु झोप म्हणजे शरीर फक्त विश्रांती घेत असतं, इतकीच साधी प्रक्रिया नाही. उलट, झोपेत मेंदू अतिशय सूक्ष्म, गुंतागुंतीची आणि महत्त्वाची कामे करत असतो. त्याच प्रक्रियेचा एक रंजक आणि गूढ भाग म्हणजे स्वप्ने. काही स्वप्ने सुखद असतात, काही विचित्र, काही अगदी विस्कळीत, तर काही इतकी भीतीदायक असतात की, आपण दचकून जागे होतो. छातीत धडधड, अंगाला घाम, मनात भीती आणि काही क्षण वास्तव व स्वप्न यांच्यात फरकच कळेनासा होतो. प्राचीन काळात स्वप्ने ही देवाचा संदेश, भविष्यातील संकेत किंवा अदृश्य शक्तींचे दूत मानली जात होती. मात्र, न्यूरोसायन्सने स्वप्नांमागील विज्ञानाचा अनेक अंगानी शोध घेतला आहे.

झोपेची रचना

झोपेची रचना समजून घेतल्याशिवाय स्वप्नांचे विज्ञान समजत नाही. झोप प्रामुख्याने नॉन-आरईएम (Non-REM) आणि आरईएम (REM – Rapid Eye Movement) अशा दोन प्रकारांत विभागली जाते. रात्री झोप लागल्यानंतर शरीर प्रथम नॉन-आरईएम टप्प्यात जाते. या काळात शरीराची झीज भरून काढणे, ऊर्जेची बचत, पेशींची दुरुस्ती अशी कामे चालू असतात. यानंतर झोपेचे चक्र आरईएम टप्प्यात प्रवेश करते. या अवस्थेत डोळ्यांच्या बाहुल्या जलद हालचाल करतात, मेंदूची विद्युत क्रिया खूप सक्रिय होते आणि या काळात ज्वलंत, कथनात्म आणि भावनिक स्वप्ने पडण्याची शक्यता जास्त असते.

अ‍ॅटोनिया म्हणजे काय?

आरईएम झोपेतील एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे ‘अ‍ॅटोनिया’, म्हणजेच स्नायूंचे तात्पुरते शिथिलीकरण. म्हणजे स्वप्नात आपण धावत असलो, पडत असलो किंवा भांडत असलो तरी प्रत्यक्ष शरीर तशी हालचाल करत नाही. निसर्गाने दिलेले हे संरक्षण आहे. अन्यथा माणूस स्वप्नांनुसार हालचाल करून स्वतःलाच इजा पोहोचवू शकला असता. म्हणूनच आरईएम झोप ही केवळ स्वप्नांचा काळ नसून मेंदू आणि शरीरातील अत्यंत गुंतगुंतीचा समन्वय असलेली जैविक प्रक्रिया आहे.

स्वप्नांचे नेमके कार्य काय?

स्वप्नांचे नेमके कार्य काय, याचे अंतिम उत्तर विज्ञानाकडे अद्यापही नाही. तरीही काही महत्त्वाच्या संकल्पना पुढे आल्या आहेत. त्यातील एक म्हणजे स्मृती प्रक्रिया. दिवसभरात आपण असंख्य माहिती गोळा करतो. या सगळ्यातून काय महत्त्वाचे, काय तात्पुरते, काय विसरायचे आणि काय दीर्घकालीन स्मृतीत साठवायचे, यावर मेंदूला काम करावे लागते. झोप, विशेषतः तिचे वेगवेगळे टप्पे, या प्रक्रियेत मदत करतात. म्हणून अनेक शास्त्रज्ञ स्वप्ने ही मेंदूतील स्मृती आणि भावनिक अनुभवांवर चाललेल्या प्रक्रियेचे प्रतिबिंब असू शकतात, असे मानतात.

स्वप्ने आणि आपल्या भावना

आपल्या मनातील भावनांचे नियंत्रण करण्यात स्वप्नांचा मोठा वाटा असतो. दिवसभरात आपल्याला जाणवणारी भीती, आनंद, राग किंवा ताण यांसारख्या भावना झोपल्यावर लगेच संपत नाहीत, तर मेंदू त्यावर शांतपणे प्रक्रिया करत असतो. विशेषतः गाढ झोपेत (REM Sleep) ही स्वप्ने आपल्या भावनिक अनुभवांना योग्यरीतीने साठवण्यास आणि मनाची मरगळ झटकण्यास मदत करतात. जेव्हा आपण एखाद्या तणावपूर्ण प्रसंगातून जातो, तेव्हा मेंदू स्वप्नांच्या माध्यमातून तोच अनुभव पुन्हा समोर आणतो, पण तो जसाच्या तसा न दाखवता वेगळ्या किंवा प्रतिकात्मक रूपात मांडतो. यामुळेच वास्तवातील छोट्या भीती स्वप्नांमध्ये अनेकदा विचित्र किंवा भयानक रूप घेऊन येतात, कारण त्यामागे मेंदू आपला मानसिक ताण हलका करण्याचा प्रयत्न करत असतो.

Why do we get nightmares

दुःस्वप्न म्हणजे काय?

याच ठिकाणी दुःस्वप्नांची गोष्ट सुरू होते. असे स्वप्न जे खूप अस्वस्थ करणारे, भीतीदायक किंवा धक्कादायक असते आणि त्यातून व्यक्ती दचकून जागी होते, तेव्हा त्याला दुःस्वप्न म्हणतात. दुःस्वप्न म्हणजे केवळ ‘वाईट स्वप्न’ नाही. दुःस्वप्न हा मेंदूतील भीतीची प्रक्रिया, भावनिक ताण आणि स्मृती यांच्या संगमावर घडणारा अनुभव असू शकतो. अशा वेळी मेंदूतील काही भाग विशेष महत्त्वाचे ठरतात.

अमिग्डाला

पहिला भाग म्हणजे अमिग्डाला. ही मेंदूची भावनिक ‘अलार्म सिस्टिम’ मानली जाते. भीती, धोका, असुरक्षितता यांना प्रतिसाद देण्यात अमिग्डालाची मोठी भूमिका असते. दुःस्वप्न पडताना हा भाग तुलनेने अधिक सक्रिय असू शकतो. त्यामुळे शरीरात धोक्याचा इशारा निर्माण होतो. त्यावेळी हृदयाचे ठोके वाढतात, घाम येतो, जाग आली तरी काही काळ भीती टिकून राहते.

प्रीफ्रंटल कॉर्टेक्स

दुसरा भाग म्हणजे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. हा भाग तर्क, निर्णय, वास्तव-परीक्षण आणि नियंत्रण यांच्याशी संबंधित असतो. जागेपणी तो आपल्याला सांगतो की, कोणती गोष्ट शक्य आहे आणि कोणती नाही. पण स्वप्नांच्या अवस्थेत या भागाचे नियंत्रण तुलनेने कमी होते. म्हणूनच स्वप्नात एखादी मृत व्यक्ती भेटणे, हवेत उडणे, बंद दारातून जाणे किंवा पूर्णपणे अशक्य असणाऱ्या घटना खऱ्या असल्याप्रमाणे भासतात. स्वप्नातील विचित्रतेवर मेंदू प्रश्नच विचारत नाही.

हिप्पोकॅम्पस

तिसरा भाग म्हणजे हिप्पोकॅम्पस. हा स्मृती प्रक्रियेशी संबंधित आहे. जुन्या आठवणी, ताजे अनुभव, त्यांना जोडलेले संदर्भ हे सर्व या भागाशी संबंधित असतात. म्हणूनच एखादा जुना धक्का, एखादी न सुटलेली भीती किंवा ताज्या चिंतेशी संबंधित प्रतिमा स्वप्नात मिसळून एक नवीन कथानक तयार होऊ शकते. दुःस्वप्नांमध्ये अनेकदा वास्तव आणि भूतकाळातील अनुभव विचित्र पद्धतीने एकमेकांत मिसळलेले दिसतात.

पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर

दुःस्वप्ने पडण्यामागे एकच कारण नसते. भावनिक ताण हे त्यातील एक मोठे कारण आहे. एखादी परीक्षा, नोकरीचा ताण, नातेसंबंधातील संघर्ष, आर्थिक असुरक्षितता, अपघात, मृत्यू किंवा मानसिक धक्का अशा घटना मेंदूवर ठसा उमटवतात. काही लोकांच्या बाबतीत हा ताण रात्री स्वप्नांत पुन्हा समोर येतो. ज्यांना पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर, म्हणजेच PTSD असतो, त्यांना तर जुने धक्कादायक अनुभव वारंवार दुःस्वप्नांच्या रूपात दिसू शकतात.

जीवनशैलीचाही परिणाम

जीवनशैलीचाही काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. उशिरापर्यंत स्क्रीन पाहाणे, अनियमित झोप, मद्यपान, कॅफिनचे जास्त सेवन, ताणतणावपूर्ण दिनक्रम हे सर्व झोपेच्या गुणवत्तेला बाधा आणू शकतात. खराब झोप आणि खंडित आरईएम झोप यांचा अप्रत्यक्ष परिणाम स्वप्नांच्या स्वरूपावर होऊ शकतो. मात्र फलाणा एकच घटक = दुःस्वप्ने असे सरळ समीकरण विज्ञान मानत नाही. प्रत्येक व्यक्तीचा जैविक, मानसिक आणि सामाजिक संदर्भ वेगळा असतो.

थ्रेट सिम्युलेशन थिअरी

स्वप्नांविषयीची एक रोचक संकल्पना म्हणजे ‘थ्रेट सिम्युलेशन थिअरी’. या मतानुसार, स्वप्ने विशेषतः भीतीदायक स्वप्ने ही मेंदूची संभाव्य धोक्यांसाठी मानसिक तालीम असू शकतात. जणू काही मेंदू संकटाच्या सरावासाठी काल्पनिक प्रसंग तयार करतो. हा सिद्धांत सर्वमान्य अंतिम उत्तर नाही, पण उत्क्रांतीच्या दृष्टीने तो उत्सुकता वाढवणारा आहे. कदाचित म्हणूनच स्वप्नांमध्ये पाठलाग, पडणे, हल्ला, हरवणे किंवा असहायता यांसारखे विषय वारंवार दिसतात.

मानसोपचारतज्ज्ञ किंवा झोपतज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य

दुःस्वप्ने वारंवार पडू लागली, झोपेची भीती वाटू लागली, दिवसाही अस्वस्थता राहू लागली किंवा कामात लक्ष लागत नसेल तर त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असते. कारण अशा वेळी ती एखाद्या मानसिक आरोग्य समस्येचा संकेत असू शकतात. नैराश्य, दीर्घकालीन चिंता, PTSD, काही औषधांचे परिणाम किंवा इतर झोपेचे विकार यामागे असू शकतात. त्यामुळे “वाईट स्वप्न पडले, जाऊ द्या” एवढ्यावर न थांबता, त्रास सतत असेल तर मानसोपचारतज्ज्ञ किंवा झोपतज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरते.

ल्यूसिड ड्रीमिंग

स्वप्नांच्या जगातला आणखी एक रोमांचक विषय म्हणजे ‘ल्यूसिड ड्रीमिंग’. काही लोकांना स्वप्न पाहत असतानाच आपण स्वप्नात आहोत याची जाणीव होते. काहीवेळा ते स्वप्नातील प्रसंगांवर मर्यादित नियंत्रणही मिळवू शकतात. उदाहरणार्थ, भितीदायक दृश्यातून पळून जाण्याऐवजी त्याकडे पाहणे किंवा कथानक बदलण्याचा प्रयत्न करणे. यामुळे अनेकांना स्वप्नांविषयी विशेष आकर्षण वाटते. मात्र दुःस्वप्नांवरील मान्यताप्राप्त उपचार म्हणून सर्वाधिक चर्चेत असते ती ‘इमेजरी रिहर्सल थेरपी’ किंवा IRT. या उपचारपद्धतीत रुग्णाला वारंवार पडणारे दुःस्वप्न लिहून काढायला सांगितले जाते आणि नंतर त्याचा शेवट किंवा स्वरूप सुरक्षित, नियंत्रणात किंवा कमी भीतीदायक अशा पद्धतीने बदलून त्याचा मानसिक सराव केला जातो. हा सराव काही रुग्णांत दुःस्वप्नांची तीव्रता कमी करण्यास मदत करू शकतो.

सर्केडियन रिदम

शांत झोप आणि सुखकर स्वप्नांसाठी काही साध्या पण प्रभावी सवयी महत्त्वाच्या ठरतात. झोपण्याची आणि उठण्याची वेळ शक्य तितकी नियमित ठेवणे हे सर्वात महत्त्वाचे. शरीरातील सर्केडियन रिदम एका लयीवर काम करतो; त्याला वारंवार धक्का दिला की झोपेची गुणवत्ता कमी होऊ शकते. झोपण्याच्या किमान एक तास आधी स्क्रीनपासून दूर राहणेही उपयुक्त ठरते. मोबाईल, टॅब, लॅपटॉप यांमधील तेजस्वी प्रकाश मेलॅटोनिनच्या नैसर्गिक स्त्रावावर परिणाम करू शकतो. रात्री कॅफिन टाळणे, अतिजड जेवण टाळणे, मद्यपान कमी ठेवणे आणि झोपण्यापूर्वी मन शांत करण्यासाठी श्वसन, ध्यान, प्रार्थना, हलके वाचन किंवा सौम्य संगीत यांचा उपयोग होऊ शकतो.

एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वप्नांकडे अंधश्रद्धेने किंवा दडपणाने पाहू नये. प्रत्येक स्वप्नाला भविष्यसूचक अर्थ नसतो. प्रत्येक दुःस्वप्न हे संकटाचे लक्षणही नसते. बऱ्याच वेळा ते ताण, भावना आणि स्मृती यांच्या चालू प्रक्रियेचे प्रतिबिंब असते. पण त्याच वेळी स्वप्ने पूर्णपणे निरर्थकही नाहीत. ती आपल्या अंतर्गत जगाविषयी संकेत देऊ शकतात. आपण किती तणावाखाली आहोत, एखाद्या अनुभवाचा परिणाम अजूनही मनावर आहे का, झोपेची गुणवत्ता खालावली आहे का, भावनिक ओझे वाढले आहे का याचाही विचार करण गरजेचं आहे.