थोड्याशा पावसातही पाणी तुंबण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणामध्ये मुंबईत अंधेरी सब वेचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. थोडासा पाऊस पडला की सब वे वाहतुकीसाठी बंद करावा लागतो. गेल्या कित्येक वर्षात या समस्येवर मुंबई महापालिकेला तोडगा काढता आलेला नाही. हिंदमाता परिसरात उपाययोजना करून पाण्याचा निचरा करण्यात पालिकेला काही अंशी यश आले आहे. पण अंधेरी सब वेचे भौगोलिक कोडे अद्याप पालिकेला सोडवता आलेले नाही.
अंधेरी सब वे कुठे आहे?
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसराला जोडणारा हा मार्ग अंधेरी स्थानकाच्या जवळ आहे. गोखले पुलालगत असलेला हा मार्ग रेल्वे रुळाच्या खालून जातो. सब वे असला तरी हा भुयारी मार्ग नाही. तो रस्त्याच्या वरच आहे. पश्चिम उपनगरात खार, सांताक्रूझ, अंधेरी आणि मालाड येथे असे रुळाखालून जाणारे सब वे आहेत. वर रेल्वे मार्ग असल्यामुळे रस्त्याची उंचीही वाढवता येत नाही.
अंधेरी सब वेमध्ये पावसाचे पाणी का साचते?
मुसळधार पाऊस पडला की पाणी साचण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणांमध्ये अंधेरी सब वेचे नाव पहिल्या क्रमांकावर असते. अंधेरी पश्चिम परिसरातील मोगरा नाल्याची रुंदी बऱ्याच ठिकाणी कमी असल्यामुळे पाऊस पडताना व भरतीची वेळ असताना मोगरा नाल्यातील पाण्याची पातळी वाढते व त्यालगत असलेल्या अंधेरी सब वे, दाऊद बाग, आझाद नगर, वीरा देसाई मार्ग या परिसरामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते. तसेच हा परिसर बशीसारखा असल्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागतो.
उपाययोजना करणे आवश्यक का?
मुंबईत इतर ठिकाणी पाणी साचल्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. मात्र अंधेरी सब वेमध्ये पाणी साचल्यानंतर मोठा धोका निर्माण होतो. उतारावरून वेगात येणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे चारचाकी गाड्या वाहून जाण्याची शक्यता असते. अंधेरी सब वे परिसर सखल भाग असून जवळच मोठा उतार असल्यामुळे ताशी ५० मिमी पाऊस पडताच प्रति सेकंद ५० हजार लीटर पाणी जोरात वाहत येते. तुलनेत नाल्याची रुंदी कमी असल्यामुळे पाणी साचते. परिणामी, सब वेमध्ये पाणी साचताच तत्काळ वाहतूक बंद करावी लागते.
इतक्या वर्षांत उपाययोजना का नाही?
अंधेरी येथील मोगरा नाल्यावर पावसाचे पाणी उपसण्यासाठी उदंचन केंद्र बांधण्यात येणार होते. मात्र उदंचन केंद्राचे काम जागेअभावी रखडले. चार वर्षांपूर्वी पालिकेने मोगरा उदंचन केंद्रासाठी निविदा मागवल्या होत्या. मात्र जमीन अधिग्रहण होऊ न शकल्यामुळे निविदा रद्द करण्यात आली. त्यानंतर मोगरा उदंचन केंद्र नाल्याच्या प्रवाहातच बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र नाल्याच्या जमिनीच्या मालकीचा मुद्दा न्यायालयात गेला. या जागेवर दोघांनी दावा केला. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे मोगरा उदंचन केंद्र रखडले. त्यामुळे पालिकेने या मार्गाजवळील भूमिगत पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढण्यासाठी विविध कामे हाती घेण्याचे ठरवले होते. मात्र गोखले पुलाच्या बांधकामामुळे ही कामे सुरू होऊ शकली नाहीत. त्याचबरोबर पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढवली तरी फारसा दिलासा मिळणार नाही हे लक्षात आल्यामुळे आता महापालिकेने आयआयटीची मदत घेण्याचे ठरवले आहे. तीव्र उतार असलेल्या अंधेरी सब वेमध्ये पाणी साचू नये म्हणून नक्की कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करता येतील याचा सल्ला आयआयटीकडून घेण्यात येणार आहे. हिंदमाताप्रमाणे या भागात भूमिगत टाकी बांधता येईल का याचाही विचार केला जाणार आहे.
पावसाळ्यात अंधेरी सब वे बंद का करतात?
अंधेरी सब वेमध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत नाही तोपर्यंत थोडासा पाऊस पडला की सब वे वाहतुकीसाठी बंद करणे हाच एक मार्ग आहे. अंधेरी सब वे २०२४ च्या पावसाळ्यात तब्बल २८ वेळा वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागला होता. पंधरा मिनिटे ते चार तास वाहतूक बंद ठेवावी लागली होती. तर २०२३ मध्ये हा मार्ग संपूर्ण पावसाळ्यात २१ वेळा बंद ठेवावा लागला होता. यंदाही आतापर्यंत तीन वेळा हा सब वे बंद करावा लागला आहे.
अंधेरी सब वेसाठी इतका खर्च करावा का?
अंधेरीतील मोगरा नाल्यामध्ये मलनिःस्सारण वाहिन्यांमधील प्रवाह मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे हा नाला पावसाळ्यानंतरही वाहत असतो. त्यामुळे केवळ ताशी २० मिमी पाऊस पडला तरी या परिसरात पाणी साचते. परिणामी, ताशी ७५ मिमी पावसाच्या पाण्याचा निचरा करता येईल अशा पद्धतीने या भागाचे नियोजन करावे लागणार आहे. पाण्याचा प्रवाह, पाण्याचा वेग, उतार, पावसाचे प्रमाण याचा अभ्यास करून कोणती उपाययोजना करायची ते ठरवले जाणार आहे. याकरिता २०० ते ४०० कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित आहे. मात्र मोगरा नाल्यावर झालेली अनधिकृत बांधकामे हटवल्यास नाला रुंद होईल, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. वर्षातील जास्तीत जास्त ३० दिवस पाणी साचणाऱ्या या सब वेवर किती खर्च करायचा याचा विचार करावा लागणार आहे. आयआयटीचा सल्ला आणि स्थानिकांचेही मत घेऊन व्यवहार्य उपाय शोधणे आवश्यक आहे.
indrayani.narvekar@expressindia.com