अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाने भारतीय आयटी क्षेत्रातील कंपन्यांना गुरुवारी मोठा तडाखा दिला. अमेरिकेत कुशल परदेशी कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी निवासाचा (ग्रीन कार्ड) मार्ग उपलब्ध करून देणाऱ्या ‘PERM’ प्रक्रियेतून सहा भारतीय आयटी कंपन्यांना निलंबित करण्यात आले. त्यामध्ये कॉग्निझंट, इन्फोसिस, टाटा, विप्रो, एचसीएल आणि कॅपजेमिनी यांसारख्या बड्या कंपन्यांचा समावेश आहे. या सहाही कंपन्या अमेरिकन नागरिकांच्या नोकऱ्या हिरावून त्या परदेशी नागरिकांना देत असल्याचा आरोप ट्रम्प प्रशासनाकडून करण्यात आला. तसेच या प्रक्रियेत मोठा गैरप्रकार संशयही व्यक्त करण्यात आला. अमेरिकेचे कामगार सचिव कीथ साँडरलिंग यांनी गुरुवारी या कारवाईबाबत माहिती दिली. ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयामुळे अमेरिकेत नोकरीची संधी शोधणाऱ्या भारतीय आयटी व्यावसायिकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे, त्याविषयी…

अमेरिकेतील ‘परमनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम’ या प्रक्रियेला PERM म्हणून ओळखले जाते. या माध्यमातून अमेरिकेतील कंपन्या आपल्या परदेशी कर्मचाऱ्यांना ग्रीन कार्ड मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. सध्या अमेरिकेत कार्यरत असलेल्या भारतातील अनेक आयटी कंपन्यांकडून याच प्रक्रियेचा वापर केला जातो. गेल्या महिन्यात ट्रम्प प्रशासनाने कॉग्निझंट कंपनीला या प्रक्रियेतून निलंबित करण्याची घोषणा केली होती; पण त्यावेळी कंपनीवरील नेमके आरोप, प्रभावित झालेल्या अर्जांची संख्या आणि निलंबनाचा कालावधी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. सध्या परदेशी कर्मचाऱ्यांवर अवलंबून असणाऱ्या तंत्रज्ञान आणि आयटी सेवा क्षेत्रातील कंपन्या आता ट्रम्प प्रशासनाच्या रडारवर आल्याचे दिसून येत आहे. भारतीय आउटसोर्सिंग कंपन्यांशिवाय मायक्रोसॉफ्ट आणि अ‍ॅडोब या दिग्गज कंपन्यांनाही PERM प्रक्रियेतून निलंबित करण्यात आले आहे. तसेच त्यात झालेल्या कथित गैरप्रकाराची वेगाने चौकशीही केली जात आहे. त्यामध्ये स्थानिक कर्मचाऱ्यांपेक्षा कमी वेतनावर काम करून घेणे, बनावट अर्ज दाखल करणे आणि अमेरिकन कामगारांना नोकऱ्यांवरून हटवणे यांसारख्या आरोपांचा समावेश आहे. अमेरिकेत H-1B व्हिसा मिळवणारे आणि नोकरीच्या आधारावर ग्रीन कार्डसाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये भारतीयांचे प्रमाण सर्वाधिक असल्याने या कारवाईचा थेट आणि मोठा फटका भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारतीय आयटी कंपन्यांविरोधात कारवाई का?

अमेरिकेतील भारतीय कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर परदेशी कर्मचाऱ्यांची भरती सुरू केल्यामुळे स्थानिक नागरिकांच्या रोजगाराच्या संधी कमी झाल्याचा आरोप अमेरिकेचे कामगार सचिव कीथ साँडरलिंग यांनी केला आहे. परदेशी कामगारांवरील अवलंबित्व वाढवणाऱ्या कथित गैरव्यवहारांना आळा घालण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. “अमेरिकेतील व्यावसायिकांनी जगातील प्रतिभावान मनुष्यबळाचा शोध घेताना सर्वप्रथम अमेरिकन कामगारांना प्राधान्य द्यावे अशी आमची इच्छा आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कामगार विभागाची या सर्व प्रक्रियांवर नजर आहे. अमेरिकन कामगार हे जगातील सर्वाधिक प्रतिभावान आणि बुद्धिमान असल्याचा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे अमेरिकन कामगारांकडून हिरावून घेतलेल्या नोकऱ्या आता प्रथम अमेरिकन नागरिकांनाच मिळतील, परदेशी नागरिकांना नाही आणि विशेषतः फसवणूक करणाऱ्या परदेशी नागरिकांना तर अजिबात नाही,” असे कीथ साँडरलिंग यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. त्यांच्या मते, २००९ पासून या कारवाईच्या कक्षेत येणाऱ्या कंपन्यांनी जवळपास ३० लाख परदेशी कर्मचाऱ्यांना ग्रीन कार्ड मिळवून देण्यासाठी विनंती केली आहे. या कंपन्यांना २ लाख ३० हजारांहून अधिक H-1B व्हिसा मंजुरी मिळाल्या असून एक लाखांहून अधिक कायमस्वरूपी कामगार प्रमाणपत्रेही मंजूर झाली आहेत. या प्रक्रियेमुळे लाखो अमेरिकन कामगारांना नोकऱ्यांपासून वंचित राहावे लागले आहे.

नेमकी काय आहे PERM प्रक्रिया?

अमेरिकेतील एखाद्या कंपनीला परदेशी कर्मचाऱ्याला रोजगाराच्या आधारे ग्रीन कार्ड मिळवून द्यायचे असल्यास त्यांना या प्रक्रियेतून कामगार प्रमाणपत्र मिळवावे लागते. अमेरिकन व्हिसासाठीचा अर्ज प्रामुख्याने संबंधित व्यक्तीच्या माध्यमातून केला जातो; पण PERM प्रक्रियेतील अर्ज नियोक्ता म्हणजेच कंपनी कर्मचाऱ्याच्या वतीने दाखल करते. या प्रक्रियेत कंपनीला संबंधित पदासाठी लागू असलेल्या प्रचलित वेतनाबाबत निश्चिती करून घ्यावी लागते. तसेच, निर्धारित नियमांनुसार भरती प्रक्रिया राबवावी लागते. परदेशी कर्मचाऱ्याला कायमस्वरूपी नोकरी दिल्याने स्थानिक अमेरिकन कामगारांच्या नोकरीच्या संधी, वेतन किंवा कामाच्या परिस्थितीवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही हे सिद्ध करणे या प्रक्रियेचा मुख्य उद्देश असतो. कामगार विभागाने या अर्जाला मंजुरी दिल्यानंतरच नियोक्ता ग्रीन कार्ड प्रक्रियेच्या पुढील टप्प्याकडे जाऊ शकतो. कामगार विभागाकडून अर्ज स्वीकारला जाण्याची तारीख ही सर्वसाधारणपणे संबंधित कर्मचाऱ्याची ‘प्रायॉरिटी डेट’ ठरते. म्हणजेच नोकरीवर आधारित स्थलांतरित व्हिसाच्या रांगेत कर्मचाऱ्याचा कितवा क्रमांक आहे, हे या तारखेवरून निश्चित होते. भारतीय कर्मचाऱ्यांसाठी या तारखेला विशेष महत्त्व आहे. कारण भारतातून ग्रीन कार्डसाठी असलेली मागणी उपलब्ध व्हिसांच्या संख्येपेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे अनेक भारतीय व्यावसायिकांना कायमस्वरूपी निवास मिळवण्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागू शकते. H-1B व्हिसा हा तात्पुरत्या स्वरूपाचा ‘नॉन-इमिग्रंट’ कामाचा व्हिसा आहे. या माध्यमातून अमेरिकन कंपन्या परदेशी कुशल कामगारांना ठरावीक काळासाठी कामावर ठेवू शकतात. याउलट PERM ही रोजगाराच्या आधारे ग्रीन कार्ड मिळवण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाची पायरी आहे.

भारतीय IT कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होणार?

अमेरिकेने कॉग्निझंटसह मोठ्या आयटी कंपन्यांविरोधात केलेल्या कारवाईचा भारतीय कर्मचाऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः ज्या कर्मचाऱ्यांच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेतील PERM अर्ज अद्याप दाखल झालेला नाही, त्यांना या निर्णयामुळे विलंबाचा सामना करावा लागू शकतो. निलंबनाचा निर्णय लागू असेपर्यंत या कंपन्यांना नवीन ‘PERM’ अर्ज सादर करता येणार नाहीत. याचाच अर्थ कर्मचाऱ्यांना त्यांची ‘प्रायॉरिटी डेट’ निश्चित करता येणार नाही. तसेच कंपनीमार्फत सुरू होणाऱ्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत त्यांचे पुढे जाणे पूर्णपणे ठप्प होईल. अमेरिकेचे ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी भारतीय नागरिकांना आधीपासूनच मोठ्या प्रतीक्षा कालावधीचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत PERM प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे त्यांच्यासाठी आव्हाने आणखी वाढू शकतात. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या सप्टेंबर २०२६ मधील माहितीनुसार, रोजगाराधारित ग्रीन कार्डच्या दुसऱ्या प्राधान्य श्रेणीतील (EB-2) भारतासाठी अंतिम निर्णयासाठी व्हिसांची उपलब्धता नसल्याचे नमूद करण्यात आले होते, तर तिसऱ्या प्राधान्य श्रेणीतील (EB-3) भारतासाठी अंतिम कारवाईची तारीख १ जानेवारी २०१४ होती. अमेरिकेत रोजगाराच्या आधारे दिल्या जाणाऱ्या ग्रीन कार्डच्या संख्येवर मर्यादा आहेत. तसेच एका देशातील नागरिकांना मिळू शकणाऱ्या ग्रीन कार्डच्या संख्येवरही मर्यादा लागू होतात. त्यामुळे भारतीय अर्जदारांची मोठी संख्या आणि उपलब्ध व्हिसांची मर्यादित संख्या यांमुळे प्रतीक्षा वाढते.

H-1B व्हिसा धारकांच्याही अडचणी वाढणार?

अमेरिकेच्या या कारवाईचा परिणाम काही कर्मचाऱ्यांच्या H-1B व्हिसाधारकांवरही होण्याची शक्यता आहे. विशेषतः ज्या कर्मचाऱ्यांची H-1B व्हिसाची नियमित सहा वर्षांची मुदत संपण्याच्या जवळ आहे, त्यांच्यासाठी PERM प्रक्रियेला होणारा अधिकच विलंब होऊ शकते. अमेरिकेच्या नियमांनुसार, काही अटी पूर्ण करणाऱ्या H-1B व्हिसाधारकांना सहा वर्षांपेक्षा अधिक काळ अमेरिकेत राहण्याची मुदतवाढ मिळू शकते. त्यासाठी ग्रीन कार्डशी संबंधित कामगार प्रमाणपत्राचा अर्ज निर्धारित वेळेपूर्वी दाखल होणे आवश्यक असते. मात्र, सध्याच्या निलंबनामुळे PERM प्रक्रिया सुरूच करता आली नाही, तर अशा कर्मचाऱ्यांना मुदतवाढ मिळवण्याच्या पात्रतेसंदर्भात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्हिसाची मुदत संपण्याच्या जवळ असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी या निर्णयाचे महत्त्व अधिक आहे. दुसरीकडे ज्या कर्मचाऱ्यांचे ग्रीन कार्ड अर्ज आधीच मंजूर झाले किंवा प्रतिक्षेत आहेत, त्यांना या नियमांचा थेट फटका बसणार नाही. अशा कर्मचाऱ्यांना नियमांनुसार तीन वर्षांपर्यंत H-1B व्हिसा मुदतवाढ मिळवण्याची पात्रता कायम राहणार आहे.