जगभरात इलेक्ट्रिक कारची लोकप्रियता झपाट्याने वाढली असून दर महिन्याला लाखो वाहनांची विक्री होत आहे. मात्र, या कारमधून प्रवास करताना काही लोकांना मळमळ होणे, चक्कर येणे आणि अस्वस्थ जाणवणे यांसारख्या समस्या निर्माण होत एका संशोधनातून समोर आले आहे. विशेष बाब म्हणजे पेट्रोल-डिझेलवरील वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक कारमधील प्रवाशांना हा त्रास अधिकच जाणवत असल्याचे या संशोधनात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बॅटरीवर धावणाऱ्या वाहनांतून प्रवास करताना अशा समस्या का निर्माण होतात? यामागची नेमकी कारणे काय? त्याविषयीचा हा आढावा…

इंधनाला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांना जगभरात मोठी पसंती मिळत आहे. सध्या दर महिन्याला सुमारे १८ ते २० लाख इलेक्ट्रिक वाहनांची विक्री होत असल्याची माहिती आहे. २०२३ मध्ये जगभरात विकल्या गेलेल्या नवीन कारपैकी १८ टक्के कार इलेक्ट्रिक होत्या. २०२४ मध्ये हे प्रमाण २२ टक्क्यांवर पोहोचले, तर सप्टेंबर २०२६ पर्यंत ते २४ ते २७ टक्क्यांपर्यंत वाढल्याचा अंदाज आहे. मात्र, इलेक्ट्रिक कारची लोकप्रियता वाढत असतानाच एका वेगळ्याच समस्येकडे लक्ष वेधले जात आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार, इलेक्ट्रिक कारमधून प्रवास करताना काही लोकांना पेट्रोल-डिझेलच्या कारच्या तुलनेत अधिक मळमळ होत असल्याचे जाणवले आहे. लहान मुलांनाही असा त्रास होत असल्याचे काही पालकांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे, या तक्रारी प्रामुख्याने चालकाच्या शेजारी किंवा मागील सीटवर बसलेल्या प्रवाशांनी केल्या आहेत. दुसरीकडे, इलेक्ट्रिक कार चालवणाऱ्या काही चालकांनी मात्र आपल्याला असा त्रास होत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

याबाबत वैद्यकीय तज्ज्ञ काय सांगतात?

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, इतर वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक कारमधून प्रवास करताना काही लोकांना ‘मोशन सिकनेस’ म्हणजेच मळमळ, चक्कर येणे तसेच उलट्या होण्याचा त्रास अधिकच जाणवतो. याबाबत शिकागो येथील मेंदू आणि मज्जासंस्था विकाराचे तज्ज्ञ डॉ. निकोलस हॅक यांनी बीबीसीला सांगितले की, काही लोकांना इलेक्ट्रिक वाहनांमधून प्रवास करताना अधिक मळमळ होत असल्याचे आम्हाला जाणवले. मात्र, या समस्येमागचे नेमके कारण शोधण्यासाठी अद्याप संशोधन सुरू आहे. याबाबत ठोस निष्कर्ष काढण्यासाठी पुरेसा डेटा उपलब्ध नाही आणि प्रत्येकालाच हा त्रास होतो असेही नाही. बीबीसीशी बोलताना अनेक इलेक्ट्रिक कारचालकांनी आपल्याला असा कोणताही त्रास झालेला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

इलेक्ट्रिक कारमध्ये बसल्यावर शरीरात काय होते?

फ्रान्समधील एका विद्यापीठात कारमधून प्रवास करताना होणाऱ्या त्रासावर संशोधन करणारे पीएचडीचे विद्यार्थी विल्यम एमॉन्ड यांनी द गार्डियनशी बोलताना यामागचे एक संभाव्य कारण स्पष्ट केले. त्यांच्या मते, इलेक्ट्रिक कारमधून प्रवास करण्याची सवय नसल्यामुळे काही लोकांना मळमळ होऊ शकते. कारण त्यांचा मेंदू वाहनाच्या हालचालींचा अंदाज घेण्यासाठी आधीच्या अनुभवांवर अवलंबून असतो. सोप्या भाषेत सांगायचे तर, एखाद्या व्यक्तीने आयुष्यभर पेट्रोल किंवा डिझेलच्या कारमधून प्रवास केला असेल, तर त्याच्या मेंदूला इंजिनचा आवाज आणि त्यातील बदलांची सवय झालेली असते. वाहनाचा वेग वाढण्यापूर्वी इंजिनचा आवाज बदलतो. त्यामुळे वेगात बदल होणार असल्याचे संकेत मेंदूला मिळतात. मात्र, इलेक्ट्रिक कारमध्ये मोटारीचा आवाज तुलनेने कमी असतो. त्यामुळे वाहनाचा वेग अचानक वाढला किंवा कमी झाला, तर मेंदूला त्या हालचालीचा आधीच अंदाज येत नाही. परिणामी काही प्रवाशांना मळमळ होणे, चक्कर येणे तसेच अस्वस्थता जाणवू शकते. इलेक्ट्रिक कारमधील या वेगळ्या अनुभवाशी मेंदूला जुळवून घेण्यासाठी काही वेळ लागू शकतो, असेही एमॉन्ड यांनी स्पष्ट केले.

इलेक्ट्रिक कारमध्ये प्रवाशांना जास्त मळमळ का होते?

यापूर्वी काही संशोधनांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची वैशिष्ट्ये आणि ‘मोशन सिकनेस’ यांच्यातील संभाव्य संबंधांचा अभ्यास करण्यात आला होता. २०२० मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात इलेक्ट्रिक कारमध्ये इंजिनचा आवाज नसणे हे प्रवासादरम्यान मळमळ होण्यामागील एक संभाव्य कारण असल्याचे नमूद करण्यात आले होते. २०२४ मधील अशाच एका अभ्यासात इलेक्ट्रिक वाहनांच्या सीटमधून जाणवणारी कंपने आणि मोशन सिकनेसची तीव्रता यांच्यात संबंध असल्याचे सांगण्यात आले होते. इलेक्ट्रिक कारमध्ये गिअर बदलण्याची गरज नसते. एक्सलेटर दाबताच ही वाहने भरधाव वेग पकडतात. त्यामुळे वेगात अचानक होणाऱ्या या बदलामुळे प्रवाशांच्या शरीराला सावरता येत नाही आणि त्यांना अस्वस्थ वाटू लागते. तसेच इलेक्ट्रिक वाहनांमध्ये चालकाने एक्सलेटरवरून पाय काढताच गाडीचा वेग वेगाने कमी होतो. यामुळे प्रवाशांना कार थांबताना सतत सौम्य धक्के बसल्यासारखे वाटते. अशा हालचालींची शरीराला सवय नसल्यामुळे त्यांना मळमळ सुरू होते, असे या संशोधनात नमूद करण्यात आले होते. त्याशिवाय पेट्रोल-डिझेलच्या कारमध्ये इंजिनचा आवाज, गिअर बदलणे यांवरून गाडी वेग घेणार आहे की हळू होणार आहे, याचा मेंदूला आधीच अंदाज येतो. इलेक्ट्रिक कार पूर्णपणे शांत असल्याने मेंदूला असे कोणतेही संकेत मिळत नाहीत. त्यामुळे हालचालींचा अंदाज न आल्याने मेंदू गोंधळात पडतो आणि चक्कर किंवा मळमळ जाणवू लागते, असेही संशोधनात स्पष्ट करण्यात आले होते.

इलेक्ट्रिक कारमधील मळमळ-उलट्यांचा त्रास कसा टाळाल?

  • पुढच्या सीटवर बसा : शक्य असल्यास चालकाच्या शेजारील सीटवर बसा. त्यामुळे गाडीच्या हालचालींचा अंदाज येतो आणि मळमळ कमी होण्यास मदत होऊ शकते.
  • समोरच्या रस्त्याकडे पाहा : मागच्या सीटवर बसल्यावर मळमळ होत असेल, तर समोरच्या काचेतून दिसणाऱ्या रस्त्याकडे पाहिल्यास त्रास कमी होऊ शकतो.
  • मोबाईलचा वापर टाळा : प्रवासादरम्यान मोबाइलवर वाचणे, व्हिडिओ पाहणे किंवा सतत खाली मान घालून बसणे टाळा, यामुळे मळमळ वाढू शकते.
  • डोके स्थिर ठेवा : बसताना डोके सीटच्या मागील आधाराला टेकवून ठेवा. त्यामुळे गाडीच्या हालचालींमुळे डोके हलण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.
  • सीट थोडी मागे झुकवा : शक्य असल्यास सीट आरामदायी स्थितीत थोडी मागे करून बसा. यामुळे प्रवासात आराम मिळू शकतो.
  • ताजी हवा घ्या : शक्य असल्यास खिडकी उघडा किंवा एसीमधून हवा येईल अशी व्यवस्था करा. ताजी हवा मिळाल्याने काही लोकांना मळमळ कमी होऊ शकते.
  • प्रवासाची हळूहळू सवय लावा : इलेक्ट्रिक कारमधून वारंवार प्रवास केल्याने मेंदूला गाडीच्या हालचालींची सवय होऊ शकते आणि कालांतराने मळमळीचा त्रासही कमी होऊ शकतो.
  • इलेक्ट्रिक कारमधून प्रवास करताना या सोप्या उपायांचा वापर केल्यास मळमळ आणि अस्वस्थता कमी करण्यास मदत होऊ शकते, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.