संशोधकांची मागणी नेमकी काय?: केंद्र सरकारने भारतात चित्ता पुनस्र्थापित करण्यासाठी ‘प्रोजेक्ट चित्ता’ची आखणी केली. हा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासूनचा असला तरीही चार वर्षांपूर्वी तो प्रत्यक्षात मार्गी लागला. मात्र, अतिशय महत्त्वाकांक्षी असणारा हा प्रकल्प सुरुवातीपासूनच पर्यावरणतज्ज्ञ, वन्यजीव शास्त्रज्ञांमध्ये वादाचा विषय ठरला आहे. भारतात सात दशकांनंतर पहिल्या फेरीत नामिबिया, दुसर्‍या फेरीत दक्षिण आफ्रिका आणि तिसर्‍या फेरीत बोत्सवाना येथून चित्ते आणले. त्यांना मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले. मात्र संशोधकांच्या म्हणण्यानुसार या प्रकल्पासाठी वैज्ञानिक आधार, अधिवासाची क्षमता आणि सामाजिक वास्तव या बाबींचे पुरेसे मूल्यांकन झालेले नाही. त्यामुळे पुढील टप्प्यात आफ्रिकन चित्त्यांची आयात थांबवून आधी विद्यमान परिस्थितीचे पुनर्मूल्यांकन करावे, अशी त्यांची मागणी आहे. आफ्रिकेतून आणलेल्या चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडून भारतात या नामशेष झालेल्या प्रजातीची पुनस्र्थापना करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, या प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत आणि त्यामागील वैज्ञानिक आधाराबाबत अलीकडे अनेक वन्यजीव शास्त्रज्ञ आणि संवर्धन तज्ज्ञांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

अधिवासाची मर्यादित क्षमता आहे का?

चित्त्यासारख्या वेगवान शिकारी प्राण्यासाठी मोठा, सलग आणि तुलनेने मोकळा अधिवास आवश्यक असतो. आफ्रिकेतील अभ्यासानुसार चित्त्यांमधील नर सुमारे ४०० चौरस किलोमीटर तर मादी ६५० चौरस किलोमीटरपर्यंत क्षेत्र व्यापू शकतात. त्यामुळे एका प्रदेशात चित्त्यांची संख्या नैसर्गिकरीत्या कमी घनतेतच टिकते. या पार्श्वभूमीवर कुनो राष्ट्रीय उद्यानाचा विस्तार लक्षात घेतला तर तो सुमारे ७४८ चौरस किलोमीटर आहे. त्यामुळे या परिसरात दीर्घकाळ टिकणार्‍या चित्त्यांची संख्या मर्यादित राहू शकते, असे संशोधकांचे म्हणणे आहे. तर काही अभ्यासांनुसार या प्रदेशाची प्रत्यक्ष वहन क्षमता साधारण दहा प्रौढ चित्त्यांपर्यंतच असू शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत या ठिकाणी मोठ्या संख्येने चित्ते आणल्यास ते या उद्यानाबाहेर भटकू शकतात. ते मानवी वस्तीजवळ पोहोचल्यास मानव-चित्ता संघर्ष नव्याने सुरू होण्याची दाट शक्यता आहे. कारण यापूर्वी उद्यानातील चित्त्यांनी गावांच्या सीमा गाठल्या आहेत.

चित्त्यांच्या आहारावर प्रश्नचिन्ह का?

एका प्रदेशातून दुसर्‍या प्रदेशात आणलेल्या चित्त्यांना त्या प्रदेशात टिकून राहण्यासाठी शिकार प्रजातींची उपलब्धता हा दुसरा महत्त्वाचा घटक मानला जातो. चित्त्यांचा आहार प्रामुख्याने चितळ, चिंकारा, काळवीट किंवा ससा यांसारख्या मध्यम आकाराच्या शाकाहारी प्राण्यांवर अवलंबून असतो. काही तज्ज्ञांच्या मते कुनो परिसरात या प्रजातींची घनता आफ्रिकेतील गवताळ अधिवासांच्या तुलनेत कमी आहे. शिकार पुरेशी नसेल तर चित्त्यांना अन्नाच्या शोधात मोठ्या क्षेत्रात फिरावे लागते आणि त्यामुळे ते उद्यानाबाहेर जाण्याची शक्यता वाढते. अशा वेळी जनावरांवर हल्ल्याच्या घटना घडू शकतात आणि मानवी-वन्यजीव संघर्ष तीव्र होण्याचा धोका निर्माण होतो. कुनो राष्ट्रीय उद्यानात प्रति चौरस किलोमीटर २० चितळ आहेत. २०१४ मध्ये ही संख्या ६० होती. २०१४च्या तुलनेत आता ही संख्या घटली आहे. एका चौरस किलोमीटरमध्ये २० चितळ असणे ही १५ चित्त्यांसाठी पुरेशी शिकार आहे, पण सुरुवातीला २० आणि आता वाढलेल्या चित्त्यांसाठी ही शिकार पुरेशी नाही. दक्षिण आफ्रिकेत चित्ते इम्पाला, चिंकारा, काळवीट या प्राण्यांची शिकार करतात.

तज्ज्ञांना या प्रकल्पात कोणत्या सुधारणा हव्यात?

या प्रकल्पाच्या व्यवस्थापन पद्धतीवरही काही शास्त्रज्ञांनी टीका केली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात अनेक चित्ते बराच काळ विशिष्ठ भागात पण निगराणीसाखी ठेवण्यात आले होते. त्यांना नवीन अधिवासाशी जुळवून घेण्यासाठी ही प्रक्रिया आवश्यक होती. तरीही काही तज्ज्ञांच्या मते प्रकल्पाचा भर चित्त्यांची संख्या वाढवण्यापेक्षा व्यवस्थापित प्रजनन किंवा नियंत्रित व्यवस्थापनावर जास्त दिसतो. त्यामुळे चित्त्यांची संख्या वाढवण्याचे उद्दिष्ट साध्य होईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्याच्या परिस्थितीत आफ्रिकेतून आणखी चित्ते आयात करण्याऐवजी आधी उपलब्ध अधिवास मजबूत करणे, शिकार प्रजाती वाढवणे आणि स्थानिक समुदायांचा विश्वास संपादन करणे अधिक महत्त्वाचे असल्याचा त्यांचा युक्तिवाद आहे. अधिवास आणि शिकार प्रजातींचे स्वतंत्र वैज्ञानिक मूल्यमापन करून स्थानिक समुदायांचा सहभाग वाढवणे तसेच दीर्घकालीन संवर्धन धोरण आखणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, या सुधारणा केल्याशिवाय प्रकल्पाचा विस्तार करणे पर्यावरणीय आणि आर्थिकदृष्ट्या धोकादायक ठरू शकते.