पक्षातील फुटीनंतर निवडणूक चिन्ह गोठवून पक्षाचे नाव वापरण्यास बंदी का घातली जाते?
पक्षात फूट पडल्यावर दोन्ही गटांकडून पक्षाचे नाव व चिन्हावर दावा केला जातो. यावर निवडणूक आयोगाकडून दोन्ही गटांना नोटीस बजावून त्यांना सुनावणी दिली जाते. निवडणूक चिन्हाबाबत १९६८च्या निवडणूक चिन्ह (वाटप आणि राखीव ठेवणे) नियमाच्या १५व्या परिच्छेदात स्पष्टपणे तरतूद करण्यात आली आहे. यानुसार एखाद्या राजकीय पक्षात फूट पडल्यावर दोन्ही बाजूने नाव आणि चिन्हावर दावा करण्यात आल्यावर निवडणूक आयोगाने संबंधितांना त्यांची बाजू मांडण्याची संधी द्यावी. दोन्ही बाजू किंवा अन्य कोणी दावा करणाऱ्यांची बाजू ऐकून वस्तुस्थितीनीरुप निवडणूक आयोगाने दोन्ही पैकी एका गटाला अधिकृत मान्यता द्यावी किंवा कोणालाच मान्यता देऊ नये, अशी नियमात तरतूद आहे. ही सुनावणी पूर्ण होऊन अंतिम निवाडा होईपर्यंत निवडणूक आयोगाकडून पक्षाचे नाव वापरण्यास बंदी घातली जाते तसेच निवडणूक चिन्ह गोठविण्यात येते.
तृणमूल काँग्रेसचे नाव व चिन्ह तात्पुरत्या स्वरुपात का गोठविण्यात आले आहे?
ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस पक्षात विधानसभा निवडणुकीनंतर फूट पडली. निवडून आलेल्या ८०पैकी ६० आमदारांनी ममता बॅनर्जी यांचे नेतृत्व झुगारून बंड केले. बंडखोर नेते ऋतुब्रत बॅनर्जी यांनी आपल्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस पक्षाला मान्यता मिळावी, अशी मागणी केली होती. यावर सध्या निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू आहे. दरम्यानच्या काळात पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली. ममता बॅनर्जी तसेच बंडखोर गटांच्या उमेदवारांनी अर्जासमावेत पक्षाचे ‘फुले आणि गवत’ हे चिन्ह मिळावे, अशी मागणी केली होती. हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेले होते. निवडणूक आयोगाने पोटनिवडणुका लक्षात घेता ममता बॅनर्जी व बंडखोर गटांना तात्पुरत्या काळासाठी तृणमूल काँग्रेस हे नाव तसेच पक्षाचे चिन्ह वापरण्यास दोन्ही गटांना बंदी घातली. तसेच नवीन नाव व पक्षाचे चिन्ह सुचविण्याचा आदेश दिला होता. दोन्ही गटांनी तीन नावांचे पर्याय दिले होते. यानुसार ममता बॅनर्जी यांच्या गटाला ‘ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ हे पक्षाचे नाव आणि फूटबॉलपटू हे चिन्ह बहाल करण्यात आले. बंडखोर गटाला ‘डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस’ हे नाव व लिफाफा हे चिन्ह देण्यात आले आहे.
शिवसेना व राष्ट्रवादीतील फुटीनंतर अशा प्रकारे नाव व चिन्ह गोठविण्यात आले होते का?
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत तर अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत फूट पडली होती. शिवसेनेतील फुटीनंतर दोन महिन्यांतच अंधेरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती. तेव्हा ठाकरे गटाला शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह वापरण्यास बंदी घालावी, असा अर्ज शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे केला होता. निवडणूक आयोगाने ऑक्टोबर २०२२मध्ये तात्पुरत्या स्वरुपात शिवसेना हे नाव वापरण्यास बंदी घातली होती. तसेच धनुष्यबाण हे चिन्ह गोठविले होते. तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव व मशाल चिन्ह बहाल करण्यात आले होते. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव आणि ढाल तलवार चिन्ह देण्यात आले होते. पुढे फेब्रुवारी २०२३मध्ये शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला देण्यात आले. राष्ट्रवादीतील फुटीनंतर घड्याळ हे चिन्ह गोठविण्यात आले नव्हते. निवडणूक आयोगाने अंतिम निवाडा करताना राष्ट्रवादी हे नाव व घड्याळ चिन्ह अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला देण्यात आले. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार हे नाव आणि तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह देण्यात आले.
अन्य कोणत्या पक्षाचे चिन्ह अलीकडे गोठविण्यात आले होते का?
रामविलास पासवान यांच्या मृत्यूनंतर त्यांचे भाऊ व पुत्र चिराग यांच्यात पक्षाची सूत्र कोणाकडे यावरून वाद झाा होता. तेव्हा निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठविले होते.
santosh.pradhan@expressindia.com
