हरित वायू उत्सर्जन, प्रदूषण, समुद्राचे तापमान तसेच हवेतील एरोसोलचे प्रमाण वाढत असल्याने पृथ्वीवरील तापमानात प्रचंड वाढ होत आहे. मागील तीन वर्षात सर्वाधिक जागतिक तापमानवाढ झाल्याचे एक अहवालातून समोर आले आहे. युरोपियन महासंघाच्या ‘कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसेस’ या संस्थेने नुकताच जागतिक तापमानवाढ संदर्भात एक अहवाल प्रकाशित केला. त्यानुसार २०२५ या वर्षी जागतिक तापमानात १.४७ अंश सेल्सियसने वाढ झाली. १८५०-१९०० या कालावधीत पृथ्वीवर जितके तापमान होते, त्या तुलनेत जागतिक तापमानात सध्या किती वाढ होत आहे ? याची आंतरराष्ट्रीय संस्थांकडून नोंद घेतली जाते. यापूर्वी २०२३ मध्ये १.४६ अंश सेल्सियस, तर २०२४ मध्ये १.६० अंश सेल्सियसने जागतिक तापमानात वाढ झाल्याची नोंद आहे.
जागतिक तापमानात होत असलेल्या वाढीने पॅरिस कराराने घालून दिलेली १.५० अंश सेल्सियसची मर्यादा ओलांडली आहे. मागील तीन वर्षांतील तापमानाची सरासरी १.५१ अंश सेल्सियस आहे. पृथ्वीवरील तापमानात वाढ होण्यास प्रामुख्याने हरित वायू उत्सर्जन (कार्बन डायऑक्साइड व मिथेन) प्रदूषण, समुद्राचे तापमान तसेच हवेतील एरोसोलचे प्रमाण कारणीभूत आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
‘कार्बन सिंक’ काय आहे ?
पृथ्वीवरील तापमान नियंत्रित ठेवण्यात कार्बन सिंक ( कार्बन डायऑक्साइड शोषून घेणारे घटक) महत्वाची भूमिका बजावतात. तापमानवाढ होण्यास कारणीभूत ठरणारे कार्बन डायऑक्साइड शोषून घेण्याचे काम कार्बन सिंक करतात. समूद्र व जंगल हे नैसर्गिक कार्बन सिंक आहेत. यांमुळे मोठ्या प्रमाणात पृथ्वीवरील तापमानवाढ कमी होण्यास मदत मिळते. जवळपास निम्म्याहून अधिक मानव निर्मित हरित वायू उत्सर्जन नैसर्गिक कार्बन सिंक शोषून घेतात.
‘कार्बन सिंक’ उष्णता शोषून घेत आहेत का ?
मागील काही वर्षांमध्ये दुष्काळ तसेच जंगलात आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे नैसर्गिक कार्बन सिंकची कार्बन डायऑक्साइड (CO2) शोषून घेण्याची क्षमता कमी होत आहे. परिणामी पृथ्वीच्या तापमानात सतत वाढ होत आहे. शास्त्रज्ञांनी लावलेल्या अंदाजानुसार, २०२३ मध्ये जंगल, वनस्पती व माती या घटकांनी काहीच कार्बन डायऑक्साइड (CO2) शोषून घेतले नाहीत.
नैसर्गिक कार्बन सिंक CO2 शोषून घेत नसतील, तर पृथ्वीवरील हरित वायू उत्सर्जनात घट होणार नाही. परिणामी हरित वायू (CO2 व मिथेन आणि इतर. ) सातत्याने जमा होऊन तापमानवाढीत आणखी भर पडेल. त्यामुळे जागतिक तापमानवाढ वेगाने होईल. झेक रिपब्लिकमधील ‘फॅक्ट्स ऑन क्लायमेट चेंज’ या थिंक टँकनुसार जागतिक तापमानवाढ होण्यास CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साइड ७० टक्के जबाबदार आहे,
‘एरोसोल’मुळे तापमानात वाढ
एरोसोल म्हणजे घन व द्रव स्वरूपातील प्रदूषित सूक्ष्म कण जे की हवेत मिसळतात. एरोसोलचा परिणाम थेट पृथ्वीवर पडणाऱ्या सूर्य प्रकाशावर होतो. वातावरणात एरोसोल अधिक असेल तर सूर्य प्रकाश पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे नैसर्गिक कार्बन सिंक सूर्याची उष्णता शोषून घेण्यास असमर्थ ठरतात. त्यामुळे पृथ्वीवरील उष्णता वाढून तापमानात वाढ होते. दरम्यान, एरोसोलची पातळी कमी झाली तर सूर्याची किरणे थेट पृथ्वीवर येतात. त्यामुळे देखील तापमान वाढते. हा एक विरोधाभास आहे.
एरोसोलची निर्मिती ही मुख्यत: जीवाश्म इंधन जाळल्याने होते. पेट्रोल, डिझेल, नैसर्गिक वायू, कोळसा यांसारखी जीवाश्म इंधने वापरल्याने हवेत एरोसोलचे प्रमाण वाढते. त्याने फुफ्फुसाचे आजारही होतात. दरम्यान, सध्या एरोसोलचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे जागतिक तापमानवाढ होत आहे. एरोसोलचे उत्सर्जन कमी करण्यासाठी अनेक देश काम करत आहेत.
२०२५ मध्ये ‘कम्युनिकेशन अर्थ अँड एन्व्हायरमेंट’ या संस्थेने एक अहवाल प्रकाशित केला. पूर्व आशियामध्ये २०१० पासून एरोसोल निर्मिती करणाऱ्या घटकांचा वापर कमी केला गेला. त्यामुळे तापमानात ०.०७ अंश सेल्सियसने घट झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
जहाज इंधनात सल्फर डायऑक्साइडचा वापर होत असल्याने मोठ्या प्रमाणात एरोसोल हवेत मिसळत होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुद्र संघटनेने इंधनात सल्फर डायऑक्साइडचा वापर कमी केला. परंतु, हा निर्णय घेण्याआधीच जहाज इंधनातील सल्फर डायऑक्साइडमुळे जागतिक तापमानात ०.०४ अंश सेल्सियसची भर पडली आहे.
समुद्राचे तापमान वाढले
मागील शंभर वर्षात पृथ्वीवरील समुद्रांनी हरित वायू उत्सर्जनाने तयार झालेली ९० टक्के अतिरिक्त उष्णता शोषून घेतली आहे. त्यामुळे समुद्रांचे तापमान प्रचंड वाढले आहे. तापमानवाढ रोखण्यात समुद्र महत्वाची भूमिका बजावतात. परंतु, मागील तीन वर्षांत समुद्राचे तापमान सर्वाधिक वाढल्याचे कोपनिर्कस अहवालात नमूद आहे.
‘एल निनो’ आणि ‘ला निना’चा प्रभाव
मागील तीन वर्षांत झालेल्या तापमानवाढीस ‘एल निनो’ हेही एक कारण ठरले आहे. २०२३ व २०२४ या दोन वर्षांत ‘एल निनो’चा प्रभाव होता. त्यामुळे समुद्राच्या तापमानात प्रचंड वाढ झाली होती. त्याचा परिणाम पृथ्वीवरील वातावरणावरही झाला होता.
ज्यावेळी समुद्रातील तापमानात प्रचंड वाढ होते तेव्हा ‘एल निनो’चा प्रभाव असतो. तर ज्यावेळी समुद्रातील तापमानात घट (थंड) होते, त्यावेळी ‘ला निना’चा प्रभाव असतो. तिसऱ्या अवस्थेत तापमान न्यूट्रल असते. ‘एल निनो’चा प्रभाव असल्याने २०२३ व २०२४ या दोन वर्षांमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.
