US Deportation Indian Citizens : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची दुसऱ्यांदा सूत्रे हाती घेतल्यापासून एकापाठोपाठ एक कठोर निर्णय घेतले. गेल्या वर्षी त्यांनी अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्यांची मुस्कटदाबी करून त्यांना देशाबाहेर हाकलून लावले होते. त्यामध्ये परदेशात नोकरीसाठी गेलेल्या अनेक भारतीयांचाही समावेश होता. हातात बेड्या ठोकलेल्या भारतीयांना मायदेशी परतताना पाहून त्यावेळी अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. यादरम्यान गेल्या १७ महिन्यांच्या कालावधीत अमेरिकेतून तब्बल ४,६०० हून अधिक भारतीयांची हकालपट्टी झाल्याचे एका आकडेवारीतून समोर आले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ही आकडेवारी जाहीर केली. या पार्श्वभूमीवर अमेरिकेत भारतविरोधी भावना का वाढत आहे? त्यामागची नेमकी कारणे काय? त्याविषयीचा हा आढावा…

परराष्ट्र मंत्रालयाने नेमके काय सांगितले?

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले की, २०२६ मध्ये आतापर्यंत एकूण एक हजार ७६ भारतीय नागरिकांना अमेरिकेतून भारतात हद्दपार करण्यात आले आहे, तर २०२५ या वर्षात एकूण सुमारे तीन हजार ५६७ भारतीयांना अमेरिकेतून परत पाठविण्यात आले होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनासाठी स्थलांतरितांचा मुद्दा हा नेहमीच राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील राहिला आहे. सत्तेवर आल्यापासूनच ट्रम्प सरकारने देशात बेकायदा राहणाऱ्या परदेशी नागरिकांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या मुद्द्यावर भारताने आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. जर एखादा नागरिक परदेशात बेकायदा राहत असल्याचे आढळल्यास त्याला परत मायदेशात आणणे हे आपल्या देशाचे कर्तव्य आहे. मात्र, या प्रक्रियासाठी संबंधित व्यक्तीच्या राष्ट्रीयत्वाची तपासणी आणि पडताळणी आवश्यक आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. यादरम्यान अमेरिकेने वर्षभरात पुन्हा भारतीयांची हकालपट्टी केल्याने हद्दपारीचा हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

भारतीयांची हकालपट्टी का केली जात आहे?

अमेरिकेतून गेल्या १७ महिन्यांत ४,६०० हून अधिक भारतीय नागरिकांची हकालपट्टी करण्यामागे ट्रम्प प्रशासनाचे कडक कायदे कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. अनेक भारतीय नागरिक पर्यटन, शैक्षणिक किंवा कामाच्या कायदेशीर व्हिसावर अमेरिकेत जातात. मात्र, व्हिसाची मुदत संपल्यानंतरही ते नियमांचे उल्लंघन करून तिथेच राहतात. अशा नागरिकांचा शोध घेऊन त्यांना आपल्या मायदेशी परत पाठवले जात आहे, असे एका अमेरिकन अधिकाऱ्याने तेथील माध्यमांना सांगितले. अमेरिकेत राहण्यासाठी आवश्यक असलेली वैध कागदपत्रे, जसे की वैध पासपोर्ट, वर्क परमिट किंवा निवासी पुरावे नसलेल्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जात आहे. या हकालपट्टीच्या कारवाईत अशाही काही व्यक्तींचा समावेश आहे, ज्यांच्यावर अमेरिकेत गंभीर गुन्हे दाखल आहेत किंवा ज्यांना तिथल्या न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यामध्ये काही गुन्हेगार आणि गँगस्टर्सचाही समावेश आहे, ज्यांना कायदेशीर प्रक्रियेनंतर भारताच्या स्वाधीन करण्यात आले असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.

अमेरिकेत भारतविरोधी भावना का वाढल्या?

अमेरिकेत गेल्या काही काळापासून भारतीय समुदाय आणि भारतविरोधी नकारात्मक भावना किंवा द्वेष वाढताना दिसत आहे. हे चित्र केवळ समाजमाध्यमांपुरतेच मर्यादित नसून खऱ्या आयुष्यातही तेथील भारतीयांना वर्णद्वेषी टिप्पण्यांना सामोरे जावे लागत असल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. अमेरिकेतील आयटी, तंत्रज्ञान, वैद्यकीय आणि कॉर्पोरेट क्षेत्रात भारतीयांचे मोठे वर्चस्व आहे. ‘एच १ बी’ व्हिसाच्या माध्यमातून मोठ्या संख्येने भारतीय नागरिक अमेरिकेत रोजगार आणि वास्तव्यासाठी जातात. मात्र, या व्हिसा प्रक्रियेतून अमेरिकी नागरिकांच्या कल्याणापेक्षा परदेशी नागरिकांना जास्त प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप वारंवार होत आहे. त्यातच हा वाद केवळ नोकऱ्यांपुरता मर्यादित राहिलेला नसून काही ठिकाणी त्याचे रूपांतर संतापातही झाले आहे. भारतीय लोक आपल्या हक्काच्या नोकऱ्या हिरावून घेत असल्याचा समज अमेरिकेतील काही उजव्या विचारसणीच्या गटांमध्ये आहे.

भारतीयांबद्दलचा दृष्टीकोन का बदलला?

अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येत भारतीयांचा वाटा सुमारे १.५ टक्का आहे. हा गट सर्वांत सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या यशस्वी स्थलांतरित गटांपैकी एक मानला जातो. त्यातील बहुतांश लोक तंत्रज्ञान, वैद्यकीय व व्यावसायिक क्षेत्रांत कार्यरत आहेत. यादरम्यान जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२५ दरम्यान अमेरिकेतील समाजमाध्यमांवर भारतीयांविरोधात वापरल्या जाणाऱ्या अपशब्दांमध्ये तब्बल ११५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अलीकडेच ‘एक्स’वर भारतीयांच्या विरोधातील अपशब्द किंवा भारतीयांना हाकलून द्या, अशा आशयाच्या पोस्टना तब्बल २८० दशलक्ष (२८ कोटी) व्ह्यूज मिळाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात ‘अवैध स्थलांतर’ हा अमेरिकेत अत्यंत संवेदनशील मुद्दा बनला आहे. गेल्या काही महिन्यांत अमेरिकेत बेकायदा प्रवेश करणाऱ्या किंवा व्हिसा संपल्यानंतरही तिथे राहणाऱ्या हजारो भारतीयांची तेथून हकालपट्टी करण्यात आली आहे. या अवैध स्थलांतराच्या बातम्यांमुळे संपूर्ण भारतीय समुदायाकडे पाहण्याचा स्थानिकांचा दृष्टिकोन नकारात्मक होत आहे.

भारतीयांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय?

काही दिवसांपूर्वी भारतीय वंशाचे अमेरिकन लेखक, चित्रपट निर्माते तथा राजकीय भाष्यकार दिनेश डिसूझा यांनी या संदर्भात एक पोस्ट शेअर केली होती. अमेरिकेतील ४० वर्षांच्या कारकिर्दीत मी भारतीयांबद्दल वापरली जाणारी अशा प्रकारची भाषा कधीही पाहिली नाही, अशी नाराजी त्यांनी बोलून दाखली होती. उजव्या विचारसरणीचे लोक पूर्वी कधीही असे बोलत नसत. मग या प्रकारच्या खालच्या पातळीवरील भाषेचा वापर का होत आहे? हा विचार करण्याजोगा प्रश्न आहे, असेही दिनेश यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले होते. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’नुसार, २०२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कमला हॅरिस यांच्या उमेदवारीमुळे दक्षिण आशियाईविरोधी द्वेषयुक्त भाषणे वाढू लागली आहे. गेल्या उन्हाळ्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी एच १ बी व्हिसावर कार्यकारी आदेश काढल्यानंतर आणि न्यूयॉर्क शहराच्या राजकारणात जोहरान ममदानी यांचा प्रभाव वाढल्यानंतर यात पुन्हा मोठी वाढ झाली. अमेरिकेतील समाजमाध्यमांवर केल्या जाणाऱ्या बहुतांश पोस्ट या तेथील भारतीयांना लक्ष्य करणाऱ्या असतात. उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स यांच्या भारतीय वंशाच्या पत्नी उषा व्हान्स यांनाही या वर्णद्वेषी टिप्पण्याचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे भारतीयांकडे पाहण्याचा अमेरिकन नागरिकांचा दृष्टीकोन नेमका बदलणार तरी कधी, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.