दिल्लीचे माजी मुख्य सचिव राकेश मेहता यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी आपली जीवनयात्रा संपवली. नोएडा येथील राहत्या घरी त्यांचा मृतदेह आढळून आल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. मेहता हे अत्यंत कार्यक्षम आणि यशस्वी प्रशासकीय अधिकारी म्हणून परिचित होते. त्यांनी अचानक इतक्या टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहता यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांना दीर्घकाळापासून असलेल्या आजारांचा उल्लेख केला होता. निवृत्तीनंतर ते घरी एकटेच राहत होते आणि त्यांना उच्च रक्तदाब तसेच मधुमेहाचा त्रास होता. या घटनेमुळे वृद्धापकाळातील आजारपण आणि एकटेपणा यांसारखे घटक एखाद्या व्यक्तीला नैराश्याच्या गर्तेत कसे ढकलू शकते, यावर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली, त्याविषयी…

वृद्धांमधील आत्महत्येची आकडेवारी काय सांगते?

नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या ताज्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये भारतात एकूण एक लाख ७० हजार ७४६ आत्महत्यांची नोंद झाली. मृतांमध्ये इतर वयोगटांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण सर्वाधिक होते. त्यातील १८ टक्के लोकांच्या आत्महत्येचे कारण आजारपण आणि एकाकीपणा असल्याचे समोर आले. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार जागतिक स्तरावरही नोंदवल्या गेलेल्या आत्महत्यांच्या घटनेत ७० वर्षांवरील व्यक्तींचे प्रमाण सुमारे १६.६ टक्के इतके मोठे आहे. या धक्कादायक परिस्थितीवर दिल्लीतील एम्स रुग्णालयातील मानसोपचार विभागाच्या प्राध्यापिका डॉ. ममता सूद यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना आपले मत व्यक्त केले. आपल्या सर्वांनाच आयुष्यातील संक्रमणाच्या काळात मार्गदर्शनाची गरज असते. वाढत्या वयासोबत केवळ निवृत्त होणे कठीण नसते, तर एकेकाळी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग राहिलेला अधिकार, सामाजिक दर्जा, स्वावलंबन, आर्थिक स्वातंत्र्य आणि शारीरिक ताकद हळूहळू कमी होत जाणे हे स्वीकारणे अधिक आव्हानात्मक असते, असे त्या म्हणाल्या.

वृद्धापकाळात आत्महत्येच्या विचारांचा धोका का वाढतोय?

डॉ. ममता सूद पुढे सांगतात की, आयुष्याच्या सर्वोत्तम काळात आपण जे काही मिळवले होते, ते कायमच आपल्यासोबत राहणार नाही हे वास्तव स्वीकारणे आवश्यक आहे. अत्यंत यशस्वी आणि आत्मविश्वासू व्यक्तीलाही आपली प्रतिष्ठा आणि स्थान निर्माण करणाऱ्या भूमिका हळूहळू कमी होऊ लागल्यास असुरक्षित वाटू शकते. दुर्दैवाने बहुतेक लोक वृद्धापकाळातील गोष्टींचा स्वीकार करण्यापेक्षा त्याकडे पराभव म्हणून पाहतात आणि तो स्वतःच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे समजून घेत नाहीत. याच कारणांमुळे ते नैराश्याच्या गर्तेत ढकलले जातात. परिणामी त्यांच्या डोक्यात टोकाचे विचार येऊ शकतात. वृद्धापकाळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज व्यक्त करताना डॉ. ममता पुढे म्हणाल्या की, आपण आयुष्यात मिळवलेल्या यशाचा अभिमान बाळगणे, वाढत्या वयासोबत येणारा शारीरिक अशक्तपणा आणि इतरांवरील वाढते अवलंबित्व यासाठी आधीपासूनच तयारी करणे, तसेच आयुष्यातील नवा उद्देश, सक्रियता, नातेसंबंध आणि काही छंद जाणीवपूर्वक जोपासणे गरजेचे आहे.

किरकोळ समस्या मानसिक संकटात कशा बदलतात?

डॉ. ममता यांच्या मते, वृद्धापकाळात अनेक किरकोळ भासणाऱ्या समस्या हळूहळू मानसिक संकटाचे रूप घेतात. शारीरिक आणि बौद्धिक क्षमता कमी होणे, स्वावलंबन संपणे, एकाकीपणा, सामाजिक संपर्क तुटणे, जुनाट आजार, अनेक प्रकारच्या गोळ्यांचे सेवन, जोडीदार किंवा जवळच्या मित्रांचे जाणे, आपण इतरांवर ओझे आहोत अशी भावना मनात निर्माण होणे, आर्थिक किंवा सामाजिक पाठबळाचा अभाव आणि आपली व्यावसायिक ओळख पुसली जाणे हे मानसिक खचण्याचे मुख्य घटक ठरतात. दीर्घकालीन मधुमेहामुळे स्मरणभ्रंश आणि नैराश्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. रक्तातील साखरेची पातळी दीर्घकाळ जास्त राहिल्याने रक्तवाहिन्यांवर ताण येऊन मेंदूचा रक्तपुरवठा बाधित होतो. परिणामी स्मरणशक्ती व विचार करण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. याशिवाय, मेंदूतील भावना नियंत्रित करणाऱ्या रसायनांमधील असंतुलन आणि सततच्या आजारपणाचा ताण यामुळे व्यक्ती नैराश्याच्या गर्तेत ढकलली जाते, असेही डॉ. ममता यांनी सांगितले.

समस्या सुटण्याची शक्यताच नाही असे का वाटते?

वृद्धापकाळात अनेक समस्या एकत्र मनावर भावनिक तणाव निर्माण होऊ शकतो. त्यात नैराश्य, चिंता, भीती किंवा अस्वस्थता यांसारख्या बाबींचा समावेश असू शकतो. ही स्थिती पुढे निराशेपर्यंत आणि त्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न करण्यापर्यंत जाऊ शकते, असे डॉ. ममता यांनी स्पष्ट केले. ही निर्णायक अवस्था व्यक्तीच्या वर्तनातूनही दिसून येऊ शकते. उदाहरणार्थ, इच्छापत्र तयार करणे, अधिक गुप्तपणे वागणे, इतरांपासून दूर जाणे किंवा भावनिकदृष्ट्या अलिप्त होणे, मी मरायला हवे अशा प्रकारची वक्तव्ये करणे किंवा अन्न घेणे बंद करणे, अशी लक्षणे दिसू शकतात. मात्र हे संकेत नेहमीच लगेच लक्षात येतील असे नाही. कारण मानसिक त्रास आणि दैनंदिन कामकाजातील अडथळे हे स्पष्ट शब्दांत व्यक्त होण्याऐवजी व्यक्तीच्या वर्तनातून दिसून येऊ शकतात. त्यामुळे मानसोपचार तज्ज्ञांनाही हे संकेत तात्काळ ओळखता येतीलच असे नाही. वृद्धापकाळात शारीरिक आजार सामान्य असतात. दीर्घकालीन शारीरिक आजारांनी त्रस्त असलेल्या व्यक्तींमध्ये आत्महत्येचा एक महत्त्वाचा जोखीम घटक असलेले नैराश्य सामान्य व्यक्तींच्या तुलनेत दोन ते तीन पट अधिक आढळते. मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये नैराश्याचे प्रमाण अंदाजे १५ ते ३५ टक्के, कर्करोगाच्या रुग्णांमध्ये २० ते ४० टक्के, उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींमध्ये २० ते ३० टक्के, तर स्ट्रोकनंतर ३० ते ३५ असल्याचे आढळते, असेही डॉ. ममता म्हणाल्या.

मानसिक संकट गंभीर होण्यापूर्वी काय करता येऊ शकते?

डॉ. ममता सूद यांच्या मते, यासाठी अनेक पातळ्यांवर उपाययोजना करणे आवश्यक आहे. शारीरिक आजार आणि दीर्घकालीन वेदनांवर योग्य उपचार व नियंत्रण ठेवणे गरजेचे असते. तसेच नैराश्य आणि बौद्धिक क्षमतांमध्ये होणारी घट यांचा शोध घेणेही महत्वाचे ठरते. या समस्यांना केवळ वृद्धत्वाचा सामान्य भाग मानून दुर्लक्षित करता कामा नये. कुटुंबीयांसाठी प्रतिबंधात्मक उपाय हे फार मोठे किंवा कठीण नसले तरी ते सातत्याने करणे महत्त्वाचे असते. वृद्धांना शारीरिक क्षमतेनुसार दररोज चालणे, स्ट्रेचिंग, हलका योग किंवा श्वसनाचे व्यायाम करण्यास प्रोत्साहन द्यावे. तसेच आनंद देणाऱ्या आणि आवडीच्या गोष्टी सुरू ठेवाव्यात. त्याशिवाय नियमितपणे सामाजिक संपर्क कायम ठेवावा. वेळोवेळी ज्येष्ठ व्यक्तीची शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्थिती कशी आहे, याची कुटुंबीयांनी विचारपूस करावी. समुदायातील विविध गट आणि उपक्रमांमध्ये सहभागी होण्यामुळेही एकटेपणा कमी करून सामाजिक जोडणी वाढवता येऊ शकते, असा सल्लाही डॉ. ममता यांनी दिला आहे.