Heart Attack in Gym : शरीर आणि हृदय तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपण ज्या जिममध्ये जातो, अशाच ठिकाणी एका डॉक्टरचं हृदय अचानक थांबलं. आसाममधील नागाव मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलचे ४७ वर्षीय असोसिएट प्रोफेसर डॉ. साहिन रहमान व्यायाम करत असताना अचानक कोसळले. त्यांना शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न केले गेले; मात्र ते फोल ठरले.

डॉक्टर नेहमी आपल्याला आरोग्याची काळजी, व्यायाम आणि फिटनेस याबाबत इतरांना सल्ला देत असतात. त्यामुळे डॉक्टरांना हृदयविकाराचा झटका येणं ही गांभीर्याची बाब आहे. त्यामुळे ‘वरून तंदुरुस्त वाटणाऱ्या व्यक्तीचं हृदयही सक्षम असेल का,’ हा प्रश्नही ही बाब उपस्थित करते.

बंगळुरूतील स्पर्श हॉस्पिटलचे लीड कार्डिओलॉजिस्ट डॉ. रंजन शेट्टी यांच्या मते, हृदयविकाराचा धोका केवळ वय किंवा शरीराच्या फिटनेसवर अवलंबून नसतो. हृदयाच्या लयीत अचानक बिघाड, ताण, झोपेची कमतरता, शरीरातील पाण्याची कमतरता किंवा आधीपासून हृदयाची समस्या असेल; पण त्याचं निदान झालं नसेल, तर यामुळे अचानक हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

फिट दिसणं म्हणजे हृदय सक्षम असणं नाही

सडपातळ शरीर, नियमित व्यायाम, कमी हार्ट रेट किंवा अनेक किलोमीटर सहज धावण्याची आणि वजन उचलण्याची क्षमता आपल्यात असल्याने आपण स्वतःला फिट समजतो. पण, त्यापैकी कोणतीही गोष्ट हृदय पूर्णपणे तंदुरुस्त असल्याची खात्री देऊ शकत नाही.

कष्टदायी व्यायाम करताना हृदयाचे ठोके वाढतात, रक्तदाब वाढतो आणि शरीराला अधिक ऑक्सिजनची गरज भासते. तंदुरुस्त हृदयासाठी ही शरीरातील सामान्य प्रक्रिया आहे. मात्र, हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये आधीपासून काही समस्या असेल, हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता असेल किंवा हृदयाच्या रचनेशी संबंधित काही दोष असेल, तर व्यायामादरम्यान हृदयावर अचानक वाढलेला ताण गंभीर परिस्थिती निर्माण करू शकतो. व्यायामादरम्यान हृदयावरील ताण वाढला, तर शरीरात आधीपासून शरीरात दडलेली समस्या समोर येऊ शकते.

चाळिशीनंतर धोका का वाढतो?

डॉ. रंजन शेट्टी पुढे सांगतात, चाळिशीनंतर वय, जीवनशैली आणि अनेक वर्षांच्या सवयींचा हृदयाच्या आरोग्यावर परिणाम दिसू लागतो. कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, मधुमेह, तंबाखूचे सेवन, अपुरी झोप, मानसिक ताण, चुकीचा आहार, मद्यपान आणि कुटुंबातील हृदयविकाराची पार्श्वभूमी यांमुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

विशेष म्हणजे, व्यक्तीला यापैकी एखादी जोखीम असूनही कधी कधी स्पष्ट लक्षणं जाणवत नाहीत. त्यामुळे बाहेरून पूर्णपणे तंदुरुस्त वाटणाऱ्या व्यक्तीच्या शरीरातही हृदयाशी संबंधित समस्या असू शकते, असेही डॉ. रंजन शेट्टी नमूद करतात.

डॉक्टरांनाही ताणापासून सुटका नाही

डॉक्टर रुग्णांना नियमित व्यायाम, पुरेशी झोप, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्याचा सल्ला देतात. मात्र, त्यांच्या स्वतःच्या कामाच्या पद्धतीमुळे हे सगळं पाळणं अनेकदा त्यांना कठीण होतं.

अनेक तासांची ड्युटी, रात्रीच्या शिफ्ट, अपुरी झोप, सततचा मानसिक ताण आणि वेळेवर जेवण न होणं याचा त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होतो. वर्षानुवर्षे शरीराच्या वेळेच्या विरुद्ध काम करण्याची सवय, दीर्घकाळाचा ताण आणि झोपेची कमतरता यांमुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचा धोका वाढू शकतो.

व्यायाम कधी ठरू शकतो ‘स्ट्रेस टेस्ट’?

कठीण व्यायाम म्हणजे हृदयावर टाकलेला एका प्रकारचा नियंत्रित ताणच असतो. हृदयाचे ठोके वाढतात, रक्तदाब वाढतो, शरीरात अॅ़ड्रेनाईल स्रवते आणि स्नायूंना जास्त ऑक्सिजनची गरज भासते. निरोगी व्यक्तीसाठी ही प्रक्रिया फायदेशीर असते.

पण, एखाद्याला हृदयाची समस्या आहे आणि ते त्याला माहीत नसेल, तर अचानक कठीण प्रकारचा व्यायाम सुरू केल्याने धोका वाढू शकतो. विशेषतः जास्त वजन उचलणे, क्षमतेपेक्षा जास्त कार्डिओचा व्यायाम करणे, शरीराला सवय नसताना अतितीव्र व्यायाम करणे किंवा डिहायड्रेशन यांमुळे शरीरावरचा ताण वाढतो.

एका व्यक्तीसाठी फायदेशीर ठरणारा व्यायाम दुसऱ्या व्यक्तीसाठी तितकाच सुरक्षित असेलच, असं नाही, असेही डॉ. रंजन शेट्टी स्पष्ट करतात.
शरीर देत असलेले संकेत दुर्लक्षित करू नका

काही लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत. मात्र, काही जणांमध्ये शरीर आधीच संकेत देत असते; पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

व्यायाम करताना किंवा व्यायामानंतर अचानक श्वासांची गती वाढणे, छातीत दडपण किंवा अस्वस्थता, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे, हृदयाची धडधड जाणवणे किंवा पूर्वीपेक्षा व्यायाम करण्याची क्षमता कमी होणे अशी लक्षणे दिसल्यास ती केवळ थकवा म्हणून त्यांकडे दुर्लक्ष करू नये, असे डॉ. शेट्टी सूचित करतात.

ही लक्षणे नेहमी हृदयविकाराचीच असतात, असे नाही. मात्र, ती वारंवार उद्भवत असतील किंवा व्यायामादरम्यान किंवा व्यायामानंतर जाणवत असतील, तेव्हा तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

हृदयाची तपासणी वयाच्या चाळिशीनंतरच का?

तज्ज्ञांच्या मते, हृदयाशी संबंधित जोखमींचं मूल्यांकन मध्यम वयापर्यंत थांबवू नये. कोलेस्ट्रॉल, रक्तातील साखर, लठ्ठपणा आणि रक्तदाब यांसारख्या घटकांची तपासणी लवकर सुरू करणे महत्त्वाचे आहे.

विशेषतः अनेक दिवस व्यायाम न करता, अचानक अतितीव्र व्यायाम सुरू करणार असाल, तर शरीराची क्षमता लक्षात घेणे गरजेचे आहे. गरजेनुसार डॉक्टर ईसीजी, 2D इको, स्ट्रेस टेस्ट किंवा सीटी कोरोनरी स्कॅनसारख्या तपासण्या सुचवू शकतात.

आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे सार्वजनिक ठिकाणी Automated External Defibrillator (AED) उपलब्ध असायला हवेत. हृदयविकाराचा झटका येण्याच्या वेळी योग्य प्रशिक्षणासह AEDचा तातडीने वापर केल्यास हृदयाची असामान्य लय सामान्य करण्यास मदत होऊ शकते, तसेच रुग्ण तत्काळ बरा होण्याची शक्यता वाढते.